Home LATEST NEWS ताजी बातमी जुन्या फोनच्या बदल्यात नवीन फोन घेताय? ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा

जुन्या फोनच्या बदल्यात नवीन फोन घेताय? ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा

4
0

Source :- BBC INDIA NEWS

जुना फोन एक्सचेंज करून नवीन घेताय? लक्षात ठेवा या 7 महत्त्वाच्या गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images

ॲपलने नुकतेच आयफोन ड्युओसह (iPhone Duo) आयफोन 18 प्रो (iPhone 18 Pro) आणि 18 प्रो मॅक्स (18 Pro Max) लाँच केले आहेत.

ग्राहकांसाठी कंपनीने ‘ट्रेड-इन’ नावाची एक्सचेंज ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहक आपला जुना स्मार्टफोन बदलून नवीन आयफोन खरेदीवर मोठी सूट किंवा इन्स्टंट क्रेडिट मिळवू शकतात.

जुना फोन बदलून नवीन फोन घेण्याची अशी ऑफर देणारी ॲपल ही काही एकटीच कंपनी नाही. पण जुना फोन एक्सचेंज करताना वापरकर्त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे.

जुना फोन एक्सचेंज करायच्या आधी तुमच्या डेटा सुरक्षेची आणि प्रायव्हसीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

फोनमध्ये आपली बरीच वैयक्तिक माहिती असते; जसे की बँक खाती, क्रेडिट-डेबिट कार्डचे डिटेल्स, ब्राऊझिंग हिस्ट्री, कुकीज आणि इंटरनेटवरील आपल्या ॲक्टिव्हिटीची संपूर्ण नोंद त्यात सेव्ह असते.

ही अत्यंत महत्त्वाची वैयक्तिक माहिती जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडली, तर मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

म्हणूनच जुना फोन बदलताना त्यातील सगळा डेटा काढून टाकून फोन पूर्णपणे फॉरमॅट करावा, असे StellarInfo.co.in च्या ब्लॉगमध्ये सांगितले आहे.

एवढे करूनही फॉरमॅट केलेल्या फोनमधून कुणी डेटा परत मिळवू नये आणि सगळी माहिती कायमची नष्ट व्हावी, यासाठी डेटा डिलीट करणाऱ्या विशेष सॉफ्टवेअरचा वापर करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

याचा अर्थ असा की, कोणत्याही डेटा रिकव्हरी टूलचा वापर करून हा डेटा नंतर कधीही परत मिळवता येणार नाही.

1. अशा वेळी तुम्ही काय करायला हवे?

भारतात जुने आणि वापरलेले मोबाईल फोन ऑनलाइन विकणाऱ्या ‘कॅशिफाय’ या कंपनीने जुना फोन बदलताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे, याची यादी आपल्या वेबसाइटवर दिली आहे.

जुना फोन एक्सचेंज करण्याआधी किंवा दुसऱ्या कोणाला विकण्यापूर्वी त्यातील संपूर्ण डेटाचा बॅकअप घेणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. यामुळे व्हायरसचा धोका किंवा अचानक फोन बंद होणे आणि इतर मानवी चुकांपासून तुमचा डेटा सुरक्षित राहतो.

जुना फोन एक्सचेंज करून नवीन घेताय? लक्षात ठेवा या 7 महत्त्वाच्या गोष्टी

फोटो स्रोत, Debajyoti Chakraborty/NurPhoto via Getty Images

फोनमधील कॉन्टॅक्ट्स, मेसेजेस, कॉल लॉग्स, फोटो, व्हिडिओ आणि सर्व मीडिया फाइल्सचा बॅकअप नक्की घेतला पाहिजे.

बॅकअप घेण्यासाठीतुम्ही दुसऱ्या एखाद्या डिव्हाइसचा किंवा एक्सटर्नल हार्ड ड्राइव्हचा वापर करू शकता किंवा गुगल ड्राइव्ह आणि आयक्लाउड ड्राइव्ह सारख्या क्लाउड स्टोरेज सेवांची मदत घेऊ शकता.

2. ‘फॅक्टरी रीसेट’ करण्याआधी काय काळजी घ्यावी?

जुना फोन देण्यापूर्वी तो फॅक्टरी रीसेट करणे फार गरजेचे असते. पण त्याआधी मोबाईलमधील सर्व गुगल किंवा सोशल मीडिया खाती नीट लॉगआउट झाली आहेत ना, हे तपासा.

तसेच फोनमध्ये कुठे पासवर्ड्स सेव्ह करून ठेवले असल्यास, तेही पूर्णपणे डिलीट करून टाका.

आपला फोन विकण्यापूर्वी किंवा एक्सचेंज करण्याआधी, त्यातील पासवर्ड आणि वैयक्तिक माहितीचा कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही याची काळजी घेऊन सर्व डेटा पूर्णपणे काढून टाकला पाहिजे.

3. सिम कार्ड आणि मायक्रो-एसडी कार्ड काढून घ्या

मोबाईल फोन विकण्यापूर्वी त्यातील सिम कार्ड आणि एसडी कार्ड नक्की बाहेर काढून ठेवा. आपल्या फोनमधील बराचसा डेटा, फोटो किंवा फाइल्स मेमरी कार्डमध्ये असतात, त्यामुळे ते काढून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

सिम कार्डमध्येही तुमचे संपर्क आणि खाजगी माहिती असते. त्यामुळे फोन देण्यापूर्वी सिमकार्ड फोनमधून काढून बाजूला ठेवा.

भविष्यात जर ते सिम कार्ड तुमच्या काहीही उपयोगाचे नसेल तर ते फेकून देण्याऐवजी कायमचे नष्ट करून टाकणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग ठरतो.

जुना फोन एक्सचेंज करून नवीन घेताय? लक्षात ठेवा या 7 महत्त्वाच्या गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images

4. फोनमधील डेटा ‘एन्क्रिप्ट’ करायला विसरू नका

स्मार्टफोनमधील या जबरदस्त फीचरबद्दल बऱ्याच लोकांना अजूनही माहिती नाही. मुळात, एन्क्रिप्शन ही अशी सुरक्षित पद्धत आहे, जी तुमच्या डेटाला सुरक्षेचा डबल लेअर देते.

फोन एन्क्रिप्ट केल्यावर त्यातील सर्व माहिती अशा भाषेत किंवा कोडमध्ये बदलते, जी इतर कोणालाही सहजासहजी वाचता येत नाही किंवा समजू शकत नाही.

हा डेटा उघडण्यासाठी किंवा पाहण्यासाठी एका खास पासवर्ड अथवा ‘की’ची गरज लागते. यामुळे तुमच्या बँक खात्याशी किंवा आर्थिक व्यवहारांची फसवणूक होण्यापासून यूझर पूर्णपणे सुरक्षित राहतात.

यामुळे कोणत्याही अनोळखी किंवा चुकीच्या व्यक्तीला तुमचा डेटा पाहता येत नाही. काही स्मार्टफोन्समध्ये हे फीचर इनबिल्ट म्हणजेच आधीपासूनच असते तर काही मॉडेल्समध्ये सेटिंग्जमध्ये जाऊन हा पर्याय स्वतः सुरू करावा लागतो.

5. शेवटची महत्त्वाची पायरी : फॅक्टरी रीसेट

जुना फोन एक्सचेंज करून नवीन घेताय? लक्षात ठेवा या 7 महत्त्वाच्या गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images

हे सगळं करून झाल्यावर शेवटी फोनमधील सर्व माहिती पूर्णपणे डिलीट करावी लागते. म्हणजे फोन वापरताना तुम्ही त्यात जे काही केले आहे त्या सगळ्याचा डेटा एका फटक्यात डिलीट होऊन जातो.

हा पर्याय वापरणे खूप सोपे आणि वेगवान आहे. मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही हा पर्याय सहज निवडू शकता.

यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोनमधील ‘सेटिंग्ज’मध्ये जा.

त्यानंतर ॲडिशनल सेटिंग्समधील ‘बॅकअप’ किंवा ‘रीसेट’ हा पर्याय निवडा.

तिथे दिसणाऱ्या ‘इरेज ऑल डेटा’ आणि ‘रीसेट ऑल सेटिंग्ज’ या पर्यायावर क्लिक करा.

6. डेटा डिलीट केला नाही तर काय नुकसान होऊ शकतं?

जुन्या फोनमधून सिम कार्ड बाहेर काढले नाही, फोनमधील डेटा पूर्णपणे काढून टाकला नाही किंवा तो फॉरमॅट केला नाही, तर पुढे जाऊन मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते

तुमचे खाजगी फोटो, व्हीडिओ, कॉन्टॅक्ट नंबर आणि बँक खात्यांचे डिटेल्स दुसऱ्यांच्या हातात जाऊ शकतात. याचा गैरफायदा घेऊन सायबर भामटे ऑनलाइन फ्रॉड करू शकतात किंवा धमक्या देऊन पैसे उकळू शकतात.

प्रत्येक फोनला स्वतःचा एक युनिक IMEI नंबर असतो. फोनवरून असा काही सायबर गुन्हा घडल्यास पोलीस थेट त्या IMEI नंबरवरूनच चौकशी सुरू करतात, ज्यामुळे तुम्ही विनाकारण मोठ्या संकटात किंवा कायदेशीर कचाट्यात सापडू शकता.

फोन

फोटो स्रोत, Getty Images

यासाठीच जुना फोन दिल्यावर लगेच सिम कार्ड नवीन फोनमध्ये ॲक्टिव्ह केले पाहिजे, असा सल्ला टेक एक्सपर्ट नल्लामुथू श्रीधर देतात.

असे केल्याने आपले सिम कार्ड जुन्या IMEI नंबरशी लिंक राहत नाही. सायबर गुन्हे घडल्याची तारीख आणि वेळ तपासूनच पोलीस चौकशी पुढे नेतात, असे ते स्पष्ट करतात.

तुमचा मोबाईल नंबर अजूनही जुन्या फोनच्या IMEI नंबरशी जोडलेला आहे का, हे तुम्ही TRAI च्या अधिकृत वेबसाइटवर सहज चेक करू शकता.

7. खबरदारीचा उपाय म्हणून काय करावे?

जुना फोन देताना फॅक्टरी रीसेट केल्यानंतर फोनची अंतर्गत मेमरी पूर्णपणे रिकामी करायला हवी, असा सल्ला श्रीधर देतात. यामुळे फोनमधील जुना डेटा इतर कोणालाही पुन्हा बाहेर काढता येत नाही.

अनेकदा डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअरच्या मदतीने जुन्या फोन्समधील माहिती परत मिळवली जाते. मात्र ‘झिरो फिलिंग’ ही पद्धत वापरल्यास कोणालाही डेटा रिकव्हर करता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

यासोबतच डेटा एन्क्रिप्शन फीचर वापरण्याचा सल्लाही दिला जातो. काही स्मार्टफोन्सच्या सेटिंग्जमध्ये हे फीचर इनबिल्ट म्हणजे आधीपासूनच उपलब्ध असते, तर काही मॉडेल्समध्ये ते सुरू करावे लागते.

फोनच्या मॉडेलनुसार कंपन्या एन्क्रिप्शनची सुविधा देतात. हा पर्याय वापरल्यास फॅक्टरी रीसेट झाल्यावर उरलेला सर्व डेटा अक्षरशः जंक डेटा म्हणजे निरुपयोगी बनतो. त्यामुळे तो कोणाच्याही कामाचा राहत नाही.

आपण आपला जुना स्मार्टफोन नक्की कोणाच्या हातात सोपवत आहोत याची काहीच शाश्वती नसते.

विश्वासू मार्गांनी एक्सचेंज केल्यास फोनची किंमत कदाचित थोडी कमी येईल तर छोट्या-मोठ्या दुकानांतून थोडे जास्त पैसे मिळू शकतात. पण सुरक्षेचा विचार करता नेहमी अधिकृत आणि खात्रीशीर माध्यमांचाच वापर करा, असा सल्ला त्यांनी दिला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC