Home LATEST NEWS ताजी बातमी ‘एफआयआर होईपर्यंत हटणार नाही’: पेलेट गनमुळे जखमी झालेल्या युवकासोबत राहुल गांधींचं पोलीस...

‘एफआयआर होईपर्यंत हटणार नाही’: पेलेट गनमुळे जखमी झालेल्या युवकासोबत राहुल गांधींचं पोलीस ठाण्यातच आंदोलन

6
0

Source :- BBC INDIA NEWS

राहुल गांधी

फोटो स्रोत, ANI

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी दिल्लीमध्ये पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत. त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधीही पोलीस ठाण्यात आल्या आहेत.

राहुल गांधींसोबत जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान जखमी झालेला विद्यार्थी साहिल लोचवही आहे. 20 जुलै रोजी पेलेट गनमुळे साहिल जखमी झाल्याचा आरोप आहे.

साहिल लोचवने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल करावा, अशी राहुल गांधी यांची मागणी आहे. याच मागणीसाठी ते पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.

भाजपने राहुल गांधी हे अराजकतेचं राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, ‘ते कायद्याचा आदर करत नाहीत का?’ असा सवाल भाजपने केला आहे.

भाजप नेते रवी शंकर प्रसाद म्हणाले, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जे लोक पीडित आहेत, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने स्वतः एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश करत आहेत.”

रवी शंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या या कृतीचा संबंध ‘वंदे मातरम’वर सुरू असलेल्या वादाशीही जोडला.

ते म्हणाले, “आम्हाला अशी शंका आहे आणि आमचा आरोपही आहे की, वंदे मातरमच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला आहे.”

राहुल गांधी पोलीस ठाण्यात गेल्याच्या प्रकाराला भाजपने अराजकतेचं राजकारण म्हटलं आहे.

खासदार रवी शंकर प्रसाद म्हणाले, “ते कोणतीही परवानगी किंवा पूर्वसूचना न देता संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनास बसले आहेत. ज्या घटनेचा ते उल्लेख करत आहेत, त्याबाबत आधीच एफआयआर दाखल झाला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे, असं पोलिसांनी त्यांना सांगितलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानेही एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे.”

“राहुल गांधी, तुम्हाला कोणत्याही कायद्याचा आदर करायचा नाही का?”, असा सवाल त्यांनी केला.

“वंदे मातरमबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस आता अडचणीत सापडली आहे, असा आमचा आरोप आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सध्या जे काही करत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.”

“देशात असा संदेश गेला आहे की, 1937 मध्ये काँग्रेसवर मुस्लिमांच्या बाजूने भूमिका घेण्याचा दबाव होता, तसाच प्रकार आता 2026 मध्येही होत आहे.”

नेमकं प्रकरण काय आहे?

साहिल लोचवने दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल करावा, अशी राहुल गांधींची मागणी आहे. याच मागणीसाठी ते पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.

राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही संसद मार्ग पोलीस ठाण्यात आले आहेत. दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेस कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहेत.

“राहुल गांधी ठिय्या आंदोलनाला बसले आहेत,” असं काँग्रेसचे सरचिटणीस आणि संपर्क विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी सांगितलं.

20 जुलै रोजी जखमी झालेला साहिल लोचवही राहुल गांधींसोबत उपस्थित आहे.

फोटो स्रोत, INCIndia

आपल्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी राहुल गांधी करत आहेत. सध्या ते साहिल लोचव आणि काँग्रेसच्या खासदार कुमारी शैलजा यांच्यासोबत डीसीपी कार्यालयात उपस्थित आहेत.

काँग्रेसनं गृहमंत्री अमित शाह यांच्यावर पेलेट गन्सचा वापर करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसने ‘एक्स’वर लिहिलं, “अमित शाह यांनी देशातील मुलांवर पेलेट गन चालवण्याचे आदेश दिले. यात साहिलच्या डोळ्याला पेलेट लागून गंभीर दुखापत झाली.”

“साहिल आणि त्याची आई एफआयआर दाखल करण्यासाठी अनेकवेळा पोलिसांकडे गेले, पण पोलिसांनी त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केलं. त्यामुळे आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी साहिल आणि त्याच्या आईसोबत पोलीस अधिकाऱ्यांना भेटले आणि या प्रकरणाच्या चौकशीबाबत माहिती मागितली.”

साहिलच्या तक्रारीवर पोलिसांनी तपास क्रमांक दिलेला नाही. त्यामुळे एफआयआर दाखल झालेली नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

आरटीआयद्वारे काय माहिती समोर आली होती?

टीएमसीचे माजी खासदार साकेत गोखले यांनी आंदोलनादरम्यान पेलेट गनच्या वापराबाबत आरटीआयद्वारे माहिती मिळवली होती.

त्यात पेलेट गनमुळे जखमी झालेल्या लोकांची संख्या किमान 5 असल्याची माहिती समोर आल्याचं साकेत गोखले यांनी सांगितलं होतं.

“पण पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या जास्त त्याच्या दुप्पट, म्हणजेच 10 आहे,” असं त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिलं.

YouTube पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

गोखले यांना मिळालेल्या माहितीनुसार, पेलेट गनने जखमी झालेल्या नऊ जणांना लेडी हार्डिंग रुग्णालयात आणि एकाला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिल्लीतील एम्स (AIIMS) आणि आरएमएल (RML) कडून माहितीासाठी गोखले अजूनही वाट पाहत आहेत.

“ही कसली लोकशाही आहे, जिथं पोलीस पेलेट गन वापरतात, त्याबद्दल खोटं बोलतात आणि चौकशी केल्यावर जखमींची संख्या सांगण्यास नकार देतात?”, असं गोखले यांनी ही सर्व माहिती इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिलं.

“भारताच्या राजधानीत शांततापूर्ण आंदोलकांवर पेलेट गनचा वापर करण्यात आला आणि सरकार तसंच पोलीस अजूनही तपशील लपवत आहेत. मोदी सरकारनं पेलेट गनमुळं जखमी झालेल्या लोकांची निश्चित संख्या अद्याप का जाहीर केली नाही?” असंही त्यांनी पुढं लिहिलं.

राहुल गांधी काय म्हणाले?

आंदोलन करताना राहुल गांधी यांनी 20 जुलै रोजी जंतर मंतरवर पेलेट गनचा वापर करण्यात आला होता असं म्हटलं.

राहुल गांधी यांनी यावेळी एका बॉक्समध्ये ठेवलेले कथित छर्रे दाखवले. ते छर्रे संबंधित तरुणाच्या शरीरातून काढण्यात आल्याचा दावा केला.

“त्यांच्या शरीरात 200 छर्रे आहेत तर तीन छर्रे डोळ्यात आहेत,” असंही ते म्हणाले.

राहुल गांधी, साहिल लोचव आणि त्याची आई

फोटो स्रोत, ANI

दिल्लीतील एम्स आणि लेडी हार्डिंग हॉस्पिटलचे रिपोर्ट त्यांनी दाखवले.

“या अहवालांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, त्यांच्या शरीरात 200 हून अधिक छर्रे आहेत. डोळ्यात तीन छर्रे आहेत. त्या डोळ्याने त्यांना दिसणार नाही आणि त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ छर्रे अडकले आहेत, ते काढता येणार नाहीत,” असंही त्यांनी म्हटलं.

दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, आम्ही पेलेट गनचा वापर केला नाही. पण जर तुम्ही केला नाही, तर कोणीतरी नक्कीच केला. कदाचित दुसऱ्या कोणीतरी त्यांच्यावर या पेलेट गनने गोळ्या झाडल्या असतील. जर दुसऱ्या कोणी त्या झाडल्या नसतील, तर कदाचित त्यांनी स्वतःवरच झाडल्या असतील. आम्हाला फक्त एफआयआर नोंदवला जावा असं वाटतं. जोपर्यंत एफआयआर नोंदवला जात नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC