Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
एकेकाळी खिशात फक्त आठ डॉलर घेऊन हैदराबादहून कॅनडाला गेलेले प्रेम वत्स आता आयडीबीआय बँकेचे मालक होणार आहेत.
1985 मध्ये सुरू झालेली फेअरफॅक्स ही एक छोटी विमा कंपनी आता मोठी वित्तीय कंपनी बनली आहे.
प्रेम वत्स यांची व्यावसायिक समज, दूरदृष्टी आणि शिस्त यांमुळे हे शक्य झाल्याचं सांगितलं जातं.
प्रेम वत्स यांची ही कंपनी आयडीबीआय बँकेतील 60.72 टक्के शेअर खरेदी करण्यासाठी 52 हजार 878 कोटी रुपये देणार आहे.
प्रेम वत्स कोण आहेत आणि त्यांनी एवढे मोठे व्यावसायिक साम्राज्य कसे उभे केले? जाणून घेऊया.
‘कॅनडाचे वॉरेन बफे’
या वृत्तानुसार, वत्स शांतपणे आपले काम करतात. माध्यमांच्या झगमगाटापासून दूर राहणाऱ्या वत्स यांनी फेअरफॅक्सच्या सुरुवातीच्या 15 वर्षांत क्वचितच एखाद्या पत्रकाराशी संवाद साधला असेल.
गुंतवणूकदारांसोबत कॉन्फरन्स कॉल घेण्यासही त्यांनी 2001 मध्ये सुरुवात केली.
वत्स यांची ओळख ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टर’ म्हणून आहे.
फोटो स्रोत, Getty Images
त्यांचे मार्गदर्शक जॉन वॉटसन यांनी त्यांना बेंजामिन ग्रॅहम यांची व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची तत्त्वे शिकवली आहेत.
बेंजामिन ग्रॅहम यांचे तत्त्व सांगते की, ‘भक्कम पाया असलेल्या ज्या कंपन्यांचे मूल्य कमी ठरवले जात आहे, त्यात गुंतवणूक करा आणि ती गुंतवणूक दीर्घकाळ टिकवून ठेवा.’
जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेले वॉरेन बफेही साधारणपणे याच पद्धतीने गुंतवणूक करण्याचे समर्थन करतात.
याच तत्त्वांनुसार प्रेम वत्स यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. आज या कंपन्या त्यांच्यासाठी सोन्याची खाण ठरत आहेत.
यामुळेच वत्स यांना कॅनडाचे वॉरेन बफे म्हटले जाते.
हैदराबाद ते कॅनडा प्रवास
1950 साली हैदराबादमध्ये जन्मलेले प्रेम वत्स यांचे वडील शाळेत शिक्षक होते.
त्यांनी हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. याच शाळेतून मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, ॲडोबीचे सीईओ शांतनू नारायण आणि जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष अजय बंगा यांनीही शिक्षण घेतलं आहे.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वत्स यांनी IIT मद्रासमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी IIMची प्रवेश परीक्षा पास केली. पण वत्स यांचे नशीब त्यांना दुसरीकडे घेऊन जाणार होते.
फोटो स्रोत, Reuters
वत्स यांचे मोठे भाऊ कॅनडात राहत होते. वत्स यांनीही कॅनडात जाऊन करिअर करावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.
वत्स यांनी ‘द फेअरफॅक्स वे’ या पुस्तकात लिहिले आहे, “मला कॅनडामध्ये अजिबात रस नव्हता. मला भारत सोडायचा नव्हता. पण वयाच्या 22 व्या वर्षी तुम्ही वडिलांचं ऐकत असता.”
कॅनडाला पोहोचल्यानंतर त्यांनी वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठातून MBA केले. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी एअर कंडिशनर आणि भट्टी विकल्या.
वत्स यांच्या मते, विक्रेत्याला आवश्यक असलेली नम्रता आणि मेहनत पुढे त्यांच्या खूप कामी आली.
फॅमिली मॅन
प्रेम वत्स कुटुंबातील मूल्यांना खूप महत्त्व देतात.
इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार, वत्स यांचे वडील नेहमी म्हणायचे, ‘सगळे काही तुमच्यावर अवलंबून आहे, अशा पद्धतीने मेहनत करा आणि सगळे काही देवावर अवलंबून आहे, अशा भावनेने प्रार्थना करा.’
वत्स यांनी 1974 मध्ये कॉन्फेडरेशन लाइफ इन्शुरन्स कंपनीत रिसर्च अॅनालिस्ट म्हणून करिअरला सुरुवात केली.
वत्स यांचा सक्सेस फॉर्मुला
प्रेम वत्स यांच्या यशाचे सर्वात मोठे सूत्र आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कंपन्यांमध्ये दडले होते. या कंपन्यांचा पाया मजबूत होता.
अशा कंपन्या ओळखण्याची त्यांच्यात जबरदस्त क्षमता होती. तसेच, त्यात दीर्घकाळ गुंतवणूक कायम ठेवण्याचा संयमही होता.
वत्स यांना काळाची चाहूल ओळखण्यातही चांगले कौशल्य आहे. संकटाची चाहूल त्यांना खूप आधी लागते.
याच क्षमतेच्या जोरावर त्यांनी 1987 मधील आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील घसरण, ज्याला ‘ब्लॅक मंडे’ म्हणून ओळखले जाते, 1990 मध्ये जपानची अर्थव्यवस्था कोसळणे आणि 2008 मधील आंतरराष्ट्रीय आर्थिक संकट म्हणजेच सबप्राइम संकट यांचा अंदाज घेतला होता.
फोटो स्रोत, Reuters
या काळात प्रेम वत्स यांनी अमेरिकेतील आर्थिक मंदीचा फायदा घेतला. भविष्यात चांगली कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांचे शेअर्स त्यांनी अत्यंत कमी किमतीत खरेदी केले.
मात्र, फेअरफॅक्सलाही मोठे धक्के बसले. हार्वे, इर्मा आणि मारिया यांसारखी चक्रीवादळे तसेच कॅलिफोर्नियातील जंगलांना लागलेल्या आगीमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले.
कोविड-19 हेही कंपनीसमोरचे मोठे आव्हान ठरले. या काळात कंपनीच्या विमा व्यवसायाला मोठा तोटा झाला.
पण या धक्क्यांतून सावरण्याच्या प्रेम वत्स यांच्या क्षमतेमुळे फेअरफॅक्स पुन्हा मार्गावर आली. ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत 2025 मध्ये फेअरफॅक्सचे मूल्य चारपट झाले होते.
फेअरफॅक्सची व्यावसायिक रणनीती यशस्वी ठरली आहे.
विमा दावे देण्यापूर्वीच कंपनी मोठ्या प्रमाणात विमा हप्ते गोळा करते. या पैशांची भक्कम पाया असलेल्या, पण कमी किमतीत उपलब्ध असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे.
व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील असाधारण योगदानासाठी प्रेम वत्स यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रेम वत्स यांचा भारतातला व्यवसाय
आयडीबीआय बँकेतील गुंतवणूक ही फेअरफॅक्सची आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल.
मात्र, फेअरफॅक्स इंडिया होल्डिंग्जच्या माध्यमातून त्यांनी 2014 मध्येच भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता.
प्रेम वत्स यांचा मुलगा असलेले बेन वत्स भारतात मार्वल कॅपिटल नावाची फंड मॅनेजमेंट कंपनी चालवतात. ही कंपनी फक्त भारतीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करते.
फोटो स्रोत, X/amitabhk87
फेअरफॅक्सने भारतात IIAFAला त्या वेळी पैसे दिले होते, जेव्हा ही कंपनी गोल्ड लोन व्यवसायात नियामक अडचणींचा सामना करत होती.
बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडमध्येही फेअरफॅक्स बरीच भागिदारी आहे. कंपनीने समर केमिकल्स आणि इतर काही उत्पादन कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे.
मात्र, नियामक नियमांमुळे कंपनीने यापूर्वी CSB बँकेत केलेली गुंतवणूक कमी केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




