Home LATEST NEWS ताजी बातमी ‘तोपर्यंत दररोज जंतरमंतरकडे मोर्चा काढणार’; सीजेपीनं नेमकं काय म्हटलं?

‘तोपर्यंत दररोज जंतरमंतरकडे मोर्चा काढणार’; सीजेपीनं नेमकं काय म्हटलं?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दिपके यांच्याकडून एक व्हीडिओ जारी करत आपल्या गैरहजेरीत सीजेपी आंदोलनाचं नेतृत्व अजिंक्य शिंदे यांच्याकडे दिलं आहे.

Published

वाचन वेळ: 26 मिनिटे

  • अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातच पोलिसांनी ताब्यात घेतलं
  • आंदोलनापूर्वी प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती
  • जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था
  • राजधानीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे 25 ते 30 हजार जवान तैनात
  • सीजेपीच्या आंदोलनापूर्वी शेकडो जणांना ताब्यात घेतल्याची माहिती
  • मेट्रो स्थानकं बंद ठेवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल
  • नेहा बोरा, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव आणि दीपंकर भट्टाचार्य यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, नेहा बोरा यांची पोलिसांनी दिवसभरानंतर संध्याकाळी सुटका केली आहे.
सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके (फाइल फोटो)

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज (10 ऑक्टोबर) सीजेपीकडून दिल्लीत आंदोलन झालं. मात्र, दिल्ली पोलिसांनी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके, सीजेपी प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातच ताब्यात घेतलं.

याशिवाय दिल्लीसह देशभरात विविध ठिकठिकाणी सीजेपी समर्थकांना देखील मोठ्या संख्येने ताब्यात घेण्यात आले.

दिल्लीतील आंदोलनादरम्यान पत्रकार ताब्यात; प्रेस कार्ड असूनही कारवाई?

सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

सीजेपी नेते अजिंक्य शिंदे यांनी सांगितले, उद्या जंतर-मंतरवर कधी जाणार?

कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते अजिंक्य शिंदे यांनी ‘एक्स’वर एक व्हीडिओ पोस्ट करून रविवारी होणाऱ्या आंदोलनाबाबत माहिती दिली आहे.

या व्हीडिओत ते म्हणतात, “आज आम्ही जंतर-मंतरवर ज्ञानेश कुमार यांनी मतदानाचा अधिकार हिरावून घेतलेल्या 12 कोटी मतदारांच्या हक्कांची मागणी करण्यासाठी गेलो होतो. तरीही मोदींच्या हुकूमशाही सरकारने अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासह सर्व विद्यार्थी नेते आणि आंदोलकांना ताब्यात घेतले.”

सीजेपी नेते अजिंक्य शिंदे यांनी लोकांना रविवारी जंतर मंतरवर पोहोचण्याचे आवाहन केले आहे.

ते पुढे म्हणाले, “आज ताब्यात घेतल्यानंतर सर्वजण घाबरून घरी निघून गेले असतील, असे त्यांना वाटले असेल. मात्र, मोदी-शाह यांना वाटणारी ही भीती दाखवते की, आम्ही अर्धी लढाई जिंकली आहे. आणि ही एका नव्या लढाईची सुरूवात आहे.”

मागच्या वेळी ज्याप्रमाणे त्यांनी सरकारचा अहंकार चिरडून टाकला होता, त्याचप्रमाणे यावेळीही सरकारचा अहंकार चिरडून टाकतील, असे त्यांनी सांगितले.

“जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत आम्ही घरी परतणार नाही,” असे ते म्हणाले.

उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा जंतर-मंतरच्या दिशेने कूच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मोठ्या संख्येने जंतर-मंतर येथे पोहोचण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

दिल्ली पोलिसांनी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सुटका केली आहे.

पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “सध्या आम्ही काहीही बोलणार नाही, कारण उद्या इंडिया आघाडीने एकजुटीने विरोध करण्याचे आवाहन केले आहे. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. मी नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. या बाबतीत मी खूप शिस्तप्रिय आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, आमच्याकडे कोणताही पुरावा नाही. चौकशी करायची असेल, तर पुरावे आवश्यक आहेत. आम्ही त्यांना सांगितले की, ‘ठीक आहे, आम्ही पुरावे देऊ.'”

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नवी दिल्लीतील द्वारका नॉर्थ पोलीस ठाण्यातून सुटका करण्यात आली.

शनिवारी पोलिसांनी ममता बॅनर्जी यांच्यासह त्यांच्या पक्षातील पाच नेत्यांना साऊथ अव्हेन्यू येथील बसस्थानकावरून ताब्यात घेतलं होतं.

ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, त्यांना जंतर-मंतर येथे जायचे होते; मात्र पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही. त्यानंतर त्या आपल्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलनाला बसल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

अभिजीत दिपकेंबाबत दिल्ली पोलिसांनी काय सांगितलं?

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना त्यांच्या आजीच्या निधनाची माहिती देण्यात आली नाही, असे दावे सोशल मीडियावर केले जात होते. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर पसरत असलेले हे दावे फेटाळून लावले आहेत.

दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, “अभिजीत दिपके यांच्या आजीच्या निधनाची माहिती त्यांना तातडीने आणि पूर्ण संवेदनशीलतेने देण्यात आली होती.”

अंत्यविधीची नियोजित वेळही त्यांना कळवण्यात आली होती, असंही पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांच्या निवेदनानुसार, मानवतेच्या दृष्टिकोनातून अभिजीत दिपके यांना त्यांच्या गावी जाण्यास मदत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे.

अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका विमानातून उतरताच पोलिसांच्या ताब्यात

अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दीपके यांचे शनिवारी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या. हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी, संतुक पिंपरी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शनिवारी संध्याकाळी सीजेपीने पत्रकार परिषद घेत सांगितलं की, “अभिजीत दिपके यांच्या आजीचे निधन झाले आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना ही दुःखद बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवू दिली जात नाही.”

सीजेपीने अभिजीत दीपके यांची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी केली आहे.

‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत दररोज जंतरमंतरकडे मोर्चा काढणार’

CJP आणि SFI सह प्रमुख विद्यार्थी संघटनांनी संयुक्तपणे दिल्लीतील एच.के.एस. सुरजित भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांवर दिवसभर निष्पाप आंदोलकांची अमानुष छळवणूक केल्याचा आणि त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप केला.

CJP चे नेते अजिंक्य शिंदे म्हणाले, “जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून हटवले जात नाही, तोपर्यंत आतापासून दररोज जंतरमंतरकडे मोर्चे काढले जातील.”

दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके आणि इतरांना अमानुष वागणूक दिल्याचाही आरोप केला.

सीजेपीचे नेते अजिंक्य शिंदे आणि इतर पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना

SFI चे सरचिटणीस सृजन भट्टाचार्य यांनी ‘हुकूमशाही राजवटीविरुद्ध’ शक्य तितकी व्यापक एकता दाखवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, उद्यापासून (11 ऑक्टोबर) विद्यार्थ्यांची ही आंदोलने देशाच्या कानाकोपऱ्यात पसरतील. विद्यार्थी सर्वत्र शांततापूर्ण निदर्शने करतील आणि जिथे त्यांना पोलिसांच्या बॅरिकेड्समुळे अडवले जाईल, तो परिसरच ‘जंतरमंतर’ बनेल.

या पत्रकार परिषदेत इतर विद्यार्थी आणि युवा नेत्यांनीही सहभाग घेतला. अभिनेता सुधन्वा देशपांडे, इतिहासकार सोहेल हाश्मी आणि प्राध्यापिका नंदिता नारायण हेही या आंदोलनाच्या समर्थनासाठी उपस्थित होते.

‘आयसा’च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांची सुटका

ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (आयसा) राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांची पोलिसांनी सुटका केली आहे. बीबीसीचे वार्ताहर दिलनवाज पाशा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नेहा बोरा यांच्यासोबत योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि दीपांकर भट्टाचार्य यांना सफदरजंग उड्डाणपुलावरून ताब्यात घेण्यात आले होते.

नेहा बोरा

सीपीआय (एमएल) ने दावा केला होता की, आयसाच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांना ताब्यात घेतल्यानंतर दिल्लीतील मैदान गढी येथील नजरकैद केंद्रात नेण्यात आले होते.

ताब्यात घेतल्यानंतर नेहा बोरा यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं, “मी ताब्यात आहे. आंदोलन नाही. लोक सध्या सफदरजंग उड्डाणपुलावर जमू लागले आहेत. तुम्हाला शक्य असल्यास, तिथे पोहोचा. तुम्हाला रोखण्यात आल्यास, तिथेच बसा आणि ठामपणे डटून राहा. आम्हाला ताब्यात घेतले आहे, पण त्यामुळे काहीही फरक पडत नाही.”

नेहा बोरा यांच्यासोबत योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि दीपांकर भट्टाचार्य यांनाही सफदरजंग उड्डाणपुलावरून ताब्यात घेण्यात आले होते.

‘देशात आता लोकशाही उरलेली नाही’ – प्रियांका गांधी

दिल्लीतील आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेत्यांसह अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईवर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियांका गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, “सर्वप्रथम 254 खासदारांना त्यांच्या मूलभूत घटनात्मक हक्कांचे उल्लंघन करून त्यांना बेकायदेशीर पद्धतीने धक्काबुक्की करत ताब्यात घेण्यात आले. यामुळे त्यांच्या मूलभूत घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन झाले. विरोधी पक्षांच्या इतर आंदोलकांसोबतही असेच वर्तन करण्यात आले.”

“त्यानंतर देशाची राजधानी चारही बाजूंनी घेरून आणि बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आली. रेल्वे आणि मेट्रो सेवा थांबवण्यात आल्या, इंटरनेट बंद करण्यात आले आणि ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले. आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून आंदोलन करणाऱ्या तरुणांना, महिला आणि पुरुषांनाही ताब्यात घेण्यात आले.”

प्रियांका गांधी

प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या, “निवडणूक आयोगाच्या संगनमताने निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आणि आपली वैधता धोक्यात आल्याने सरकार घाबरले असून, त्यांना जाब विचारला जात असल्याची भीती सरकारला वाटते, याचा हा पुरावा नसेल, तर मग आणखी काय आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“भारतात आता लोकशाही उरलेली नाही”, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.

“ही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून चालवली जाणारी हुकूमशाही आहे. लोकशाही कमकुवत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करणारे लोक राष्ट्राशी विश्वासघात करत आहेत”, अशी टीका त्यांनी केली.

‘आप’साठी सीजेपीचं ‘शॅडो बॉक्सिंग’, भाजपचा आरोप

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरून भाजपने कॉक्रोच जनता पार्टी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका केली आहे.

भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन सीजेपी आम आदमी पार्टीसाठी ‘शॅडो बॉक्सिंग’ करत असल्याचा आरोप केला.

रविशंकर प्रसाद म्हणाले, “आमचा आंदोलनाला विरोध नाही. मात्र, पराभवामुळे त्यांनी रस्त्यावर होणाऱ्या आंदोलनांना एक हत्यार बनवले आहे. यामध्येही कमालीची स्पर्धा सुरू आहे.”

भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन सीजेपी आम आदमी पार्टीसाठी ‘शॅडो बॉक्सिंग’ करत असल्याचा आरोप केला.

ते पुढे म्हणाले, “सुरुवातीचे तीन दिवस राहुल गांधी होते. त्यानंतर ते निघून गेले. मग आम आदमी पार्टीसाठी ‘शॅडो बॉक्सिंग’ करणारी सीजेपी आली.

सीजेपी ही आम आदमी पार्टीसाठी शॅडो बॉक्सिंग करते. सकाळपासून त्यांचे (सीजेपीचे) नाटक सुरू होते. नंतर अरविंद केजरीवाल आणि इतर लोकही आले. त्यानंतर ममताजींना वाटलं की, आपण तरी मागे का राहायचे? म्हणून त्याही आल्या. त्यानंतर सीपीआय आणि सीपीएमचे नेतेही आले.”

सीजेपी विरोधकांकडून आंदोलकांना मारहाणीचा आरोप

दिल्लीतील कनॉट प्लेस येथे आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) समर्थक आणि सीजेपीविरोधी आंदोलक यांच्यात झटापट झाल्याची घटना समोर आली आहे.

बीबीसी प्रतिनिधी विष्णुकांत तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीजेपीचे समर्थक आणि सीजेपीविरोधक आमनेसामने आले. यावेळी सीजेपीविरोधकांनी आंदोलन करणाऱ्या सीजेपी समर्थकांना धक्काबुक्की केली, त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आणि आक्रमक भाषेचा वापर केला.

या वेळी पोलिसांनी सीजेपीविरोधकांना रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, असा आरोप आहे.

बीबीसीने याबाबत पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न केला असता, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

सीजेपी समर्थक तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं तो क्षण

बीबीसीशी बोलताना एका सीजेपी आंदोलकाने सांगितलं, “ते लोक आमच्याविरोधात अपमानास्पद भाषेचा वापर करत आहेत. हिंसक घोषणा देत आहेत. आम्हाला मारहाण करत आहेत, पण पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत.”

“हा कसला दुजाभाव आहे? पोलीस आम्हाला रोखत आहेत, पुढे जाऊ देत नाहीत; मात्र, त्या लोकांना पूर्ण मोकळीक दिली जात आहे”, असा आरोप या आंदोलकाने केला.

दुसरीकडे मुंबई-पुण्यातही सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलक एकवटले होते. मात्र, या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

कॉक्रोच आंदोलनामुळे दिल्लीत अभूतपूर्व बंदोबस्त; काही आंदोलक ताब्यात

राहुल गांधींनी दिल्लीतील आंदोलनावर काय प्रतिक्रिया दिली?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक व्हीडिओ संदेश जारी करून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

ते म्हणाले, “मी नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्यांच्याशी संबंधित लोकांविरोधात दशकाहून अधिक काळ लढत आहे. एखादी व्यक्ती आपल्या प्रतिस्पर्ध्याला जितक्या चांगल्या प्रकारे ओळखू शकते, तितक्याच चांगल्या प्रकारे मी माझ्या विरोधकांना ओळखतो. मी त्यांना आतून-बाहेरून ओळखतो, मला त्यांच्या प्रत्येक हालचालीची जाणीव आहे. या लोकांची सर्वांत मोठी ओळख म्हणजे त्यांचा भित्रेपणा.”

“नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, ज्ञानेश कुमार आणि अजित डोभाल हे या कथेतले खलनायक आता हळूहळू घेरले जात आहेत. त्यांच्या सभोवतालचा फास आवळला जात आहे,” असेही ते म्हणाले.

शनिवारी राहुल गांधी आंदोलनात सहभागी नव्हते, पण त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

पोलिसांनी मोठ्या संख्येने आंदोलकांना ताब्यात घेत केलेल्या कारवाईवर राहुल गांधी म्हणाले, “तुम्हाला जे करायचे आहे, ते करा. जितके पोलीस बोलवायचे आहेत, तितके बोलवा. 10 हजार, 20 हजार किंवा 50 हजार. सर्व नेत्यांना अटक करा. सर्व तरुणांना अटक करा. आम्हा सर्वांना अटक करा. घाबरू नका, आम्ही तुम्हाला चारही बाजूंनी घेरलं आहे आणि आम्ही मागे हटणार नाही.”

ते पुढे म्हणाले, “माझे शब्द लक्षात ठेवा. आम्हाला जी माहिती हवी आहे, ती आमच्याकडे आधीपासूनच आहे. आम्ही आपल्या संविधानाचे रक्षण करू. भारतातील जनतेच्या आवाजाचे रक्षण करू. तसेच, गेल्या 10 ते 15 वर्षांत भारतासोबत जे घडले, त्याची पुनरावृत्ती पुन्हा कधीही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, याची आम्ही खात्री करू.”

राहुल गांधी तरुणांना उद्देशून म्हणाले, “भारताच्या तरुणांनो, मला तुमचा अभिमान आहे. तुमचे आंदोलन सुरू ठेवा. आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत. या सरकारला आणि आपल्या संविधानावर हल्ला करणाऱ्यांना पराभूत केले जाईल, याची आम्ही खात्री करू.”

अभिजीत दिपकेंच्या गैरहजेरीत अजिंक्य शिंदेंकडे नेतृत्व

दरम्यान, अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका हे तिघे पोलिसांच्या ताब्यात असेपर्यंत जंतर-मंतरवरील या आंदोलनाचे नेतृत्व सीजेपीचे संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे करणार आहेत. अभिजीत दिपके यांनी संभाव्य अटकेची शक्यता लक्षात घेऊन शुक्रवारी रात्रीच हा व्हीडिओ रेकॉर्ड करून ठेवला होता, अशी माहिती सीजेपीकडून देण्यात आली आहे.

पक्षानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात, दिल्ली पोलिसांनी पूर्वनियोजित पद्धतीने केलेल्या या कारवाईचा उद्देश आजच्या शांततापूर्ण आंदोलनाच्या नेतृत्वाला आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच निष्प्रभ करणे हा आहे, असं म्हटलं आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दिपके यांच्याकडून एक व्हीडिओ जारी करत आपल्या गैरहजेरीत सीजेपी आंदोलनाचं नेतृत्व अजिंक्य शिंदे यांच्याकडे दिलं आहे.

सीजेपीने याला नागरिकांच्या मुक्त संचाराच्या अधिकाराचे उघड उल्लंघन असल्याचे म्हटले असून अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची तत्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे.

ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपके म्हणाले की, त्यांना अटकेची भीती वाटत नाही आणि ते त्यासाठी तयार आहेत.

मुंबई-पुण्यात सीजेपी आंदोलकांची धरपकड

दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही सीजेपी समर्थकांनी आंदोलनाची हाक दिली. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात सीजेपी समर्थक जमले होते.

दरम्यान, पोलिसांनी ऑगस्ट क्रांती मैदानाबाहेरून आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात एकवटलेल्या सीजेपी समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

या आंदोलनात सहभागी अभिनेता इम्रान खान, वरुण सरदेसाई यांनाही ताब्यात घेतलं आहे.

आतापर्यंत जवळपास 400 जण ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

अभिनेता इम्रान खान काय म्हणाला?

ताब्यात घेतले जाण्यापूर्वी अभिनेता इम्रान खान पत्रकारांशी बोलताना म्हणाला, “माझी कोणतीही मागणी नाही. मी येथे एक नागरिक म्हणून आलो आहे, या शहरात राहणारी एक व्यक्ती म्हणून आलो आहे. लोकांच्या मुक्त संचाराच्या अधिकारावर निर्बंध का घातले जात आहेत आणि लोकांचा आवाज का दाबला जात आहे, हे पाहण्यासाठी मी येथे आलो आहे. त्यामुळेच मी येथे आहे.”

‘मी कोणाकडेही कोणतीही मागणी करण्याच्या स्थितीत नाही आणि मी कोणत्याही संघटनेचाही भाग नाही’, असंही त्याने यावेळी नमूद केलं.

अभिनेता इम्रान खान आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर आला होता (फाइल फोटो).

दुसरीकडे, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तुषार गांधी यांच्या सुटकेसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब डी.एन. नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

तुषार गांधी यांच्या सुटकेची मागणी करत शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे.

‘त्यांना सोडत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यातून बाहेर जाणार नाही’, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली. मुंबईतील सर्व शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर जमतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांची गर्दी, तुषार गांधी यांच्या सुटकेची मागणी

मुंबईप्रमाणे पुण्यातही आंदलनाची हाक देण्यात आली होती, येथेही सीजेपी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे.

पुण्यात लाल महाल ते कलेक्टर ॲाफिस असा मोर्चा काढण्यात आला होता. त्यात सहभागी झालेल्यांना ताब्यात घेऊन लष्कर पोलीस ठाण्याला नेण्यात आलं आहे.

पुण्यातही पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

सोनम वांगचूक यांनी सरकारला काय इशारा दिलाय?

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी शनिवारी इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला. त्यात त्यांनी सरकारने ताब्यात घेतलेल्या लोकांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली.

या व्हीडिओमध्ये ते म्हणाले, “काही वेळापूर्वी परत आल्यानंतर मला समजलं की, आज दिल्लीत अनेकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी नेते, युवा नेते, वकील, पत्रकार आणि अगदी खासदारांचाही समावेश आहे.”

“कालपर्यंत त्यांना वाटत होते की जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत शांततेत आंदोलन करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, आता देशभरात जणू अघोषित आणीबाणी लागू झाली आहे, असं चित्र आहे.”

सोनम वांगचूक

पुढे सरकारला उद्देशून ते म्हणाले, “पुढील 24 तासांतही अटक केलेल्या लोकांची सुटका झाली नाही, तर मलाही शांततापूर्ण आंदोलन करण्याचा विचार करावा लागेल.”

आपण धरणे आंदोलन, उपोषण किंवा पदयात्रा यांपैकी कोणताही मार्ग निवडू शकतो. तसेच हे आंदोलन दिल्ली किंवा लेहमध्ये कुठेही होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वकिलांना त्यांच्या चेंबरमधून ताब्यात घेतलं, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून टीका

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप राय यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवर टीका केली आहे.

त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं, “सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना त्यांच्या चेंबरमधून ताब्यात घेणे ही अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी बाब आहे. आम्ही हा मुद्दा तातडीने भारताच्या सरन्यायाधीशांसमोर मांडत आहोत.”

जंतरमंतर आंदोलन

वकिलांना मनमानी पद्धतीने ताब्यात घेणे आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रदीप राय यांनी ताब्यात घेतलेल्या सर्व वकिलांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली.

दिल्लीतील आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टाजवळून अनेक वकिलांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या वकिलांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या अॅडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड (एओआर) सुमिता हजारिका यांचाही समावेश आहे.

जंतर-मंतरवरील आंदोलनाबाबत सीजेपीने नव्या व्हीडिओत काय म्हटलं?

कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) आपल्या समर्थकांना जंतर-मंतरवर पोहोचण्याचे आवाहन करत एक व्हिडिओ जारी केला आहे.

या व्हीडिओमध्ये सीजेपीचे नवनियुक्त नेते अजिंक्य शिंदे म्हणाले, “जर दिल्ली पोलिसांनी तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, तर जिथे तुम्हाला रोखले जाईल, तीच जागा तुमच्यासाठी जंतर-मंतर बनेल.”

सामाजिक कार्यकर्त्या नेहा बोरा यांनी केलेल्या आवाहनानंतर सीजेपीने हे आवाहन केले आहे. नेहा बोरा यांनी लोकांना जिथे रोखले जाईल, तिथेच विरोध प्रदर्शन करण्याचे आवाहन केले होते.

त्यामुळे जंतर-मंतरवर एकाच ठिकाणी मोठे आंदोलन होण्याऐवजी दिल्लीतील वेगवेगळ्या भागांत निदर्शने होण्याची शक्यता आहे.

जंतरमंतरच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

पोलिसांच्या कारवाईदरम्यान सीजेपीने एक प्रसिद्धिपत्रक जारी करून सांगितलं की, पक्षाचे राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे जंतर-मंतरवर नियोजित आंदोलनाचे नेतृत्व करतील.

दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह सौरव दास आणि आशुतोष रांका यांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआय) विमानातून उतरताच ताब्यात घेतले. त्यानंतर सीजेपीने आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.

ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) प्रवक्ते साकेत गोखले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

त्यांनी लिहिले, “ममता दीदी यांच्यासह आम्हा पाच जणांना दिल्ली पोलिसांनी आणि सीआरपीएफने दीदी यांच्या निवासस्थानाबाहेरून ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले आहे. आम्हाला कुठल्यातरी अज्ञात ठिकाणी नेले जात आहे. ही भारतातील लोकशाहीची हत्या आहे.”

टीएमसीचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी ममता बॅनर्जी यांचा हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, पीटीआयच्या वृत्तानुसार, टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि पक्षाच्या अन्य नेत्यांनी साऊथ अॅव्हेन्यू येथील एका बसस्थानकावर धरणे आंदोलन केले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतलं.

अरविंद केजरीवाल हे पक्षाच्या अन्य नेत्यांसह जंतर-मंतरच्या दिशेने मोर्चा काढत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं.

याबाबतचा एक व्हीडिओही समोर आला असून यामध्ये पोलीस केजरीवाल यांना घेऊन जाताना दिसत आहेत.

आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज यांनी हा व्हीडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं की, “निर्लज्ज दिल्ली पोलिसांनी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय संयोजकांसोबत धक्काबुक्की केली.”

या व्हिडिओमध्ये केजरीवाल यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार संजय सिंह हे देखील दिसत आहेत.

गुरुद्वारा बंगला साहिबजवळ आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप

शनिवारी (10 ऑक्टोबर) गुरुद्वारा बंगला साहिबपासून जंतर-मंतरपर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि अनेकांना बसमध्ये बसवून ताब्यात घेतलं, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारपासून दिल्लीला येणारे अनेक जण गुरुद्वारा बंगला साहिबमध्ये थांबले होते. तेथे उपस्थित असलेल्या लोकांचा दावा आहे की, शनिवारी सकाळपर्यंत गुरुद्वारामध्ये सुमारे 600 आंदोलक उपस्थित होते. त्यापैकी जवळपास 300 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

हैदराबादहून आलेले सॉफ्टवेअर इंजिनिअर अजय जिंगाडे यांनी आरोप केला की, सकाळपासून आंदोलक जंतर-मंतरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मोठ्या संख्येने तैनात असलेले पोलीस त्यांना पुढे जाऊ देत नव्हते.

आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यांच्याशी कठोर वर्तन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

गुरुद्वारा बंगला साहिबजवळ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

दरम्यान, आंध्र प्रदेशातील वारंगल येथून आलेले सीजेपीचे सदस्य चेतन प्रमोद यांनी आरोप केला की, पोलीस गुरुद्वाराच्या तिसऱ्या क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून आत येऊन आंदोलकांना जबरदस्तीने बाहेर घेऊन जात होते. शांततेत बसलेल्या लोकांनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.

गुरुद्वारा बंगला साहिबच्या परिसरात मोठ्या संख्येने पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान आणि रॅपिड अॅक्शन फोर्सचे (आरएएफ) कर्मचारी तैनात करण्यात आले होते. परिसरातील रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तसेच, दंगल नियंत्रणासाठी वापरली जाणारी वाहनेही तैनात होती.

यादरम्यान, काही ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये झटापटी झाल्या. मात्र, जंतर-मंतरवर पोहोचून आपले आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कायम असल्याचे आंदोलकांनी सांगितलं.

अजय जिंगाडे म्हणाले, “इतक्या मोठ्या संख्येने पोलीस दल पाहून भीती नक्कीच वाटते. मात्र, आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवू आणि जंतर-मंतरवर पोहोचण्याचा प्रयत्न करत राहू.”

दिपके यांचे आई-वडील काय म्हणाले?

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके म्हणाले, “मला इंदिरा गांधींबद्दल फारशी माहिती नाही. मात्र एवढं माहिती आहे की त्यांच्या कार्यकाळात आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि त्यानंतरही त्या पुन्हा सत्तेत परतल्या होत्या.”

अभिजीत दिपके यांनी ताब्यात घेतले जात असताना, “असं तर इंदिरा गांधींच्या काळातही होत नव्हतं,” असं वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, अभिजीत दिपके यांच्या आई अनीता दिपके म्हणाल्या, “अभिजीत देशासाठी चांगलं काम करत आहे आणि सरकार चुकीचं वागत आहे.”

आंदोलनादरम्यान वकीलही ताब्यात

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सर्वोच्च न्यायालय परिसरातून अनेक वकिलांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतलेल्या वकिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ॲडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड (एओआर) सुमिता हजारिका यांचाही समावेश आहे.

बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, वकिलांमध्ये प्रसारित करण्यात आलेल्या संदेशांच्या आधारे ही माहिती दिली आहे. यात सर्वोच्च न्यायालय परिसर आणि वकिलांच्या चेंबर्सजवळून किमान चार वकिलांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये दोन ॲडव्होकेट-ऑन-रेकॉर्डचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. सर्वांना एका पोलीस वाहनातून नेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या एका वकिलाने आरोप केला की, त्यांना कुठे नेले जात आहे याची कोणतीही माहिती पोलिसांनी दिली नाही.

दरम्यान, वकिलांकडून शेअर करण्यात आलेल्या एका छायाचित्रात तीन महिला पोलीस वाहनात बसलेल्यांचे दिसत असून त्यांच्यासोबत गणवेशधारी पोलीस कर्मचारीही उपस्थित आहेत.

वकिलांमध्ये प्रसारित होत असलेल्या इतर काही संदेशांमध्ये सुमारे 100 वकिलांना ताब्यात घेऊन यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये नेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ताब्यात घेतलेल्या वकिलांची नेमकी संख्या आणि पोलिसांच्या कारवाईमागील कारणांची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकलेली नाही.

लाइव्ह लॉच्या वृत्तानुसार, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने सरन्यायाधीशांकडे (सीजेआय) हस्तक्षेप करण्याची मागणी केली. त्यानंतर सरन्यायाधीशांनी संबंधित अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेल्या वकिलांची सुटका करण्याचे निर्देश दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.

नेहा बोरा यांचं आंदोलनकर्त्यांना आवाहन; ‘आज दिल्ली हाटच जंतर-मंतर’

ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (आयसा)च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्ली हाट येथे जमण्याचं आवाहन केलं आहे.

सीजेपीच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर नेहा बोरा यांनी हे आवाहन केलं आहे.

नेहा बोरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिलं, “आज दिल्ली हाटच जंतर-मंतर बनलं आहे! तिथे भेटूया!”

नेहा बोरा यांचं आंदोलनकर्त्यांना आवाहन; 'आज दिल्ली हाटच जंतर-मंतर'

आज सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान नेहा बोरा नेमक्या कुठे आहेत, याबाबत सातत्याने चर्चा आणि शोध सुरू होता.

त्यांच्या या एक्स पोस्टनंतर त्या दिल्ली हाट येथे आंदोलनात सहभागी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, डाव्या विचारसरणीशी संबंधित विद्यार्थी संघटना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मुख्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत.

पत्रकारांना घेतलं ताब्यात

या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांसह काही पत्रकारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ताब्यात घेतलेल्या पत्रकारांमध्ये न्यूजलॉन्ड्री, स्क्रोल डॉट इन आणि नवभारत टाइम्सशी संबंधित पत्रकारांचा समावेश आहे.

न्यूजलॉन्ड्रीने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे, “पत्रकारांनी आपण प्रसारमाध्यमांशी संबंधित असल्याचं सांगितल्यानंतर त्यांना ‘इथे कोणीही मीडिया नाही’ असं सांगण्यात आलं. पत्रकारांचे मोबाईल फोनही काढून घेण्यात आले. सुमारे 30 जणांना एकाच बसमध्ये बसवण्यात आलं असून त्यामध्ये आंदोलनकर्ते आणि पत्रकार दोघांचाही समावेश आहे.”

cjp

न्यूजलॉन्ड्रीने पुढे म्हटलं, “पत्रकारांचं काम वृत्तांकन करणं आहे, आंदोलन करणं नाही. ते पोलिसांच्या कामात कोणतीही अडचण निर्माण करत नव्हते. मग त्यांना कोणत्या आधारावर ताब्यात घेतलं जात आहे आणि त्यांचे फोन जप्त केले जात आहेत? दिल्ली पोलिसांनी या कारवाईबाबत स्पष्टीकरण द्यावं आणि पत्रकारांना कोणतीही भीती न बाळगता आपलं काम करू द्यावं.”

स्क्रोल डॉट इननेही सांगितलं की, त्यांच्या एका पत्रकाराला दिल्ली पोलिसांनी आयटीओ परिसरातून ताब्यात घेतलं आहे.

स्क्रोलच्या अधिकृत निवेदनानुसार, “ते जंतर-मंतरवरही नव्हते. त्यांचं प्रेस कार्ड स्पष्टपणे दिसत होतं. त्यांनी अनेकदा पोलिसांना आपण पत्रकार असल्याचं सांगितलं. तरीदेखील त्यांना जबरदस्तीने एका व्हॅनमध्ये बसवून तिथून नेण्यात आलं.”

नवभारत टाइम्सचे संपादक आशिष पांडे यांनीही सांगितलं की, दिल्ली पोलिसांनी त्यांच्या संस्थेच्या दोन पत्रकारांना ताब्यात घेतलं होतं.

ते म्हणाले, “पोलीस त्यांना दर्यागंजकडे घेऊन जात होते. आमच्या टीमकडे प्रसारमाध्यमांचे ओळखपत्र होते आणि ती स्पष्टपणे दिसत होती.”

कॉक्रोच आंदोलनामुळे दिल्लीत अभूतपूर्व बंदोबस्त; काही आंदोलक ताब्यात

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन

अभिजीत दिपके आजीसह

सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचे प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले आहे.

शॉर्ट व्हीडिओ पाहा

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

SOURCE : BBC