Home LATEST NEWS ताजी बातमी दिल्लीत सीजेपी आंदोलनात पोलिसांकडून पत्रकारांशी गैरवर्तन, जाणून घ्या नेमकं काय घडलं

दिल्लीत सीजेपी आंदोलनात पोलिसांकडून पत्रकारांशी गैरवर्तन, जाणून घ्या नेमकं काय घडलं

4
0

Source :- BBC INDIA NEWS

11 ऑक्टोबर रोजी पत्रकारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा.

Published

वाचन वेळ: 6 मिनिटे

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान अनेक पत्रकारांशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

10 ऑक्टोबरला कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, त्याआधीच पोलिसांनी पार्टीच्या नेत्यांना ताब्यात घेतले.

दुसऱ्या दिवशी, रविवारी 11 ऑक्टोबरला त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर रविवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत सीजेपीचे नेते सौरव दास यांनी “भारत सरकारने भारतीय पत्रकारांविरुद्ध युद्ध पुकारलं आहे” असा आरोप केला.

ते म्हणाले, “काल पत्रकारांना कशी वागणूक दिली गेली, हे तुम्ही पाहिलं. आज या देशात पत्रकारिता हा गुन्हा झाला आहे का? दिल्ली पोलीस पत्रकारांना नाव असलेले ओळखपत्र दाखवायला सांगत आहेत. पण हेच पत्रकार दिल्ली पोलिसांना त्यांच्या नावाच्या पाट्या कुठे आहेत, असं विचारतात, तेव्हा पोलीस त्यांच्यावर अमानुष अत्याचार करतात.”

“पत्रकारांची डोकी फोडली जात आहेत, त्यांना ढकललं जात आहे, मारहाण केली जातंय आणि ताब्यात घेतलं जात आहे. पत्रकारितेच्या बाबतीतही ही आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. पत्रकारिता चिरडली जात आहे. युवा आंदोलनाचं निःपक्षपातीपणे वार्तांकन करणाऱ्या स्वतंत्र पत्रकारांविरुद्धच सरकार आज लढत आहे,” असा आरोप सौरव दास यांनी केला.

शनिवारी 10 ऑक्टोबरला झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक, वकील आणि इतर लोकांबरोबरच काही पत्रकारांनाही अडवण्यात आले. काहींना ढकलण्यात आले, फरफटत नेण्यात आले, तर काहींचे फोन हिसकावून घेण्यात आले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या बीबीसीच्या पत्रकारांनी सांगितले की, दिल्लीतील राजीव चौकाच्या आउटर सर्कलवरून आंदोलनस्थळी जात असताना त्यांनी आपले प्रेस कार्ड आणि ओळखपत्र दाखवले. पण यानंतरही त्यांनाही अडवण्यात आले. वारंवार विनंती केल्यावर अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतरच त्यांना जाऊ दिलं.

पत्रकार संघटनांकडून पोलिसांच्या कारवाईचा निषेध

पत्रकारांना आंदोलनाचे रिपोर्टिंग करताना ताब्यात घेतल्याबद्दल देशातील 4 पत्रकार संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.

PTI या वृत्तसंस्थेनुसार, प्रेस क्लब ऑफ इंडिया (PCI), इंडियन विमेन्स प्रेस कॉर्प्स (IWPC), दिल्ली युनियन ऑफ जर्नालिस्ट्स (DUJ) आणि केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट्सच्या (KUWJ) दिल्ली शाखेने संयुक्त निवेदन जारी केले.

रिपोर्टिंग करत असताना पोलिसांकडून पत्रकारांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

CJP नेत्यांची पत्रकार परिषद

वैध प्रेस आयकार्ड असलेल्या पत्रकारांनाही ताब्यात घेण्यात आले. काही पत्रकारांचे फोन आणि रिपोर्टिंगसाठीची साधनंही जप्त करण्यात आल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.

डिजिटल मीडिया संस्थांचे फोरम असलेल्या डिजीपब न्यूज इंडिया फाउंडेशननेही पत्रकार, डिजिटल कंटेंट क्रिएटर्स आणि नागरिकांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला.

डिजीपबने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, न्यूजलॉन्ड्रीचे अश्विन सिंग आणि स्क्रोलचे आयुष तिवारी यांच्यासह अनेक पत्रकारांना ताब्यात घेण्यात आले.

“ही कायद्याची अंमलबजावणी नसून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हा पत्रकार स्वातंत्र्यावरील आणि घटनात्मक अधिकारांवरील हल्ला आहे,” असे निवेदनात म्हटलं आहे.

9 ऑक्टोबरला एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने एका महिला पत्रकाराच्या कथित लैंगिक छळासंदर्भात निवेदन जारी केले होते. पत्रकारांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांसाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणीही गिल्डने केली होती.

याआधी, 4 ऑक्टोबरला प्रेस क्लब ऑफ इंडियाने पत्रकारांवरील पोलीस कारवाई आणि जंतर मंतर परिसरातील इंटरनेट बंदीबद्दल चिंता व्यक्त केली होती. पत्रकारांना कोणत्याही भीतीशिवाय मुक्तपणे रिपोर्टिंग करता यावे, अशी मागणीही क्लबने केली होती.

‘दिल्लीत रिपोर्टिंग करणं अवघड’

बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी दिलनवाझ पाशा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनस्थळी पोहोचलेल्या बहुतांश आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यामध्ये अनेक पत्रकार आणि कंटेंट क्रिएटर्सचाही समावेश होता.

शुक्रवार 9 ऑक्टोबरच्या रात्रीपासून आंदोलनाचे नियोजित स्थळ असलेल्या जंतर मंतरच्या 4 किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

त्यामुळे पत्रकारांना वार्तांकन करण्यात अडचणी येत आहेत. रविवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या विशेष सुनावणीदरम्यान अनेक याचिकाकर्त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाझ पाशा म्हणाले, “स्वतंत्र पत्रकारांसाठी परिस्थिती आणखी कठीण झाली आहे.”

शनिवारी आंदोलनाचे वार्तांकन करताना दिलनवाझ पाशा एका आंदोलकाला अटक केल्याची बातमी देत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीतील आंदोलनाचं रिपोर्टंग करताना अनेक पत्रकारांची धरपकड करण्यात आली.

तर दुसऱ्या दिवशी रविवारी (11 ऑक्टोबर) मायक्रोफोन घेतलेल्या काही लोकांनी दिलनवाझ यांना घेरले आणि सुमारे 10 मिनिटे त्यांची चौकशी केली.

एका व्यक्तीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जमावाने त्याचा पाठलाग केला आणि त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

एनडीटीव्हीसोबत काम केलेले आणि आता स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करणारे काही ज्येष्ठ पत्रकार यांनाही पोलिसांनी अडवल्याचा आरोप आहे.

शनिवारी एका डिजिटल मीडिया पत्रकाराशी बोलत असताना ज्येष्ठ पत्रकार परंजय गुहा ठाकुर्ता यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

रविवारी दिल्लीत नेमकं काय घडलं?

रविवारी केवळ डिजिटल कंटेंट क्रिएटर्स आणि स्वतंत्र पत्रकारांनाच पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले नाही, तर काही प्रमुख माध्यम संस्थांच्या पत्रकारांनाही ताब्यात घेण्यात आले.

‘द हिंदू’च्या एका महिला पत्रकाराला कनॉट प्लेसमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली.

त्या म्हणाल्या, “मी तिथे उभी राहून व्हीडिओ शूट करत होते. तेवढ्यात काही पोलीस आले आणि त्यांनी विचारलं, ‘तुम्ही काय करत आहात?’ त्यानंतर त्यांनी मला ताब्यात घेतलं.”

इंडियन एक्सप्रेस हिंदीने रविवारी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर दिलेल्या वृत्तानुसार, त्यांचे 3 पत्रकार, शशवत, सिया आणि विजय यांना रिपोर्टिंग करत असताना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. आपण पत्रकार असून आपले काम करण्यासाठी आलो आहोत, असे स्पष्ट करूनही त्यांना जबरदस्तीने बसमध्ये चढवण्यात आले.”

रविवारी इतर अनेक पत्रकारांनाही ताब्यात घेण्यात आले. रात्री सुमारे 8.30 वाजता स्वतंत्र पत्रकार श्याम मीना यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली.

याआधी रेड माइकचे सौरभ शुक्ला यांनी एका व्हीडिओत स्वतंत्र पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल सांगितले होते.

त्यांच्या म्हणण्यानुसार, जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बॅरिकेड्सच्या आत स्वतंत्र पत्रकारांना जाऊ दिले जात नव्हते. तसेच, लहान डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवण्यात आले होते.

दिल्लीत राणा अय्युब, अजित अंजुम आणि श्रीनिवासन जैन यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ पत्रकारांनीही आंदोलनाचे रिपोर्टिंग करण्यापासून रोखण्यात आल्याचे सांगितले.

राणा अय्युब, अजित अंजुम आणि श्रीनिवासन जैन यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ पत्रकारांनीही आंदोलनाचे रिपोर्टिंग करण्यापासून रोखण्यात आल्याचे सांगितले.

राणा अय्युब यांनी एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी आरोप केला की, शनिवारी आंदोलनस्थळी त्या उभ्या असताना एका गाडीत बसलेल्या व्यक्तीने पोलिसांसमोर त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

रविवारी त्यांनी आपल्या X सोशल मीडिया हँडलवर एक व्हीडिओ शेअर केला. एक व्यक्ती पत्रकार असल्याचे भासवून चिथावणीखोर वक्तव्ये करत आहे आणि दिल्ली पोलिसांनी यासाठी पत्रकारांनाच दोष देण्यास सुरुवात केली, असं राणा यांनी म्हटलं.

श्रीनिवासन जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिला पत्रकाराने ओळखपत्र दाखवूनही पोलिसांनी त्यांच्यासमोरच तिला जबरदस्तीने ताब्यात घेतले. हा प्रकार आपल्यासाठी धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, “आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान पत्रकार आणि वकिलांना ताब्यात घेता येणार नाही, असे सांगण्यात आले. या महिलेकडे बॅज आणि मायक्रोफोन होता. ती आपण पत्रकार असल्याचे वारंवार सांगत होती, तरीही तिला ताब्यात घेण्यात आले. तिथे उपस्थित असलेल्या एका IPS अधिकाऱ्याला आम्ही पत्रकार असल्याचे वारंवार सांगत होतो, पण काहीच झाले नाही.”

रविवारी सकाळी सौरभ शुक्ला कनॉट प्लेसच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांची गाडी थांबवली.

दिल्लीत आंदोलकांना ताब्यात घेतलं तेव्हा.

पत्रकार स्मिता शर्मा यांना दिल्ली पोलिसांनी थांबवले, तेव्हा त्यांनी पोलिसांवर भेदभावाचा आरोप केला. त्या म्हणाल्या, “तुम्ही काही राष्ट्रवादी माध्यमांच्या पत्रकारांना जाऊ द्याल आणि इतरांना नाही. हे बरोबर नाही.”

मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने कोणालाही पुढे जाऊ दिले जाणार नसल्याचे सांगितले.

पत्रकार झीशान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी जेव्हा इतर पत्रकारांना का घेऊन जात आहे, असं पोलिसांना विचारलं असता, त्यांनाही ताब्यात घेतले. पण बसमधील एका खिडकीतून त्यांनी पळ काढला.

सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

शनिवारी झालेल्या आंदोलनादरम्यान काही पत्रकारांना पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

न्यूज वेअर या मिडियासाठी रिपोर्टिंग करणाऱ्या एका महिला पत्रकाराचा व्हीडिओही व्हायरल झाला आहे. त्यात त्या कनॉट प्लेसमध्ये काही लोकांशी वाद घालताना आणि त्यांच्यासमोर एकट्या उभ्या असल्याचे दिसतं.

दुसऱ्या एका व्हीडिओमध्ये एक स्वतंत्र पत्रकार, ‘पत्रकारांवर लाठीचार्ज का केला जात आहे?’, असा प्रश्न विचारताना दिसतो. त्यानंतर त्याच पोलीस अधिकाऱ्याने त्याला ढकलून ताब्यात घेतल्याचा आरोप आहे.

पोलीस अधिकाऱ्याने अशी कोणतीही घटना घडल्याचे स्पष्टपणे नाकारले. मात्र, वारंवार प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

एका व्हीडिओमध्ये 3 महिला पोलीस अधिकारी एका महिलेला पकडत असल्याचे दिसते. तिथे उपस्थित असलेल्या काही पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, त्या महिलेकडे प्रेस कार्ड होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC