Home LATEST NEWS ताजी बातमी भूताच्या अफवेनं मेळघाटातील आश्रमशाळा ओस, 606 विद्यार्थी-विद्यार्थिनी परतले घरी – ग्राऊंड रिपोर्ट

भूताच्या अफवेनं मेळघाटातील आश्रमशाळा ओस, 606 विद्यार्थी-विद्यार्थिनी परतले घरी – ग्राऊंड रिपोर्ट

4
0

Source :- BBC INDIA NEWS

डोमा आश्रमशाळा

फोटो स्रोत, NiteshRaut/BBC

भूत दिसल्याच्या अफवेमुळे अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या मेळघाटातील डोमा गावातील एक आदिवासी आश्रमशाळा ओस पडली आहे.

भीतीपोटी आश्रम शाळेतील 606 विद्यार्थी-विद्यार्थिनी आपापल्या घरी परतले आहेत. यामध्ये 263 मुले आणि 343 मुलींचा समावेश आहे.

मुलींच्या वसतिगृहात काही विद्यार्थिनी अचानक विनाकारण हसणे, रडणे, एकटक पाहणे, किंचाळणे, हात-पाय ताठरणे आणि कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद न देणे, अशा गोष्टी करायला लागल्याचं इथल्या विद्यार्थिनींचं म्हणणं आहे. या प्रकारामुळे इतर विद्यार्थिनींमध्ये भीती पसरली.

विशेष म्हणजे, या वसतिगृहाच्या लगतच विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. मात्र या विद्यार्थ्यांमध्ये असा कुठलाही प्रकार आढळून आला नाही. याकडेही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते लक्ष वेधत आहे.

डोमा आश्रमशाळा अमरावतीपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. या आश्रम शाळेत पाचडोंगरी, एकताई, चुनखडी आणि आसपासच्या गावातील विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत.

या ठिकाणी उत्तम शिक्षण मिळत असल्यामुळे इथली पटसंख्या इतर शासकीय आश्रमशाळेपेक्षा चांगली आहे. या आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसह 800 च्या जवळपास शाळेची पटसंख्या आहे. मात्र, 300 पेक्षा अधिक मुलींना राहण्यासाठी तीनच खोल्या आहेत. मुलींच्या राहण्यासाठी या खोल्या अपूर्ण पडतात. मुलांच्या वसतिगृहाचीही अवस्था सारखीच आहे.

वसतिगृहाची मोठी इमारत तयार आहे. मात्र, वॉल कंपाऊंडच्या वादाचे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे इमारत मुलांसाठी खुली करण्यात आली नाही. त्यामुळे जुन्या अपूर्ण जागेतच त्यांना राहावं लागतंय.

वसतिगृह

फोटो स्रोत, NiteshRaut/BBC

100 मीटरवर असलेले हे मोहफूलाचे झाड गेल्या अनेक वर्षापासून येथे होतं. नवीन इमारतीच्या बांधकामासाठी हे झाड तोडण्यात आले. तेव्हापासूनच भूतबाधेच्या अफवेला उधाण आले.

या झाडावर भूताचं कुटुंब वास्तव्यास होते आणि झाड तोडल्यामुळे भूताचं कुटुंब वसतिगृहात रहायला आले असल्याचं काही विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धा पसरली आहे.

गावापासून काही मीटर अंतरावर ही आश्रम शाळा आहे. शाळेलगतच्या परिसरात प्रचंड शांतता असते. शाळेची नवी इमारत बांधकाम करताना काही झाडे तोडल्या गेली. त्यामुळे शाळेत भूतबाधेची अंधश्रद्धा पसरली.

डोमापासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर एकताई गाव आहे. येथे राहणाऱ्या अनेक मुली या आश्रमशाळेत शिकतात. नेमक्या या गावात राहणाऱ्या मुलींमध्ये विचित्र लक्षणे दिसून आली, त्या गावात आम्ही पोहचलो. गावात सगळीकडे याची चर्चा सुरू होती. यातील एका मुलीचे वडील शंकर धिकार यांच घर गाठलं. त्यांच्या मुलीतही विचित्र लक्षण होती.

बीबीसी मराठीशी बोलताना शंकर धिकार म्हणाले, “शाळेचा परिसर माझ्या मुलीसाठी सध्या अनुकूल नाही. मात्र ती यातून बरी झाल्यानंतर तिला शाळेत पाठवू. ती शाळेत जाण्यासाठी आमच्या मागे लागली आहे.”

शंकर यांच्या मुलीला त्या दिवशी घडलेला प्रकार काहीच आठवत नाही. मात्र, शाळेत रंगलेली चर्चा तिच्या कानावर पडली होती.

मोहफुलाचं झाड तोडल्या नंतरच्या उठलेल्या अफवेमुळे हे सगळं होत आहे, अशी अंधश्रद्धा कळत नकळत तिच्याशी मनात कोरल्या गेली असावी. या भीतीतून हा प्रकार घडला असावा, असेही डॉक्टरांनी सांगितले.

अंधश्रद्धेमागे पायाभूत सुविधांची कमतरता?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका महिला पदाधिकाऱ्याने सांगितले की, “मुळात या ठिकाणी मुलींसाठी राहण्याची जागा अत्यंत अपुरी आहेआहे. एका कॉटवर दोन तीन मुली झोपतात. प्रकाशव्यवस्थाही अपुरी आहे. या कोंदट वातावरणाचा हा एक परिणाम असू शकतो.”

शिक्षणाच्या तसेच पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मेळघाट भागात अंधश्रद्धा, अंगात येण्याचे प्रकार काही नवे नाही.

कुणाची तब्येत बिघडल्यास आदिवासी बांधव डॉक्टरकडे जात नाहीत, ते भुमका बाबांकडे (स्थानिक वैदू) जाण्याचा कल जास्त आहे.

भुमका बाबा म्हणजे तांत्रिक मांत्रिक बाबा, ते या माध्यमातून आजार बरे करण्याचा दावा करतात. मात्र, एकप्रकारे ते अंधश्रद्धा बळकट करण्याचे काम करतात. स्थानिकांच्या भूमकावर एवढा विश्वास आहे की, स्थानिक प्रशासनही हतबल ठरले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते परिसरात काम करत आहेत

फोटो स्रोत, NiteshRaut/BBC

स्थानिक गावकऱ्यांच्या मते, गावातील काही मुली जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच हा प्रकार घडतो. त्यांच्यात अंधश्रद्धा पसरली आहे. यातील अनेक विद्यार्थी आता शाळेत परतण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, त्यांचे कुटुंबीय त्यांना शाळेत सोडायला तयार नाही.

शाळेचे मुख्याध्यापक संजय चौधरी मुलांना शाळेत परत आणण्याच्या प्रयत्नात आहे. ते म्हणतात, दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी मुलांनी शाळेत याव. मुलांना कुठलाही आजार झालेला नाही, मात्र पालकांच्या भीतीपोटी मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी भीती त्यांना वाटते आहे.

भूतबाधा नव्हे, मानसिक ताण आणि सामूहिक भीती?

या प्रकारामागे भूतबाधा नसून मानसिक ताण, भीती आणि अफवांचा परिणाम असण्याची शक्यता मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मानसोपचारतज्ज्ञ स्वाती सोनवणे यांनी विद्यार्थिनींची तपासणी केली असता Dissociative/Conversion Symptoms सारखी लक्षणे आढळल्याचे सांगितले.

विनाकारण हसणे-रडणे, विस्मृती, भीती आणि तणाव यांसारखी मानसिक लक्षणे त्यामध्ये दिसून आली. अंधश्रद्धा, अति ताण-तणाव आणि भीती यामुळे अशी लक्षणे उद्भवू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरे म्हणजे या विद्यार्थिनी त्या आरोग्याच्या दृष्टीने ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मेळघाटात दाखल झाले आहेत. यापूर्वीही 300 हून अधिक गावात समितीने एक मोहीम हाती घेतली होती.

कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनी तसेच पालकांशी संवाद साधून शाळेत परतण्याबाबत जनजागृती सुरू केली आहे. शाळेतील वातावरणावर काही चित्रपट आणि भूतबाधेबाबतच्या चर्चांचाही प्रभाव पडल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

डोमा शाळेतील मुली

फोटो स्रोत, NiteshRaut/BBC

29 जुलैच्या गुरुपौर्णिमेपासून या प्रकाराला सुरुवात झाली. सुरुवातीला चार विद्यार्थिनी बाथरूममधून बाहेर आल्यानंतर विचित्र वर्तन करू लागल्या. त्यानंतर हा प्रकार इतर विद्यार्थिनींमध्येही दिसून आला. मात्र यातील बहुतांश विद्यार्थिनी घरी गेल्यावर अगदी उत्तम आहेत.

त्या घरचे आणि शेतीचे काम करत असल्याचे दिसून आले. एक सारखीच गोष्ट या मुलींमध्ये आढळून आली ती म्हणजे यातील बहुतांश मुलींनी ‘कंचना’ नावाचा हॉरर सिनेमा बघितला होता.

दुसरे म्हणजे यातील सर्व मुलींची वर्तणूक एकसारखी होती. म्हणजे मुली एकमेकांना कॉपी करत होती याकडेही एकाने लक्ष वेधले.

सध्या आश्रमशाळेचे वसतिगृह जवळपास ओस पडले आहे. मात्र घरी गेलेल्या अनेक मुलींना पुन्हा शाळेत यायचे आहे. “शाळा बंद तर होणार नाही ना?” अशी भीतीही काही विद्यार्थिनी व्यक्त करत आहेत.

विद्यार्थी पुन्हा शाळेत परतावेत यासाठी आदिवासी विकास विभागाकडूनही प्रयत्न सुरू आहेत.

अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात पुन्हा शाळेत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले आहे.

भूताच्या अफवेने शाळा ओस पडली असली, तरी या संपूर्ण घटनेमागचे वास्तव भीती आणि अंधश्रद्धेपेक्षा मानसिक ताण, सामूहिक भीती आणि अफवांचा परिणाम आहे का, याचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC