Home LATEST NEWS ताजी बातमी ‘दुबई-इस्रायल फ्लाईट’ थरारनाट्याचे हिरो कॅप्टन स्मित मच्छर कोण आहेत?

‘दुबई-इस्रायल फ्लाईट’ थरारनाट्याचे हिरो कॅप्टन स्मित मच्छर कोण आहेत?

7
0

Source :- BBC INDIA NEWS

फ्लायदुबईमध्ये रुजू होण्यापूर्वी स्मितने भारतीय एअरलाइन स्पाइसजेटमध्ये एक दशकाहून अधिक काळ काम केलं आहे.

Published

वाचन वेळ: 5 मिनिटे

दुबई-इस्रायल फ्लाइटमधील थरारनाट्याचे धाडसी ‘हिरो’ म्हणून आता पायलट स्मित मच्छर यांचं जगभरातून कौतुक होत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासहित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्मित मच्छर यांची पाठ थोपटली आहे.

‘फ्लायदुबई’च्या FZ1073 विमानात भारतीय नागरिक असलेल्या कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर चाकूनं हल्ला झाला. त्यांनी बेशुद्ध होण्यापूर्वी कॉकपिटचा दरवाजा उघडला होता.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रसंगावधान राखत त्यांनी केलेल्या या कृतीमुळे हा विमान अपघात टळला, असं वृत्त आहे.

या विमानातून प्रवास करणारे इस्रायली प्रवासी यानिव हायून यांनी बुधवारी (30 सप्टेंबर) बेन गुरियन विमानतळावर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान ही माहिती दिली.

हायूननं नेतान्याहूंना सांगितलं की, कॉकपिटचा दरवाजा उघडा होता, पण पायलट स्मित मच्छर दरवाजाच्या इतका जवळ होता की तो उघडणं कठीण होतं.

“माझा निष्कर्ष असा आहे की, त्यानं प्रसंगावधान राखून आमच्यासाठी दरवाजा उघडला आणि नंतर तो बेशुद्ध झाला,” असं हायून यांनी म्हटलं.

नंतर नेतान्याहू यांनी ‘एक्स’वरील एका निवेदनात या घटनेचा उल्लेख करत स्मितच्या शौर्याचं कौतुक केलं आहे.

“चाकूनं हल्ला झाल्यानंतर गंभीर जखमी होऊनही, त्यानं प्रत्युत्तर दिलं, हल्लेखोराचा प्रतिकार केला, कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांना हल्लेखोरावर मात करण्यासाठी सावध केलं. यामुळे, एक मोठी हवाई दुर्घटना टळली,” असं इस्रायलच्या पंतप्रधानांनी लिहिलं आहे.

नेतान्याहू म्हणाले की, स्मितनं इस्रायली नागरिक आणि इतर देशांच्या नागरिकांसह 174 लोकांचे प्राण वाचवले आहेत.

केबिनच्या आतून व्हीडिओ रेकॉर्ड करणारे आणि पायलटला आवर घालण्यास मदत करणारे आसाफ रेगाविम

पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

या सगळ्या घटनाक्रमावर व्यक्त होताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलंय की, “कॅप्टन स्मित मच्छर हे एक ‘हिरो’ आहेत. अत्यंत गंभीर धोक्याचा सामना करताना आणि स्वतः गंभीर जखमी असूनही, त्यांनी असीम धैर्य आणि इतरांचे प्राण वाचवण्याचा अटळ निर्धार दाखवून दिला.”

“त्यांच्या या शौर्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले आणि एक मोठी दुर्घटना टळली. भारताला कॅप्टन मच्छर यांचा अभिमान आहे. ते लवकर बरे व्हावेत, त्यांना नव्याने बळ मिळावे आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी मी प्रार्थना करत आहे,” असंही त्यांनी म्हटलंय.

चाकू हल्ल्यादरम्यान स्मितनं काय केलं?

स्मित मच्छर यांचं सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. एका इराणी महिलेनं तिच्या इन्स्टाग्रामवर लिहिलंय की, “माझे पती पायलट आहेत. त्यांनी मला सांगितलं की पायलटच्या कॉकपिटमध्ये एक स्विच असतो, जो आतून कॉकपिटचा दरवाजा ‘अनलॉक’ करतो. त्यामुळे, कॅप्टन स्मित मच्छर यांनी केवळ मदतीसाठी कॉल दिला नसेल, तर बेशुद्ध होण्यापूर्वी तो स्विच देखील दाबला असेल, ज्यामुळे फ्लाइट अटेंडंट आणि प्रवाशांना कॉकपिटमध्ये प्रवेश करता आला. असं घडलं असण्याची शक्यता अधिक आहे.”

जर कॉकपिटचा दरवाजा बंद राहिला असता, तर कुणीही आत जाऊन विमान वाचवायला मदत करू शकलं नसतं. त्यांना सलाम. त्यांच्या त्या एका निर्णयानं विमानात असलेल्या प्रत्येकाचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

इस्रायलमधील तेल अवीव येथील बेन गुरियन विमानतळावर 30 सप्टेंबर 2026 रोजी, कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये प्रवाशांचे त्यांच्या कुटुंबीयांनी स्वागत केले.

‘जेरुसलेम पोस्ट’ या इस्रायली वृत्त संकेतस्थळानुसार, अनेक प्रवाशांनी जखमी झालेल्या स्मित मच्छर यांना प्रथमोपचार दिले.

त्यामध्ये इस्रायली डेंटीस्ट शोटा मुसायेव यांचाही समावेश होता. तबूक विमानतळावर विमानाचं आपत्कालीन लँडिंग झाल्यानंतर स्मित मच्छर यांना सौदी अरेबियातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मुसायेव यांनी इस्रायली माध्यमांना सांगितलं की, स्मित मच्छर गंभीर जखमी झाले होते आणि त्यांच्या डोक्यातून व हातांमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्यांनी रक्तस्त्राव थांबवण्यास मदत केली. त्यांनी सांगितलं की, त्यानंतर स्मित मच्छर यांची प्रकृती स्थिर झाली. परंतु, विमान उतरताना त्यांची प्रकृती पुन्हा खालावली.

मुसायेव यांनी असंही सांगितलं की, दुसऱ्या पायलटनं आपल्यावर चाकूनं हल्ला केला आहे, हे सांगण्याइतपत मच्छर बोलण्याच्या स्थितीमध्ये होते.

स्मित मच्छर हे एक अनुभवी पायलट असून त्यांनी नवीन पायलट्सना प्रशिक्षणही दिलं आहे.

स्मित मच्छर कोण आहेत?

त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर असलेल्या माहितीनुसार, ‘फ्लायदुबई’मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी भारतीय एअरलाइन असलेल्या ‘स्पाईसजेट’मध्ये एक दशकाहून अधिक काळ काम केलं आहे. तिथं त्यांनी ट्रेनिंग कॅप्टन आणि नव्या पायलट्ससाठी मार्गदर्शक म्हणूनही काम पाहिलं आहे.

त्याच्या प्रोफाइलनुसार, त्यांनी बोईंग 737-800 आणि 737 मॅक्स 8 व 9 विमानांमध्ये अंदाजे 9,750 तास उड्डाण केलं आहे.

लिंक्डइन प्रोफाइलवरून असंही दिसून येतं की, स्मित मच्छर विवाहित असून त्यांना मुलंही आहेत.

सौदी अरेबियातील भारतीय दूतावासानं सांगितलं की, स्मित मच्छर यांना सौदी अरेबियाच्या वायव्येकडील तबुक शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.

पायलट स्मित मच्छर यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप संपूर्ण माहिती मिळालेली नाही. परंतु, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं दूतावासानं कळवलं आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की ते स्मित मच्छर यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत.

ट्रम्प यांनीही केलं स्मित यांचं कौतुक

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘फ्लायदुबई’चे पायलट स्मित मच्छर यांना ‘हिरो’ म्हटलं आहे. ते म्हणाले की, त्या पायलटनं सह-पायलटचा चाकू हल्ला परतवून लावला. कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि मदतीसाठी हाक मारली. त्यामुळे विमान जाणूनबुजून पाडण्याचा कथित प्रयत्न हाणून पाडण्यास मदत झाली.

ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली आहे.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, नेतान्याहू यांनी त्यांना सांगितलं की, ज्यानं कधीही विमान उडवलं नव्हतं, अशा एका प्लंबरनं दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या या विमानाला हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे विमान अखेर सौदी अरेबियामध्ये उतरलं.

“पायलटची प्रकृती खूपच गंभीर होती. मला वाटतं, त्याची प्रकृती अजूनही तशीच आहे. पण त्यानं प्रसंगावधान राखून जे केलं, ते खरोखरच आश्चर्यकारक होतं, तो एका अर्थानं हिरोचं होता,” असंही ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्मितला 'हिरो' म्हटलं आहे.

ट्रम्प म्हणाले की, पायलट कॉकपिटचा दरवाजा उघडू शकला आणि मदतीसाठी ओरडू शकला.

“असं दिसतं की को-पायलट कदाचित दहशतवादी होता किंवा मानसिकदृष्ट्या विकृत व्यक्ती होता आणि त्यानं वैमानिकावर चाकूनं हल्ला केला,” असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले.

त्यानंतर ट्रम्प यांनी त्या इस्रायली प्रवाशाच्या “असामान्य” भूमिकेचा उल्लेख केला, ज्यानं स्वत:ची ओळख एक प्लंबर म्हणून करून दिली.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, विमान कधीही न चालवलेल्या एका प्रवाशानं कॉकपिटमध्ये प्रवेश केला, को-पायलटला त्याच्या जागेवरून खेचलं आणि मागे ढकललं. त्यानंतर इतर प्रवाशांनी त्याला पकडून रोखलं.

ट्रम्प म्हणाले की, त्या प्रवाशानं नंतर सांगितलं की, त्यानं ‘एअर डिझास्टर्स’ हा टीव्ही कार्यक्रम पाहून विमान उड्डाणाची काही मूलभूत तत्त्वं शिकलेली आहेत.

“तो म्हणाला की, तो हा शो खूप बघतो आणि त्यातूनच काही प्रमाणात तो विमान उडवायला शिकला आहे,” असंही ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, विमानाच्या मागील भागात उपस्थित असलेले अतिरिक्त पायलट आणि सुरक्षा कर्मचारी नंतर कॉकपिटमध्ये पोहोचले आणि त्यांनी विमानाचा ताबा घेतला.

“मला वाटतं की, ही एक प्रचंड अविश्वसनीय अशी कथा आहे,” असंही ते म्हणाले.

मात्र, ट्रम्प यांनी हे देखील स्पष्ट केलं की, त्यांनी केवळ त्यांना मिळालेली माहितीच सांगतली असून या तथ्यांची त्यांनी स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाहीये.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC