Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, CJP
वाचन वेळ: 7 मिनिटे
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबई आणि दिल्लीत मोठं आंदोलन सुरु आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानाजवळ कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं आहे. या आंदोलनाच्या मंचावर अभिजीत दिपके, सौरव दास, अजिंक्य शिंदे यांच्यासह मुंबईतील अनेक कलाकार देखील सहभागी झाले आहेत.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यासाठी जमलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांसह शेकडो जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांमध्ये पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज, दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी आणि नेते संजीव झा यांचा समावेश आहे.
याशिवाय राजद खासदार मनोज झा, आयसा अध्यक्ष नेहा बोरा, सीपीएम जनरल सेक्रेटरी एमए बेबी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीनं (सीजेपी) आज 2 ऑक्टोबरला मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. SIR प्रक्रियेविरोधात आणि निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात येत असल्याचं पक्षानं म्हटलं आहे.
दिल्लीतही जंतरमंतरवर सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी, नेत्यांनी आंदोलनासाठी एकत्रित आले. परंतु, दिल्ली पोलिसांनी मुख्य जंतरमंतरवरील आंदोलनाला परवानगी देण्यास नकार दिला होता. त्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
फोटो स्रोत, Getty Images
या आंदोलनाचे आवाहन करणाऱ्यांपैकी एक असलेले वकील प्रशांत भूषण यांनी सांगितले की, मेट्रो स्थानकांपैकी 11 स्थानक बंद करण्यात आले आहे, प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी जंतर-मंतर परिसराला वेढा घातला असून तेथे लोकांना ताब्यात घेतले जात आहे, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, मुंबईतील आंदोलन आणि दिल्लीत लागू करण्यात आलेले निर्बंध यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR प्रक्रियेभोवतीचा राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत.
मुंबईतील आंदोलनाच्या मंचावरून कोण काय म्हणालं?
अभिजित दिपके यांनी आंदोलकांना संबोधित करताना म्हटलं, “आज संपूर्ण देशातून लोक इथे आले आहेत. सगळ्यात आधी महाराष्ट्र पोलिसांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. महाराष्ट्र पोलीस देशातले सर्वोत्तम पोलीस आहेत. मुंबई पोलीस ‘पूकी’ आहेत. मुंबई पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून आदेश आला होता की अभिजीतला ताब्यात घ्या. पण मुंबई पोलिसांनी मला चहा पाजून सोडून दिलं. ते मला म्हणाले की तुम्ही बरोबर करताय.”
दिपके पुढे म्हणाले, “महात्मा गांधींना आपण आज खरी श्रद्धांजली वाहत आहोत. गांधीजींना इंग्रजांनी जेवढा त्रास दिला नसेल तेवढा त्रास आज आम्हाला संघी लोकांकडून होतो आहे. आज इथे आलेला प्रत्येकजण गांधी आहे. यांना वाटलं होतं की गांधींना गोळ्या घालून गांधींनी संपवून टाकू पण गांधी कधीही मरणार नाहीत. आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत गांधी जिवंत राहणार आहेत. गोडसेच्या विचारांच्या लोकांना मला हे सांगायचं आहे. मला यांना हे सांगायचं आहे की गांधी, नेहरू आणि आंबेड्करांपेक्षा मोठं होण्याची तुमची लायकी नाही. गांधी या देशाचा आत्मा असेल तर आंबेडकर या देशाच्या पाठीचा कणा आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नेहरूंनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला होता.”
अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील सडकून टीका केली.

गायक विशाल ददलानी हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांशी बोलताना ते म्हणाले, “निवडणूक आयोगाने माझा अर्ज देखील फेटाळून लावला आहे. कारण मी त्यांना मतदान करणार नाही. हे सगळं घडत आहे, हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आपण आवाज उठवला पाहिजे.”
महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी म्हणाले, “मुंबईने दाखवून दिलं आहे की आम्ही जंतर-मंतर पेक्षा कमी नाही. मुंबई कधीही मागे हटत नाही. मुंबईने इतिहासात दाखवून दिलं आहे की प्रत्येक बदलाची सुरुवात मुंबईतून होते. लाल बहादूर शास्त्रींचा सुद्धा आजचा दिवस आहे. त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ चा नारा दिला होता. आज तरुणांनी त्यांची ताकद इथे दाखवून दिली आहे.”
कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले, “आजची गर्दी बघून मोदींना सांस्कृतिक धक्का तर बसलाच असेल. मागच्या अनेक वर्षांपासून सुरु असलेलं मोदींचं दुकान ज्ञानेश कुमार चालवत आहेत. ते खरे मास्टरमाइंड आहेत. मागच्या दोन वर्षात 13 कोटी लोकांना मतदार यादीतून काढण्यात आलं आहे. देशातल्या 15 टक्के लोकांना काढण्यात आलं आहे. 1950 साली आपण प्रजासत्ताक झालो तेव्हा बाबासाहेब आणि नेहरूंनी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला होता. जगातली सगळ्यात जुनी लोकशाही असणाऱ्या अमेरिकेला मतदानाचा अधिकार द्यायला दोनशे वर्षं लागली होती. या देशात प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला होता. हा अधिकार हिसकावून घेणारे ज्ञानेश कुमार कोण आहेत?”
सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास म्हणाले, “आज खऱ्या अर्थाने मुंबई स्पिरिट दिसत आहे. आज दिल्लीत आपल्यासारख्या अनेकांना जंतर-मंतरवर जायचं होतं पण दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांच्यासोबत क्रूरता केली आहे. या मंचावरून आम्ही दिल्ली पोलिसांना पुन्हा एकदा इशारा देत आहोत. जंतर-मंतरवर न्याय आहे. त्या जागेवर लोकांचा विश्वास आहे. तिथे तरुणांची अनेक स्वप्नं आहेत म्हणून मोदी आणि शहांनी त्या जागेला कुलूपबंद केलं आहे. या देशात एवढी मोठी चोरी होत आहेत. या देशातल्या जेन-झीकडून मतदान करण्याचा अधिकार हिसकावून घेण्यात आला आहे. ज्ञानेश कुमार आता आम्ही हे सहन करणार नाही. आता तुमचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही घरी परतणार नाही. दोन वर्षांपासून आपल्या मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला आहे.”
सीजेपीचं आज मुंबईत आंदोलन, दिल्लीत जंतर-मंतरवर कडक सुरक्षा व्यवस्था
सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी गुरुवारी (1 ऑक्टोबर) सांगितलं की, मुंबईतील शिवाजी पार्क येथून आंदोलनाची सुरुवात केली जाणार असून त्यानंतर ते देशभर नेलं जाईल.
सौरव दास म्हणाले, “आता संपूर्ण देशाला हे समजलं आहे की आपण कितीही मोहिमा राबवल्या तरी ही मोडकळीस आलेली, भ्रष्ट व्यवस्था या देशातील तरुणांचे आयुष्य आणि भवितव्य गिळंकृत करत आहे.”
फोटो स्रोत, Getty Images
ते पुढं म्हणाले, “आम्ही बदलाची मागणी करत आलो आहोत, पण आपल्या समाजात काहीही बदल घडवून आणण्यासाठी उरलेलं एकमेव साधन म्हणजे मतदानाचा अधिकार, जर आपल्याकडून हिरावून घेतला गेला तर कोणताही बदल होणार नाही.”
“त्यामुळे प्रत्येकाला ही व्यवस्था बदलण्याची समान संधी मिळावी आणि चांगली व्यवस्था उभारण्यासाठी समान पातळीवर स्पर्धा करण्याची संधी मिळावी यासाठी या देशातील तरुण पिढीने ही समस्या दुरुस्त केलीच पाहिजे, असा निर्णय घेतला आहे. “
फोटो स्रोत, Getty Images
“शुक्रवारपासून शिवाजी पार्क येथून आंदोलन सुरू होईल आणि ते देशभर नेलं जाईल. ज्ञानेश कुमार राजीनामा देईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. त्यांना जावंच लागेल. ते या देशाचे गद्दार आहेत, देशाचे शत्रू क्रमांक एक आहेत. त्यांना त्या पदावरून हटवलंच जाईल, त्यांनी केलेले सर्व गुन्हे उघड केले जातील आणि देशातील तरुण पिढीविरुद्ध तसेच देशाविरुद्ध त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची किंमत त्यांना मोजावी लागेल.”
सीजेपीच्या मुख्य मागण्या काय?
या आंदोलनासाठी सीजेपीने तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी आणि त्यांना आदेश कोणी दिले हे जाहीर करावं, SIR प्रक्रिया स्थगित करावी, जानेवारी 2025 मधील मतदार यादी पुन्हा लागू करावी व स्वतंत्र चौकशी करावी, तसेच 2023 चा नियुक्ती कायदा रद्द करून नागरी समाजाच्या सहभागातून पारदर्शक नियुक्ती प्रक्रिया लागू करावी, या मागण्यांचा समावेश आहे.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी गुरुवारी 1 ऑक्टोबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषणा केली. ते म्हणाले, “आम्ही उद्या मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आमचं आंदोलन सुरू करणार आहोत.”
फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणाले, “आमची मागणी आहे की SIR प्रक्रिया तात्काळ थांबवावी, निवडणुका 2025 च्या मतदार यादीच्या आधारे घ्याव्यात आणि नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड स्वतंत्र संस्थेमार्फत केली जावी.”
दीपके यांनी सांगितलं की, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणे, SIR प्रक्रियेला स्थगिती देणे, 2025 च्या मतदार यादीच्या आधारे निवडणुका घेणे आणि नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करणे या आंदोलनातील प्रमुख मागण्या आहेत. त्यांच्या मते, ज्ञानेश कुमार पदाचा राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरू राहील.
जंतर-मंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था
दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा यांनी सांगितलं, “जंतर-मंतर येथे कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला किंवा मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.”
त्याचवेळी दिल्ली मेट्रोने जंतर-मंतर, राजीव चौक, सेंट्रल सेक्रेटरिएटसह 11 स्थानकांवरील प्रवेश आणि निर्गमन तात्पुरते बंद केले आहे.
फोटो स्रोत, Getty Images
या मुद्द्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती घटनात्मक पद्धतीने झालेली नाही. घटनात्मक तरतुदीनुसार विरोधी पक्षनेते, भारताचे सरन्यायाधीश आणि पंतप्रधान यांच्या समितीद्वारे निवडणूक आयुक्तांची निवड केली जात होती. मात्र कायद्यात बदल करून ही व्यवस्था बदलण्यात आली. आता मंत्रीच नियुक्ती प्रक्रियेचा भाग असतील. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणूक आयोगाची नियुक्ती केली आहे. याला घटनात्मक आधार नाही. ज्यांनी नियुक्ती केली, त्यांच्यासाठीच संबंधित व्यक्ती काम करेल आणि त्यांचीच स्तुती करेल. ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. जर मतदानाचा अधिकार हिरावून घेतला गेला, जर मतदानाचा अधिकार चोरीला गेला, तर भविष्यात या देशातील लोकशाही जिवंत राहणार नाही असं दिसतं.”
इंडियन एक्सप्रेसच्या एका शोधपत्रकारितेतील वृत्तानंतर विरोधी पक्ष आणि सीजेपी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्या अहवालात निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर 14 वेळा आक्षेप नोंदवल्याचा दावा करण्यात आला होता.
मुंबईतील आंदोलन आणि दिल्लीत लागू करण्यात आलेले निर्बंध यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR प्रक्रियेभोवतीचा राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




