Home LATEST NEWS ताजी बातमी मासिक पाळीत ‘सायकल-सिंकिंग’नुसार व्यायाम करण्याचा ट्रेंड, जाणून घ्या संशोधन काय सांगतं

मासिक पाळीत ‘सायकल-सिंकिंग’नुसार व्यायाम करण्याचा ट्रेंड, जाणून घ्या संशोधन काय सांगतं

4
0

Source :- BBC INDIA NEWS

सोशल मीडियावर '@fitwsarah' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारा मॅके यांच्या मते, मासिक पाळीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांची ऊर्जेची पातळी बदलत राहते.

फोटो स्रोत, Sarah Mackay

फोटोमध्ये एक महिला वेगवेगळ्या रंगांच्या चार्टकडे बोट दाखवताना दिसत आहे. यामध्ये मासिक पाळीच्या चक्राचे 4 टप्पे दाखवले असून प्रत्येक टप्प्यानुसार कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा याचे पर्याय दिले आहेत.

जेव्हा तुम्हाला रक्तस्राव होत असतो, तेव्हा तुम्ही संथ गतीने जॉगिंग, पायलेट्स, बार वर्कआउट, हळूवार चालणे किंवा विश्रांती घेण्यावर भर दिला पाहिजे,” असं ती प्रेक्षकांना सांगते.

सध्या महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या सायकलनुसार (चक्रानुसार) वर्कआउट बदलण्याचा सल्ला देणारे हजारो व्हीडिओ सोशल मीडियावर म्हणजेच टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहेत.

फिटनेस जगतात या ट्रेंडला ‘सायकल-सिंकिंग’ म्हटलं जातं.

सोशल मीडियावर ‘सायकल-सिंकिंग’ वर्कआउट प्लॅन्सची सध्या तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. 2022 पासून गुगलवर या शब्दाचा सर्च तब्बल 740 टक्क्यांनी वाढला आहे. तर टिकटॉकवर 55 हजारपेक्षा जास्त व्हीडिओंमध्ये #cyclesyncing हा हॅशटॅग वापरला गेला आहे.

विशेष म्हणजे यासंदर्भातील बहुतांश सल्ले हे कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय संशोधकांकडून नव्हे तर फिटनेस आणि वेलनेस इन्फ्लुएन्सर्सकडून दिले जात आहेत.

या वर्कआउट प्लॅन्समध्ये संपूर्ण सायकलचे वेगवेगळे टप्पे पाडून खालील सल्ला दिला जातो,

  • पाळीच्या दिवसांत शरीराला ताण न देणारा अगदी हलका-फुलका व्यायाम
  • ओव्हुलेशनच्या आधीच्या फॉलिक्युलर टप्प्यात व्यायामाचा वेग आणि जोर हळूहळू वाढवणे.
  • ओव्हुलेशनच्या दिवसांत हेवी स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा जास्त तीव्रतेचे हाय-इंटेन्सिटी वर्कआउट्स करणे.
  • यूटियल टप्प्यात म्हणजेच ओव्हुलेशननंतर ते पुढची पाळी सुरू होईपर्यंत वर्कआउटचा वेग पुन्हा कमी करून शरीराला रिलॅक्स करणे

पण या ट्रेंडबाबत विज्ञान काय सांगते?

‘मार्केटिंगवर आधारलेला ट्रेंड’

संपूर्ण सायकलमध्ये काही महिलांना त्रासाची लक्षणं, शरीरातील एनर्जी किंवा स्वतःच्या ताकदीच्या क्षमतेत बदल जाणवतो, हे अभ्यासातून समोर आलं आहे, असं लीड्स बेकेट युनिव्हर्सिटीमध्ये पीरियड्स सायकल आणि वर्कआउटवर रिसर्च करणाऱ्या केली मॅकनल्टी यांनी सांगितलं.

पण याचा अर्थ असा मुळीच नाही की, प्रत्येक महिलेने पाळीच्या ठराविक टप्प्यावर असाच विशिष्ट व्यायाम केला पाहिजे. या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत, असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

सोशल मीडियावरील हे व्हीडिओ म्हणजे “कोणताही वैज्ञानिक पुरावा नसून फक्त मार्केटिंगचा फंडा आहे,” असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

मासिक पाळीच्या सायकलनुसार वर्कआउट अ‍ॅडजस्ट करण्याचा सल्ला देणारे हजारो व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर व्हायरल होत आहेत.

यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येकीची मासिक पाळीची सायकल ही अगदी वेगळी असते, असं मॅकनल्टी स्पष्ट करतात.

2 महिलांच्या सायकलमध्ये फरक असू शकतोच. शिवाय एकाच महिलेला दर महिन्याला एका सायकलमधून दुसऱ्या सायकलमध्ये वेगवेगळे अनुभव येऊ शकतात.

त्यामुळेच सोशल मीडियावर सरसकटपणे दिला जाणारा हा सल्ला प्रत्यक्षात अमलात आणणे कठीण ठरते, असं त्या स्पष्ट करतात.

शिवाय, अनेक सायकल-ट्रॅकिंग अ‍ॅप्स हे 21 ते 35 दिवसांच्या एका नियमित मासिक पाळीच्या चक्राचा अंदाज बांधून डिझाइन केलेले असतात. त्यामुळे ज्यांची पाळी अनियमित आहे किंवा ज्या महिला हॉर्मोनल गोळ्या-गर्भनिरोधके वापरत आहेत, त्यांच्यासाठी या अ‍ॅप्समधला सल्ला तितकासा उपयोगी ठरत नाही.

“सायकलच्या प्रत्येक टप्प्यात विशिष्ट व्यायाम करण्यापेक्षा, स्वतःच्या शरीराला नेमकी कशाची गरज आहे हे समजून घेऊन त्यानुसार व्यायाम करणे जास्त महत्त्वाचे आहे,” असा सल्ला त्या देतात.

कठोर नियमांपेक्षा शरीराच्या गरजेनुसार बदल

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात राहणाऱ्या सेस्की बर्गाइन या नर्स असून त्या प्रमाणित वैयक्तिक प्रशिक्षक आणि पोषणतज्ज्ञही आहेत.

त्या स्वतःच्या मासिक पाळीच्या सायकलदरम्यान शरीराला जसे जाणवते, त्यानुसार व्यायामात बदल करतात.

त्या सांगतात की, त्या कोणत्याही ठरवून दिलेल्या साचेबद्ध प्लॅनवर अवलंबून राहत नाहीत. तर शरीराची गरज आणि अंतर्गत जाणीव ओळखून वर्कआउटमध्ये बदल करतात.

“ल्यूटियल टप्प्यात असताना मी वर्कआउटचा जोर थोडा कमी ठेवते. पण फॉलिक्युलर टप्प्यात मात्र शरीरात जबरदस्त एनर्जी असते. त्या वेळी मी जास्त वजन उचलू शकते आणि मला लांब पल्ल्याच्या रनिंगला जायलाही खूप आवडतं,” असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

महिलांच्या आरोग्यावर सध्या लोकांचं लक्ष वेधलं जात असल्याचं बर्गाइन स्वागतच करतात.

त्यांच्या मते, आजपर्यंत व्यायाम आणि डाएटच्या अभ्यासात बहुतांश वेळा केवळ पुरुषांच्याच शरीरावर संशोधन झाले आणि नंतर तेच नियम सरसकटपणे महिलांनाही लावले गेले.

मासिक पाळी सुरू असतानाही साराने मोडलेत स्वतःचेच फिटनेस रेकॉर्ड्स…

फोटो स्रोत, Sarah Mackay

इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर ‘@liftwsarah’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या फिटनेस क्रिएटर सारा मॅकेलासुद्धा महिनाभरात एनर्जी लेव्हल्स, वर्कआउटची इच्छा, पोटातल्या कळा आणि मूड स्विंग्समध्ये बरेच चढ-उतार जाणवले आहेत.

पण तरीही ती कोणताही ठरवून दिलेला कठोर डाएट किंवा वर्कआउट प्लॅन फॉलो करत नाही. कारण तिच्या मते, “शरीरावर एकाच वेळी खूप वेगवेगळ्या घटकांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे कोणताही एकच नियम लागू करून चालत नाही.”

सोशल मीडियावरील अनेक वर्कआउट प्लॅन्समध्ये मासिक पाळीदरम्यान हेवी वर्कआउट न करण्याचा सल्ला दिला जातो, असं सारा सांगते. पण प्रत्यक्षात मात्र याच दिवसांत तिने स्वतःचेच सर्वोत्तम फिटनेस रेकॉर्ड्स मोडले आहेत.

मासिक पाळीच्या सायकलचा शरीरावर परिणाम होतच नाही असा याचा अर्थ नाही. पण प्रत्येक वेळी शरीर तसेच वागेल याचा आधीच ठाम अंदाज लावता येत नाही, ही खरी अडचण आहे,” असं ती सांगते.

‘नोसिबो’ परिणाम

प्रशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञ आणि महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. फे बेट यांनीही प्रत्येक टप्प्यानुसार वर्कआउट बदलण्याच्या या ट्रेंडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“अमुक एका टप्प्यात असाच व्यायाम करा आणि दुसऱ्या टप्प्यात तसाच, असा सर्वांसाठी एकच नियम ठरवून देणारा सल्ला प्रत्येक महिलेला तंतोतंत लागू होऊ शकत नाही,” असं त्या सांगतात.

मासिक पाळीच्या ठराविक टप्प्यांवर महिला शारीरिकदृष्ट्या अशक्त असतात किंवा त्यांची कार्यक्षमता कमी असते, हेच सतत त्यांच्या मनावर बिंबवल्यामुळे ‘नोसिबो’ इफेक्ट तयार होऊ शकतो, अशी भीती त्या व्यक्त करतात.

‘जेव्हा मनात आधीच अशा नकारात्मक समजुती किंवा निराशा घर करून राहते, तेव्हा त्याचा थेट परिणाम शरीरावर आणि प्रत्यक्ष क्षमतेवर अथवा कामगिरीवर होतो. याच मानसिक स्थितीला ‘नोसिबो’ म्हणतात.

ताकदीच्या व्यायामाचा जोर वारंवार कमी करत राहिल्याने शरीराची ताकद म्हणावी तशी वाढत नाही, असं मॅकनल्टी यांनी बीबीसीला सांगितलं.

वाढत्या वयात हाडे ठिसूळ होण्याचा धोका जास्त असतो म्हणूनच त्यांच्यासाठी असे व्यायाम खूप गरजेचे असतात.

शरीराची ताकद वाढवण्यासाठी नियमित सराव आणि व्यायामाचा जोर टप्प्याटप्प्याने वाढवणे गरजेचे असते.

“महिलांनी महिन्यातील जवळपास अर्धा काळ व्यायामाचे प्रमाण कमी ठेवावे असा सल्ला देऊन, त्यांच्या मार्गात आणखी एक नवीन अडथळा निर्माण करणे आम्हाला योग्य वाटत नाही.” त्या सांगतात.

पाळीच्या काळात त्रास अंगावर काढू नका किंवा तो ‘नेहमीचाच आहे’ म्हणून सोडून देऊ नका. जर अंगदुखी, थकवा किंवा चिडचिड यामुळे रोजच्या कामात किंवा व्यायामात अडथळा येत असेल, तर “हे असं होणारच” असं गृहीत धरून गप्प बसण्यापेक्षा स्त्रियांनी सरळ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

मासिक पाळीच्या चक्राविषयी जागरूक कसे राहावे?

पाळीच्या दिवसांनुसार व्यायाम किंवा दिनचर्या बदलण्याला विज्ञानाचा फारसा भक्कम आधार नसला, तरी आपण आपल्या मासिक पाळीच्या चक्राविषयी सजग असायला हवे, असा सल्ला आम्ही बोललेल्या तज्ज्ञांनी दिला आहे.

मॅकनल्टी यांच्या मते, मासिक पाळीच्या चक्राची नोंद ठेवल्याने शरीराची एकंदर पद्धत समजून घेणं सोपं जातं.

त्याच वेळी, महिन्याच्या वेगवेगळ्या दिवसांमध्ये शरीराला नेमकं कसं वाटतं, थकवा येतो की उत्साह जाणवतो, याकडे महिलांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, असं डॉ. बेट सुचवतात.

“पाळीच्या आरोग्याविषयी चारचौघांत मोकळेपणाने बोललं जात आहे ही नक्कीच चांगली गोष्ट आहे”, असं या दोघी मानतात.

पण ठराविक दिवसांचे साचेबद्ध नियम पाळण्यापेक्षा प्रत्येक महिलेने स्वतःचे वैयक्तिक अनुभव लक्षात घेतले पाहिजेत, यावर त्यांचा भर आहे.

दैनंदिन जगण्यात हे अगदी सहज करता येऊ शकते. जसे की पाळीचे दिवस जवळ येताच गरजेनुसार पेनकिलर जवळ ठेवणं, पोटात खूप दुखत असेल तर व्यायामाला सरळ सुट्टी घेणं किंवा शरीरात नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवत असल्यास हलकाफुलका व्यायाम करणं.

डॉ. बेट यांच्या सांगण्यानुसार, “आपल्या शरीराचं ऐकणं आणि आपल्याला आतून कसं वाटत आहे याकडे लक्ष देणं, हेच सर्वात महत्त्वाचं आहे.”

म्हणजेच, पाळीच्या चक्राला कडक नियमांचे बंधन न बनवता आपले शरीर काय सांगते आहे हे समजून घेण्याचे माध्यम बनवा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC