Home LATEST NEWS ताजी बातमी चष्म्यानं स्पष्ट दिसतंय म्हणजे डोळे निरोगी आहेत? दृष्टी कमी होतेय हे कसं...

चष्म्यानं स्पष्ट दिसतंय म्हणजे डोळे निरोगी आहेत? दृष्टी कमी होतेय हे कसं ओळखाल?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

डोळे

  • वाचन वेळ: 9 मिनिटे

रस्त्यावरून चालताना बाजूनं येणारी व्यक्ती अचानक लक्षात येईनाशी होते. रात्री गाडी चालवताना समोरचं पाहणं पूर्वीपेक्षा कठीण वाटू लागतं. वाचताना अक्षरं धूसर दिसतात किंवा सरळ रेषा किंचित वाकड्या भासू लागतात. अनेकदा आपण हे बदल थकवा, वाढतं वय किंवा चष्म्याचा नंबर बदलल्यामुळे होत असतील असं समजून दुर्लक्ष करतो.

पण दृष्टी कमी होण्याची सुरुवात नेहमीच अचानक डोळ्यांसमोर पूर्ण अंधार येण्यानं होत नाही.

काही गंभीर आजार अतिशय हळू आणि फारशी चाहूल न देता पुढे जाऊ शकतात. उदाहरणार्थ, ग्लॉकोमामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणं नसतात. डायबेटिक रेटिनोपथीमध्येही सुरुवातीला काहीच त्रास जाणवत नाही. त्यामुळे दृष्टीमध्ये जाणवणारा बदल हे नेहमीच आजाराचं पहिलं लक्षण असेल असं नाही.

म्हणूनच ‘मला व्यवस्थित दिसतंय, म्हणजे माझे डोळे ठीक आहेत’ ही समजूत काही वेळा धोकादायक ठरू शकते.

मग अशी दृष्टी कमी व्हायला लागल्याचे सुरुवातीचे संकेत कोणते? आपल्याला बाजूचं दिसणं (पेरिफेरल व्हिजन) कमी झालंय हे कसं ओळखायचं? कोणते आजार कोणतीही चाहूल न देता दृष्टीचं नुकसान करू शकतात? आणि डोळ्यांची नियमित तपासणी नेमकी किती महत्त्वाची आहे? याची माहिती घेणं आवश्यक आहे.

दृष्टी धूसर होण्याआधीही डोळ्यांचं नुकसान सुरू झालेलं असू शकतं

आपल्याला स्पष्ट दिसत असेल, वाचताना अडचण येत नसेल आणि डोळे दुखत नसतील तर डोळे पूर्णपणे निरोगी आहेत, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण डोळ्यांच्या काही गंभीर आजारांमध्ये हीच गोष्ट फसवी ठरू शकते.

ग्लॉकोमामध्ये अनेकदा सुरुवातीची स्पष्ट लक्षणं किंवा धोक्याचे संकेत नसतात. डायबेटिक रेटिनोपथीच्या सुरुवातीच्या टप्प्यातही कोणतीही लक्षणं जाणवत नसू शकतात.

वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशनमध्ये मात्र मध्यवर्ती दृष्टीवर परिणाम होऊ शकतो आणि ‘wet AMD’मध्ये सरळ रेषा वाकड्या दिसणं हे सुरुवातीचं लक्षण असू शकतं.

दृष्टी धूसर होण्याआधीही डोळ्यांचं नुकसान सुरू झालेलं असू शकतं

काही बदल मात्र अगदी तातडीचा इशारा असू शकतात. डोळ्यांसमोर अचानक मोठ्या प्रमाणात नवीन ठिपके किंवा धाग्यांसारख्या आकृत्या तरंगताना दिसणं, प्रकाशाच्या चमकदार शलाका दिसणं, बाजूच्या दृष्टीमध्ये सावली जाणवणं किंवा एखादा राखाडी पडदा दृष्टीसमोर आल्यासारखं वाटणं ही रेटिनाच्या आजाराची लक्षणं असू शकतात. अशावेळी तातडीनं नेत्ररोगतज्ज्ञांशी संपर्क करण्याचा सल्ला American Academy of Ophthalmology देते.

त्यामुळे स्पष्ट दिसत असलं तरी डोळे पूर्णपणे निरोगी आहेत, असं गृहीत धरता येत नाही. म्हणूनच डोळ्यांचा त्रास सुरू होण्याची वाट न पाहता नियमित तपासणी करणं महत्त्वाचं ठरतं.

याबाबत हळूहळू दृष्टी कमी होत असेल तर त्या व्यक्तीला त्याची जाणिव होते का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याबद्दल आम्ही डॉ. स्वाती हिरे यांना विचारलं. त्या डोंबिवली इथल्या एम्स हॉस्पिटलमध्ये नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

त्या म्हणाल्या, “अशी जाणिव होऊ शकते. दृष्टी हळूहळू कमी होत असल्यास मेंदू आणि व्यक्ती त्या बदलाशी नकळत जुळवून घेऊ शकतात. उदाहरणार्थ, एखाद्याला दूरचं कमी दिसत असेल तर ती व्यक्ती जवळून पाहण्याची सवय लावून घेऊ शकते. त्यामुळे दृष्टी कमी होत असल्याचे त्याला लगेच जाणवत नाही. विशेषतः दोन्ही डोळ्यांमध्ये हळूहळू बदल होत असल्यास ही समस्या उशिरानं लक्षात येऊ शकते.”

दृष्टी धूसर होण्याआधीही डोळ्यांचं नुकसान सुरू झालेलं असू शकतं

डॉ. हिरे पुढं सांगतात, “एका डोळ्याची दृष्टी कमी होत असल्यास दुसरा डोळा काही प्रमाणात समतोल साधतो त्यामुळे दोन्ही डोळ्यांनी एकत्र पाहताना व्यक्तीला दृष्टी व्यवस्थित असल्यासारखी वाटू शकते. विशेषतः काचबिंदूसारख्या काही आजारांमध्ये दृष्टीच्या कडेचा भाग हळूहळू कमी होत असल्याने सुरुवातीला त्याकडे लक्ष जात नाही.

मात्र, अशा बदलांमुळे दैनंदिन कामांमध्ये काही सूक्ष्म अडचणी जाणवू शकतात. उदाहरणार्थ, रात्री वाहन चालवताना त्रास होणं, पायऱ्यांवर पाय ठेवताना अंदाज चुकल्याने तोल जाणं, चालताना आजूबाजूच्या व्यक्ती अथवा वस्तूंना धडकणं, वाचताना वारंवार ओळ चुकणं किंवा समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याची ओळख पटण्यास त्रास होणं वगैरे. त्यामुळे दृष्टीमध्ये अगदी किरकोळ बदल जाणवले तरी त्याकडे दुर्लक्ष न करता डोळ्यांची तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.”

पेरिफेरल व्हिजन कमी होणं म्हणजे नेमकं काय?

पेरिफेरल व्हिजन म्हणजे आपण समोर पाहत असतानाच आजूबाजूला दिसणारा भाग.

ही दृष्टी कमी होताना एखाद्या व्यक्तीला वारंवार वस्तूंना धडकणं, गर्दीतून चालताना अडचण येणं, वाचताना त्रास होणं किंवा रात्री व्यवस्थित न दिसणं असे अनुभव येऊ शकतात. वाहन चालवताना किंवा रस्त्यावरून चालताना अपघात होतात. (किंवा अपघात होता होता टळतात.)

ग्लॉकोमामध्ये हा बदल अतिशय हळूहळू आणि वेदनारहित होऊ शकतो. मध्यवर्ती दृष्टी बराच काळ स्पष्ट राहिल्यामुळे समस्या गंभीर होईपर्यंत बाजूची दृष्टी कमी झाल्याचं लक्षात येणार नाही.

रात्री पाहण्यात अडचण आणि त्यानंतर हळूहळू कमी होत जाणारी बाजूची दृष्टी ही रेटिनायटिस पिग्मेंटोसा (retinitis pigmentosa) या तुलनेने दुर्मीळ अनुवंशिक आजाराशीही संबंधित असू शकते.

अनेकवेळा दृष्टीसंबंधीच्या तक्रारी केवळ वय वाढलंय म्हणून होतात असा समज करुन त्याकडे दुर्लक्ष करतात.

वाचताना अधिक प्रकाशाची गरज वाटणं, रात्रीच्या वेळीकमी दिसणं, धूसर दिसणं, डोळ्यांसमोर ठिपके दिसणं किंवा चमकणं रंग ओळखण्यात बदल जाणवणे याकडे काही जण वयाचा परिणाम म्हणून पाहतात. मात्र, अशी लक्षणं सारखी जाणवत असतील किंवा त्यात बदल होत असेल तर डोळ्यांची तपासणी करणं आवश्यक आहे.

दृष्टी धूसर होण्याआधीही डोळ्यांचं नुकसान सुरू झालेलं असू शकतं

डॉ. स्वाती हिरे यांना आम्ही चष्म्यानं दृष्टी स्पष्ट होणं आणि डोळे पूर्णपणे निरोगी असणे यात काय फरक आहे? असा प्रश्न विचारला.

त्यावर त्या म्हणाल्या, “चष्म्यामुळे नंबरचा त्रास दूर होऊन दृष्टी स्पष्ट होऊ शकते. मात्र, त्यामुळे डोळ्यांमध्ये कोणताही आजार नाहीच, असं होत नाही. काचबिंदू, पडदा किंवा डोळ्याच्या मागील भागाशी संबंधित काही आजार सुरुवातीला चष्म्यानं दृष्टी स्पष्ट असतानाही अस्तित्वात असू शकतात. त्यामुळे केवळ चष्म्याचा नंबर तपासणं आणि डोळ्यांची संपूर्ण तपासणी करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

चष्म्याचा नंबर तपासताना प्रामुख्याने दृष्टी किती स्पष्ट होते आणि योग्य नंबर कोणता आहे, हे पाहिले जाते. मात्र, डोळ्यांची संपूर्ण तपासणी करताना डोळ्यांचा दाब, डोळ्याचा पडदा, ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून मेंदूपर्यंत दृश्य माहिती पोहोचवणारी नस आणि डोळ्याच्या आतील इतर भागांचीही तपासणी केली जाऊ शकते.”

म्हणून चष्मा असलेल्या व्यक्तीने केवळ नंबर वाढला आहे की कमी झाला आहे, एवढंच पाहणं पुरेसे नाही. विशेषतः वय वाढल्यावर, कुटुंबात काचबिंदूचा इतिहास असल्यास, मधुमेह असल्यास किंवा दृष्टीमध्ये अचानक बदल जाणवल्यास डोळ्यांची संपूर्ण तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

दृष्टी कमी होण्याची सुरुवात कशी होते?

दृष्टी कमी होण्याची सुरुवात म्हणजे अचानक डोळ्यांसमोर अंधार येणं किंवा काहीच न दिसणं, असं नेहमीच होत नाही.

अनेकदा त्याची सुरुवात अगदी छोट्या बदलानं होते. चालताना वारंवार वस्तूंना धडकणं, बाजूने येणारी गाडी किंवा स्कूटर न दिसणं, खिडकीचे गज किंवा दरवाजाची चौकट वाकडी दिसणं, कमी प्रकाशात पाहताना त्रास होणे किंवा एका डोळ्यानं अचानक धूसर दिसू लागणे ही दृष्टीशी संबंधित गंभीर समस्यांची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.

दृष्टी धूसर होण्याआधीही डोळ्यांचं नुकसान सुरू झालेलं असू शकतं

विशेष म्हणजे ग्लॉकोमा किंवा डायबेटिक रेटिनोपॅथीसारख्या काही आजारांच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणं दिसतीलच असं नाही.

त्यामुळे नक्की याची सुरुवात कशी होते हा प्रश्न आम्ही मुंबईतील वरळी इथल्या एएसजी हॉस्पिटल लिमिटेजमध्ये मेडिकल डायरेक्टर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सुविरा जैन यांना विचारला.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, “डोळ्याचा नेमका कोणता भाग प्रभावित झाला आहे यावर दृष्टीतील बदल कशाप्रकारे सुरू होतील हे अवलंबून असतं.

ग्लॉकोमाच्या सर्वाधिक आढळणाऱ्या प्रकारात सुरुवातीला वेदना होत नाहीत. आधी आजूबाजूची म्हणजेच पेरिफेरल व्हिजन कमी होऊ शकते. त्यामुळे आजार बराच पुढे जाईपर्यंत अनेकांच्या लक्षात समस्या येत नाही.

वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशन (AMD)मध्ये मध्यवर्ती दृष्टी हळूहळू कमी होऊ शकते. सरळ रेषा वाकड्या किंवा लाटांसारख्या दिसू शकतात. दृष्टीच्या मध्यभागी एखादा राखाडी किंवा रिकामा भागही जाणवू शकतो.

या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

रेटिनल डिटॅचमेंटमध्ये दृष्टी कमी होण्याबरोबरच अचानक डोळ्यांसमोर काळे ठिपके किंवा तरंगणारे आकार दिसणं, प्रकाश चमकल्यासारखा भास होणे किंवा बाजूची दृष्टी कमी होणं अशी लक्षणं दिसू शकतात.

मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजारांमध्ये सुरुवातीला अजिबात लक्षणं नसण्यापासून धूसर दिसणं, डोळ्यासमोर ठिपके किंवा आकार तरंगताना दिसणं, रात्री पाहताना त्रास होणे किंवा मध्यवर्ती दृष्टी विचित्र वाटणं अशा वेगवेगळ्या तक्रारी होऊ शकतात. लहान मुलांमधील मायोपिया म्हणजे जवळचं स्पष्ट पण दूरचं अस्पष्ट दिसण्याची समस्या हादेखील वाढता चिंतेचा विषय आहे.

याबद्दल डॉ. जैन यांनी सांगतात, एका अभ्यासाच्या अंदाजानुसार 2050 पर्यंत शहरी भारतीय मुलांमध्ये मायोपियाचं प्रमाण 48% पर्यंत पोहोचू शकतं.

या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • चालताना दरवाजाच्या चौकटीला किंवा वस्तूंना धडकणं
  • बाजूने येणारी स्कूटर किंवा वाहन पटकन न दिसणं
  • खिडकीचे गज किंवा दरवाजाच्या चौकटीसारख्या सरळ रेषा वाकड्या दिसणं
  • दृष्टीच्या मध्यभागी राखाडी किंवा रिकामा भाग दिसणं
  • कमी प्रकाशात पाहताना त्रास होणं
  • अचानक अनेक फ्लोटर्स म्हणजे तरंगणारे ठिपके किंवा आकार दिसणं
  • डोळ्यांसमोर प्रकाश चमकल्यासारखा भास होणं
  • फक्त एका डोळ्यात धूसर दिसणं
कोणतीही लक्षणं नसतानाही डोळ्याचं नुकसान होऊ शकतं का?

कोणतीही लक्षणं नसतानाही डोळ्याचं नुकसान होऊ शकतं का?

याच उत्तर देताना, हो लक्षणं नसतानाही डोळ्याचं नुकसान झालेलं असू शकतं असं डॉ. जैन म्हणाल्या,

डॉ. जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅलमॉलॉजीमधील भारतात ग्लॉकोमाच्या अनेक प्रकरणांचं निदानच होत नाही. दक्षिण भारतातील population-based अभ्यासाचा संदर्भ देणाऱ्या एका वैद्यकीय लेखानुसार, ग्लॉकोमाची सुमारे 90% प्रकरणं निदान न झालेली असू शकतात

यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सुरुवातीला ग्लॉकोमाची ठळक लक्षणं जाणवत नाहीत. वेदना होत नाहीत आणि आधी मध्यवर्ती दृष्टीऐवजी बाजूची दृष्टी प्रभावित होऊ शकते. त्यामुळे व्यक्तीला समस्या लक्षात येईपर्यंत दृष्टीचं लक्षणीय नुकसान झालेलं असू शकतं.

डायबेटिक रेटिनोपॅथीच्या सुरुवातीच्या टप्प्यातही लक्षणं जाणवतीलच असं नाही.

यामुळेच ‘मला व्यवस्थित दिसतंय, त्यामुळे डोळे निरोगी आहेत’ असा निष्कर्ष नेहमीच सुरक्षित नसतो.

हे आजार दृष्टी कायमची हिरावून घेऊ शकतात

काही आजारांमुळे झालेलं दृष्टीचं नुकसान नंतर पूर्ववत करणं शक्य नसू शकतं.

ग्लॉकोमा: ग्लॉकोमामुळे आधीच गेलेली दृष्टी परत मिळत नाही. मात्र आजार लवकर ओळखून योग्य उपचार सुरू केल्यास पुढील नुकसान कमी करता किंवा रोखता येऊ शकतं.

डायबेटिक रेटिनोपॅथी: सुरुवातीच्या अवस्थेत लक्षणं नसू शकतात. पण आजार पुढे गेल्यास दृष्टीचं गंभीर आणि काही वेळा कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं.

वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशन (AMD): हा आजार रेटिनाच्या ‘मॅक्युला’ या भागावर परिणाम करतो. वाचणे किंवा चेहरा ओळखणे यांसारख्या कामांसाठी आवश्यक असलेल्या स्पष्ट मध्यवर्ती दृष्टीमध्ये मॅक्युलाची महत्त्वाची भूमिका असते.

सुरुवातीला लक्षणं नसू शकतात किंवा किंचित धूसर दिसणं, रंग फिके वाटणं किंवा contrast कमी होणं असे बदल जाणवू शकतात. हा आजार वेदनारहित असल्यामुळे अनेकांना तपासणीची गरज वाटत नाही. सरळ रेषा वाकड्या दिसणं किंवा दृष्टीच्या मध्यभागी डाग दिसणं सुरू होईपर्यंत काही जणांना फक्त चष्म्याचा नंबर बदलला असावा असं वाटू शकतं.

AMD चा ड्राय प्रकार काही प्रकरणांमध्ये वेट प्रकारात बदलू शकतो. त्यामुळे योग्य वेळी निदान आणि उपचार महत्त्वाचे ठरतात.

कोणाला धोका जास्त?

काही लोकांनी डोळ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

मधुमेह असलेले लोक: मधुमेह किती वर्षांपासून आहे यासोबत डोळ्यांच्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

उच्च रक्तदाब किंवा ग्लॉकोमाचा कौटुंबिक इतिहास असलेले लोक: मधुमेह, हायपरटेन्शन आणि कुटुंबाचा आरोग्याचा इतिहास हे ग्लॉकोमासाठी महत्त्वाचे लक्षात घेतले जाणारे घटक आहेत.

40 वर्षांवरील आणि विशेषतः 60 वर्षांवरील व्यक्ती: वयानुसार अनेक दृष्टीसंबंधी आजारांचा धोका वाढतो.

मायोपिया असलेले लोक: मायोपिया हा ग्लॉकोमाची जोखीम वाढवणाऱ्या घटकांपैकी एक आहे.

दीर्घकाळ स्टिरॉइडचा वापर करणारे लोक: दीर्घकाळ स्टिरॉइडचा वापर ग्लॉकोमाचा धोका वाढवू शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टिरॉइड असलेले आय ड्रॉप्स दीर्घकाळ वापरणं टाळणं महत्त्वाचं आहे.

ही लक्षणं दिसली तर तातडीनं डॉक्टरांकडे जा

  • काही लक्षणांमध्ये वाट पाहणं धोकादायक ठरू शकतं.
  • अचानक भरपूर फ्लोटर्स दिसू लागणं, डोळ्यांसमोर प्रकाश चमकणं, दृष्टीसमोर पडदा किंवा सावली आल्यासारखं वाटणं किंवा अचानक दृष्टी जाणं ही रेटिनल डिटॅचमेंटची लक्षणं असू शकतात.
  • अशी लक्षणं जाणवल्यास तातडीनं नेत्रतज्ज्ञांकडे जाणं गरजेचं आहे.
  • डोळ्याला फटाके किंवा अन्य कशामुळे इजा झाल्यास डोळा चोळू नये. इजा किरकोळ वाटत असली तरी वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे.
  • त्याचप्रमाणे प्रदूषणाच्या दिवसांत डोळ्यांत केवळ किरकिर किंवा पाणी येण्याऐवजी वेदना किंवा दृष्टी धूसर होण्यासारखी लक्षणं जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
ही लक्षणं दिसली तर तातडीनं डॉक्टरांकडे जा

डोळ्यांची तपासणी किती वेळा करावी?

याबाबत वेगवेगळ्या वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तपासणीच्या अंतरात फरक दिसतो.

डॉ. जैन यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, कोणतीही लक्षणं नसलेल्या 40 वर्षांवरील प्रौढांनी साधारणपणे दर 2 वर्षांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. जास्त धोका असलेले आणि 60 वर्षांवरील लोक यांना वार्षिक तपासणीचा सल्ला दिला जातो.

मधुमेह असलेल्या लोकांसाठी नियमित डायलेटेड आय एक्झामिनेशन विशेष महत्त्वाची असते.

तर अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजीच्या मार्गदर्शनानुसार 40 व्या वर्षी बेसलाईन आय एक्झामिनेशन करून त्यानंतर 54 वर्षांपर्यंत दर 2 ते 4 वर्षांनी आणि 55 ते 64 वर्षांदरम्यान दर 1 ते 3 वर्षांनी तपासणी करण्याची शिफारस आहे.

त्यामुळे प्रत्येकासाठी एकच वेळापत्रक लागू होत नाही. वय, मधुमेह, कौटुंबिक इतिहास, आधीपासून असलेले डोळ्यांचे आजार आणि इतर घटक लक्षात घेऊन नेत्रतज्ज्ञ तपासणी किती वेळाने करावी हे ठरवू शकतात.

डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी काय करता येईल?

डॉ. जैन यांच्या मते काही गोष्टी विशेष महत्त्वाच्या आहेत.

  • नियमित कॉम्प्रहेन्सिव आय एक्झामिनेशन करा, विशेषतः वय 40 पेक्षा जास्त असल्यास, मधुमेह असल्यास किंवा कुटुंबात ग्लॉकोमाचा इतिहास असल्यास.
  • मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवा. योग्य आहार, व्यायाम, आवश्यक औषधोपचार आणि नियमित डोळ्यांची तपासणी महत्त्वाची आहे.
  • मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या. डॉ. जैन यांनी दिलेल्या दिल्लीतील 10,000 शालेय मुलांच्या अभ्यासाच्या संदर्भानुसार, दिवसातून 2 तासांपेक्षा अधिक वेळ बाहेर घालवणं मायोपियाची वाढ कमी करण्याशी संबंधित होतं.
  • धूम्रपान टाळा. धूम्रपानाचा मोतीबिंदू आणि AMDच्या वाढलेल्या धोक्याशी संबंध आहे.
  • UV किरणांपासून डोळ्यांचं संरक्षण करा. बाहेर पडताना युव्ही प्रोटेक्शन असलेले सनग्लासेस वापरणं उपयुक्त ठरू शकतं.
  • डोळ्याला इजा होऊ नये याची काळजी घ्या. डोळ्याला इजा झाल्यास तो चोळू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • वायुप्रदूषणाकडे दुर्लक्ष करू नका. डॉ. जैन यांनी उल्लेख केलेल्या युके बायोबँकच्या 12 वर्षांच्या अभ्यासात PM2.5च्या सर्वाधिक एक्स्पोजर असलेल्या गटामध्ये सर्वात कमी एक्स्पोजरच्या गटाच्या तुलनेत ग्लॉकोमाचा धोका 10% अधिक आढळला. मात्र हा अभ्यास संबंध दर्शवतो, प्रदूषणामुळेच ग्लॉकोमा होतो असं सिद्ध करत नाही.
डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी काय करता येईल?

सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आयड्रॉप्सचा दीर्घकाळ वापर करू नका, विशेषतः स्टिरॉइड असलेले ड्रॉप्स सल्ल्याशिवाय वापरू नयेत.

फटाके किंवा इजा होण्याचा धोका असलेल्या कामांमध्ये डोळ्याचं रक्षण करणारे साहित्य वापरा.

अचानक दृष्टी कमी होणं, प्रकाश चमकणं, अनेक ठिपके, रेषा किंवा पडदा आल्यासारखं वाटणं यासाठी तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC