Home LATEST NEWS ताजी बातमी रशियाचा गुप्तहेर ब्रिटनसाठी काम करू लागला; गुप्तहेराची खासगी समस्या आणि शीतयुद्धाच्या काळातील...

रशियाचा गुप्तहेर ब्रिटनसाठी काम करू लागला; गुप्तहेराची खासगी समस्या आणि शीतयुद्धाच्या काळातील गुंतागुंतीची मोहीम

5
0

Source :- BBC INDIA NEWS

एमआय-6चा अधिकारी इयान मॅककार्डी आणि ब्रिटनसाठी हेरगिरी करणारा केजीबी अधिकारी व्लादिमीर कुझिचकिन

फोटो स्रोत, Courtesy of Ian McCredie

दोन गुप्तहेर अधिकारी- एक रशियन आणि दुसरा ब्रिटिश. दोघेही ब्रिटिश दूतावासाच्या परिसरातील एका घराच्या छोट्याशा बाथरूममध्ये बसले आहेत. आपल्या बोलण्याचा आवाज बाहेर ऐकू जाऊ नये, म्हणून त्यांनी नळ सुरू ठेवले आहेत आणि रेडिओही चालू आहे. इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी या घरात हेरगिरीसाठी उपकरणं (बग- गुप्त ऐकण्याचं यंत्र) लावली असावीत, असा एमआय-6च्या अधिकाऱ्याला संशय आहे.

बेन मॅकइंटायर यांनी आपल्या नवीन पुस्तकाची सुरुवात 1981 मध्ये तेहरानमध्ये घडलेल्या या प्रसंगापासून केली आहे.

रशियन पाहुणा व्लादिमीर कुझिचकिन हा सोव्हिएत गुप्तहेर संस्था केजीबीचा अधिकारी आहे. त्याने ब्रिटनची गुप्तचर संस्था एमआय-6साठी हेरगिरी करण्याची तयारी दर्शवली आहे. काही काळानंतर त्याला इराणमधून बाहेर काढून ब्रिटनमध्ये स्थायिक केलं जाईल, अशी त्याची अपेक्षा आहे.

या भेटीदरम्यान त्याने एक अत्यंत वैयक्तिक गोष्टही सांगितली. मॅकइंटायर यांच्या मते, पाश्चिमात्य देशांतील डॉक्टर त्याच्या लैंगिक समस्येवर उपचार करू शकतील आणि त्यामुळे त्याचे वैवाहिक जीवनही वाचू शकेल, असा कुझिचकिनला विश्वास होता.

हा प्रसंग शीतयुद्धाच्या काळातील एका अत्यंत गुंतागुंतीच्या गुप्तहेर मोहिमेची सुरुवात ठरला. ब्रिटिश लेखक बेन मॅकइंटायर यांनी आपल्या ‘रेडवुड : द अनटोल्ड स्टोरी ऑफ द कोल्ड वॉर्स मोस्ट रिमार्केबल स्पाय’ या पुस्तकात ही घटना सांगितली आहे.

‘रेडवुड’ या पुस्तकात कुझिचकिनला ब्रिटनसाठी हेर बनवण्यापासून ते तेहरानमधील त्याच्या गुप्त कारवाया आणि बाझारगान सीमेवरून त्याच्या पलायनापर्यंतची कहाणी एका स्पाय थ्रिलर म्हणजेच गुप्तहेराच्या थरारक कथेसारखी सांगितली आहे.

परंतु, या घटनेचं महत्त्व केवळ केजीबीच्या एका अधिकाऱ्याच्या कहाणीपुरतं मर्यादित नाही. मॅकइंटायर यांच्या नवीन पुस्तकानुसार, सोव्हिएत संघ आणि तुदेह पक्षातील संबंधांबाबत कुझिचकिनने दिलेली माहिती ब्रिटन आणि अमेरिकेच्या माध्यमातून इराणच्या सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचली. या माहितीमुळे 1982 आणि 83 मध्ये तुदेह पक्षावर झालेल्या मोठ्या कारवाईला मदत झाली, असं या पुस्तकात म्हटलं आहे.

या पुस्तकामुळे एक ऐतिहासिक आणि अजूनही वादाचा विषय असलेला प्रश्न पुन्हा समोर येतो: तुदेह पक्ष आणि सोव्हिएत युनियन खरोखरच इराणमध्ये सत्तापालट करण्याची तयारी करत होते का?

पर्शियन भाषेचा विद्यार्थी ते केजीबी अधिकारी

व्लादिमीर कुझिचकिनचा जन्म 1947 मध्ये मॉस्कोमध्ये झाला. त्याचे सावत्र वडील आंद्रेई कुझिचकिन हे केजीबीचे अधिकारी होते. व्लादिमीरला वयाच्या 22 व्या वर्षांपर्यंत आंद्रेई हेच आपले खरे वडील आहेत, असं वाटत होतं.

त्यावेळी त्याचे खरे वडील जॉर्जी अलेक्झांड्रोविच लार्किन हे आयरिश वंशाचे होते. ते सिव्हिल इंजिनिअर होते. व्लादिमीरने त्यांना कधीच पाहिलं नव्हतं. त्याची आई एलिझाव्हेटा हिच्याशी लग्न केल्यानंतर आंद्रेई यांनी व्लादिमीरला दत्तक घेतलं होतं.

कुझिचकिन मॉस्कोमधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ एशियन अँड आफ्रिकन कंट्रीज’मध्ये पर्शियन भाषा शिकला. 1973 चे शैक्षणिक वर्ष त्याने इराणमधील बाफ्क औद्योगिक प्रकल्पात अनुवादक म्हणून काम करत घालवले.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो केजीबीच्या ‘एस डिपार्टमेंट’मध्ये रुजू झाला. या विभागाची जबाबदारी ‘बेकायदेशीर एजंट’ म्हणून काम करणाऱ्या गुप्तहेरांचं कामकाज पाहणं होती. हे गुप्तहेर राजनैतिक ओळख किंवा संरक्षणाशिवाय, अनेकदा बनावट ओळख घेऊन परदेशात राहत आणि गुप्तपणे आपलं काम करत असत.

कुझिचकिनला 11 जून 1977 रोजी वाणिज्य दुतावासातील अधिकारी असल्याची बतावणी करून तेहरानला पाठवण्यात आलं. सुरुवातीला तो ‘लाइन एन’ नावाच्या विभागात ‘सपोर्ट ऑफिसर’ म्हणून काम करत होता. हा विभाग इराण आणि आजू बाजूच्या देशांमध्ये केजीबीसाठी गुप्तपणे काम करणाऱ्या एजंट्सचे नेटवर्क सांभाळत होता.

1980 च्या मध्यात या विभागाचे प्रमुख व्लादिमीर गोलोवानोव्ह यांना मॉस्कोला परत बोलावण्यात आलं. त्यानंतर कुझिचकिनने ‘लाइन एन’ची जबाबदारी घेतली. त्याच वेळी त्याला अधिकृतपणे ‘उप-वाणिज्यदूत’ (व्हाइस-कॉउन्सल) हे पद देण्यात आलं.

त्याच्या महत्त्वाच्या कामांपैकी एक म्हणजे मिशेल आणि उर्सुला गेशविंड्ट या खोट्या नावाने तेहरानमध्ये राहणाऱ्या एका जोडप्यावर लक्ष ठेवणं. हे दोघे पार्ट्या आणि राजनैतिक कार्यक्रमांना जात असत. तिथे ते परदेशी नागरिक आणि इराणमधील अधिकाऱ्यांबद्दल माहिती गोळा करत असत.

लष्करी सेवेत असताना व्लादिमीर कुझिचकिन

फोटो स्रोत, Courtesy of Elena Alexandrovna

क्रांतीपूर्वीच्या काळात तेहरान हे पूर्व-पश्चिमी देश आणि सोव्हिएत युनियन यांच्यातील गुप्तहेर कारवायांसाठी महत्त्वाचं ठिकाण होतं. इराणची गुप्तहेर संस्था सावाक ही सीआयए आणि एमआय-6च्या मदतीने सोव्हिएत एजंट्सवर पाळत ठेवत होती.

1979 च्या इराणी क्रांतीनंतर आणि अमेरिकेच्या दूतावासावर ताबा मिळवल्यानंतर इराणमधील पाश्चिमात्य देशांचे गुप्तहेर नेटवर्क मोठ्या प्रमाणात कमकुवत झाले. त्याच काळात सोव्हिएत सैन्य अफगाणिस्तानात दाखल झाले. त्यामुळे सोव्हिएत युनियनचा प्रभाव इराण आणि आखातापर्यंत वाढू शकतो, अशी चिंता अमेरिका आणि ब्रिटनला वाटू लागली.

कुझिचकिनने नंतर केजीबीबद्दलच्या सर्वसाधारण समजुतीपेक्षा एक वेगळं चित्र मांडलं. जे त्या संघटनेच्या अधिकार आणि शिस्तीबाबतच्या जनमानसातील समजेपेक्षा वेगळं होतं. आपल्या आठवणींमध्ये त्याने केजीबीमधील भ्रष्टाचार, अंतर्गत गटबाजी, अतिमद्यपान आणि कर्मचाऱ्यांची कामातील अकार्यक्षमता याबद्दल सांगितलं.

त्याच्या देखरेखीखाली काम करणाऱ्या 2 गुप्त एजंटना स्वित्झर्लंडमध्ये अटक झाल्याने त्याची चिंता आणखी वाढली. या प्रकरणाची चौकशी पुढे गेली तर या एजंट्सच्या नेटवर्कचा प्रमुख अधिकारी म्हणून आपली ओळख उघड होईल, अशी त्याला भीती वाटत होती.

त्याच काळात त्याचे पत्नी गॅलिनासोबतचे संबंधही बिघडले होते. या सर्व मानसिक तणावाचा सामना करण्यासाठी तो दारूच्या आहारी जाऊ लागला होता.

‘रेडवुड’ पुस्तकाचे लेखक मॅकइंटायर यांच्या मते, सोव्हिएत व्यवस्था आणि केजीबीबद्दलचा कुझिचकिनचा भ्रमनिरास, आपल्या नोकरीच्या भवितव्याची चिंता आणि वैयक्तिक आयुष्यातील अडचणी यामुळे त्याने ब्रिटनला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.

पुस्तकानुसार, त्याची लैंगिक समस्या आणि त्याचा वैवाहिक जीवनावर झालेला परिणाम याचाही या निर्णयात मोठा वाटा होता. पाश्चिमात्य देशांतील डॉक्टर त्याच्या समस्येवर उपचार करू शकतील आणि त्यामुळे आपलं वैवाहिक जीवन वाचू शकेल, अशी त्याला आशा होती.

तुदेह पक्षाची गोपनीय माहिती

तेहरानमध्ये कुझिचकिनच्या कामातील सर्वात संवेदनशील भाग म्हणजे तुदेह पक्षाच्या नेत्यांशी असलेला संपर्क. पुस्तकातील माहितीनुसार, पक्षाचे जुने सदस्य गागिक अवानेसियन हे तुदेह पक्षाचे केंद्रीय समितीचे पहिले सचिव नुरुद्दीन कियानुरी यांचे संदेश सोव्हिएत दूतावासापर्यंत पोहोचवत असत.

या संदेशांमध्ये अनेकदा इराणमधील राजकीय परिस्थिती, सत्तेतील अंतर्गत मतभेद आणि लष्करातील घडामोडींची सविस्तर माहिती असायची.

मॅकइंटायर यांच्या मते, दुसरीकडे सोव्हिएत युनियनकडून तुदेह पक्षाला पैसे आणि इतर सुविधा मिळत होत्या. त्यांच्या माहितीनुसार, तुदेह पक्षाने सोव्हिएत व्यापारी प्रतिनिधी मंडळाच्या मदतीने एक आयात कंपनी सुरू केली होती. या कंपनीमार्फत पक्षाला पैसे आणि वस्तू मिळत असत.

सोव्हिएत युनियन पक्षाच्या वर्तमानपत्रासाठी लागणारा कागदही पुरवत होता. तसेच विमानाची तिकिटे, हॉटेलचा खर्च अशा काही खर्चांची भरपाईही याच माध्यमातून केली जात असत.

या माहितीचा काही भाग लष्करातील तुदेह पक्षाच्या गुप्त संघटनेशी संबंधित होता. मोहम्मद मेहदी परतवी, ज्यांना संघटनेत ‘खुस्रो’ या नावाने ओळखलं जात होतं, ते या गुप्त नेटवर्कचं नेतृत्व करत होते. या नेटवर्कमध्ये लष्कर, हवाई दल, नौदल आणि पोलिसांमध्ये काम करणारे सदस्य होते.

मॅकइंटायर यांनी त्यांच्या स्रोतांच्या आधारे केलेल्या अंदाजानुसार, 1981 च्या अखेरपर्यंत या गुप्त नेटवर्कमध्ये 300 हून अधिक सदस्य होते.

या गुप्त नेटवर्कमधील सर्वात महत्त्वाचे लष्करी सदस्य म्हणजे तेव्हाचे इराणच्या नौदलाचे प्रमुख रिअर अॅडमिरल बहराम अफझाली होते. मॅकइंटायर यांनी त्यांच्या माध्यमातून तुदेह पक्ष आणि त्यानंतर सोव्हिएत युनियनपर्यंत पोहोचलेल्या दोन गोपनीय माहितीचा उल्लेख केला आहे.

पहिली माहिती म्हणजे पर्शियन आखातात ‘पायकान’ या युद्धनौकेसोबत बुडालेल्या अमेरिकन हारपून क्षेपणास्त्राचे ठिकाण आणि दुसरी म्हणजे इराणच्या लष्कराच्या गुप्तचर विभागाने सोव्हिएत समर्थित अफगाण सैन्याच्या संदेशांवर पाळत ठेवण्यासंबंधीची माहिती.

अफझाली यांनी न्यायालयात हेरगिरीचे आरोप नाकारले, पण या दोन प्रकरणांत त्यांनी तुदेह पक्षाला गोपनीय माहिती दिल्याचे मान्य केले.

तुदेह पक्षाचे सोव्हिएत युनियनशी संबंध असल्याचे पुरावे केवळ अटक केलेल्या पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या टीव्हीवरील कबुलीजबाबांपुरते मर्यादित नाहीत. सोव्हिएत युनियनची प्रसिद्ध झालेली काही जुनी कागदपत्रे पाहिल्यास, तुदेह पक्षाचे नेते मॉस्कोमधील अधिकाऱ्यांच्या थेट संपर्कात होते, त्याचबरोबर गुप्तपणे काम करण्यासाठी मदत आणि प्रशिक्षणाची मागणी करत होते, असे दिसून येते.

'रेडवुड' हे बेन मॅकइंटायर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. यात केजीबी अधिकारी व्लादिमीर कुझिचकिन आणि इराणमध्ये त्याने एमआय-6 सोबत केलेल्या गुप्त सहकार्याची कहाणी सांगितली आहे.

फोटो स्रोत, Penguin Books Ltd

तुदेह पक्षाची लष्करातील गुप्त संघटना किती मोठी होती आणि तिचे नेमकं काम काय होते, याबाबतही विविध अहवाल आणि संशोधन प्रकाशित झाले आहेत.

तुदेह पक्षाच्या गुप्त संघटनेचे आणि लष्करातील नेटवर्कचे अस्तित्व पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यांनीही मान्य केले आहे. परंतु, या गुप्त संघटनेचा नेमका उद्देश काय होता, याबाबत त्यांनी वेगवेगळी मतं मांडली आहेत.

गुप्त संघटनेचे तत्कालीन प्रमुख मोहम्मद मेहदी परतवी यांनी 2016 मध्ये ‘अंदिशे पोया’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, क्रांतीनंतरही कियानुरीला ही गुप्त संघटना सुरू ठेवायची होती.

त्यांना सत्तापालट होऊन पहलवी राजवट पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वाटत होती. तसेच, पक्षाच्या उघडपणे सुरू असलेल्या कामावर सरकारने दबाव आणला, तर पक्षाचे काम पुढे सुरू ठेवण्यासाठी गुप्त नेटवर्क असावे, असे कियानुरीला वाटत होते.

परतवी यांनी या मुलाखतीत पक्षाला पाठिंबा देणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवण्यासाठी वेगळं नेटवर्क तयार करण्यात आल्याचेही सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका अधिकाऱ्याने अफगाणिस्तानातील सत्तापालटाचा उल्लेख करत म्हटलं, “आपल्याकडेही अफगाण मित्रांपेक्षा कमी क्षमता नाही.”

त्यावर कियानुरीने उत्तर दिले, “मला माहीत आहे, परंतु सध्या अशा गोष्टी बोलण्याची वेळ नाही. पक्ष सध्या इस्लामी प्रजासत्ताकाच्या बाजूने आहे, त्यांना पाठिंबा देत आहे.”

पुस्तकातील काही माहिती केवळ कुझिचकिनच्या माहितीवर किंवा इराणच्या किंवा इस्लामिक रिपब्लिक सुरक्षा यंत्रणांच्या अहवालांवर आधारित आहे. उदाहरणार्थ, तुदेह पक्षाच्या केंद्रीय समितीतील सर्व सदस्यांना मॉस्कोकडून पैसे मिळत होते, असा कुझिचकिनचा दावा आहे. पण, स्वतंत्र कागदपत्रांमधून या दाव्याला दुजोरा मिळालेला नाही.

मॅकइंटायर यांच्या अंदाजानुसार, सोव्हिएत युनियन तुदेह पक्षाला दरवर्षी जवळपास 5 लाख डॉलरची आर्थिक मदत करत होता. यासाठी त्यांनी इराणच्या एका गुप्तचर अहवालाचा आधार घेतला आहे. त्यानुसार, तुदेह पक्षाच्या केंद्रीय समितीतील एका सदस्याला एका वेळी 8 लाख तोमन, म्हणजे त्या काळच्या हिशोबाने 40 हजार डॉलरपेक्षा जास्त रक्कम मिळाली होती.

मॅकइंटायर यांनी दर महिन्याला याच आसपासची रक्कम दिली जात असावी, असे गृहीत धरून वर्षाला जवळपास 5 लाख डॉलरचा अंदाज काढला. म्हणजेच, हा आकडा एका नोंद झालेल्या देयकाच्या आधारे केलेला अंदाज आहे.

सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोच्या एका स्वतंत्र कागदपत्रात तुदेह पक्षाला केलेल्या आर्थिक मदतीचा उल्लेख आहे. हे कागदपत्र व्लादिमीर बुकोव्स्की यांच्या संग्रहात प्रकाशित झाले आहे. त्यानुसार, 29 डिसेंबर 1980 रोजी तुदेह पक्षाला 1981 साठी 3 लाख डॉलर्सची मदत देण्यास मंजुरी देण्यात आली होती. ही रक्कम पोहोचवण्याची जबाबदारी केजीबीवर सोपवण्यात आली होती.

परंतु, या कागदपत्रावरून ही संपूर्ण किंवा त्यातील काही रक्कम तुदेह पक्षाला प्रत्यक्ष मिळाली होती, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तसेच, या मंजूर मदतीचा मॅकइंटायर यांनी सांगितलेल्या आर्थिक व्यवहारांशी नेमका काय संबंध होता, हेही अस्पष्टच आहे.

तुदेह पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहम्मद अली अमुई यांनी त्यांच्या ‘बिटर पेशन्स’ (सब्र-ए तल्ख) या पुस्तकात पक्षाला मिळणाऱ्या पैशांच्या स्रोतांची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे सदस्यत्व शुल्क, समर्थकांकडून मिळणारी मदत, पुस्तकं आणि नियतकालिकांची विक्री तसेच पक्षाने सुरू केलेल्या कंपन्यांमधून मिळणारे उत्पन्न हे पक्षाच्या उत्पन्नाचे स्रोत होते.

‘मित्र देशाकडून मिळणारी आर्थिक मदत पक्षाच्या उत्पन्नाचा स्रोत होती का?’ या प्रश्नावर अमुई यांनी नाही, असं उत्तर दिलं. पण, उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं की, वर्तमानपत्रासाठी लागणारा कागद चेकोस्लोव्हाकियातून अत्यंत कमी दरात मिळत असे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाशी संबंधित कंपन्यांची खाती थेट कियानुरी यांच्या देखरेखीखाली होती आणि ती पक्षाच्या नियमित आर्थिक विभागाच्या खात्यांपासून वेगळी ठेवली जात असत.

चॅटानूगा येथे भेट आणि बाझरगान सीमेवरून पलायन

या पुस्तकातील माहितीनुसार, कुझिचकिनची एमआय-6 सोबतची पहिली महत्त्वाची भेट 22 ऑक्टोबर 1981 रोजी उत्तर तेहरानमधील प्रसिद्ध चॅटानूगा रेस्टॉरंटमध्ये झाली. ब्रिटनचा तरुण गुप्तचर अधिकारी इयान मॅककार्डीने कुझिचकिनवर कोणाची नजर नाही ना, याची खात्री करून घेतली आणि त्याच्याशी संपर्क साधून स्वतःची ओळख करून दिली.

एका आठवड्यानंतर मॅककार्डी ठरलेल्या ठिकाणी कुझिचकिनला लँड रोव्हरमध्ये घेऊन गेला. रशियन अधिकारी कोणाला दिसू नये यासाठी मागच्या सीटवर झोपला आणि त्याने अंगावर चादर घेतली. त्यानंतर त्याला ब्रिटिश दूतावासाच्या परिसरातील मॅककार्डीच्या निवासस्थानी नेलं.

ती गुप्त चर्चा घराच्या बाथरूममध्ये झाली. मॅककार्डीच्या मते, घरात संभाषण ऐकण्यासाठी बाथरूम सर्वात सुरक्षित जागा आहे.

मॅकइंटायर लिहितात की, पहिल्या भेटीत कुझिचकिन सोव्हिएत दूतावासाची फोन डायरी घेऊन आला होता. त्यात इराणमधील 100 हून अधिक सोव्हिएत राजनैतिक अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश होता.

त्याने इराण आणि आसपासच्या भागात काम करणाऱ्या सोव्हिएत गुप्तहेरांच्या ‘लाइन एन’ या गुप्त नेटवर्कचीही माहिती दिली. या गुप्तहेरांची ओळख, ते कुठे काम करत होते आणि केजीबीच्या इतर गुप्त कारवायांबद्दल त्याने मॅककार्डीला सांगितलं.

त्यानंतर त्याने सोव्हिएत युनियन आणि तुदेह पक्षाचे संबंध, पक्षाचे गुप्त नेटवर्क, मिळणारी आर्थिक व गुप्त माहितीची मदत तसेच तुदेह पक्षाचे केजीबीसोबतचे संपर्क याचीही माहिती दिली.

एमआय-6ने त्याच्यासाठी ‘रेडवुड’ हे गुप्त नाव ठेवलं. त्याचे गुप्त सहकार्य तेहरानमध्ये साधारण 1 वर्ष सुरू राहणार होते. परंतु, त्याला मॉस्कोला परत बोलावलं जाईल आणि त्याची गुप्त कारवाई उघड होईल, अशी भीती वाढू लागली. त्यामुळे ब्रिटनने आपली योजना बदलली.

अखेरीस ब्रिटनने त्याच्यासाठी ‘मायकेल रूड’ या नावाने पासपोर्ट तयार केला.

1 जून 1982 च्या सायंकाळी कुझिचकिन राजनैतिक गाडीने तेहरानहून तुर्कीच्या सीमेच्या दिशेने निघाला. पुस्तकात पंतप्रधान कार्यालयातील गुप्तचर विभागाचे उपप्रमुख म्हणून उल्लेख केलेले सईद हजारीयन यांच्या म्हणण्यानुसार, इराणी अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. पण, तबरेझ आणि माकोदरम्यान त्याचा माग काढण्यात त्यांना अपयश आलं.

त्यानंतर हे पथक बाझरगान सीमेवर पोहोचलं. कुझिचकिन सीमा तपासणी केंद्राच्या असताना त्याची राजनैतिक बीएमडब्ल्यू ट्रक पार्किंगच्या ठिकाणी उभी असल्याचं अधिकाऱ्यांना दिसून आलं.

कुझिचकिनने गाडी तिथेच सोडली. त्यानं सोव्हिएत कागदपत्रं आणि इराणचा प्रवास परवाना गाडीच्या डॅशबोर्डमध्ये ठेवला आणि ब्रिटिश पासपोर्ट घेऊन सीमेवरील तपासणी नाक्याच्या दिशेने निघाला.

या पुस्तकात कुझिचकिनने बाझरगान सीमा कशी पार केली, याचं सविस्तर वर्णन आहे. मॅकइंटायर यांच्या मते, त्याने बनावट ब्रिटिश पासपोर्ट दाखवला. आपण एक ब्रिटिश राजनैतिक अधिकारी असून महत्त्वाच्या कामासाठी इराणमध्ये आलो होतो आणि आता तुर्कीमार्गे ब्रिटनला परत जात असल्याचं त्याने सांगितलं.

सीमेवर काही ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने त्याला अडवलं. त्यावेळी त्याने आपल्याला पर्शियन भाषा येत नसल्याचं नाटक केलं. परंतु, तणावामुळे त्याने चुकून एका ठिकाणी पर्शियन भाषेत उत्तर दिलं. तरीही त्याची ओळख उघड झाली नाही, त्याला अटकही करण्यात आली नाही.

कस्टमच्या इमारतीत त्याची एका दुभाषाच्या उपस्थितीत चौकशी करण्यात आली. यावेळीही त्याने आपल्याला पर्शियन येत नसल्याचं ठामपणे सांगितलं. अखेर त्याला देश सोडण्याची परवानगी मिळाली आणि तो तुर्कीमध्ये पोहोचला. तिथे एमआय-6चे अधिकारी त्याची आधीपासूनच वाट पाहत होते.

मॅकइंटायर यांनी इयान मॅककार्डी आणि या मोहिमेत सहभागी असलेल्या एमआय-6च्या जवळपास सर्व जिवंत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पण, ते स्वतः सांगतात की त्यांना एमआय-6च्या अधिकृत कागदपत्रं पाहण्याची मुभा नव्हती. तसेच, पुस्तकातील अनेक अधिकाऱ्यांची खरी नावं न देता टोपणनावं वापरण्यात आली आहेत.

या गुप्त मोहिमेची मुख्य माहिती अनेक पुराव्यांशी जुळते. परंतु, पुस्तकात दिलेली प्रत्येक चर्चा आणि प्रत्येक तपशील स्वतंत्रपणे तपासणं शक्य नाही.

इराणच्या प्रतिनिधींची केजीबीच्या गुप्तहेरासोबत भेट

पुस्तकातील एक महत्त्वाची माहिती कुझिचकिनला ब्रिटनमध्ये नेल्यानंतर घडलेल्या एका घटनेशी संबंधित आहे.

मॅकइंटायर यांच्या मते, कुझिचकिनकडून मिळालेली माहिती इराणपर्यंत पोहोचवण्याची योजना सीआयए आणि एमआय-6ने मिळून तयार केली. त्यावेळी सीआयएचे प्रमुख असलेले विल्यम केसी यांनी ही योजना पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अमेरिकेत ही मोहीम अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. कुझिचकिनने दिलेल्या माहितीच्या आधारे सीआयएने एक अहवाल तयार केला. त्यात इराणमधील किमान 100 आणि कदाचित 200 पर्यंत सोव्हिएत गुप्तहेर, संपर्कातील व्यक्ती आणि मदतनीसांची नावे होती.

पाकिस्तानमध्ये ‘इस्लामिक रिपब्लिक’च्या (इराण) प्रतिनिधींसोबत होणाऱ्या भेटीत कुझिचकिन आणि त्याच्यासोबत जाणाऱ्या ब्रिटिश ‘हँडलर्स’ची उपस्थिती निश्चित करण्याची जबाबदारी एमआय-6ने घेतली होती.

याचा केवळ केजीबीला धक्का देणे हा उद्देश नव्हता. केसी यांना आशा होती की या गुप्त सहकार्यामुळे तेहरानशी संपर्क साधता येईल आणि सोव्हिएत युनियनविरोधात इराणची भूमिका मजबूत करता येईल.

ही बैठक पाकिस्तानची लष्करी गुप्तचर संस्था आयएसआयच्या इस्लामाबादमधील मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती.

मॅकइंटायर यांच्या मते, 22 सप्टेंबर 1982 पासून 2 दिवस कुझिचकिन आणि त्याच्यासोबतचे ब्रिटिश अधिकारी इराणच्या 2 सुरक्षा अधिकाऱ्यांशी- हबीबुल्ला बे-तरफ आणि मोहम्मदजवाद मदारशाही यांच्याशी चर्चा करत होते.

व्लादिमीर कुझिचकिन पत्नी गॅलिनासोबत – 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला.

फोटो स्रोत, Galina Kokosova Archives

पुस्तकातील माहितीनुसार, इराणच्या प्रतिनिधींना सोव्हिएत गुप्तहेर, त्यांचे संपर्क आणि गुप्त नेटवर्कमधील सदस्यांची नावे असलेली कागदपत्रे आणि यादी देण्यात आली. कुझिचकिनने पर्शियन भाषेत इराणमधील केजीबीची रचना, संपर्काची साधनं, सुरक्षित ठिकाणे- आश्रयस्थाने, तुदेह पक्षाला दिली जाणारी आर्थिक मदत आणि त्याच्या लष्करी संघटनेबद्दल माहिती दिली.

पुस्तकाच्या लेखकाने ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्या म्हणण्यानुसार, तुदेह पक्षाकडून सत्तापालटाची शक्यता, शस्त्रसाठे आणि पक्षाच्या नेत्यांना देशातून बाहेर काढण्याच्या योजनेबद्दल चर्चा सुरू झाल्यावर इराणच्या प्रतिनिधींनी विशेष रस दाखवला. तुदेह पक्षाकडे किती सशस्त्र लोक आहेत, ते कधी कारवाई सुरू करू शकतात आणि सोव्हिएत युनियन त्यांना कशाप्रकारे मदत करेल, हे जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता होती.

या भेटीची माहिती केवळ एमआय-6च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यावर आधारित नाही. त्याचा उल्लेख त्या वेळचे इराणच्या संसदेचे अध्यक्ष अकबर हाशमी रफसंजानी यांच्या आठवणींमध्येही आढळून येतो.

त्यांनी 27 सप्टेंबर 1982 रोजी केलेल्या नोंदीत लिहिलं की, “सायंकाळी इंजिनिअर जवाद (मदारशाही) आणि हबीब आले. ते एका जाणकार व्यक्तीकडून माहिती घेण्यासाठी पाकिस्तानला गेले होते. त्यांनी केजीबीच्या कामकाजाबद्दल, तुदेह पक्षाबद्दल आणि इराणमधील सोव्हिएत युनियनच्या भविष्यातील भूमिकेबद्दल मिळालेली महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती सांगितली.”

मोहम्मदजवाद मदारशाही यांनी अनेक वर्षांनंतर सांगितलं की, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अली खामेनेई यांना पाकिस्तानमध्ये कुझिचकिनची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर हा विषय अकबर हाशमी रफसंजानी यांच्यासमोर मांडण्यात आला. कुझिचकिनकडून माहिती घेण्यासाठी मदारशाही आणि हबीबुल्ला बे-तरफ यांना पाकिस्तानला पाठवण्यात आलं.

वॉटरगेट घोटाळा उघडकीस आणून जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेले अमेरिकन पत्रकार बॉब वुडवर्ड यांनी नोव्हेंबर 1986 मध्ये वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक वृत्तांत लिहिला. त्यात त्यांनी म्हटलं की, सीआयएने कुझिचकिनची चौकशी केल्यानंतर इराणमधील सोव्हिएत गुप्तहेर आणि त्यांच्या मदतनीसांची यादी तसेच इतर माहिती इराण सरकारला पुरवली होती.

इस्लामाबाद ते तुदेहवरील कारवाई

इस्लामाबादमधून मिळालेली माहिती इस्लामिक रिपब्लिकच्या सर्वोच्च पातळीवरील चर्चेचा विषय बनली. बेन मॅकइंटायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि अली खामेनेई यांना तुदेह पक्षावर तातडीने कारवाई हवी होती.

परंतु, मीर हुसेन मुसावी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातील गुप्तहेर विभागाला तातडीने कारवाई करण्याऐवजी तुदेह पक्षाच्या नेटवर्कवर लक्ष ठेवून आणखी माहिती गोळा करायची होती. तसेच, पूर्वीपासून असलेले गुप्त माहितीचे स्रोत धोक्यात येऊ नयेत, असाही त्यांचा प्रयत्न होता.

पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील सर्वच अधिकारी तातडीने सत्तापालट होण्याची शक्यता मानत नव्हते. त्यावेळी रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर असलेले मोहसेन रेझाई यांनी अनेक वर्षांनंतर सांगितलं की, 1982 मध्ये त्यांनी तुदेह पक्ष संसदेवर आणि सरकारी दूरचित्रवाणी केंद्रावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि सोव्हिएत संघाकडे मदत मागू शकतो, असा एक अहवाल तत्कालीन सर्वोच्च नेते रुहोल्ला खोमेनी यांच्यासमोर मांडला होता.

रझाई यांच्या म्हणण्यानुसार, अयातुल्ला खोमेनी यांना हा अहवाल ‘एखाद्या कथेसारखा’ वाटला. पण, अशी शक्यता ‘हजारात एक’ जरी असली, तरी ती गांभीर्याने घेतली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं होतं.

तुदेह पक्षावर कारवाई नेमकी कधी करायची, यावर मतभेद होते, हे अकबर हाशमी रफसंजानी यांच्या आठवणींमधूनही दिसून येतं. 6 फेब्रुवारी 1983 रोजी, तुदेह पक्षाच्या नेत्यांना अटक सुरू झाल्यानंतर त्यांनी लिहिलं की, ‘कारवाईची स्थिती स्पष्ट होईपर्यंत’ अटक करण्याचा निर्णय नव्हता. परंतु, तुदेहचे नेते पळून जातील, या भीतीमुळे अटक लवकर करण्यात आली असावी, असं त्यांनी नमूद केलं.

त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख असलेले खुस्रो तेहरानी यांनीही नंतर सांगितलं की, त्यांच्या विभागाला तुदेहच्या नेटवर्कवर लक्ष ठेवणं सुरू ठेवायचं होतं, जेणेकरून आणखी माहिती आणि अधिक लोकांची ओळख पटवता येईल.

कियानुरी यांनीही ‘राह-ए तुदेह’ या वेबसाइटने त्यांच्या अखेरच्या लिखाणातील एक मजकूर म्हणून प्रसिद्ध केलेल्या लेखात याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अटक होण्याच्या काही आठवडे आधी पक्षाच्या नेत्यांच्या लक्षात आलं होतं की, सुरक्षा यंत्रणांकडून त्यांच्यावर अधिक पाळत ठेवली जात आहे. त्यामुळे सरकारकडून कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे, असं त्यांना वाटत होतं.

त्यामुळे पक्षाच्या पॉलिट ब्युरोने काही नेत्यांना देशाबाहेर पाठवून पक्षाचं काम गुप्तपणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, कियानुरी यांनी स्वतः इराण सोडण्यास नकार दिला.

कियानुरी यांनी असंही लिहिलं आहे की, कुझिचकिनने इराणमधून पलायन केल्याचं समोर आल्यानंतर सोव्हिएत अधिकाऱ्यांनी परतोवीमार्फत त्यांना अनेक वेळा इराण सोडण्याचा सल्ला दिला होता.

मॅकइंटायर यांच्या मते, 6 फेब्रुवारी 1983 रोजी रिव्होल्युशनरी गार्ड्सने केलेल्या पहिल्या कारवाईत तुदेह पक्षाच्या सुमारे 200 ‘पक्ष-संघटकांना’ अटक करण्यात आली. त्यात पक्षाच्या केंद्रीय समितीचे 30 सदस्य होते, असं त्यांनी म्हटलं आहे. परंतु, इतर काही स्रोतांमध्ये यापेक्षा वेगळी संख्या दिली आहे.

उदाहरणार्थ, ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने दिलेल्या वृत्तानुसार, त्या दिवशी तुदेह पक्षाच्या 50 हून अधिक वरिष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली होती. यात कियानुरी आणि मरियम फिरोज यांचाही समावेश होता.

अनेक कैदी आणि मानवी हक्क संस्थांच्या अहवालांनुसार, अटक केलेल्या लोकांकडून कबुलीजबाब मिळवण्यासाठी त्यांचा छळ करण्यात आला.

नंतर कियानुरी यांनी अली खामेनेई यांना लिहिलेल्या पत्रातही याचा उल्लेख केला. त्यांनी मारहाण, हातांना झालेल्या दुखापती आणि आपल्या समोर मरियम फिरोज यांचा करण्यात आलेला छळ याचा उल्लेख केला होता.

तुरुंगात असलेले तुदेह पक्षाचे नेते नुरुद्दीन कियानुरी, परदेशी पत्रकारांना मुलाखत देताना. तेहरानमधील एविन तुरुंग- 10 फेब्रुवारी 1986

फोटो स्रोत, Getty Images

एप्रिल 1983 मध्ये चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तुदेह पक्षाकडून लवकरच होणाऱ्या सत्तापालटाबाबत माहिती मिळाल्याचं सांगितलं. अटकसत्र सुरूच राहिलं आणि पक्षाच्या गुप्त संघटनेतील अनेक सदस्य तसेच पक्षाशी संबंधित लष्करी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.

1 मे रोजी कियानुरी दूरचित्रवाणीवर दिसले. त्यांनी सोव्हिएत युनियनला माहिती दिल्याचं आणि इराणच्या हिताविरोधात काही कारवाया केल्याचं मान्य केलं. इतिहासकार एरवंड अब्राहमियन यांनी या कबुलीजबाबांकडे जबरदस्तीने घेतलेले कबुलीजबाब म्हणून पाहिलं आहे. त्यांच्या मते, टीव्हीवर येण्यापूर्वी कियानुरी यांचा एक हात मोडलेला होता.

मोहम्मद मेहदी परतोवी यांनीही 2016 मध्ये ‘अंदिशे पोया’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तुदेह पक्ष लवकरच सत्तापालट करणार होता, हा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, “आता हे स्पष्ट झालं आहे की, त्या काळात पक्षाचा सत्तापालट करण्याचा कोणताही हेतू नव्हता.”

परतोवी यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाच्या अटक केलेल्या सदस्यांपैकी एका व्यक्तीने चौकशीदरम्यान सत्तापालटाची माहिती दिली. त्यानंतर चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पक्षाच्या इतर नेत्यांवर दबाव टाकला. अशा परिस्थितीत 10 पेक्षा जास्त नेत्यांनी पक्ष लवकरच सत्तापालट करणार असल्याचं कबूल केलं, असं परतोवी यांनी सांगितलं.

कियानुरी यांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या अखेरच्या लिखाणात त्यांनी तुदेह पक्ष लवकरच सत्तापालट करणार होता, हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, दूरचित्रवाणीवरील मुलाखतीत त्यांनी सत्तापालटाचा आरोप मान्य केला होता. मात्र, आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर झालेल्या छळ आणि दबावामुळेच हे कबूल केल्याचं त्यांनी त्यात म्हटलं आहे.

कियानुरी यांच्या म्हणण्यानुसार, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तुदेह पक्षाच्या कथित सत्तापालटासाठी आधी एप्रिल 1983 आणि नंतर 1 मे ही तारीख ठरवली होती. त्यांनी सत्तापालटासाठी ‘कौन्सिल ऑफ कूप’, ‘ऑपरेशन्स कौन्सिल’ आणि भविष्यातील सरकारमध्ये कोणाला कोणती जबाबदारी दिली जाईल, याची यादीही तयार केली होती.

कियानुरी यांच्या म्हणण्यानुसार, या यादीत स्वतःला राष्ट्राध्यक्ष, एहसान तबरी यांना संस्कृतीमंत्री, तर मोहम्मद अली अमुई आणि मोहम्मद अली होज्जारी यांना लष्करी विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.

कियानुरी यांच्या म्हणण्यानुसार, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाटत होतं की सोव्हिएत युनियन आपले सैनिक इराणच्या सीमेपलीकडे पाठवून या सत्तापालटाला मदत करेल. त्यामुळे सत्तापालटाचा आरोप लावल्यानंतर आपल्यावरील छळ आणखी वाढवण्यात आला, असा दावा त्यांनी केला आहे.

टेलिव्हिजनवर कबुलीजबाब देण्यासाठी आपल्यावर कशा रीतीने दबाव टाकण्यात आला, हे सांगताना कियानुरी यांनी आपली पत्नी मरियम फिरोज यांना चाबकाने मारण्याची धमकी आणि कुटुंबातील सदस्यांचा छळ केल्याचाही उल्लेख केला आहे.

तुदेह पक्षावरील कारवाईनंतर, मे 1983 मध्ये इराणच्या इस्लामिक रिपब्लिकन सरकारने सोव्हिएत युनियनच्या 18 राजनैतिक अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना देशाबाहेर पाठवलं. मॅकइंटायर यांच्या मते, यातील बहुतांश जण गुप्तहेर अधिकारी होते आणि त्यांची ओळख व्लादिमीर कुझिचकिनने सांगितली होती.

पक्षाच्या लष्करी गुप्त संघटनेतील सदस्यांवर मोहम्मद मोहम्मदी रेशहरी यांच्या अध्यक्षतेखाली बंद दरवाजाआड खटले चालवण्यात आले. रिअर अॅडमिरल बहराम अफझली यांच्यासह काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मार्च 1984 मध्ये फाशी देण्यात आली.

तुदेह पक्षाचे अनेक सदस्य आणि समर्थक तुरुंगात गेले. 1988 मध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील फाशीमध्ये तुदेह पक्षाच्या काही कैद्यांनाही ठार करण्यात आलं.

राजकीय उद्देश अपूर्ण

मॅकइंटायर यांच्या मते, ‘ऑपरेशन रेडवुड’ ही कारवाई गुप्तहेर माहितीच्या दृष्टीने ब्रिटन आणि अमेरिकेसाठी मोठं यश ठरली. कुझिचकिनकडून मिळालेल्या माहितीमुळे केजीबीच्या गुप्त नेटवर्कमधील काही भाग उघड झाला, काही सोव्हिएत गुप्तहेर अधिकाऱ्यांना इराणमधून हाकलण्यात आलं आणि तुदेह पक्षालाही मोठा धक्का बसला.

परंतु, या कारवाईचा आणखी एक उद्देश होता- इस्लामिक रिपब्लिकन सरकारसोबतचे संबंध सुधारण्यासाठी या सहकार्याचा उपयोग करणे. हा उद्देश मात्र पूर्ण झाला नाही.

पुस्तकात या निर्णयाच्या मानवी पातळीवर झालेल्या परिणामांवरही भर दिला आहे. इस्लामाबादमधील बैठकीला उपस्थित असलेले एमआय-6चे अधिकारी अँड्र्यू ब्राइट यांनी नंतर लिहिलं की, हे काम किंवा मोहीम राबवलीच नसती तर बरं झालं असतं. इराणला माहिती दिलेल्या लोकांचं पुढे काय झालं, ही त्यांच्या कारकिर्दीतील अशी एकमेव गोष्ट होती, जी त्यांना आजही त्रास देत होती.

म्हणूनच मॅकइंटायर यांच्या मते, ‘रेडवुड’ची कहाणी एकाच वेळी ‘यश’ आणि ‘शोकांतिका’ अशी दोन्ही प्रकारे पाहता येते. या कारवाईमुळे केजीबीला मोठा धक्का बसला; पण त्याच वेळी इस्लामिक रिपब्लिकला संघटित विरोधकांच्या शेवटच्या मोठ्या गटांपैकी एकाला संपवण्यात मदत झाली.

कुझिचकिनने इराणमधून पळून गेल्यानंतर ब्रिटनमध्ये ‘अलेक्झांडर जॉर्ज लार्किन’ या नावाने नवीन आयुष्याला सुरुवात केली. हे त्याच्या खऱ्या वडिलांचं आडनाव होतं. त्याने ॲक्युपंक्चरचा मार्ग स्वीकारला आणि शेवटी वेस्टन-सुपर-मेअर येथे तो स्थायिक झाला.

पण, मॅकइंटायर यांच्या मते, पुढचे अनेक वर्षे तो नैराश्य, पश्चात्ताप आणि दारूच्या व्यसनाशी झुंजत राहिला. त्याच्या व्यसनावरील उपचारांचा खर्च अनेकवेळा एमआय-6ने केला.

त्याला त्याच्या निर्णयाच्या पूर्ण परिणामांची जाणीवही कधीच झाली नाही. कुझिचकिनने नंतर इयान मॅककार्डी यांना सांगितलं की, इराणमध्ये ज्या लोकांना तुरुंगात टाकलं, छळलं किंवा मारलं गेलं, त्यांचा विचार आजही त्याला त्रास देतो. 2009 मध्ये वयाच्या 62व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

‘रेडवुड’ या पुस्तकात कुझिचकिनची ब्रिटनसाठी झालेली भरती, एमआय-6ची गुप्त मोहीम, त्याचं इराणमधून पलायन आणि त्याच्याकडून मिळालेली माहिती यांची रोचक कहाणी सांगण्यात आली आहे.

पुस्तकाचे लेखक बेन मॅकइंटायर हे मान्य करतात की, तुदेह पक्ष सत्तापालट करणार होता, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु, त्या काळातील अनेक प्रमुख व्यक्तींना सत्तेवर ताबा मिळवण्यासाठी सशस्त्र कारवाई होण्याचा धोका खरा आणि जवळ आलेला वाटत होता, असं ते सांगतात.

परंतु, पुस्तकात मात्र त्या काळातील भीती आणि अंदाज आणि आज उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे सिद्ध करता येणाऱ्या गोष्टी यांच्यातील फरक नेहमी स्पष्टपणे दाखवला जात नाही.

ही विसंगती पुस्तकाच्या सुरुवातीलाच दिसते. लेखक अशा संकटाचा उल्लेख करतात, ज्यामुळे इराणवर परकीय ताबा येण्याची आणि अगदी ‘अण्वस्त्र संघर्ष’ होण्याचीही शक्यता होती, असं ते सांगतात. पण त्याच वेळी ते हेही मान्य करतात की, सत्तापालट दुसऱ्याच दिवशी, काही महिन्यांनी किंवा कदाचित कधीच झाला नसता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC