Source :- BBC INDIA NEWS
Getty Images
मधुमेह म्हणजे केवळ रक्तातील साखरेची पातळी वाढणे एवढेच नव्हे. दीर्घकाळ साखरेवर नियंत्रण नसेल, तर नसा, किडनी, डोळे, हृदयासोबतच पायांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो.
विशेषतः पायांची आग होणे, सुया टोचल्यासारख्या वेदना, मुंग्या येणे किंवा पाय बधीर होणे याकडे अनेक लोक सर्रास दुर्लक्ष करतात. हे सर्व वाढत्या वयामुळे किंवा थकव्यामुळे होत असेल, असं त्यांना वाटतं.
ही ‘डायबेटिक पेरिफेरल न्यूरोपॅथी’ या नसांच्या आजाराची लक्षणं असू शकतात. पेरिफेरल न्यूरोपॅथीचाच हा एक भाग असून दोघांची लक्षणं सारखीच असतात. त्यामुळे अशी लक्षणं दिसणाऱ्यांनी रक्तातील साखरेची तपासणी करून घेणं चांगलं.
यातली सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे पायाला जखम झाली तरी वेदना अजिबात कळत नाहीत. एखादा लहानसा फोड, चप्पल चावणे किंवा नख टोचल्यामुळे झालेली किरकोळ इजाही हळूहळू चिघळत जाऊन मोठी जखम बनते. पुढे इन्फेक्शन वाढल्यास वेळप्रसंगी तो पाय किंवा पायाचा भाग काढून टाकण्याची गंभीर परिस्थिती ओढावू शकते.
पण वेळेत तपासणी केल्यास, व्हिटॅमिन B12 ची कमतरता ओळखल्यास, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवल्यास आणि पायांची योग्य काळजी घेतल्यास अशा अनेक समस्या टाळता येऊ शकतात किंवा त्यांची तीव्रता कमी करता येऊ शकते.
Getty Images
मधुमेह असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये नसांच्या समस्या उद्भवतातच असं नाही. मात्र मधुमेहाचा कालावधी वाढत गेला, रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राहिलं नाही अथवा इतर काही धोके असतील, तर नसा निकामी होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे काय?
रक्तातली साखरेची पातळी दीर्घकाळ जास्त राहिल्यामुळे नसांना रक्तपुरवठा करणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिन्या आणि नसांची कार्यप्रणाली खराब होऊ शकते. यामुळे नसांची कार्यक्षमता मंदावते. या स्थितीलाच ‘डायबेटिक न्यूरोपॅथी’ असं म्हणतात.
याची सुरुवात सामान्यतः पायांच्या बोटांपासून होते आणि हळूहळू ती शरीराच्या वरच्या भागात पसरत जाते.
Getty Images
मुख्य लक्षणं:
- तळपायांची रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर जळजळ होणं
- सुया टोचल्यासारखं किंवा विजेचा झटका बसल्यासारखं वाटणं
- बोटांमध्ये मुंग्या येणं आणि स्पर्श कमी जाणवणं
- उष्णता, थंडपणा किंवा वेदनांची जाणीव नीट न होणं
- चालताना तोल जाणं आणि वारंवार अडखळणं
- पायांच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवणं किंवा पायांच्या आकारात बदल होणं
काही व्यक्तींमध्ये कोणतीही जळजळ किंवा वेदना न होता केवळ संवेदना नाहीशी होते. त्यामुळे वेदना जाणवत नाहीत याचा अर्थ नसा पूर्णपणे निरोगी आहेत, असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल.
पायांवर व्रण म्हणजेच अल्सर का तयार होतात?
डायबेटिक फूट अल्सर म्हणजे डायबिटीस असलेल्या व्यक्तीच्या पायावर त्वचेच्या थराला भेदून आतल्या पेशींपर्यंत पसरलेली जखम. यामागे प्रामुख्याने 3 महत्त्वाची कारणं असतात.
- नसा खराब होणं : चप्पल चावणे, नखाची इजा, किरकोळ इजा किंवा गरम वस्तू लागून त्वचा भाजली तरी वेदना अजिबात कळत नाहीत.
- रक्तप्रवाह कमी होणं: मधुमेहासोबतच रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठल्यामुळे पायांकडे होणारा रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे जखम भरून येण्यास खूप वेळ लागतो.
- इन्फेक्शन: जखमेमध्ये बॅक्टेरिया शिरल्यास सूज येणे, पू होणे आणि पेशींचं नुकसान होणं असा त्रास सुरू होतो. हे इन्फेक्शन अगदी हाडांपर्यंत पसरण्याचा धोकाही असतो.
Getty Images
पायांच्या आकारात बदल होणं, अंगठ्याशेजारील हाड बाहेर येऊन सूज आल्यासारखं दिसणं, बोटं वाकडी होणं आणि त्वचा कडक होणं यामुळे पायाच्या विशिष्ट भागांवर दाब वाढतो आणि जखमा म्हणजेच अल्सर होतात.
2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या भारतीय अभ्यासांच्या एका सविस्तर विश्लेषणात 55 हजार 988 मधुमेह रुग्णांशी संबंधित 18 अभ्यासांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार अंदाजे 6.2 टक्के रुग्णांना डायबेटिक फूट अल्सर झालेला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
2024 मध्ये ‘बीएमजे ओपन डायबिटीस रिसर्च अँड केअर’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या भारतीय अभ्यासानुसार, पाहणी करण्यात आलेल्या मधुमेही रुग्णांपैकी सुमारे एक चतुर्थांश रुग्णांमध्ये पायांच्या गंभीर धोक्याची लक्षणं आढळली.
पायाला व्रण (अल्सर) झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा अल्सर होण्याआधीच त्याचा धोका ओळखणे अधिक महत्त्वाचे ठरते.
हिटॅमिन B12 ची कमतरता
पायांची आग किंवा मुंग्या येण्याचा त्रास असलेल्या प्रत्येकामध्ये मधुमेहामुळे नसा खराब झाल्या आहेत असं ठामपणे सांगता येत नाही. शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यामुळेही अशी लक्षणं दिसू शकतात.
नसांच्या भोवती असणाऱ्या संरक्षणात्मक आवरणासाठी, लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि संपूर्ण मज्जासंस्थेच्या सुरळीत कार्यासाठी व्हिटॅमिन B12 ची अत्यंत गरज असते.
याच्या कमतरतेमुळे हाता-पायांना मुंग्या येणं, आग होणं, संवेदनशीलता मंदावणं, चालताना तोल जाणं, थकवा आणि ॲनिमिया (रक्त कमी होणं) अशी लक्षणं समोर येतात.
ही कमतरता खूप जास्त काळ राहिली तर मज्जासंस्थेचं कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका असतो.
‘मेटफॉर्मिन’ घेणाऱ्यांनी सावध राहायला हवं
टाइप 2 मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या ‘मेटफॉर्मिन’ या औषधाच्या दीर्घकालीन वापरामुळे शरीरातील व्हिटॅमिन B12ची पातळी कमी होण्याची शक्यता असते.
विशेषतः पायांमध्ये नव्याने जळजळ जाणवणं, मुंग्या येणं अथवा ॲनिमियासारखी लक्षणं आढळल्यास तातडीने B12 ची तपासणी करून घ्यायला हवी.
Getty Images
मधुमेह असलेल्या प्रत्येकानेच व्हिटॅमिन B12 च्या गोळ्या घेतल्या पाहिजेत, असं अजिबात नाही. रुग्णामधील लक्षणं, मेटफॉर्मिन किती काळ घेतलं आहे, खाण्यापिण्याच्या सवयी आणि चाचण्यांचे रिपोर्ट पाहूनच डॉक्टर यावर योग्य निर्णय घेतात.
B12 ची कमतरता असल्याचं स्पष्ट झाल्यास योग्य प्रमाणात गोळ्या किंवा गरजेनुसार इंजेक्शन देऊन त्यावर उपचार केले जाऊ शकतात.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेटफॉर्मिन घेत असलेल्या लोकांनी B12 च्या कमतरतेच्या संशयावरून स्वतःच्या मनाने हे औषध बंद करता कामा नये. गरज पडल्यास B12 च्या कमतरतेवर उपचार करत असतानाच मधुमेहावरील औषधोपचारही सुरळीत सुरू ठेवता येतात.
नसांच्या तक्रारी वेळेत ओळखता येतात का?
डायबेटिक न्यूरोपॅथी सुरुवातीच्या टप्प्यात ओळखण्यासाठी काही खूप महागड्या टेस्ट करण्याची गरज नसते. डॉक्टरांनी रुग्णाची लक्षणं समजून घेणं, पाय बारकाईने तपासणं आणि काही सोप्या चाचण्या करून पाहणं यावरून यातला धोका सहज ओळखता येतो.
टाइप 1 मधुमेहाचे निदान झाल्यानंतर 5 वर्षांनी या चाचण्या सुरू कराव्यात.
यानंतर वर्षातून किमान एकदा नसांची चाचणी आणि पायांची संपूर्ण तपासणी करून घेणं गरजेचं आहे. ज्यांच्या पायांची जाणीव आधीच कमी झाली आहे किंवा ज्यांना जखम झालेली आहे, त्यांनी आणखी नियमितपणे या चाचण्या करून घ्यायला हव्यात.
Getty Images
या आहेत महत्त्वाच्या तपासण्या –
- 10 ग्रॅम मोनोफिलामेंट चाचणी : यात एका बारीक नायलॉनच्या धाग्याने पायावर ठिकठिकाणी हलका दाब देऊन स्पर्श समजतोय का, हे तपासलं जातं. पायाची जाणीव कमी झाली आहे का आणि पुढे जाऊन जखम होण्याचा धोका आहे का, हे समजण्यासाठी ही चाचणी खूप उपयोगी ठरते.
- हायब्रेशन टेस्ट : 128-Hz च्या ट्युनिंग फोर्कच्या मदतीने व्हायब्रेशन्स (कंपनं) जाणवतात का याची तपासणी केली जाते.
- पायांमधल्या रक्तप्रवाहाची तपासणी : पायाचे ठोके, त्वचेचे तापमान, त्वचेचा बदललेला रंग आणि जखम भरून येण्यास वेळ लागतो का या गोष्टी पाहिल्या जातात.
रुग्णाची लक्षणं बघून व्हिटॅमिन B12, थायरॉईड आणि किडनीच्या कार्याची तपासणी केली जाऊ शकते. कारण नसांच्या समस्येमागे फक्त मधुमेहच कारणीभूत असेल असं आधीच गृहीत धरता येत नाही.
पायांची काळजी कशी घ्याल?
1. दररोज पायांचे निरीक्षण करा:
तळपाय, बोटांच्या फटी आणि टाचा रोज तपासा. कुठे भेगा, फोड, लालसरपणा, सूज किंवा एखादी लहान जखम तर नाही ना, हे नक्की पाहा. स्वतः खाली वाकून व्यवस्थित दिसत नसेल तर आरशाचा वापर करा किंवा घरातल्यांची मदत घ्या.
2. पाय नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा:
कोमट पाण्याने पाय धुऊन घ्या आणि विशेषतः बोटांमधला भाग मऊ फडक्याने नीट पुसून कोरडा करा. पाय जास्त वेळ गरम पाण्यात भिजवून ठेवू नका.
3. योग्य मापाच्या चपला वापरा:
पायाला अगदी व्यवस्थित बसतील आणि आतून टोचणार नाहीत अशाच मऊ चपला वापरा. घरात वावरतानाही अनवाणी न फिरता चपला घाला. चप्पल घालण्याआधी त्यात बारीक खडे किंवा इतर काही अडकलं नाही ना, हे नक्की तपासा.
Getty Images
4. त्वचा कोरडी पडू देऊ नका:
त्वचा कोरडी पडत असल्यास मॉइश्चरायझर लावा. एक गोष्ट लक्षात ठेवा की, पायांच्या बोटांच्या फटींमध्ये क्रीम लावू नका. तिथे ओलसरपणा साचून राहिला, तर इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.
5. नखं आणि कडक त्वचेबाबत काळजी घ्या:
नखं अगदी सरळ कापा. खूप जास्त आतपर्यंत बारीक कापू नका. पायावरची कडक त्वचा, गोखरू (कॉर्न) किंवा नखांभोवती आलेली कडक कातडी ब्लेडने काढण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांना पायाला स्पर्श नीट जाणवत नाही, त्यांनी परस्पर काही न करता थेट डॉक्टरांचीच मदत घ्यायला हवी.
ज्यांच्या पायांवर आधीच जखम झाली आहे, पायांमधला रक्तप्रवाह कमी झाला आहे किंवा नसांचा त्रास सुरू झाला आहे, अशा लोकांनी पायांची विशेष काळजी घ्यायला हवी. त्यांनी पायासाठी योग्य मापाच्या मऊ चपला वापराव्यात आणि वेळच्या वेळी डॉक्टरांकडून पायांची तपासणी करून घेत राहावी.
पायाला जखम झाली तर काय कराल?
पायावर लहानशी जखम झाली तरी ती अंगावर काढू नका. विशेषतः मधुमेह आणि नसांचा त्रास असलेल्यांनी जराही वेळ न घालवता डॉक्टरांकडे जायला हवं.
जखम कापू नका, ती जागा जोरात घासू नका किंवा तिथली कडक त्वचा खरवडून काढू नका.
डॉक्टरांना विचारल्याशिवाय गोखरूवर (कॉर्न) लावायची ॲसिडची औषधं, कसलेही घरगुती उपचार किंवा केमिकल्स वापरण्याची चूक करू नका.
जखमेवर शरीराचा भार किंवा दाब अजिबात पडू देऊ नका.
डॉक्टरांना दाखवून गरजेनुसार जखम स्वच्छ करून घेणे, पायावरचा दाब कमी करणारे खास बूट वापरणे, नियमित मलमपट्टी करणे, ॲन्टिबायोटिक्स घेणे आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठीचे योग्य उपचार सुरू करणे गरजेचे आहे.
पाय जास्त लाल किंवा गरम पडणे, प्रमाणाबाहेर सूज येणे, जखमेतून पू किंवा घाण वास येणे, त्वचा काळी पडणे, ताप चढणे, जखम भराभर वाढत जाणे किंवा अचानक पाय गार पडून त्याचा रंग बदलणे आणि असह्य दुखणे ही धोक्याची घंटा असू शकते. ही तातडीची लक्षणे ठरू शकतात.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेदना जाणवत नसल्या तरीही पायावरील व्रण तितकाच जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे वेदना सुरू होण्याची वाट न पाहता वेळीच पावले उचलणे आवश्यक ठरते.
रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणं का गरजेचं आहे?
नसांचे झालेले नुकसान पूर्णपणे भरून काढणे नेहमीच शक्य नसते. पण रक्तातील साखर योग्य पातळीत ठेवली, बीपी आणि कोलेस्ट्रॉल आटोक्यात आणलं आणि धूम्रपान पूर्णपणे सोडलं तर नसांचा त्रास होण्याचा किंवा तो जास्त वाढण्याचा धोका नक्कीच कमी करता येतो.
डॉक्टर देतात ती औषधं नसांच्या वेदना कमी करायला मदत करतात. पण खराब झालेल्या नसा पूर्ण बऱ्या होतीलच असं नाही. असं असलं तरी मेडिकलमधून स्वतःच्या मनाने पेनकिलर्स किंवा व्हिटॅमिन्सच्या गोळ्या आणून खाण्याची चूक अजिबात करू नका.
गैरसमज आणि तथ्य
गैरसमज : पायांमध्ये वेदना जाणवत नसतील, तर नसा पूर्णपणे निरोगी आहेत असा त्याचा अर्थ होतो.
तथ्य : स्पर्शज्ञान अथवा संवेदना मंदावल्यामुळेही वेदनेची जाणीव न होण्याची शक्यता असते.
गैरसमज : जखम किंवा व्रण अगदी लहान असल्याने तो आपोआप भरून येईल.
तथ्य : रक्ताभिसरण आणि संवेदना मंदावलेल्या लोकांमध्ये एक लहानसा ओरखडासुद्धा मोठा अल्सर बनू शकतो.
गैरसमज : पायांमध्ये जळजळ जाणवत असेल, तर त्यामागे केवळ मधुमेह हेच एकमेव कारण असते.
तथ्य : शरीरातील व्हिटॅमिन B12 चा अभाव अथवा नसांचे इतर आजारही या त्रासाला कारणीभूत ठरू शकतात.
गैरसमज : डायबिटीस असणाऱ्या प्रत्येकानेच व्हिटॅमिन B12 च्या गोळ्या घेतल्या पाहिजेत. तथ्य : तपासणीअंती B12 ची कमतरता आणि खरी गरज पाहूनच डॉक्टर ठरवतात.
गैरसमज : घरात अनवाणी फिरल्याने काही धोका नसतो.
तथ्य : संवेदना कमी असल्यामुळे घरातही नकळत ठेच लागून जखम होऊ शकते. म्हणूनच घरातही चपला घालणं अधिक सुरक्षित आहे.
(टीप: या लेखाच्या लेखिका डॉक्टर आहेत. वैद्यकीय बाबी आणि योग्य उपचारांबद्दल जनजागृती करणे हा यामागचा हेतू आहे. आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




