Home LATEST NEWS ताजी बातमी ‘पतीच्या मारेकऱ्यांविषयी सुडाची भावना आहे का?’, दलाई लामांच्या प्रश्नाला सोनिया गांधींनी दिलं...

‘पतीच्या मारेकऱ्यांविषयी सुडाची भावना आहे का?’, दलाई लामांच्या प्रश्नाला सोनिया गांधींनी दिलं होतं ‘हे’ उत्तर

7
0

Source :- BBC INDIA NEWS

सोनिया गांधी या भारताच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली राजकीय नेत्यांपैकी एक राहिल्या आहेत.

दोन मुलांची आई असलेल्या सोनिया गांधी यांच्यासाठी 31 ऑक्टोबर 1984 ची ती सकाळ आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्या दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी राहत होत्या. आंघोळीसाठी जाण्याच्या तयारीत असतानाच अचानक त्यांना बागेत गोळीबाराचा आवाज ऐकू आला.

त्यांच्या सासू आणि भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी शेजारच्या इमारतीतील आपल्या कार्यालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी काही समजण्याच्या आधीच 2 शीख अंगरक्षकांनी इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली.

अमृतसरमधील शीख धर्मीयांचे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या सुवर्ण मंदिरात (गोल्डन टेम्पल) त्याच वर्षी भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आली होती.

तो आवाज फटाक्यांसारखा होता, परंतु तो काहीतरी ‘वेगळा’ वाटत होता. इतक्यात मुलांना सांभाळणारी नॅनी घाबरलेल्या अवस्थेत धावत आली. तिने बाथरूमचा दरवाजा जोरजोरात ठोठावला आणि बागेच्या दिशेने बोट दाखवू लागली.

सोनिया गांधी धावतच त्या रस्त्याच्या दिशेने गेल्या. तितक्यात एक पांढरी ॲम्बेसेडर कार हळूहळू त्यांच्या दिशेने येताना दिसली. कारमध्ये इंदिरा गांधी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या साडीवर रक्ताचे डाग होते आणि त्यांचे डोळे उघडे होते. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते, असं सोनिया गांधी यांना नंतर आठवत होतं.

‘मम्मी, मम्मी,’ असं म्हणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांच्या तोंडून शब्दच फुटले नाहीत. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे सोनिया गांधी अनेक तास डॉक्टरांच्या उत्तराची वाट पाहत होत्या. अखेर डॉक्टरांनी नकारार्थी मान हलवली आणि त्यांना ज्या गोष्टीची भीती होती, तीच खरी ठरली.

 Caption- ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

पण सोनिया गांधी यांच्यासमोरची संकटं इथेच संपली नाहीत. पश्चिम बंगालमध्ये एका निवडणूक सभेला गेलेले त्यांचे पती राजीव गांधी यांना त्वरीत बोलावण्यात आलं. ते रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांनी सोनिया यांना सांगितलं की, पक्षाच्या नेत्यांची इच्छा आहे की त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारावी.

हे ऐकताच सोनिया गांधी संतापल्या आणि घाबरल्याही. त्या राजीव गांधी यांना विनवणी करत म्हणाल्या, “ते तुम्हाला मारून टाकतील. तुमचाही जीव घेतील!” त्यावर राजीव गांधी म्हणाले, “कसंही ते मला मारणारच आहेत.”

त्याच संध्याकाळी इंदिरा गांधी यांचं पार्थिव घरी असतानाच राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रातला हा प्रसंग मनाला चटका लावणारा, हृदयद्रावक असा आहे. खासगी आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्यांचाही सामना त्यांना करावा लागत होता.

राजकारणापासून दूर राहणाऱ्या सोनिया गांधी आता भारताच्या पंतप्रधानांच्या पत्नी झाल्या होत्या. पुढे त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 2 लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला. अशा प्रकारे त्या भारतीय राजकारणातील एक महत्त्वाच्या आणि अत्यंत प्रभावशाली नेत्या बनल्या.

त्यानंतरच्या काही वर्षांत सोनिया गांधी यांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवलं.

राजीव गांधींसोबत विवाह, नव्या देशात सुरू झालेलं आयुष्य

वयाच्या 19 व्या वर्षी इटलीतील एका छोट्या शहरात राहणाऱ्या सोनिया यांची इंग्लंडमध्ये राजीव गांधी यांच्याशी ओळख झाली. राजीव हे तिथे शिक्षण घेत होते. या ओळखीतून दोघांचं प्रेम जुळलं आणि सोनिया भारतात आल्या. त्यांचं आयुष्य एका नव्या देशात आणि नवीन कुटुंबात सुरू झालं. इंदिरा गांधी यांच्याशीही त्यांचं घनिष्ठ नातं निर्माण झालं. पती राजीव आणि सासू इंदिरा यांच्यामुळे भारत हाच त्यांचा देश आणि घर बनला.

राजीव यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांच्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणंही कठीण झालं होतं. त्या काही स्मृती न्यासांच्या प्रमुख होत्या. त्यामुळे त्यांना अनेकवेळा कार्यक्रमांना जावं लागत असत. भाषण करण्यापूर्वी बोलताना आपल्याला रडू कोसळेल आणि अश्रू अनावर होतील, अशी भीती त्यांना सतत वाटत असे.

दलाई लामांनी एकदा सोनिया गांधी यांना विचारलं की, पतीच्या मारेकऱ्यांविषयी त्यांच्या मनात सुडाची भावना आहे का? त्यावर त्यांनी म्हटलं, “नाही, अजिबात नाही.” असं म्हणताच त्यांना रडू कोसळलं.

Caption- आई इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर काही तासांतच राजीव गांधी यांनी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

हळूहळू राजीव गांधी यांच्या आठवणी त्यांच्यासाठी दुःख देणाऱ्या न राहता आयुष्याचा एक भाग बनल्या, असं त्यांनी लिहिलं आहे. राजीव यांची उणीव सतत जाणवण्याऐवजी ते आपल्या मनात कायमचे असल्याची भावना निर्माण झाली, असं त्या सांगतात.

मात्र कुटुंबातील आनंदाच्या प्रसंगीही त्यांना राजीव गांधी यांची आठवण येऊन दुःख अनावर होत असत. 1995 मध्ये मुलगा राहुल गांधीच्या केंब्रिज विद्यापीठातील पदवीदान समारंभाला राजीव गांधी असते, तर मुलाच्या यशाचा त्यांना किती अभिमान वाटला असता, या विचाराने सोनिया आणि त्यांची दोन्ही मुलं भावूक झाली होती.

राजकारणातला प्रवेश

दरम्यान, राजकारणापासून दूर राहण्याचा सोनिया गांधी यांचा प्रयत्नही फार काळ टिकणार नव्हता. त्यांच्या कुटुंबाचा अनेक पिढ्यांपासून असलेला काँग्रेस पक्ष हळूहळू कमकुवत होत होता. पक्षातील एकजूट कमी होत होती आणि निवडणुकांमध्येही पक्षाची पीछेहाट होत होती.

पक्षातील ज्येष्ठ नेते काँग्रेस सोडून जात होते. अशा परिस्थितीत सोनिया गांधी यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी जोर धरू लागली होती.

परंतु, सुरुवातीला त्यांनी काँग्रेसची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. राजीव गांधी यांच्या माध्यमातून त्यांनी राजकारण जवळून पाहिलं होतं. राजकारणात चांगली कामं होत असली, तरी त्यात सत्तेची महत्त्वाकांक्षा, स्वार्थ, ढोंगीपणा आणि विश्वासघातही असल्याचं त्यांनी अनुभवलं होतं.

‘मला राजकारण कधीच आवडलं नव्हतं,’ असं त्यांनी आत्मचरित्रात लिहिलं आहे. राजकारणामुळे आधी त्यांच्या सासू इंदिरा गांधी यांना जीव गमवावा लागला आणि त्यानंतर ‘माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्ती, माझ्या मुलांच्या वडिलांनाही’ गमवावं लागलं, असं त्या सांगतात.

पण, काँग्रेस पक्षाची घसरण ही आता त्यांच्यासाठी वैयक्तिक दुःखाचा विषय बनली होती. इंदिरा आणि राजीव गांधी यांचे फोटो पाहताना त्यांच्या मनात ‘दुःख आणि अपराधीपणाची भावना’ निर्माण होत असत. ‘भारतातील विविध धर्म आणि संस्कृतींचा आदर’ करणारी एकजूट टिकवण्यासाठी इंदिरा आणि राजीव यांनी ज्या विचारांविरोधात लढा दिला होता, तेच विचार पुन्हा बळकट होत असल्याची त्यांना भीती वाटत होती.

त्यांच्या मते, ‘वाढता हिंदुत्ववादी राष्ट्रवाद हा भारताच्या धर्मनिरपेक्ष’ आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांना धोका निर्माण करत होता.

सोनिया गांधी यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली नाही, तर काँग्रेसमध्ये फूट पडू शकते आणि धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्या शक्तींना विरोध करण्यासाठी पक्षात फारसं बळ उरणार नाही, असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं होतं.

गांधी घराण्याच्या नावाला धर्म, जात, भाषा आणि प्रदेश यांच्या पलीकडे जाऊन लोकांचा पाठिंबा मिळू शकतो, असं त्यांना वाटत होतं. पक्षाची जबाबदारी स्वीकारण्यामागे हाच ‘सर्वात महत्त्वाचा मुद्दा’ होता, असं त्यांनी आत्मचरित्रात म्हटलं आहे.

सोनिया गांधी यांनी या पुस्तकात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतरचं आपलं दुःख, आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या आहेत.

त्यांना स्वतःच्या क्षमतेबद्दलही शंका होती. भारताबाहेरून आलेली व्यक्ती इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी सांभाळलेली जबाबदारी कशी पार पाडू शकेल, असा प्रश्न त्यांना पडला होता.

दुसरीकडे, राहुल आणि प्रियांका यांनाही आई गमावण्याची भीती वाटत होती. आधीच त्यांनी आजी आणि वडिलांना गमावलं होतं. त्यामुळे नववर्षाच्या सुट्टीसाठी जाण्यापूर्वी दोघांनी आईकडून एक वचन घेतलं. ते म्हणाले, “आम्ही बाहेर असताना तू काहीही वेडंवाकडं पाऊल उचलू नकोस.”

या प्रश्नाचं ‘उत्तर’ आपल्याला भगवद्गीतेतून मिळालं, असं सोनिया गांधी सांगतात. त्या धार्मिक नव्हत्या. परंतु, जानेवारी 1997 मध्ये त्यांनी संस्कृतच्या एका विद्वानाकडून खासगी शिकवणी घेण्यास सुरुवात केली. त्यांनी भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक वाचून त्याचा अर्थ समजून घेतला. गीतेचा मुख्य संदेश म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता पार पाडणं. या विचारामुळे मनातील द्वंद्व दूर झालं आणि त्यांना निर्णय घेणं सोपं झालं, असं त्यांनी लिहिलं आहे.

“माझ्या मनातील शंका आणि प्रश्नांची उत्तरं मला मिळाली होती. आता मला घराबाहेर पडून जिथे माझं कर्तव्य मला बोलावत होतं, तिथे जाणं गरजेचं होतं. आणि मी तो निर्णय घेतला.”

पंतप्रधानपद नाकारण्याचा निर्णय

मात्र या आत्मचरित्रातील सर्वात नाट्यमय राजकीय प्रसंग 7 वर्षांनंतरचा आहे. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला होता या निवडणुकीत सोनिया गांधी यांनी पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.

सोनिया या मनमोहन सिंग यांच्यासोबत दिल्लीत राष्ट्रपती भवनात जातात. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा असल्याचे त्या राष्ट्रपतींना कळवतात. त्यावेळी सोनिया गांधीच देशाच्या पंतप्रधान होणार, असं सर्वांना वाटत असतं. मात्र, त्या याबद्दल काहीच बोलत नाहीत.

घरी परतल्यानंतर त्यांनी आपण पंतप्रधानपद स्वीकारणार नसल्याचे एका वरिष्ठ सहकाऱ्याला सांगितलं. दरम्यान, पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर जमू लागले. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनीही त्यांची भेट घेण्याचा आग्रह धरला.

एका नेत्याने त्यांना सांगितलं, “तुम्ही निवडणूक लढवली, आमचं नेतृत्व केलं. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला. मग तुम्ही त्यांना अशा प्रकारे निराश कसं करू शकता? तुमच्या या निर्णयामुळे पक्षाचे कार्यकर्ते बंड करतील. तुमच्याऐवजी दुसऱ्या नेत्याला ते स्वीकारतील, असं तुम्हाला वाटतं का?”

त्यांची समजूत काढण्यासाठी आघाडीतील नेते त्यांच्या घरी येतात. ते सगळे त्यांच्याभोवती जमून त्यांना निर्णय बदलण्याची विनंती करत होते. त्यांच्या आठवणीनुसार, त्यातील एकाने आग्रह धरला, “तुम्ही ‘नकार’ दिलात तरी आम्ही तो स्वीकारणार नाही.”

या सर्व गोष्टींमुळे गोंधळलेल्या सोनिया गांधी हळूच पुटपटल्या, ‘ठीक आहे.’ नेत्यांनी त्यांच्या या बोलण्याचा अर्थ त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारलं असं घेतला आणि त्यांचे अभिनंदन करू लागले.

Caption- 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या अंत्यसंस्कारावेळी मुलगी प्रियांका आणि मुलगा राहुल यांच्यासोबत सोनिया गांधी (मध्यभागी).

सोनिया गांधी लिहितात की, त्यांच्या मुलांना हा प्रकार अजिबात आवडला नाही. राहुल गांधी संतापून त्यांच्याकडे आले आणि विचारलं, “तू हो म्हणालीस?” तर मुलगी प्रियांका त्यांना कोणाच्याही दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नकोस, असं सांगितलं.

सोनिया गांधी लिहितात की, त्या रात्रभर स्वतःशी, मित्रांशी आणि कुटुंबीयांशी चर्चा करत राहिल्या. हा निर्णय केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापुरता मर्यादित नव्हता. भाजप त्यांचा जन्म परदेशात झाल्याचा मुद्दा पुढे करून टीका करत राहील, असे त्यांना वाटत होतं. त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले असतं, तर या वादामुळे देशात ‘मोठा गोंधळ’ निर्माण झाला असता आणि देशाचं नुकसान झालं असतं, अशी त्यांना भीती होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपला निर्णय पक्का केला होता. त्या राहुल गांधी यांना म्हणाल्या, “मी निर्णय घेतला आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे .”

Caption- 2004 मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यानंतर सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला. त्याऐवजी त्यांनी मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून निवड केली.

त्यांनी अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या आणि काँग्रेसचे सदस्य असलेल्या मनमोहन सिंग यांची निवड केली. त्यांच्या मते, मनमोहन सिंग यांची ‘प्रतिमा स्वच्छ’ होती. तसेच, ‘प्रशासन कसे चालवायचे, याची त्यांना सखोल आणि उत्तम जाण’ होती.

कुटुंबाच्या आठवणींनंतर सोनिया गांधी भारतात बदलत गेलेल्या परिस्थितीबद्दल लिहितात. यातून त्यांचे विचार स्पष्टपणे समोर येतात.

सोनिया म्हणतात की, त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला, तेव्हा ‘संसदीय राजकारणात एक प्रकारची सभ्यता आणि शिस्त पाळली जात’ होती.

राजकीय टीका आणि कठोर शब्दांचा वापर यापूर्वीही होत होता. परंतु, आता सत्तेत असलेल्यांकडून “आपल्यापेक्षा वेगळं मत मांडणाऱ्यांना कमी लेखणं, त्रास देणं आणि विरोधकांना धमकावणं” याचे प्रमाण वाढले आहे, असं त्यांना वाटतं. त्यांच्या मते, जगभरात ‘हुकूमशाही वृत्ती वाढत असून, अशा सत्तांमध्ये दिसणारी निर्दयताही’ वाढत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल काय लिहिलं आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सोनिया गांधी यांनी या पुस्तकात स्पष्टपणे लिहिले आहे.

सोनिया गांधी लिहितात की, संसदेच्या कार्यक्रमांमध्ये औपचारिक भेटी आणि अभिवादन यापलीकडे त्यांचा आणि नरेंद्र मोदी यांचा कधी फारसा संवाद झालेला नाही. त्या रुग्णालयातून परतल्यानंतर मोदी कधीतरी त्यांना, “ठीक आहात ना?” असे विचारायचे. “पण, ते माझ्याशी बोलताना अनेकदा नजर चुकवतात, नजरेला नजर देणं टाळतात,” असं त्या म्हणतात.

सोनिया गांधी लिहितात की, मोदी यांची भारताबद्दलची विचारसरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचारांमधून घडली आहे. त्यांच्या मते, या विचारसरणीत स्वतःचा धर्म आणि संस्कृती इतरांपेक्षा श्रेष्ठ मानली जाते.

मोदी यांना असा भारत हवा आहे, ‘जिथे ठराविक नियम, शिस्त आणि नियंत्रणाला महत्त्व असेल’, असं त्या म्हणतात. याउलट, त्यांना असा भारत हवा आहे, ‘जिथे कोणाचेही वर्चस्व नसेल. सर्वांना समान स्थान मिळेल, धर्मनिरपेक्षता जपली जाईल आणि सामाजिक न्यायाला महत्त्व’ दिले जाईल.

मोदींवरील टीका करतानाच त्या एक गोष्ट मान्य करतात. त्यांच्या मते, ‘सध्याच्या सत्ताधारी वर्गाबद्दल मोदींना वाटणारी नाराजी त्यांना समजू शकते.’

सोनिया म्हणतात की, दिल्लीतील श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांच्या बैठकीत त्यांनाही अस्वस्थ वाटायचं. तिथे होणाऱ्या राजकीय चर्चा या सामान्य ‘भारतीयांच्या वास्तवापासून खूप दूर असल्याचे त्यांना जाणवायचे.’

Caption- सोनिया गांधी लिहितात की, त्यांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कधीच फारसा थेट संपर्क आलेला नाही.

त्या लिहितात की, मोदी यांची पार्श्वभूमी त्यांच्या प्रसिद्धीची (पीआर) जबाबदारी सांभाळणारे लोक सांगतात तितकी साधी नसावी. परंतु, ते एका गरीब परिस्थितीतून पुढे आले आणि आरएसएसमध्ये काम करत करत सत्तेपर्यंत पोहोचले, हे नक्कीच आहे.

काँग्रेसचे नेते आणि सामान्य मतदार यांच्यात किती अंतर होते, याची जाणीव सोनिया गांधी यांच्या या विधानातून होते. याच मतदारांचे प्रतिनिधित्व पुढे नरेंद्र मोदी करू लागले.

जागतिक नेत्यांसोबतच्या गाठीभेटी

या आत्मचरित्रामध्ये सोनिया गांधी यांची जगातील अनेक मोठ्या नेत्यांसोबत झालेल्या भेटींचे काही प्रसंगही वाचायला मिळतात.

सोनिया गांधी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची आठवण सांगितली आहे. त्या म्हणतात की, पुतिन ‘आकर्षक व्यक्तिमत्वाचे’ होते. सेंट पीटर्सबर्गमध्ये त्यांनी सोनिया गांधी यांना बोटीतून फिरवले आणि वाटेत शहरातील ऐतिहासिक वास्तू दाखवल्या.

जागतिक राजकारणाची पुतिन यांना असलेली जाण आणि ‘रशियाला पुन्हा एकदा पूर्वीसारखे शक्तिशाली बनवण्याची त्यांची इच्छा’ पाहून आपण प्रभावित झालो होतो, असे सोनिया गांधी सांगतात. परंतु, हा प्रसंग ‘युक्रेन युद्ध सुरू होण्याच्या खूप आधीचा, वेगळ्या काळातील आहे,’ असंही त्या स्पष्ट करतात.

फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांच्यासोबतचा एक प्रसंगही मजेशीर आहे. 2008 मध्ये ते भारतात आले, तेव्हा त्यांची जोडीदार कार्ला ब्रुनी त्यांच्यासोबत नव्हती. कारण त्या दोघांचा विवाह झालेला नव्हता.

भारताच्या उपराष्ट्रपतींच्या पत्नीने एका खास सरकारी मेजवानीत सार्कोझी यांना मजेशीर प्रश्न विचारले. ते कार्ला ब्रुनी यांच्याशी लग्न कधी करणार, त्यांना त्यांची आठवण येते का आणि लग्नाची तारीख ठरली आहे का, अशी विचारणा त्यांनी केली. सार्कोझी यांनीही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्याच वेळी ते आपल्या मोबाईलवरून कार्ला ब्रुनी यांना मेसेजही पाठवत होते.

‘बिलाँगिंग’ हे पुस्तक पूर्णपणे तटस्थपणे लिहिलेले इतिहासाचं पुस्तक नाही. राजीव गांधी यांच्या सरकारला मोठा फटका बसलेल्या आणि अनेक वर्षे गांधी कुटुंबाचा पाठलाग केलेल्या बोफोर्स तोफांच्या खरेदीतील कथित गैरव्यवहाराचा उल्लेख या पुस्तकात फार थोडक्यात करण्यात आला आहे.

502 पानांच्या या आत्मचरित्रात काँग्रेसच्या कारभारातील उणिवांबद्दल मात्र फारसं भाष्य करण्यात आलेलं नाही. विरोधी पक्षांवर राजकीय भ्रष्टाचार, दुटप्पीपणा आणि राजकारणातील घसरलेल्या दर्जाबद्दल सोनिया गांधी यांनी बरीच टीका केली आहे.

पण, काँग्रेस सत्तेत असताना पक्षात वाढलेले मर्जीतील लोकांना झुकते माप देण्याचे प्रकार, जवळच्या लोकांना फायदा पोहोचवणे आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर त्या फारसे बोलत नाहीत. जनतेचा राजकारणावरील विश्वास कमी होण्यास काँग्रेसही काही प्रमाणात जबाबदार होती, याचाही फारसा ऊहापोह या पुस्तकात केलेला नाही.

आपल्या पती आणि सासू यांनी उभ्या केलेल्या राजकीय वारशाची बाजू मांडण्याचा सोनिया गांधी यांनी या पुस्तकात प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांनी उभा केलेला काँग्रेस पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून घसरणीच्या काळातून जात आहे. हा राजकीय वारसा सांभाळताना सोनिया गांधी यांना किती अडचणींचा सामना करावा लागला, याची कहाणी या पुस्तकात आहे. आपल्याला हे राजकीय आयुष्य कधीच नको होतं, असंही त्या सांगतात.

त्यामुळे या आत्मचरित्राची शेवटची पानं वाचताना एक प्रकारची उदासिनता जाणवते. सोनिया गांधी आता 79 वर्षांच्या असून राज्यसभेच्या सदस्य आहेत. राहुल गांधी 55 वर्षांचे असून 4 वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. ते सध्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. प्रियांका गांधी 53 वर्षांच्या असून त्या देखील खासदार आहेत.

वेदना आणि नुकसान, विजय आणि पराभव, तसेच राजकारणातील डावपेच या सगळ्यांचा सामना करताना ‘न्याय्य आणि माणुसकी जपणाऱ्या समाजाच्या विचारांशी प्रामाणिक राहणं,’ हेच आपल्यासमोरचं मोठं आव्हान होतं, असं त्या म्हणतात.

पण, पुस्तकाचा शेवट करताना त्या आपल्या विजयाचा दावा करत नाहीत. भविष्यात इतिहास आपल्याला योग्य ठरवेल, अशी खात्रीही त्या व्यक्त करत नाहीत.

“आज मागे वळून पाहताना मला वाटतं की, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले. पण ज्या शक्तींविरोधात लढण्यासाठी मी पुढे आले होते, त्यांना रोखण्यात मला यश आलेलं नाही.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC