Source :- BBC INDIA NEWS

या रेड्याची सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये प्रचंड चर्चा रंगली होती.

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

बांगलादेशात बकरी ईदच्या अगोदर चर्चेत आलेला आणि ‘डोनाल्ड ट्रम्प’ या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झालेला रेडा आता सरकारच्या ताब्यात आहे. या ईदला त्याची कुर्बानी दिली जाणार नाही, अशी माहिती आता समोर आली आहे.

या वर्षी बकरी ईदच्या बाजारात या पांढऱ्या रंगाच्या (अल्बिनो) रेड्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली.

सोशल मीडियासह देश-विदेशातील विविध वृत्तवाहिन्यांवरच्या वृत्तांकनामुळेही या रेड्याबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली.

नुकतेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करून या रेड्याच्या मालकाने त्याला गोठ्यातून आपल्या घरी आणले होते.

परंतु ईदच्या अवघ्या 1 दिवस आधी असे समजले की, सरकार या रेड्याची कुर्बानी न देता त्याचे संरक्षण करण्याचा विचार करत आहे.

बांगलादेशचे गृहमंत्री सलाहउद्दीन अहमद यांनी स्वतः हा निर्णय घेण्यात पुढाकार घेतला. गृह मंत्रालयाकडून आदेश मिळताच पोलिसांनी बुधवारी (27 मे) या रेड्याला त्याच्या मालकाच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

या रेड्याचे संरक्षण करण्यात येणार आहे

दुसरीकडे, ‘डोनाल्ड ट्रम्प’ नावाच्या या रेड्याला आपण स्वतःच विकत घेतल्याचे गृहमंत्री सलाहउद्दीन अहमद यांनी बीबीसी बांगलाला सांगितले. या दुर्मीळ प्रजातीच्या रेड्याचे संरक्षण करण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

बीबीसी बांगलाशी बोलताना ते म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प या नावाने व्हायरल झालेला हा रेडा एका दुर्मिळ प्रजातीचा आहे. बकरी ईदच्या आधी तो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.”

“त्यामुळे कुर्बानीच्या वेळी तिथे कोणतीही गडबड किंवा गोंधळ होऊ नये या विचाराने मी तो स्वतः विकत घेतला आहे. सध्या त्याला एका फार्मवर ठेवण्यात आले असून पुढे त्याला प्राणीसंग्रहालयात ठेवले जाऊ शकते.”

नारायणगंज शहरातील पाईकपाडा येथील ‘राबेया ॲग्रो फार्म’चे मालक झियाउद्दीन मृधा यांनी यापूर्वी बीबीसी बांगलाशी बोलताना सांगितले होते की, त्यांच्या लहान भावाने या म्हशीचे केस आणि डोळ्यांचा रंग पाहून गंमत म्हणून त्याचे नाव ‘डोनाल्ड ट्रम्प’ ठेवले होते. त्यांच्या या फार्मवर एक व्हीडिओ बनवला गेला होता. त्यामध्ये हा रेडा देखील दिसत होता.

हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्येही या रेड्यावर अनेक रिपोर्ट्स दाखवले गेले. त्यामुळे त्याला जागतिक स्तरावर ओळख मिळाली.

केरानीगंजमधील जिंजिरा भागातील रहिवासी फरिदुज्जमान यांनी हा रेडा विकत घेतला होता.

गृह मंत्रालयाकडून खास आदेश आल्यानंतर बुधवारी दुपारी पोलिसांनी या रेड्याच्या मालकाशी संपर्क साधला.

त्यानंतर केरानीगंजमधील जिंजिरा येथून या प्राण्याला पोलीस संरक्षण देऊन ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, सरकारी आदेशाची माहिती देऊन रेड्याला पोलीस ठाण्यात आणण्याची विनंती केली तेव्हा मालकही त्यासाठी लगेच तयार झाला.

नारायणगंजमधील एका डेअरी फार्ममधून (खामार) या दुर्मिळ प्रजातीच्या रेड्याची विक्री करण्यात आली आहे.

नारायणगंज सदर पोलीस ठाण्यातील अधिकारी मोहम्मद साजेदूर रहमान यांनी माहिती दिली की, गृह मंत्रालय आणि पोलीस प्रमुखांच्या आदेशानंतर केरानीगंजमधून या रेड्याला आणण्यात आले आहे.

बीबीसी बांगलाशी बोलताना त्यांनी सांगितले, “गेल्या सोमवारीच या रेड्याला आमच्या इथून केरानीगंजला नेण्यात आले होते. आधी त्याला परत नारायणगंजलाच आणायचा विचार होता, पण नंतर हा निर्णय बदलला गेला. आता बहुधा या रेड्याला थेट एखाद्या प्राणीसंग्रहालयात ठेवले जाईल.”

ताब्यात घेतल्यानंतर या रेड्याला आधी केरानीगंज पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथून पुढे त्याला एका फार्मवर सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री सालाहउद्दीन अहमद यांनी बीबीसी बांगलाशी बोलताना दिली.

गृहमंत्री म्हणाले की, या रेड्याला मी स्वतः खरेदी केले असून तो एका दुर्मीळ प्रजातीचा असल्याने त्याच्या संरक्षणाची योजना आखली जात आहे.

याशिवाय सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या या रेड्याच्या कुर्बानीवरून कोणताही वाद किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या गोष्टीलाही या निर्णयात विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

याबद्दल सांगताना ‘राबेया ॲग्रो फार्म’चे मालक झियाउद्दीन मृधा यांनी बीबीसी बांगलाला आधी माहिती दिली होती की, साधारण 10 महिन्यांपूर्वी राजशाही भागातल्या एका बाजारातून त्यांनी हा पांढरा (अल्बिनो) रेडा आणला होता. विशेष म्हणजे त्यांच्या फार्मवर असे आणखी 6 पांढरे रेडे आहेत, असेही त्यांनी सांगितले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC