Home LATEST NEWS ताजी बातमी फ्लॅश ड्राऊट : महाराष्ट्रात आकस्मिक दुष्काळाचं संकट? हवामान बदलामुळे हा धोका वाढला

फ्लॅश ड्राऊट : महाराष्ट्रात आकस्मिक दुष्काळाचं संकट? हवामान बदलामुळे हा धोका वाढला

4
0

Source :- BBC INDIA NEWS

हवामान बदलामुळे वाढतो आहे या संकटाचा धोका

मान्सूनचा परतीचा प्रवास आता लवकरच सुरू होण्याची चिन्हं आहेत, पण महाराष्ट्रात अंतर्गत भागांत फिरताना अनेक गावं-तालुके तुलनेनं कोरडेच असल्याचं दिसून येतं.

ऑगस्टमध्ये मराठवाड्यातल्या काही तालुक्यांत तर पावसाचं प्रमाण इतक्या वेगानं कमी झालं, की तिथे भर पावसाळ्यात फ्लॅश ड्राऊट म्हणजे आकस्मिक दुष्काळ पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

इतकंच नाही, तर राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अशा आकस्मिक दुष्काळाचा धोका जास्त असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

फ्लॅश ड्राऊट किंवा आकस्मिक दुष्काळ काय असतो, त्याचा परिणाम काय होतो आणि त्याकडे लक्ष देणं का महत्त्वाचं आहे, जाणून घेऊया.

वेगानं पडणारा दुष्काळ

फ्लॅश ड्राऊट ही फ्लॅश फ्लडसारखीच अतीतीव्र हवामानाची स्थिती आहे, असं दुष्काळ आणि हवामान बदलावर काम करणारे विकास पुनिया सांगतात. ते भोपाळमध्ये मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (MANIT) संशोधक आणि हायड्रोक्लायमॅटोलॉजीचे प्रमुख आहेत.

एखाद्या ठिकाणी अचानक पूर किंवा पाण्याचा लोंढा आला, तर त्याला फ्लॅश फ्लड म्हटलं जातं. नेपाळमध्ये यंदा तसंच संकट ओढवलं होतं.

फ्लॅश ड्राऊट हाही वेगानं येणारा दुष्काळाचा प्रकार आहे. जागतिक हवामान संघटना (WMO) च्या तज्ज्ञांच्या मते आकस्मिक दुष्काळाच्या स्थितीवर लक्ष ठेवणं, त्याचं भाकित करणं आणि त्यासाठी पद्धतशीरपणे माहिती गोळा करणं गरजेचं आहे.

हवामान बदलामुळे वाढतो आहे या संकटाचा धोका

साधारणतः पावसाअभावी आणि उष्ण हवा तसंच जास्त तापमानामुळे जमीन वेगानं कोरडी पडू लागते, तेव्हा त्याला रॅपिड ऑनसेट ड्‌राऊट किंवा फ्लॅश ड्राऊट म्हणजेच आकस्मिक दुष्काळ असं म्हटलं जातं.

अगदी काही आठवड्यांत किंवा काहीवेळा काही दिवसांतच असा आकस्मिक दुष्काळ तयार होऊ शकतो.

यंदा मराठवाड्यात काही ठिकाणी तर वीस दिवस पावसानं दडी मारली आणि शेतातली माती ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी कोरडी पडलेली दिसली.

जुलै-ऑगस्टमध्ये युरोपमध्ये अनेक ठिकाणची हिरवळ आठवडाभरात पिवळी पडल्याचे फोटो आणि व्हीडिओ तुम्ही पाहिले असतील. फ्लॅश ड्राऊट सारख्या परिस्थितीमुळे असं घडल्याचं तज्ज्ञ सांगतात.

भारतीय हवामान विभागाच्या 1 जून ते 15 सप्टेंबरदरम्यानच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या 36 जिल्ह्यांपैकी केवळ तीनच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

विकास पूनिया सांगतात, “एखादा भिजलेला टॉवेल बाहेर ठेवला, तर थंड, पावसाळी दिवसात तो हळूहळू कोरडा होतो. पण उष्ण आणि भरपूर वारा असलेल्या दिवशी तो काही तासांतच वाळतो. फ्लॅश ड्राऊट तसंच काम करतो, म्हणजे त्यात जमिनीतली ओल वेगानं कमी होते.”

मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर काळातच नाही तर मान्सूनच्या दरम्यानही एखाद्या ठिकाणी फ्लॅश ड्राऊट निर्माण होऊ शकतो.

महाराष्ट्रात फ्लॅश ड्राऊटचा धोका वाढला आहे का?

जागतिक तापमान वाढीमुळे अशा आकस्मिक दुष्काळाची तीव्रता आणि वारंवारता वाढते आहे.

सध्या अमेरिका आणि युरोपमध्ये अशा पद्धतीच्या दुष्काळांवर संशोधन केलं जातंय. तसंच सॅटेलाईट माहितीच्या आधारे अशा फ्लॅश ड्राऊटचा अंदाज लावण्याचे प्रयत्नही होत आहेत.

राजस्थानसारखी कोरडी राज्यच नाही, तर उत्तर आणि मध्य भारत, तसं महाराष्ट्रातला पठारी प्रदेश आणि दक्षिण भारतातील काही भागांतही याआधी आकस्मिक दुष्काळाच्या घटना याआधीही घडल्या आहेत.

यासंदर्भात विकास पूनिया आणि MANIT मधल्या रिसर्च स्कॉलर दीपिका यादव यांनी महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर केलेलं संशोधन अनीकडेच ‘फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ द अर्थ’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालं.

हवामान बदलामुळे वाढतो आहे या संकटाचा धोका

त्यांनी 1981–2024 या 44 वर्षांत हवामानाविषयीच्या माहितीचा अभ्यास केला. या काळातलं पर्जन्यमान, तापमान, जमिनीतला ओलावा आणि हवेतील वाफेचं प्रमाण यांची माहिती त्यांनी तपासून पाहिली.

या संशोधनानुसार महाराष्ट्रातील शुष्क प्रदेशातच नाही, तर तुलनेनं जास्त पाऊस असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशातही फ्लॅश ड्राऊटचा धोका वाढतो आहे.

गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा या दमट जिल्ह्यांमध्ये आकस्मिक दुष्काळाची वारंवारता वाढते आहे.

तर प्रामुख्यानं अहिल्यानगर, बीड, धाराशीव, सांगली, सोलापूर या शुष्क जिल्ह्यांत फ्लॅश ड्राऊट आणखी वेगानं येत असून ते अधिक तीव्र होत आहेत.

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसारख्या एरवी भरपूर पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातही आकस्मिक दुष्काळपडण्याची शक्यता वाढते आहे, अर्थात तिथे या संकटाची तीव्रता आणि वेग इतर प्रदेशांपेक्षा कमी आहे.

पण सिंधुदुर्गातील काही भाग, नाशिक आणि पुण्यातील काही भागात मात्र ही तीव्रता जास्त असल्याचं त्यांना दिसलं आहे.

पिकांसाठी घातक

एरवी महाराष्ट्रातले काही जिल्हे तुलनेनं कमी पावसाचे म्हणून ओळखले जातात. तिथेही दुष्काळाची स्थिती ही अख्ख्या मोसमातल्या पावसाच्या अभावामुळे निर्माण होते.

म्हणजे एखाद्या ठिकाणी अख्ख्या मोसमात किंवा दीर्घकाळ कमी पाऊस पडला, तर पाण्याचे साठे वेळआधीच आटू लागतात, जलाशय कोरडे पडू लागतात, शेती वाळून जाते. त्यानंतरच मग दुष्काळ पडला किंवा दुष्काळासारखी स्थिती निर्माण झाली असं म्हटलं जातं.

दुष्काळाची अशी स्थिती एरवी काही महिन्यांच्या कालावधीत हळूहळू निर्माण होत असल्याने तिचा अंदाज लावून त्यावर काही उपाय शोधणं, पिकांमध्ये बदल करणं थोड्या फार प्रमाणात शक्य असतं.

आकस्मिक दुष्काळ मात्र काही आठवड्यांतच एवढ्या वेगानं निर्माण होतो, की शेतकरी तसंच पाण्याचं नियंत्रण पाहणाऱ्या यंत्रणा आणि सरकार यांना त्यावर उपाय करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

शेतीवर होणारा परिणाम

MANIT मध्ये संशोधन करणाऱ्या दीपिका यादव सांगतात, “फ्लॅश ड्राऊट बहुतेकदा अशा काळात निर्माण होतात, जो पिकांच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा काळ असतो.”

त्या पुढे सांगतात की अशा काळात फ्लॅश ड्राऊटमुळे “शेतीतलं उत्पादन तर कमी होतंच, शिवाय सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढते, परिणामी भूजलाची पातळी खाली जाते आणि आधीच कमी असलेल्या पाणीसाठ्यावरचा ताण वाढतो.”

इथे एक लक्षात घ्यायला हवं, केवळ पाऊस कमी पडला म्हणजे आकस्मिक दुष्काळ आला असं होत नाही. कारण जमिनीतला ओलावा पाऊस नसतानाही काही काळ टिकून राहतो.

एरवीही मान्सूनचा पाऊस कधी सलग एकसारखा पडत नाही, त्यात काही वेळा काही दिवसांचा किंवा आठवड्याचा खंड पडतो, ज्याला मान्सून ब्रेक म्हणतात.

हवामान बदलामुळे वाढतो आहे या संकटाचा धोका

पण एखाद्या वेळेस मान्सून ब्रेकचा कालावधी वाढला, काही आठवडे पाऊसच पडला नाही आणि त्यादरम्यान तापमान वेगानं वाढलं तर जमिनीतली ओल वेगानं कमी होते आणि पिकांवर ताण पडतो.

तसंच एखाद्या प्रदेशात मोसमाच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला असेल, पण तिथल्या पिकांच्या वाढीसाठी आवश्यक काळात पाऊस कमी झाला आणि तापमान जास्त अशी स्थिती निर्माण झाली, तरी फ्लॅश ड्राऊट पडू शकतो.

मोसमात मग नंतर जास्त पाऊस झाला, तरी तो अशा वेळी पिकांसाठी उपयोगाचा ठरत नाही.

फ्लॅश ड्राऊट मुळे जमिनीतील शेतीला मदत करणाऱ्या जीवाणूंवरही परिणाम होतो, कृषीतज्ज्ञ उदय देवळणकर नमूद सांगतात. ते नमूद करतात की शेतीसाठी अनेकदा जी युरियासारखी रासायनिक खतं वापरली जातात, ती प्रभावी ठरण्यासाठी या जीवाणूंवर अवलंबून असतात.

“फ्लॅश ड्राऊटसारखी घटना घडते, तेव्हा जीवाणूंची संख्या अचानक कमी होते. मातीतली जैविक क्रिया थांबते आणि त्या रसायनांचा निचराही होत नाही. याचा एकत्रित दुष्परिणाम इतका जास्त असतो की मग पुढच्या मोसमातही मातीतल्या जैविक घटकांचं प्रमाण कमी राहतं. जमिनीतलं कार्बनचं प्रमाण आधीच कमी झालेलं असेल तर फ्लॅश ड्राऊटचा परिणाम दूरगामी ठरू शकतो.”

शेतीच्या काही पारंपरिक पद्धतींमध्ये जमिनीतला ओलावा कायम राहावा आणि मातीतले सूक्ष्मजीव टिकून राहावेत याचा विचार होत असे, त्यानुसार शेताच्या बांधावरची झाडं, कुंपण यांची आखणी केली जात असे, असं मत ते मांडतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC