Home LATEST NEWS ताजी बातमी नाईट शिफ्टमुळे विस्मरणाचा धोका? रात्रीच्या जागरणाची किंमत किती मोठी? तज्ज्ञांनी दिली माहिती

नाईट शिफ्टमुळे विस्मरणाचा धोका? रात्रीच्या जागरणाची किंमत किती मोठी? तज्ज्ञांनी दिली माहिती

4
0

Source :- BBC INDIA NEWS

नाईट शिफ्ट करताय? तुमच्या मेंदू, हृदय आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतोय? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

पहाटेचे चार वाजले आहेत. रुग्णालयातील वॉर्डात शांतता आहे. एक निवासी डॉक्टर गेल्या 9 तासांपासून सतत काम करत आहे. सतत उभं राहून काम केल्यामुळे तिचं शरीर थकलं आहे, स्नायू दुखत आहेत आणि डोळ्यांवरही ताण आला आहे. पण सकाळी 6 वाजता शिफ्ट संपून घरी गेल्यानंतरही तिला सहजपणे झोप लागत नाही.

आपल्या शरीरात एक नैसर्गिक जैविक (आंतरिक) घड्याळ असतं. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमुळे ते सूर्य उगवणं आणि मावळणं यानुसार काम करण्याची सवय लावून घेतलेलं आहे.

त्यामुळे सकाळ झाली की हे घड्याळ शरीराला ‘आता उठायचं, जागं राहायचं’ असा संदेश देतं. त्यामुळे आजूबाजूला कितीही अंधार केला, कानात इअरप्लग घातले किंवा ब्लॅकआउट पडदे लावले, तरी हे पूर्णपणे शांत होत नाही.

रात्र पाळीमुळे (नाईट शिफ्ट) शरीरावर होणारा दुष्परिणाम योग्य झोपेमुळे किती कमी करता येऊ शकतो, याचा शास्त्रज्ञ आता अभ्यास करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

ही त्या डॉक्टरची वैयक्तिक उणीव किंवा कमतरता नाही. तिच्या कामाच्या वेळा आणि शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळात होणारा संघर्ष यामुळे असं होतं. अशीच परिस्थिती जगभरातील लाखो शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांची आहे.

यामध्ये नर्स, पॅरामेडिक्स, अभियंते, ट्रक चालक आणि कारखान्यांमधील कामगार यांचा समावेश आहे. हे लोक इतर सर्वजण झोपलेले असताना काम करून देशाचं कामकाज सुरळीत सुरू ठेवत असतात.

आपल्या शरीराच्या अंतर्गत जैविक घड्याळाशी सतत संघर्ष करत जगण्याची मोठी किंमत मोजावी लागते, असे वैज्ञानिक पुरावे आता समोर येत आहेत.

यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कॅन्सर, मानसिक आजार आणि कदाचित स्मरणशक्ती कमी होण्याचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे या धोक्यांकडे आता दुर्लक्ष करणं कठीण झालं आहे.

रात्रीच्या शिफ्टमुळे (नाईट शिफ्ट) शरीरावर होणारा वाईट परिणाम योग्य झोपेच्या पद्धतीने कमी करता येईल का, याचा आता शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. त्यासाठी ते एक वेगळा शोधही घेत आहेत.

दिवसा सलग दीर्घकाळ झोपण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, झोप दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये घेतली तर ती नाईट शिफ्ट करणाऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते का, यावर आता संशोधन सुरू आहे.

शिफ्टमध्ये काम करण्याची आरोग्याला मोजावी लागणारी किंमत

शिफ्टमध्ये काम केल्याने शरीरावर नेमका काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी आधी झोप किती महत्त्वाची आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे.

नव्या संशोधनानुसार, झोप ही केवळ मेंदू आणि शरीराला विश्रांती देण्यासाठी नसते. त्यापेक्षा खूप महत्त्वाची कामं झोपेदरम्यान शरीरामध्ये होत असतात.

आपण झोपेत असताना मेंदू दिवसभरातील आठवणी साठवतो, भावनांवर प्रक्रिया करतो आणि दिवसा न सुटलेल्या काही समस्यांवरही काम करत राहतो. त्याचवेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि स्नायूंची दुरुस्तीही करतो.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील झोपेचे तज्ज्ञ (स्लिप सायंटिस्ट) प्रा. रसेल फॉस्टर यांनी अनेक वर्षे झोपलेल्या अवस्थेतील मेंदू कसा काम करतो, यावर संशोधन केलं आहे.

आपण झोपेत असताना मेंदू दिवसभरातील आठवणी साठवून ठेवतो.

फोटो स्रोत, Getty Images

प्रा. रसेल फॉस्टर म्हणतात, “जसा चांगला आहार आणि व्यायाम आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत, तशीच झोपही आरोग्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे आपल्याला झोपेवरही तितकंच नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे.”

हे लक्षात घेतलं तर शिफ्टमध्ये काम करणं केवळ थकवा येण्यापुरतं मर्यादित नसल्याचं स्पष्ट होतं. अशा कामामुळे शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये वारंवार व्यत्यय येतात. या प्रक्रिया आपल्या लक्षातही न येता शरीरासाठी पडद्यामागून सतत महत्त्वाचं काम करत असतात.

अलीकडच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे, आपण झोपेत असताना मेंदू स्वतःची स्वच्छता करतो.

मेंदूच्या ‘ग्रे मॅटर’मध्ये ‘ग्लिम्फॅटिक सिस्टीम’ नावाची एक विशेष यंत्रणा असते. (ग्रे मॅटर -Grey Matter- म्हणजे मेंदूचा असा भाग ज्यामध्ये मज्जापेशींचे (न्यूरॉन्सचे) मुख्य भाग असतात. हा भाग विचार करणे, शिकणे, स्मरणशक्ती, निर्णय घेणे, भावना समजणे आणि माहिती प्रक्रिया करणे यांसारखी महत्त्वाची कामे करतो)

या यंत्रणेतून द्रव मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूच्या अतिशय बारीक मार्गांनी वाहतो आणि दिवसभर साचलेला कचरा व हानिकारक पदार्थ बाहेर काढण्याचं काम तो करतो.

मग झोप व्यवस्थित झाली नाही, तर मेंदूमध्ये साचणाऱ्या या हानिकारक किंवा विषारी पदार्थांचं काय होतं?

या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम न्यूरोलॉजिस्ट प्रा. ह्यू मार्कस यांनी सुरू केलं आहे. ते केंब्रिज विद्यापीठात स्ट्रोक मेडिसिन या संशोधन गटाचं नेतृत्व करतात.

ह्यू मार्कस आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे युटोंग चेन यांनी 40 हजारांहून अधिक लोकांच्या मेंदूच्या स्कॅनचा अभ्यास केला. हे स्कॅन आणि आरोग्यविषयक माहिती यूके बायोबँकमध्ये गेल्या 10 वर्षांहून अधिक काळात जमा करण्यात आली होती. या सर्व लोकांचे जेव्हा स्कॅन घेण्यात आले, तेव्हा ते निरोगी होते.

संशोधकांना मेंदूतील कचरा बाहेर काढणारी यंत्रणा (ड्रेनेज सिस्टिम) नीट काम करत नसलेले लोक ओळखता आले. प्रा. मार्कस यांच्या मते, ज्या लोकांमध्ये ही यंत्रणा सर्वाधिक बिघडलेली होती, त्यांना पुढील काही वर्षांत स्मृतीभ्रंश (डिमेन्शिया) होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं.

“मेंदूतील हा द्रव योग्य प्रकारे वाहत नसेल, तर पुढे कोणाला डिमेन्शिया होण्याची शक्यता आहे, याचा अंदाज लावण्यासाठी तो महत्त्वाचा संकेत ठरू शकतो. हे सामान्य लोकांवरील मोठ्या अभ्यासात दिसून आलं,” असं ते म्हणतात.

मेंदू

फोटो स्रोत, Getty Images

मेंदूतील ही यंत्रणा अमायलॉइड आणि टाऊ नावाचे प्रथिनंही बाहेर काढते. हीच प्रथिनं अल्झायमर झालेल्या लोकांच्या मेंदूत जास्त प्रमाणात साचलेली आढळून येतात.

संशोधनानुसार, केवळ एक रात्र झोप न झाल्यासही मेंदूभोवतीच्या द्रवामध्ये अमायलॉइडचं प्रमाण वाढू शकतं. जर हे सातत्याने, वर्षानुवर्षं घडत राहिलं, तर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढते.

स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी 13 हजारांहून अधिक शिफ्टमध्ये काम करणाऱ्या, त्यात नाईट शिफ्ट करणाऱ्यांचाही समावेश असलेल्या लोकांचा तब्बल 41 वर्षं अभ्यास केला.

या अभ्यासात असं आढळून आलं की, मध्यम वयात शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना डिमेन्शिया होण्याचा धोका 36 टक्क्यांनी जास्त होता. एखादी व्यक्ती जितकी जास्त वर्षे शिफ्टमध्ये काम करत होती, तितका हा धोका वाढत असल्याचंही संशोधकांना आढळून आलं.

प्रा. फॉस्टर या संबंधाबाबत सावधपणे बोलतात. ते म्हणतात, “अपुऱ्या झोपेमुळेच डिमेन्शिया होतो, असं ठामपणे म्हणता येणार नाही. परंतु, ज्या लोकांना आधीपासूनच त्याचा धोका जास्त आहे, त्यांच्यासाठी अपुरी किंवा खराब झोप हा एक महत्त्वाचा जोखीम वाढवणारा घटक ठरू शकतो.”

प्रा. मार्कस यांच्या अभ्यासात या दोन्ही गोष्टींमध्ये संबंध असल्याचे संकेत दिसून आले आहेत. पण, ते सांगतात की सध्या हा केवळ एक वैज्ञानिक अंदाज (हायपोथिसिस) आहे. यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात.

झोप

फोटो स्रोत, Getty Images

प्रा. मार्कस म्हणतात, “झोप महत्त्वाची आहेच. परंतु रक्तदाब, धूम्रपान आणि मधुमेह यांसारखे घटकही तेवढेच महत्त्वाचे आहेत. अल्झायमरचा धोका वाढवण्यात या गोष्टींचाही मोठा वाटा असतो. विशेष म्हणजे, या अशा गोष्टी आहेत ज्यांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो.”

झोपेतील सततच्या व्यत्ययामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, असे संकेतही आता संशोधनातून मिळत आहेत.

मागील वर्षी प्रसिद्ध झालेल्या 35 संशोधनांचा आढावा घेण्यात आला. त्यात असं आढळून आलं की, सलग 3 किंवा अधिक रात्री केवळ साडेचार तास झोप घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा अधिक सक्रिय होते.

संसर्गाशी लढताना ही गोष्ट फायदेशीर असते. परंतु, ही सक्रियता सतत कायम राहिल्यास शरीरात दाह (इन्फ्लेमेशन) वाढू शकतो. दीर्घकाळ असा दाह राहिल्यास हृदयविकाराचा धोका वाढण्याची जास्त शक्यता असते.

सततच्या अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील कॉर्टिसोल या ताण वाढवणाऱ्या हार्मोनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे शरीराची इन्सुलिनवरील प्रतिक्रिया कमी होते आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

कॉर्टिसोलचं प्रमाण वाढलं की झोप आणखी बिघडते. त्यामुळे हे एक दुष्टचक्र तयार होतं. याशिवाय, नाईट शिफ्ट करताना जागं राहण्यासाठी अनेक जण साखरयुक्त खाणं-पिणं करतात. त्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणखी वाढू शकतात.

हे कमी की काय, तर इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरसी) या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) संस्थेने नाईट शिफ्टला ‘माणसांमध्ये कर्करोगाचा धोका वाढवू शकणारी’ अशी श्रेणी दिली आहे.

संस्थेच्या मते, नाईट शिफ्टचा स्तन, प्रोस्टेट, मोठे आतडे आणि कोलोरेक्टल कॅन्सरशी संबंध असल्याचे काही पुरावे आहेत. त्यामुळे आयएआरसीने नाईट शिफ्टला लाल मांस (रेड मीट) ज्या जोखीम गटात ठेवले आहे, त्याच गटात वर्गीकृत केले आहे.

यामागचं एक कारण म्हणजे, नाईट शिफ्टमुळे शरीराचं नैसर्गिक जैविक घड्याळ (सर्केडियन रिदम) बिघडतं. त्यामुळे मेलाटोनिन या हार्मोनचं उत्पादन योग्य वेळी होत नाही. काही संशोधनानुसार, हा हार्मोन कॅन्सरच्या गाठींची वाढ रोखण्यास मदत करू शकतो.

तसेच, दिवसा कमी सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता भासू शकते. तसेच, अपुरी किंवा तुटक झोपेमुळे शरीरात सतत कमी प्रमाणात म्हणजेच सौम्य दाह (इन्फ्लेमेशन) निर्माण करते. हे सर्व घटक मिळून कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.

झोप दोन टप्प्यांत घेणं फायदेशीर ठरू शकतं का?

ब्रिटनमध्ये 30 लाखांहून अधिक लोक नाईट शिफ्टमध्ये काम करतात. नोकरीमुळे त्यांना झोपेची वेळ बदलण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे हे सगळं ऐकून त्यांना चिंता वाटू शकते. पण, या समस्येचा परिणाम कमी करण्यासाठी नेमकं काय उपयोगी ठरू शकतं, कोणती गोष्ट मदत करू शकेल, याचा शोध आता संशोधक घेत आहेत.

नॉर्वेची राजधानी ओस्लो येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ या संस्थेतील संशोधक डॉ. लाइन व्हिक्टोरिया मोएन या नियोजन करून घेतलेली थोड्या वेळाची डुलकी (नॅप) ही नाईट शिफ्टमुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल का, याचा अभ्यास करत आहेत.

संशोधकांनी आर्क्टिक सर्कलमधील शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांचा अभ्यास केला. उन्हाळ्यात या भागात सूर्य जवळपास मावळतच नाही, त्यामुळे दिवसाचे अनेक तास उजेड असतो आणि झोप घेणं कठीण होऊन जातं.

अशा परिस्थितीत शरीराचं अंतर्गत जैविक घड्याळ आणि बाहेरचं वातावरण यांच्यात कसा संघर्ष होतो, याचा अभ्यास करण्यासाठी हे ठिकाण अतिशय योग्य ठरले.

डॉ. मोएन यांनी उत्तर नॉर्वेमधील शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला. त्यांच्या झोपेची नोंद ठेवण्यासाठी त्यांना ओरा रिंग घालण्यात आली होती.

या माहितीचा अभ्यास करताना संशोधकांना एक महत्त्वाची गोष्ट दिसून आली. कामावरून घरी आल्यानंतर हे कर्मचारी सलग अनेक तास झोपत नव्हते. त्याऐवजी ते दोन टप्प्यांत झोप घेत होते.

ते सकाळी 9 ते 1 या वेळेत झोपायचे आणि नंतर पुढील शिफ्टला जाण्यापूर्वी दुपारी पुन्हा काही वेळ झोप घ्यायचे.

त्या म्हणतात, “त्यांच्या शरीराचं अंतर्गत जैविक घड्याळ त्यांना मध्येच उठायला भाग पाडतं. त्यामुळे झोपेची उरलेली भरपाई करण्यासाठी ते दुपारी पुन्हा अतिरिक्त वेळ झोप घेतात.”

डॉ. मोएन यांचा अभ्यास हा, नियोजन करून घेतलेली थोड्या वेळाची झोप (नॅप) ही शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी या समस्येवर एक प्रभावी उपाय ठरू शकते का, असा आहे.

फोटो स्रोत, Dr Moen

या पद्धतीला द्वि-अवस्थात्मक झोप म्हणजेच बायफेसिक स्लीप असं म्हणतात. म्हणजे 24 तासांत एकदाच सलग झोपण्याऐवजी दोन वेगवेगळ्या टप्प्यांत झोप घेणं.

झोपेचा इतिहास अभ्यासणाऱ्या संशोधकांच्या मते, वीज आणि कृत्रिम प्रकाश नसलेल्या काळात अनेक लोक अशाच पद्धतीने दोन टप्प्यांमध्ये झोपत असत. त्यामुळे ही झोपेची पद्धत माणसासाठी अधिक नैसर्गिक असू शकते, असं काही संशोधकांचं मत आहे. परंतु, यामागे नेमकी जैविक कारणं काय आहेत, यावर अजूनही मतमतांतरं आहेत.

व्हर्जिनिया टेक येथील इतिहासकार रॉजर एकिर्च यांनी गेली 40 वर्षे औद्योगिक क्रांतीपूर्व युरोपच्या इतिहासाचा अभ्यास केला आहे. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार, 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत पाश्चात्य देशांमध्ये बहुतांश लोक एकाच वेळी सलग झोपण्याऐवजी दोन टप्प्यांमध्ये झोपत असत.

त्यांच्या अभ्यासानुसार, त्या काळात अनेक कुटुंबं रात्री साधारण नऊच्या सुमारास झोपी जात. त्यानंतर मध्यरात्रीनंतर 1-2 तासांसाठी त्यांना आपोआप जाग येत असे. या वेळेत ते प्रार्थना करणं, घरातील कामं करणे किंवा गप्पा मारणे अशी कामं करत. त्यानंतर ते पुन्हा झोपत आणि या झोपेला ते ‘दुसरी झोप’ (सेकंड स्लिप) असं म्हणत.

कृत्रिम प्रकाशाचा वापर सुरू होईपर्यंत ही दोन टप्प्यांत झोपण्याची पद्धत कायम होती. 1807 मध्ये लंडनच्या रस्त्यांवर गॅसचे दिवे लावण्यास सुरुवात झाल्यानंतर लोक रात्री जास्त वेळ जागे राहू लागले. त्यामुळे दोन झोपांमधील अंतर कमी होत गेलं आणि कालांतराने ही पद्धत जवळपास पूर्णपणे बंदच झाली.

1807 मध्ये लंडनच्या रस्त्यांवर पहिल्यांदाच गॅसचे दिवे लावण्यात आले.

फोटो स्रोत, Getty Images

एकिर्च यांच्या मते, दोन टप्प्यांमध्ये झोपण्याची ही जुनी सवय पूर्णपणे संपलेली नाही. ते म्हणतात, “अनेक देशांमध्ये मध्यरात्री झोप मोडणं किंवा त्या वेळी जाग येणं ही झोपेशी संबंधित सर्वात सामान्य समस्या आहे.”

ते पुढे म्हणतात, “माझ्या मते, अनेक वेळा ही काही झोपेची समस्या नसते. उलट, ती पूर्वीच्या दोन टप्प्यांत झोपण्याच्या नैसर्गिक सवयीचा आजही दिसणारा एक अवशेष किंवा चिन्ह असू शकतो.”

प्रो. फॉस्टर यांच्या स्वतःच्या प्रयोगशाळेतील संशोधन या दाव्याला पुष्टी देतं की, काही प्रयोगही या कल्पनेला पाठिंबा देतात. एका प्रसिद्ध प्रयोगात अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ थॉमस वेहर यांनी स्वयंसेवकांना औद्योगिक क्रांतीपूर्व काळातील हिवाळी रात्रीसारखे 14 तास अंधारात ठेवलं.

काही आठवड्यांतच, कोणत्याही सूचना न देता हे स्वयंसेवक आपोआप दोन टप्प्यांमध्ये झोपू लागले. यावरून अशा प्रकारची झोप माणसासाठी नैसर्गिक असू शकते, असं संशोधकांचं मत आहे.

“माणसासाठी नैसर्गिक झोपेची पद्धत सलग एकाच टप्प्यात झोपण्याची नसावी, अशी दाट शक्यता आहे,” असं प्रा. फॉस्टर म्हणतात.

डॉ. मोएन यांना दोन टप्प्यांत झोप घेण्याच्या पद्धतीपेक्षा, त्यावर फार कमी संशोधन झालं आहे, ही गोष्ट जास्त आश्चर्यकारक वाटली.

त्यामुळे त्यांनी शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये बायफेसिक स्लीप किती प्रमाणात आढळते, तिचा आरोग्यावर काय परिणाम होतो आणि सलग एकदाच झोपण्यापेक्षा दोन टप्प्यांत झोपणं जास्त फायदेशीर आहे का, याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, यासंदर्भात त्यांना कोणतेही ठोस संशोधन किंवा माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्या म्हणतात, “मला हे खूपच रंजक आणि महत्त्वाचं वाटलं. म्हणून मी याचा सखोल अभ्यास करण्याचं ठरवलं.”

या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी डॉ. मोएन यांनी 11 हजारांहून अधिक वैज्ञानिक संशोधनांच्या सारांशांचा अभ्यास केला. त्याचबरोबर, दोन टप्प्यांत झोपण्याचा आरोग्य, कामगिरी आणि शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या अनुभवांवर काय परिणाम होतो, याचाही त्यांनी आढावा घेतला आहे. या संशोधनाचे संपूर्ण निष्कर्ष यावर्षीच्या अखेरीपर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

आतापर्यंतच्या अभ्यासात डॉ. मोएन यांना असं आढळून आलं आहे की, दोन टप्प्यांत झोपण्याबाबतचं संशोधन अजूनही विस्कळीत आहे.

काही संशोधनांत सलग एक मोठी झोप आणि त्यानंतरची छोटी डुलकी यालाच बायफेसिक स्लीप मानलं आहे. तर काही ठिकाणी दोन समान कालावधीच्या झोपा असतील, तरच त्याला बायफेसिक स्लीप म्हटलं आहे. त्यामुळेच, बायफेसिक स्लीपची एकच सर्वमान्य व्याख्या अद्याप निश्चित झालेली नाही.

झोप न येण्याची भीती

डॉ. मोएन यांच्या संशोधनाचा अंतिम उद्देश म्हणजे शिफ्टमध्ये काम करणारे आणि ज्यांची झोप वारंवार बिघडते अशा लोकांसाठी स्पष्ट वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे तयार करणं, जेणेकरून त्यांना चांगली झोप घेण्यास मदत होईल.

डॉ. मोएन म्हणतात, “नाईट शिफ्टनंतर बराच वेळ झोप येत नाही म्हणून अनेक लोक खूप चिंतेत असतात. अशावेळी त्यांना असं सांगता आलं तर चांगलं होईल की, दुपारी घेतलेली एक चांगली डुलकीही त्यांना नक्की मदत करू शकते.”

शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी स्पष्ट वैद्यकीय मार्गदर्शक सूचना तयार करणे, हा डॉ. मोएन यांच्या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे.

फोटो स्रोत, Getty Images

अनेक संशोधनांतून असं दिसून आलं आहे की, शिफ्टमध्ये काम करताना शक्य असेल तर थोडी डुलकी घेतल्याने झोप येण्याचं प्रमाण कमी होतं आणि सतर्कता वाढते.

आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, शिफ्टदरम्यान किंवा शिफ्ट संपल्यानंतर 20 ते 50 मिनिटांची डुलकी घेतल्यास एकाग्रता वाढते आणि घरी जाताना वाहन चालवताना झोप येण्याचा धोका कमी होतो.

डॉ. मोएन यांचं संशोधन पूर्वीपेक्षा अधिक सखोलपणे काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यात दोन टप्प्यांमध्ये झोप घेण्याची पद्धत किती सामान्य आहे, ती नेमकी कशी असते आणि झोप विभागून घेतल्याने आरोग्य, काम करण्याची क्षमता, थकवा आणि सुरक्षिततेवर चांगला परिणाम होतो का, याचा अभ्यास केला जाणार आहे.

डॉ. मोएन यांचे पती स्वतः शिफ्टमध्ये काम करतात आणि त्यांचा अनुभव या समस्येचं स्पष्ट आणि अचूक उदाहरण आहे.

त्या सांगतात, “ते नेहमी खूप लवकर जागे होतात. केवळ 3-4 तास झोप झाल्यानंतर त्यांना जाग येते. घरात कोणी नसतं, सगळीकडे अंधार असतो, तरीही त्यांना पुन्हा झोप लागत नाही. कारण त्यांच्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ त्यांना उठायला भाग पाडतं.”

त्यांचं शरीर केवळ अंधाराची व्यवस्था (ब्लॅकआउट ब्लाइंड) करूनही नैसर्गिक घड्याळाला थांबवू शकत नाही.

डॉ. मोएन यांना त्यांच्या पतीसारख्या आणि अशाच लाखो शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना विज्ञानाच्या आधारावर समजावून सांगायचं आहे की, शरीराच्या नैसर्गिक संकेतांशी संघर्ष करण्याऐवजी त्या संकेतांशी जुळवून घेत, त्यानुसार झोपेची पद्धत बदलणं अधिक योग्य ठरू शकतं.

डॉ. मोएन म्हणतात, “शिफ्टमध्ये काम करणाऱ्या अनेकांना दिवसा झोपण्याशिवाय पर्याय नसतो, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी चांगल्या पद्धतीने झोप घेण्यासाठी योग्य पर्याय कसे निवडता येतील, हे पाहणं महत्त्वाचं आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC