Home LATEST NEWS ताजी बातमी एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये घसरण, ही कंपनी नेमकं काय करते? तिनं मायक्रोसॉफ्ट,अ‍ॅपललाही कसं मागे...

एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये घसरण, ही कंपनी नेमकं काय करते? तिनं मायक्रोसॉफ्ट,अ‍ॅपललाही कसं मागे टाकलं होतं?

6
0

Source :- BBC INDIA NEWS

एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग

वाचन वेळ: 6 मिनिटे

एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांच्याशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत चिप निर्मिती क्षेत्रातील या दिग्गज कंपनीवर पुढील आठवड्यात जाहीर होणाऱ्या तिमाही आर्थिक अहवालातून चांगली कामगिरी करून दाखवण्याचा दबाव वाढला आहे.

दुसरीकडे जेन्सन हुआंग यांना पदावरून हटवण्याचा विचार सुरू असल्याचंही वृत्त समोर येत आहे.

जेन्सन हुआंग यांचे आणखी एका कथित प्रेमसंबंधाबाबतचे वृत्त समोर आल्यानंतर एनव्हिडियाचे शेअर्स बुधवारी (11 नोव्हेंबर) नियमित बाजार व्यवहारादरम्यान जवळपास 8 टक्क्यांनी घसरले.

यापूर्वी वॉल स्ट्रीटवरील दिवसाचा व्यवहार कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवत बंद झाला होता.

बीबीसीच्या उत्तर अमेरिका तंत्रज्ञान विभागाच्या प्रतिनिधी लिली जमाली यांनी एनव्हिडियाच्या संचालक मंडळातील घडामोडींशी जवळचा संबंध असलेल्या काही व्यक्तींशी संवाद साधला आहे.

हुआंग यांचे 2007 पासून कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी कथित प्रेमसंबंध असल्याचा आणखी एक आरोप समोर आल्यानंतर एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांचे भवितव्य फारसे आशादायक दिसत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, हुआंग यांचे एनव्हिडियातील एका महिला कर्मचाऱ्याशीही प्रेमसंबंध होते. यापूर्वी चीनसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या एका महिलेशी त्यांचे संबंध असल्याचे वृत्त समोर आले होते.

वॉल स्ट्रीट जर्नल आणि फायनान्शियल टाइम्सच्या वृत्तांनुसार, हुआंग एनव्हिडियाच्या सीईओ पदावर कायम राहणार की नाही, याबाबत कंपनीचे संचालक मंडळ विचार करत आहे.

जेन्सन हुआंग

यापूर्वी मंगळवारी (10 नोव्हेंबर) एनव्हिडियाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अमेरिकेतील एका नामांकित लॉ फर्मची नियुक्ती केली होती. त्याआधी कंपनीच्या संचालक मंडळाने हुआंग यांना पाठिंबा दर्शवला होता.

या प्रकरणात कंपनीची गोपनीय माहिती किंवा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींशी तडजोड झाल्याचे मानण्यास आपल्याकडे कोणतेही कारण नसल्याचे संचालक मंडळाने म्हटले होते.

बुधवारी (11 नोव्हेंबर) उशीरापर्यंत संचालक मंडळाने याबाबत कोणतेही नवीन निवेदन जारी केले नव्हते. कंपनीच्या अनेक प्रतिनिधींशी आणि संचालक मंडळाच्या सदस्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

एनव्हिडियाच्या चिप्सचा वापर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली, डेटा सेंटर्स, व्हिडिओ गेम्स आणि चालकविरहित वाहनांसारख्या तंत्रज्ञानामध्ये केला जातो.

एआय क्षेत्रात चीनच्या तुलनेत आघाडी मिळवण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांमध्ये या चिप्सची महत्त्वाची भूमिका आहे.

राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत अमेरिकेने 2022 पासून एनव्हिडियाच्या सर्वाधिक प्रगत चिप्स चीनला निर्यात करण्यावर निर्बंध लादले. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात यापैकी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

जेन्सन हुआंग यांनी स्वतःच्याच कंपनीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे का?

एनव्हिडियाच्या नियमावलीनुसार, कर्मचाऱ्यांनी आपल्या कृतीमुळे हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होईल, अशा परिस्थिती टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये वैयक्तिक संबंधांचाही समावेश आहे. गैरवर्तनाच्या तक्रारींची तातडीने चौकशी केली जाते, असंही कंपनीने स्पष्ट केले आहे.

एनव्हिडियाच्या आचारसंहितेबाबत यापूर्वी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका संदेशात हुआंग यांनी कंपनीची मूलभूत मूल्ये जपण्याचे आणि उच्च नैतिक मानदंडांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, हुआंग यांचं आणखी एक कथित प्रेमप्रकरण समोर आलं असून त्यानंतर आता त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

हुआंग यांचा एका संशयित चिनी महिला गुप्तहेराशी संबंध असल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर चीन आणि अमेरिकेसह जगभरात अक्षरश: खळबळ उडाली असून या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे.

एनव्हिडिया

रविवारी (8 नोव्हेंबर) कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका निवेदनात त्यांनी विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिली होती. तसेच कर्मचाऱ्यांची माफीही मागितली होती.

“मी माझ्या पत्नीशी एकनिष्ठ राहिलो नाही. माझ्या कृतींमुळे तिला आणि आमच्या मुलांना दुखापत झाली. मी जे केले त्यासाठी कोणतेही समर्थन देता येणार नाही. मी मनापासून माफी मागतो,” असे त्यांनी या निवेदनात लिहिले होते.

दरम्यान, बुधवारी (11 नोव्हेंबर) आणखी एक वृत्त समोर आले. त्यानुसार, हुआंग यांचे एनव्हिडियाच्या हेल्थकेअर विभागाच्या उपाध्यक्ष किम्बर्ली पॉवेल यांच्याशीही कथित विवाहबाह्य संबंध होते, असं पुढे आलं आहे.

एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांच्या भविष्याबाबत चर्चा सुरू असताना, एलन मस्क यांनी त्यांना नोकरी देणं ही आपल्यासाठी ‘सन्मानाची बाब असेल’, असे म्हटलं आहे.

दरम्यान, एनव्हिडिया कंपनी काय करते? गेल्या काही वर्षांत त्यांनी ही झेप कशी घेतली? नेमक्या कोणत्या तंत्रज्ञानाचा त्यांना फायदा होतोय? यासंदर्भात बीबीसी प्रतिनिधी अमृता दुर्वे यांनी 2024 साली एक बातमी केली होती. त्यातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एनव्हिडिया

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रणाली विकसित करणाऱ्या डेव्हलपर्समध्ये सध्या प्रचंड मोठी चढाओढ आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल ज्यांच्या मालकीचं आहे ती अल्फाबेट कंपनी, मेटा आणि अ‍ॅपल या टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्या AI मधलं प्रॉडक्ट विकसित करण्याच्या प्रयत्नांत आहेत. आणि या स्पर्धेचा फायदा एनव्हिडियाला होतोय. कारण AI चिप मार्केटमध्ये या कंपनीचं वर्चस्व आहे.

एनव्हिडिया

एनव्हिडिया ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIच्या सॉफ्टवेअर्ससाठी लागणाऱ्या कॉम्प्युटर चिप्स तयार करते.

पण एनव्हिडियाचं मार्केटमधलं हे वर्चस्व किती काळ टिकेल याविषयी शंकाही व्यक्त केली जातेय. या क्षेत्रातले कंपनीचे स्पर्धक वाढत आहेत, त्यामुळेच सध्या त्यांच्याकडे असणारा बाजाराचा ताबा टिकवणं त्यांना कठीण जाईल असं बार्क्लेजचे क्रेडिट अॅनालिस्ट संदीप गुप्ता यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये म्हटलं होतं.

ग्राफिक्स चिप्स ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स

एनव्हिडियाचे आताचे सीईओ जेनसन हुआंग हे 1993 मध्ये कॅलिफोर्नियात स्थापन झालेल्या या कंपनीच्या सहसंस्थापकांपैकी एक. त्यावेळी एनव्हिडिया कंपनीचा भर होता गेमिंग आणि इतर अॅप्लिकेशन्ससाठीच्या ग्राफिक्स चिप्सवर.

1999 मध्ये या कंपनीने GPU – ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (Graphics Processing Unit) विकसित केलं. यामुळे कॉम्प्युटरचा इमेज डिस्प्ले अधिक चांगला व्हायला मदत झाली. या GPUमुळे अनेक लहान टास्क एकाचवेळी (Simultaneously) करता येणं शक्य झालं. याला पॅरलल प्रोसेसिंग (Parallel Processing) म्हणतात.

पण याच GPU चा आणखी एक वापर 2006 साली स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी शोधला. या GPUचा वापर करून गणितावर आधारीत ऑपरेशन्सचा वेग वाढवता येत असल्याचं त्यांना आढळलं. हे काम नेहमीच्या प्रोसेसिंग चिप्स वापरून फारसं वेगाने होत नव्हतं.

जेन्सन हुआंग

एनव्हिडिया आणि जेनसंग हुआंग यांनी इथूनच पुढे मग AI च्या विकासावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं.

GPU प्रोग्रॅम करता यावेत यासाठीचं टूल तयार करण्यासाठीच्या संशोधनावर एनव्हिडियाने मोठी गुंतवणूक केली. आणि इथेच एनव्हिडियाने ग्राफिक्सच्या पलीकडे जाऊन नवीन क्षेत्रात आपण काय करू शकतो, याचा विचार करायला सुरुवात केली.

एनव्हिडियाच्या कॉम्प्युटर चिप्समध्ये हे नवं टूल जोडण्यात आलं. खरंतर त्या वेळी कॉम्प्युटर गेमर्सना याची गरज नव्हती आणि त्याबद्दल त्यांना फारशी माहिती नव्हती. पण सामान्य माणसासाठी तयार करण्यात आलेला कम्प्युटर आणि हार्डवेअरवर ‘हाय परफॉर्मन्स कम्प्युटर’ करता येणं ही संशोधकांसाठी मोठी गोष्ट होती.

यावरूनच पुढे मग आताच्या आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्समधली पुढची प्रगती झाली.

एनव्हिडियाभोवती वादाचे ढग

दरम्यान, 2012मध्ये अॅलेक्सनेट (Alexnet) आलं. असं AI जे फोटो ओळखू – निर्माण करू शकत होतं. एनव्हिडियाचे दोन प्रोग्रॅम करता येण्याजोगे GPU वापरून या अॅलेक्सनेटला ट्रेन करण्यात आलं होतं. नेहमीच्या प्रोसेसिंग चिप्सवर ज्या कामाला महिने लागले असते ते काम काही दिवसांत करण्यात आलं होतं.

यानंतर मग एनव्हिडियाने AIसाठी अधिक योग्य असणारे जीपीयू तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यात मोठी गुंतवणूक केली. आणि सोबतच ही टेक्नॉलॉजी वापरणं सोपं करणारी सॉफ्टवेअर्सही त्यांनी तयार केली.

दशकभराचा काळ आणि अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीनंतर चॅटGPT (ChatGPT) अस्तित्वात आलं आणि AIचं क्षेत्रच बदललं.

चॅट GPT आणि एनव्हिडिया

2022 मध्ये ChatGPT लाँच झाल्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्समधला इंडस्ट्रीचा आणि सामान्यांचाही रस प्रचंड वाढला.

एनव्हिडियाची 10,000 ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स एकत्र जोडून तयार करण्यात आलेल्या सुपर कम्प्युटरचा वापर करून चॅटGPTचा हा चॅटबॉट ट्रेन करण्यात आला होता.

यामुळेच मग एनव्हिडियाचा समावेश मे 2023 मध्ये अशा अमेरिकन कंपन्यांच्या यादीत झाला ज्यांचं मूल्य 1 ट्रिलीयन (1 लाख कोटी) अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. एनव्हिडिया कंपनी अॅपल, अॅमेझॉन, अल्फाबेट आणि मायक्रोसॉफ्टच्या पंगतीत जाऊन बसली. आणि आता वर्षभराच्या काळात या सगळ्यांपेक्षा मोठी कंपनी बनली.

मार्च महिन्यात एनव्हिडियाने अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चिप बाजारात आणली होती जी तिच्या पूर्वीच्या आवृत्तीपेक्षा 30 पट वेगाने काही कामं करू शकते.

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाजारपेठेतील 80% कंपन्या एनव्हिडियाची उत्पादनं वापरतात.

अ‍ॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआय या कंपन्या एनव्हिडियाची ही नवी AI चिप त्यांच्या क्लाऊड कम्प्युटिंग सेवा आणि त्याची AI उत्पादनं यासाठी वापरण्याची शक्यता असल्याचं जेनसेन हुआंग यांनी म्हटलं होतं.

ही AI चिप लाँच करतानाच एनव्हिडियाने आणखीही काही महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. म्हणजे त्यांनी अशा काही नवीन चिप्स आणल्या, ज्यामुळे एखाद्या कारच्या आतमध्ये चॅटबॉट वापरता येऊ शकतो. BYD आणि Xpeng (उच्चार – शाओपंग) या इलेक्ट्रिक कार्स तयार करणाऱ्या चायनीज कंपन्या या चिप्स वापरणार असल्याचं एनव्हिडियाने म्हटलं होतं.

मात्र, नुकतंच समोर आलेल्या प्रकरणानंतर एनव्हिडियाचे शेअर घसरले असून त्याचा मोठा परिणाम होताना दिसतोय. दुसरीकडे प्रतिस्पर्ध्यांसाठी ही एक मोठी संधीही दिसून येत आहे.

चॅटजीपीटी

एनव्हिडियाच्या शेअर्समधील घसरणीचा प्रतिस्पर्धी एएमडीला किती फायदा?

जेन्सन हुआंग यांच्याशी संबंधित वाद समोर आल्यानंतर एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे, चिप निर्मिती क्षेत्रातील एनव्हिडियाची प्रमुख प्रतिस्पर्धी कंपनी एएमडीच्या शेअर्समध्ये मात्र वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कॅलिफोर्नियास्थित एएमडी कंपनीचे शेअर्स गेल्या पाच दिवसांत 21 टक्क्यांहून अधिक वधारले आहेत.

एनव्हिडियाबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेपासून दूर राहण्यासाठी गुंतवणूकदार आता इतर तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याकडे वळत आहेत.

एएमडीच्या मुख्य कार्यकारी लिसा सु

ग्राफिक्स प्रोसेसर आणि मोठ्या डेटा सेंटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या एआय चिप्सच्या बाजारपेठेत एएमडीची एनव्हिडियाशी स्पर्धा आहे.

एआय तंत्रज्ञानाच्या विकासात या डेटा सेंटर्सची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, एनव्हिडियाच्या तुलनेत एएमडी ही कंपनी अजूनही आकाराने बरीच लहान आहे.

एएमडीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लिसा सु आणि एनव्हिडियाचे सीईओ जेनसन हुआंग हे दूरचे नातेवाईक आहेत. या दोघांचाही जन्म तैवानमध्ये झाला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC