Home LATEST NEWS ताजी बातमी नेपाळमधल्या पुराचा तिबेटलाही फटका, कैलास मानसरोवर यात्रेकरूंबद्दल काय माहिती समोर?

नेपाळमधल्या पुराचा तिबेटलाही फटका, कैलास मानसरोवर यात्रेकरूंबद्दल काय माहिती समोर?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

नेपाळ-चीन सीमेवरील ग्यिरोंग खोऱ्यात चिखल आणि पाण्याचा पूर आल्यानंतरचं सीसीटीव्ही दृश्य

फोटो स्रोत, Reuters

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात ‘भोटे कोशी’ नदीला आलेल्या महापुरात 150 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

रसुवा जिल्हा तिबेट सीमेला लागून आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भीषण पूर आणि चिखलाच्या लोंढ्यांमुळे तिबेटमध्येही मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून अनेक जण बेपत्ता आहेत.

बीबीसीच्या चीनमधील वार्ताहर लॉरा बिकर यांनी सांगितले की, सीमावर्ती भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये इमारती पूर्णपणे चिखल आणि पाण्याखाली गेल्याचं दिसत आहे.

चीनमधल्या कोणत्याही नैसर्गिक संकटाची खरी व्याप्ती समजून घेणे नेहमीच कठीण असते. कारण विशेषतः तिबेटमध्ये माध्यमांवर सरकारचं कडक नियंत्रण असतं.

मात्र, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग स्वतः या घटनेबाबत सूचना देतात, तेव्हा ती घटना अत्यंत गंभीर असल्याचे संकेत मानले जाते.

शी जिनपिंग यांनी बचाव पथकांना बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.

तिबेटमध्ये हे संकट किती मोठं आहे?

सीसीटीव्ही या चीनच्या सरकारी माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ सीमेलगतच्या तिबेटमधील एका व्यापारी केंद्रावर पूर आणि चिखलाच्या लोंढ्यांनी मोठा तडाखा दिला असून ‘मृत्यू झालेल्या लोकांची संख्या’ जास्त आहे.

ग्यिरोंग काउंटीतील सीमाचौकीवरील विध्वंस सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. ही चौकी चीन-नेपाळ व्यापारासाठी महत्त्वाची असून कैलास मानसरोवर यात्रेकरू याच मार्गाने प्रवास करतात.

यात्रेसाठी आलेले अनेक जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी देशात अचानक आलेल्या पुरात झालेल्या जीवितहानीबद्दल आपलं मन अत्यंत व्यथित झाल्याचं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

शी जिनपिंग यांनी बेपत्ता नागरिकांचा ‘पूर्ण ताकदीने’ शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भविष्यात अशा आपत्ती टाळण्यासाठी अधिक सक्षम देखरेख आणि पूर्वसूचना (Early Warning) यंत्रणा उभारण्याचे निर्देशही दिले आहेत.

चीन सरकारने शोध आणि बचाव मोहिमेसाठी कर्मचाऱ्यांना तिबेटमध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तिबेट हा चीनच्या नियंत्रणाखालील स्वायत्त प्रदेश आहे.

नेमका कोणत्या भागात पूर?

या पुरामुळे तिबेटमध्येही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ग्यिरोंग काउंटीतील सीमाचौकी चीन आणि नेपाळदरम्यान पर्यटक आणि वाहतुकीसाठी प्रमुख प्रवेशद्वार आहे. या भागात सुमारे 4,000 लोक राहतात.

लॉरा बिकर यांनी बीबीसीला सांगितलं की, स्थानिक कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार तिबेटच्या सीमावर्ती भागात चीनचे अनेक बांधकाम प्रकल्प सुरू होते.

नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे 100 हून अधिक भारतीय बेपत्ता आहेत.

फोटो स्रोत, Reuters

बचावकार्यासाठी अनेक यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. त्यात भूगर्भशास्त्र, अभियांत्रिकी आणि आपत्कालीन प्रतिसाद विभागातील 200 कर्मचाऱ्यांचे विशेष पथक आहे. या पथकाकडे टोही ड्रोन, 3D लेझर स्कॅनर, लाइफ डिटेक्टर आणि इतर बचाव उपकरणे आहेत.

मात्र, या भागातील रस्ते, दळणवळण व्यवस्था आणि वीजपुरवठा अजूनही खंडित आहे.

कैलास मानसरोवरच्या यात्रेकरूंवरही परिणाम

नेपाळ हे गिर्यारोहक, ट्रेकर्स तसेच हिंदू आणि बौद्ध धर्मीय यात्रेकरूंसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. दरवर्षी हजारो भाविक धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी नेपाळला येतात.

तिबेटमधील न्गारी प्रदेशात असलेल्या कैलास पर्वताच्या यात्रेसाठीही हा सर्वाधिक गर्दीचा हंगाम असतो. हा प्रदेश चीनच्या नियंत्रणाखाली आहे. काठमांडूहून कैलास मानसरोवर यात्रेसाठी साधारण 10 दिवसांचा प्रवास केला जातो.

या पवित्र स्थळांच्या दर्शनासाठी हजारो भाविक नेपाळची सीमा ओलांडून तिबेटमध्ये जातात.

नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 100 हून अधिक भारतीयांसह 500 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत.

फोटो स्रोत, Reuters

आता नेपाळच्या पर्यटन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, या यात्रेकरूंमधील शेकडो जण बेपत्ता आहेत. त्यामध्ये 100 हून अधिक भारतीयांचा समावेश असल्याचं सांगण्यात आले आहे.

ग्यिरोंगमधील नेपाळ-तिबेट सीमेवर असणाऱ्या चौकीवरूनच मोठ्या प्रमाणावर कैलास मानसरोवरला जाणारे यात्रेकरू ये-जा करत असतात. या ठिकाणी पूर आणि चिखलाच्या लोंढ्यांनी मोठं नुकसान झालं आहे.

तामिळनाडूमधील एका टूर ऑपरेटरने सांगितले की, त्यांचे ग्राहक डोंगराळ भागातून 3 बसमधून प्रवास करत होते. त्यांच्या एका सहकाऱ्याने सांगितले की, अचानक मोठं भूस्खलन झाल्यानंतर त्यांनी त्या भागातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील एक बस रस्त्यावरून दरीत कोसळली. त्या बसमधील प्रवाशांबाबत अद्याप माहितीची प्रतीक्षा आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC