Source :- BBC INDIA NEWS

(सूचना: काही प्रसंग वाचकांना अस्वस्थ करू शकतात.)
डायनासोर नष्ट करणाऱ्या महाप्रचंड उल्केच्या धडकेनंतर पृथ्वीवर तब्बल कोट्यवधी वर्षं महाकाय पक्षांचं साम्राज्य होतं. ते त्या काळचे सर्वात मोठे शिकारी बनले होते आणि त्यावेळी माणूसही त्यांच्या भक्ष्यांपैकी एक होता.
28 लाख वर्षांपूर्वीची गोष्ट. आपल्या प्राचीन पूर्वजांचं अवघं 3 वर्षांचं बाळ दक्षिण आफ्रिकेच्या सवाना गवताळ प्रदेशात इकडेतिकडे बागडत होतं. अजून त्याला दुधाचे दातही पूर्ण आले नव्हते. आकाशातून आपल्यावर कोणाची तरी नजर रोखलेली आहे याची त्या निष्पाप ‘ऑस्ट्रेलोपिथेकस आफ्रिकेनस’च्या पिल्लाला पुसटशीही कल्पना नव्हती.
कारण गरुड अशाच प्रकारे शिकार पकडतात. मग शिकारीचा थोडा भाग एखाद्या झाडावर लपवून ठेवतात आणि उरलेला भाग थेट आपल्या घरट्यात घेऊन जातात.
अश्मयुगीन काळ जीवंत राहण्यासाठी अत्यंत धोकादायक होता. त्यावेळी पृथ्वीवर अजस्र आणि महाकाय प्राण्यांचं राज्य होतं. आदिमानवाचा रोजचा सामना भलेमोठे मॅमथ, मास्टोडॉन, महाकाय स्लॉथ, सुळ्यासारखे अक्राळविक्राळ दात असलेल्या रानमांजर-वाघांशी आणि थेट लहान मुलांना उचलून नेणाऱ्या महाकाय शिकारी पक्ष्यांशी होत होता.
जमिनीवर वावरणाऱ्या डायनासोरांचा नायनाट झाल्यानंतर ते थेट महाहिमयुग सुरू होईपर्यंत, कित्येक कोटी वर्षे या अवाढव्य पक्ष्यांनीच आकाशावर राज्य केलं.
त्यांच्या या दहशतीने मानवाच्या उत्क्रांतीला अशा अनेक वळणांवर आणून ठेवलं, ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. हे महाकाय पक्षी नामशेष झाले असले, तरी ते लहान मुलांना उचलून नेणाऱ्या अजस्र पक्षाच्या दंतकथेच्या रूपात जगभरातल्या संस्कृतींमध्ये आजही जिवंत आहेत.
हे महाकाय पक्षी कुठून आले?
BBC/ Emmanuel Lafont
जमिनीवर वावरणारे डायनासोर पृथ्वीवरून पूर्णपणे नष्ट झाले तेव्हा आकाश धूळ आणि राखेच्या दाट थरांनी काळवंडून गेलं होतं आणि बहुतांश वनस्पती नष्ट झाल्या होत्या.
यातले काही पक्षी निव्वळ वनस्पती खाणारे होते. जसं की ऑस्ट्रेलियाचे ‘ड्रोमोर्निथिडी’, ज्यांना “डेमन डक्स ऑफ डूम” म्हटलं जायचं.
हे दिसायला आजच्या बदकांसारखेच होते, पण आकाराने 100 पटींनी मोठे आणि वजनाने चक्क गायीपेक्षाही जड होते.
पण इतर काही पक्ष्यांनी वेगळाच मार्ग निवडला. टायरानासोरससारखे जमिनीवरचे महाकाय शिकारी नष्ट झाल्यामुळे जी रिकामी जागा तयार झाली होती, ती या पक्ष्यांनी भरून काढली. निसर्गाचा नियमच आहे की, जिथे मोठी शिकार सहज मिळते तिथे त्याहून मोठे शिकारी उत्क्रांत होतात.
हेच ते अवाढव्य, भयानक पक्षी होते ज्यांच्याशी आपल्या पूर्वजांना रोज जीवन-मरणाचा सामना करावा लागला होता.
आधुनिक आणि प्राचीन पुरावे
“पृथ्वीवर प्राइमेट्सचे म्हणजे वानर आणि मानवाच्या पूर्वजांचे अस्तित्व जेव्हापासून आहे तेव्हापासून रॅप्टर्स शिकारी पक्षीही अस्तित्वात आहेत,” असं अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीचे वानर प्रजातींचे तज्ज्ञ स्कॉट मॅकग्रॉ सांगतात. “आणि हे शिकारी पक्षी नेहमीच प्राइमेट्सची शिकार करत आले आहेत. त्यामध्ये आपले पूर्वज आणि खुद्द आपणही आलो.”
आपले पूर्वज आणि त्या अवाढव्य पक्ष्यांमधल्या संघर्षाच्या खुणा आजही जंगलात स्पष्ट दिसतात. आयव्हरी कोस्टच्या ‘ताई जंगलात’ आफ्रिकन क्राउन्ड ईगलसारख्या शिकारी पक्ष्यांनी 600 पेक्षा जास्त वानरांना आणि प्राइमेट्सना मारून खाल्लं होतं.
स्कॉट मॅकग्रॉ यांनी या मृत प्राण्यांच्या अवशेषांची तपासणी केली तेव्हा त्यांच्या अंगावरच्या नखांचे व्रण आणि त्या प्राचीन ‘टाउंग चाइल्ड’च्या डोळ्यांखालच्या नखांच्या खुणा हुबेहूब जुळल्याचं समोर आलं.
माकडांच्या अनेक कवट्यांमध्ये आणि डोळ्यांच्या खोबणीतील हाडांच्या भागाला भयंकर जखमा झाल्याचं दिसलं. मॅकग्रॉ सांगतात, “गरुडाने चोच मारून डोळे बाहेर ओढले होते किंवा नख्यांनी ते ओरबडून काढले होते.”
मॅकग्रॉ यांच्या मते, हे महाकाय शिकारी पक्षी आपल्या आदिम मानवी पूर्वजांना नेहमीच शिकार बनवून फस्त करत असावेत. इतकंच नाही तर पक्ष्यांनी सातत्याने केलेली ही शिकारच माणूस ज्या ‘प्राइमेट्स’ कुळातून आला त्यांच्या उत्क्रांतीला दिशा देणारी आणि घडवणारी सर्वांत मोठी नैसर्गिक शक्ती ठरली असावी.
“गेल्या कित्येक वर्षांत गोळा केलेल्या मानवाच्या प्राचीन अवशेषांची आपण पुन्हा अगदी बारकाईने तपासणी केली, तर शिकारी पक्ष्यांनी मानवावर केलेल्या हल्ल्यांच्या आणखी खुणा समोर येण्याची मोठी शक्यता आहे. कारण आता आपल्याला नेमकं काय शोधायचंय हे पूर्णपणे ठाऊक आहे. ‘ताई’च्या जंगलात आज जे काही पाहायला मिळतंय त्यावरून एक गोष्ट नक्की की, त्या काळात मानवावर पक्ष्यांचे असे जीवघेणे हल्ले होणं अगदी रोजचंच होतं.”
शिकारी पक्ष्यांनी आपली उत्क्रांती कशी घडवली?
आदिमानव हा केवळ शिकारी नव्हता, तर तो स्वतःही इतर प्राण्यांचं भक्ष्य ठरत होता. याबद्दल विज्ञानाच्या आणि इतिहासाच्या नोंदींमध्ये कसलीच शंका उरलेली नाही, असं ब्रिटनच्या ब्रायटन युनिव्हर्सिटीचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ जेम्स कोल स्पष्ट करतात. “विशेषतः आपले सुरुवातीचे पूर्वज जसं की गरुडाने फस्त केलेलं ते निष्पाप ‘ऑस्ट्रेलोपिथेकस आफ्रिकेनस’ बाळ.”
आपले आदिम काळातील पूर्वज त्या काळात कित्येक हिंस्त्र प्रजातींचे भक्ष्य ठरत होते, असं कोल सांगतात.
“आपल्या पूर्वजांची शिकार होत होती, हे सत्य आहे.”
या संदर्भात बोलताना कोल सांगतात की, समूहाची ताकद त्या काळात खूप मोलाची ठरली. “जेवढी माणसांची संख्या जास्त, तेवढा धोका कमी आणि संरक्षण जास्त.”
Natural History Museum of Los Angeles County 1981
सिंह किंवा लांडग्यांसारखे प्राणी भक्ष्याचा पाठलाग करून शिकार करतात. पण शिकारी पक्षी तसे नसतात; ते दबा धरून बसतात आणि अचानक झडप घालतात. ते अतिशय सावध असतात, जसं की क्राउन्ड ईगल झाडांच्या फांद्यांमध्ये लपून योग्य वेळेची वाट बघतो.
यावरून असा अंदाज बांधता येतो की, माणसाला एकत्र येऊन टोळीने किंवा समाजात राहण्याची सवय लागली त्यामागे या शिकारी पक्ष्यांची भीती हेच मुख्य कारण असावं. अशा अचानक होणाऱ्या हल्ल्यांवर एकाच वेळी अनेकांची नजर असण्याला विज्ञानात ‘मेनी आईज इफेक्ट’ म्हणजे एकापेक्षा अनेक डोळ्यांची नजर असणं म्हणतात.
माणसाला बोलायला भाषा सुचली आणि भाषेचा जन्म झाला त्यामागेही समूहाची ही वाढलेली संख्याच कारणीभूत असावी, असं कोल पुढे सांगतात. “जेव्हा समूह मोठा होतो तेव्हा कामांची विभागणी सुरू होते. काही माणसं एक काम करत असतात, तर काही जण दुसरं काहीतरी करत असतात. अशा वेळी त्यांच्यात एकमेकांशी ताळमेळ असणं गरजेचं असतं. एकदा का समूहात अशी वेगवेगळी कामं वाटली गेली की फक्त एकमेकांकडे डोळ्यांनी बघून किंवा इशाऱ्यांनी संवाद साधणं शक्य होत नाही.”
हातवारे करून संवाद साधायचा असेल, तर समोरची व्यक्ती डोळ्यांना दिसावी लागते. पण जेव्हा समोरासमोर न बघता एकमेकांशी ताळमेळ ठेवायचा असतो, जसं की आकाशातून किंवा झाडीतून एखादा शिकारी प्राणी जवळ येतोय याचा इशारा दुसऱ्याला द्यायचा असेल “तिथेच नेमकी भाषेची खरी गरज भासायला लागते,” असं कोल सांगतात.
अभ्यासातून समोर आलेले पुरावे सांगतात की, बहुतेक वानर आणि प्राइमेट्स जमिनीवरच्या वेगवेगळ्या शिकाऱ्यांसाठी एकच सामान्य आवाज काढून धोक्याचा इशारा देतात. म्हणजे सिंह दिसला काय किंवा बिबट्या, त्यांचा इशारा एकच असतो.
पण शिकारी पक्षी आकाशात दिसले की मात्र ते अगदी वेगळा आणि विशिष्ट आवाज काढतात. मॅकग्रॉ यांच्या मते, वेगवेगळ्या संकटांसाठी वेगवेगळे आवाज काढण्याची हीच सवय पुढे जाऊन मानवी भाषेचा उगम ठरली असावी.
खऱ्या मारेकऱ्यांची ओळख: महाकाय गरुड आणि टेराटोर्न्स
माणसाचे पूर्वज आणि आकाशातले हे महाकाय शिकारी पक्षी जिथे खऱ्या अर्थाने एकमेकांसमोर उभे ठाकले, ती जागा अमेरिका खंडच असावी असा संशोधकांचा अंदाज आहे.
अमेरिकेतल्या सुरुवातीच्या मानवाचा आमना-सामना ‘टेराटोर्न्स’ नावाच्या महाकाय पक्ष्यांशी नक्कीच झाला असावा. हे इतके भयंकर मांसाहारी पक्षी होते की, अख्ख्याच्या अख्ख्या भक्ष्याला एका घासात गिळून टाकायचे.
लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील वरिष्ठ अभ्यासक जोआन कूपर सांगतात की, हे पक्षी इतके अजस्र होते की, त्यांना आकाशात भरारी घेण्यासाठी वेगळा जोरही लावावा लागायचा नाही. फक्त पंख पसरून वाऱ्याचा वर जाणारा झोत पकडला की ते सहज हवेत तरंगायचे.
विशेष म्हणजे, तोपर्यंत अमेरिकेत माणसाची पहिली पावलं पडून बराच काळ लोटला होता! कूपर यांच्या मते, स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘थंडरबर्ड’च्या गूढ दंतकथा याच पक्ष्यावरून सुरू झाल्या असाव्यात.
थोडं आणखी उत्तरेकडे गेलं तर ओरेगॉनमध्ये ‘टेराटोर्निस वुडबर्नेन्सिस’ नावाचा दुसरा महाकाय पक्षी होता. ज्याच्या पंखांचा विस्तार 4 मीटर (14 फूट) होता. आकाशात धुमाकूळ घालणारा हा अक्राळविक्राळ पक्षी साधारण 12,000 वर्षांपूर्वी वावरत होता. त्याचे अवशेष ज्या ठिकाणी सापडले, तिथेच मॅमथ, मॅस्टोडॉन, जमिनीवर राहणारे महाकाय स्लॉथ आणि त्या काळातील आदिमानवाचे अवशेषही एकत्र आढळून आले आहेत.
अगदी जगाच्या दुसऱ्या टोकाला, न्यूझीलंडमध्येही लहान मुलांना थेट उचलून नेणाऱ्या ‘ते होकिओई’ नावाच्या एका अजस्र गरुडाची लोककथा माओरी जमातीत खूप प्रसिद्ध आहे.
अभ्यासकांच्या मते, ही केवळ काल्पनिक गोष्ट नव्हती तर ती प्रत्यक्षात पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या एका अवाढव्य पक्ष्यावर आधारलेली होती. ज्याचं नाव होतं ‘हास्ट्स ईगल’, जो आता नामशेष झाला आहे.
कूपर यांच्या शब्दांत सांगायचं तर हास्ट्स ईगल म्हणजे “आकाशात उडणारा वाघच” होता. आजच्या जगातल्या सर्वांत मोठ्या गरुडांमध्ये गणल्या जाणाऱ्या ‘हार्पी ईगल‘पेक्षाही त्याचं वजन जवळपास दुप्पट होतं.
हा महाकाय गरुड जमिनीवर धावणाऱ्या 4 मीटर (13 फूट) उंच अशा धिप्पाड ‘मोआ‘ पक्ष्याची शिकार करायचा. आकाशातून खाली झेप घेताना स्वतःच्या महाकाय वजनामुळे त्याला अफाट गती मिळायची आणि मग आपल्या 10 सेंटीमीटर (4 इंच) लांब अणकुचीदार नख्यांनी तो भक्ष्याच्या पाठीवर असा तडाखा द्यायचा की समोरचा भलामोठा पक्षी एका फटक्यात जमिनीवर कोसळायचा.
“काही मोआ पक्ष्यांच्या कंबरेच्या हाडांवर या महाकाय नख्यांचे खोलवर उमटलेले घाव आजही स्पष्ट दिसतात. तसेच हा अजस्र गरुड माणसांवरही तितक्याच निर्दयीपणे झडप घालू शकत होता, असं कूपर सांगतात.
“लहान मुलांवर तर याचं भयंकर सावट असायचं. आकाशातून चालून येणारा हा कर्दनकाळ पाहताना जितकं विस्मय वाटलं असेल तितकीच थरकाप उडवणारी दहशतही निर्माण झाली असेल.”
कूपर अगदी समर्पकपणे सांगतात, “हे महाकाय पक्षी जेव्हा डोक्यावरून उडायचे तेव्हा जमिनीवर त्यांची भलीमोठी सावली पडायची आणि तीच सावली जगभरातल्या संस्कृती आणि लोककथांवर एक दीर्घकालीन प्रभाव सोडून गेली.”
आपण या महाकाय जिवांवर कशी मात केली?
थोडक्यात सांगायचं तर, आकाशातल्या या महाकाय शिकारी पक्षांनी तब्बल 5 कोटी वर्षं आकाशावर अधिराज्य गाजवलं. पण नंतर साधारण 26 लाख वर्षांपूर्वी पृथ्वी एका महाकाय हिमयुगाच्या गर्तेत लोटली गेली. त्याला विज्ञानात ‘प्लाइस्टोसीन युग’ म्हणतात.
पण दुसरीकडे, हे युग संपता संपता म्हणजेच साधारण 11,700 वर्षांपूर्वी, जमिनीवरचे अजस्र प्राणी नामशेष झाले होते आणि आकाशातले हे महाकाय शिकारी पक्षीही कायमचे गायब झाले.
“एकतर आपण त्यांची शिकार करून त्यांना खात होतो किंवा मग अन्नासाठी त्यांच्याशीच दोन हात करत होतो,” असं कूपर सांगतात.
कदाचित म्हणूनच आजच्या काळातही माणूस आणि या शिकारी पक्ष्यांमध्ये एक छुपा तणाव जाणवतो, असा अंदाज त्या वर्तवतात. “त्यांच्याबद्दल आपल्याला कमालीचं कुतूहल वाटतं, त्यांच्या ताकदीचा आपण आदरही करतो. पण त्यांच्या आजूबाजूला राहणं मात्र आपल्याला फारसं पचनी पडत नाही.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




