Home LATEST NEWS ताजी बातमी ‘पाण्याबाहेर पडलो की शरीर जळतं’, दिवस-रात्र तलावात राहणाऱ्या या मुलाला नेमकं काय...

‘पाण्याबाहेर पडलो की शरीर जळतं’, दिवस-रात्र तलावात राहणाऱ्या या मुलाला नेमकं काय झालंय?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

'पाण्याबाहेर पडलो की शरीर जळतं' म्हणणाऱ्या 16 वर्षीय मुलाला नेमकं काय झालंय?

फोटो स्रोत, ANI

Published

वाचन वेळ: 2 मिनिटे

पश्चिम बंगालमधील 16 वर्षीय इक्बाल तलावाच्या पाण्यात राहतो. पाण्याबाहेर पडताच संपूर्ण शरीर जळायला लागत असल्याचा त्याचा दावा आहे. या विचित्र वाटणाऱ्या अवस्थेमुळे तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

त्यानंतर उद्योजक अनंत अंबानी यांनी त्याच्या उपचारासाठी पुढाकार घेतला. मात्र, या मुलाला नेमकं काय झालं आहे, याबाबत डॉक्टर काय सांगतात?

ऐकायला विचित्र वाटलं तरी ही गोष्ट आहे, एका 16 वर्षांच्या मुलाची.

पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबादमध्ये इक्बाल नावाच्या मुलाला दिवसरात्र पाण्यात राहावं लागतं. पाण्याबाहेर आलं की शरीर जळल्यासारख्या वेदना होतात असं त्याचं म्हणणं आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी त्याच्या उपचारांची जबाबदारी घेतली आहे.

त्याला आता विशेष वैद्यकीय तपासण्यांसाठी विमानाने मुंबईला आणण्यात आलंय, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिलीय.

पश्चिम बंगालच्या बेलडांगा परिसरातील इक्बाल नावाच्या या मुलाचे तलावाच्या पाण्यात राहतानाचे व्हीडीओ अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एएनआयच्या वृत्तानुसार, इक्बाल म्हणाला, “मी पाण्याबाहेर पडताच माझं संपूर्ण शरीर जळत असल्यासारखं वाटतं. एखादी अलौकिक शक्ती माझ्यावर ताबा मिळवत असल्याची भावना होते आणि ती मला पाण्यातच राहण्यास सांगते.”

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओंमध्ये हा मुलगा तासन्तास पाण्यात राहतो आणि पाण्यातच अन्नपदार्थ खातानाही दिसतो.

हा प्रकार अनंत अंबानी यांच्या निदर्शनास आला. त्यांनी मुलाकडे वैद्यकीय पथक पाठवून प्राथमिक तपासण्या केल्या. त्यानंतर विशेष उपचारांसाठी मुलाला विमानाने मुंबईत आणण्यात आले आणि सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, असे एएनआयने म्हटले आहे.

रात्रंदिवस पाण्यात

स्थानिक लोकांनीही इक्बालच्या अवस्थेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांच्या मते, सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत तो एखाद्या तलावात तरंगताना दिसतो. कधीकधी तो वेगवेगळ्या तलावांमध्ये जाऊन राहतो.

“या मुलाला स्थानिक लोक अन्न देत असत. तो पाण्यात राहूनच जेवण करत असे. लहानपणापासूनच त्याचं वजन भावंडांच्या तुलनेत अचानक वाढू लागलं होतं आणि त्याला काही आरोग्यविषयक समस्या असल्याचं वाटत होतं. दीर्घकाळ पाण्यात राहिल्यामुळे त्याला सर्दी आणि खोकल्याचाही त्रास होत असे,” असे एनडीटीव्हीच्या वृत्तात नमूद करण्यात आलंय.

त्याला यापूर्वीही रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं मात्र त्यात कोणतीही प्रगती झाली नाही. अशी चिंता त्याच्या पालकांनी व्यक्त केली.

दीर्घकालीन उपचारांचा खर्च पेलणे त्यांच्या आर्थिक आवाक्याबाहेर असल्याने त्यांनी मदतीची विनंती केली आहे.

‘सतत पाण्यात राहिलं तर…’

मात्र दीर्घकाळ पाण्याच्या संपर्कात राहिल्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात, असा इशारा डॉक्टरांनी दिलाय.

त्यांच्या मते, अशा परिस्थितीत स्किन मॅसेरेशन (Skin Maceration) होऊ शकते. याचा अर्थ त्वचा सतत भिजल्याने ती मऊ पडते, कमकुवत होते आणि तिच्यावर परिणाम होतो. हळूहळू त्वचेवर भेगा पडू शकतात, ज्यामुळे चिडचिड आणि संसर्गाचा धोका वाढतो.

एनडीटीव्हीशी बोलताना एका त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितलं, त्वचा सतत ओलसर राहिल्यास बुरशीजन्य (फंगल) आणि जीवाणूजन्य (बॅक्टेरियल) संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

त्यांनी इक्बालला तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला आणि दीर्घकाळ पाण्यात राहू नये, असेही सांगितले.

एएनआयच्या वृत्तानुसार, जर या मुलाच्या मनात काही विशिष्ट समजुती, भीती किंवा मानसिक ताण असेल, तर त्याने मानसोपचारतज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC