Source :- BBC INDIA NEWS

(महत्त्वाची सूचनाः या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतात.)
14 वर्षीय इन्शाला त्या सायंकाळी काय होईल, याची किंचितही कल्पनाही नव्हती. त्या एका घटनेने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं.
या घटनेला साधारण 10 वर्षे झाली आहेत. घराच्या खिडकीतून बाहेर पाहताना ती सांगते, “त्या दिवशी अंधार झाला होता. सायंकाळचे साधारण 8-9 वाजले असतील. मी इथेच उभी होते. तेव्हा मी बाहेर काही गाड्या पाहिल्या.”
“परिस्थिती खूपच खराब होती आणि इथे मोठ्या संख्येने सुरक्षा दलाचे जवान तैनात होते. मी बाहेर पाहिलं तेव्हा मला धुरासारखं काहीतरी जाणवलं.”
“मी पुन्हा बाहेर पाहिलं आणि इतक्यात मला छर्रे लागले. माझ्या कपाळाला छर्रे लागले. मला वाटलं, मला गोळी लागली आहे. त्यानंतर मी जमिनीवर पडले.”
“माझ्या आईने मला उठवलं.”
माझ्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती, कपाळालाही मार लागला होता आणि माझे पाच दात तिथेच तुटून जमिनीवर पडले होते.
“माझ्या कपाळाला मोठी दुखापत झाल्यामुळे मला सजदा करता येत नव्हता. जवळपास 5 ते 6 महिने माझी तब्येत खूप खराब होती.”
ती पुढे सांगते, “मला असं वाटायचं की, मी अल्लाहपासून दूर गेले आहे. मी अल्लाहकडे प्रार्थना करायचे की, त्याने मला आपल्याकडे बोलावून घ्यावं. मी सर्व आशा गमावल्या होत्या.”
इन्शा मुश्ताकने दृष्टी गमावली
भारताच्या ताब्यातील काश्मीरमध्ये 2010 मध्ये अनेक महिने हिंसाचार सुरू होता.
त्यावेळी उमर अब्दुल्ला यांच्या सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे कमी घातक शस्त्रांची (नॉन-लीथल) मागणी केली होती.
त्याचवर्षी पहिल्यांदा पेलेट गनचा वापर करण्यात आला होता.

ही अशी शस्त्रं आहेत, ज्यातून गोळी झाडल्यावर शेकडो छोटे धातूचे छर्रे बाहेर पडतात. हे छर्रे चारही दिशांना विखुरले जातात.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेनंही या शस्त्रांना आंदोलकांविरोधात वापरली जाणारी अतिशय धोकादायक शस्त्रं म्हटलं आहे.
2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी विधानसभेत सांगितलं होतं की, 2016 मध्ये कट्टरतावादी कमांडर बुरहान वानीच्या मृत्यूनंतर झालेल्या आंदोलनांमध्ये पेलेट गनमुळे 6 हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते.
या घटनेत अनेकांना एका किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमवावी लागली. इन्शा मुश्ताकही त्यापैकी एक आहे.
डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं…
गेल्या काही वर्षांपासून इन्शा आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी श्रीनगरमधील एका भाड्याच्या घरात राहते. आम्ही इन्शा आणि तिच्या आईसोबत त्यांच्या सेदोव या गावी गेलो.
पेलेटचा मार लागलेल्या लोकांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम झाला, हे समजून घेणं हा आमचा उद्देश होता.

ती म्हणते, “मी माझ्या गावी जाते, तेव्हा प्रवासात आजूबाजूचं पाहता येत नाही, याची उणीव मला प्रकर्षाने जाणवते.”
ती म्हणते, “मी विचार करते की, आज हे ठिकाण कसं दिसत असेल? रस्ते कसे झाले असतील, बाजार कसा दिसत असेल आणि इथे किती बदल झाले असतील. या सर्व गोष्टी पाहता येत नाहीत, याची मला उणीव जाणवते.”
‘मला फुलं, उद्यानं, दर्गा, पाणी आणि दल सरोवर पाहायला आवडायचं’
गेल्या काही वर्षांत इन्शाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण आपण आता पुन्हा कधीच पाहू शकणार नाही, हे स्वीकारणं तिच्यासाठी सर्वात कठीण होतं.

ती म्हणाली, “पहिली 1-2 वर्षे हे स्वीकारणं खूप कठीण होतं की, आता हेच माझं वास्तव आहे आणि मला याच परिस्थितीत जगायचं आहे.”
तरीही तिने कधीही हार मानली नाही आणि आपलं शिक्षण सुरूच ठेवलं.
ती म्हणते, “पेलेट लागण्याआधी मला डॉक्टर व्हायचं होतं. मला विज्ञान विषयात खूप रस होता. पण त्या घटनेनंतर सगळंच बदलून गेलं.”
आपलं भाड्याचं घर दाखवत ती म्हणते, “मी घरातील जवळपास सर्व कामं स्वतः करू शकते. मला त्यात कोणतीच अडचण येत नाही.”
ती श्रीनगरमधील अथवाजन येथील डीपीएसमध्ये ब्रेल लिपी शिकली.
ती सांगते, “सुरुवातीला शाळेत गेल्यावर मला काहीच समजत नव्हतं. त्यामुळे मी रडत रडत ब्रेलची पुस्तकं फेकून द्यायचे.”
आता मात्र तिला आत्मनिर्भर बनून इतरांसाठी, विशेषतः दिव्यांग लोकांसाठी, एक आदर्श निर्माण करायचा आहे.
ती सांगते, मला गुलाबी, मरून आणि आकाशी निळा रंग खूप आवडतात. मला हिवाळाही आवडतो. शोपियांमध्ये होणाऱ्या जोरदार हिमवृष्टीमुळे झाडं, रस्ते किंवा घराची छपरं असो सर्वकाही पांढरंशुभ्र होऊन जातं.
पेलेट गनवर इन्शा काय म्हणाली?
ती आपल्या स्वप्नांबाबतही सांगते.
ती म्हणाली, “माझ्या स्वप्नात मला अनेकदा लग्नाचे प्रसंग दिसतात. अनेकदा सुरक्षा दलाचे जवानही दिसतात. मला विचित्र स्वप्न पडतात. कधी कधी तर मला सापही दिसून येतात.”

अलीकडेच एका बॉलिवूड चित्रपटात पेलेट गनमुळे केवळ मर्यादित नुकसान होतं, असं दाखवण्यात आलं.
ती म्हणाली, “पेलेटमुळे फक्त थोडं नुकसान होतं, असं ते म्हणतात. पण या पेलेटमुळे लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. काश्मीरमध्ये माझ्यासारखी अनेक मुलं आहेत, ज्यांचे आई-वडील आजही रडतात. त्यांचं दुःख फक्त तेच समजू शकतात.”

“आता मला माझ्या आई-वडिलांचे चेहरे अंधुकसे आठवतात,” असं ती म्हणते.
ती म्हणाली, “त्यावेळी माझी आई पण निरोगी होती आणि अधिक सुंदर दिसायची. आता मला वाटतं, ती खूपच बारीक झाली आहे.”
ती म्हणाली की, आता ‘जर’ हा शब्दच माझ्या आयुष्यातील एक दुःख आणि वेदनेचे कारण बनला आहे.
ती विचार करत सांगते, “जर, मी कोणावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर चालू शकले असते, मला शिकता आलं असतं आणि कुणावरही अवलंबून राहावं लागलं नसतं.”
“मला माझ्या आई-वडिलांचे चेहरे पाहता आले असते. जेव्हा मी एकटी असते, तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करून खूप रडते.”
“पण मला माहीत आहे की, मी खंबीर आणि मजबूत आहे.”
पेलेट गनच्या वापरावर वाद
2016 मधील मोठ्या आंदोलनांनंतर भारत सरकारने पेलेट गनच्या वापराबाबत पुन्हा विचार करण्याचं जाहीर केलं होतं. परंतु, त्यानंतरही पेलेट गनचा वापर सुरूच राहिला.
त्यावेळी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात पेलेट गनवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होती.
त्यावेळी सुरक्षा दलांनी असा युक्तिवाद केला होता की, पेलेट गनचा वापर बंद केला, तर त्यांना त्याहून अधिक घातक शस्त्रांचा वापर करावा लागू शकेल. त्यामुळे मृत्यूचा किंवा जीवितहानीचा धोका वाढू शकतो.
पेलेटमुळे दृष्टी गमावणारी इन्शा काश्मीरमधील एकमेव व्यक्ती नव्हती. पेलेट गनमुळे इतर अनेक लोक जखमी झाले आणि त्यांचं आयुष्यही कायमचं बदलून गेलं.
ही एक मोदी यादी आहे. ज्यात हिबा जान, वकार रफीक, हसीना बेगम, सुहेल अहमद बडर, उल्फत हमीद पर्रे, एजाज अहमद मीर, खुर्शीद अहमद लोन, जावेद अहमद मल्ला, परवीना बानो मीर, इम्तियाज अहमद सूफी, उमेर हमीद गनई, मोहम्मद रमजान खान, निसार अहमद लोन, जॉन मोहम्मद पर्रे, इक्बाल हमीद रादर, बासित अश्रफ मीर आणि तौसीफ अहमद मल्ला यांचा समावेश आहे.
काश्मीरमध्ये पेलेट गन्सच्या वापराची शेवटची मोठी नोंद 2020 मध्ये झाली होती. श्रीनगरमध्ये मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान पेलेट गन वापरण्यात आल्याचं समोर आलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




