Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC
इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणजे लिंगाच्या ताठरतेसंदर्भातील समस्या. यामुळे लैंगिक संबंध ठेवणं शक्य होत नाही. ही समस्या ह्रदयविकाराचा झटका, स्ट्रोक म्हणजे मेंदूचा रक्तप्रवाह खंडित होणं, मधुमेह आणि डिमेन्शिया यासारख्या आजारांसाठीचा इशारा किंवा पूर्वसूचना असू शकते.
आता डॉक्टर आणि रुग्ण या दोघांनीही याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे, असं संशोधकांना वाटतं.
इरेक्टाईल डिसफंक्शनचं वर्णन तुम्ही सायलंट एपिडेमिक म्हणजे मूक स्वरुपातील रोगाची साथ असं करू शकता.
अनेक सर्वेक्षणांनुसार, 40 वर्षांवरील निम्म्याहून अधिक प्रौढ पुरुषांना या समस्येला तोंड द्यावं लागतं. तरीसुद्धा या समस्येबाबत आपल्या जवळच्या किंवा प्रिय व्यक्तींशी चर्चा करण्यास फार कमी पुरुष इच्छूक असतात.
जरी हा मुद्दा संभाषणात आला तरी अनेकदा त्याच्याकडे एखाद्या आजारासंदर्भातील पूर्वसूचना म्हणून न पाहता एक थट्टेचा विषय म्हणूनच पाहिलं जातं. अनेक नवीन संशोधनांमधून असं दिसून आलं आहे की लिंग हे अनेकदा पुरुषांच्या एकंदरितच आरोग्याचं बॅरोमीटर म्हणजे निदर्शक असतं.
लिंगाच्या ताठरतेची समस्या ही मधुमेह, ह्रदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि डिमेन्शिया यासारख्या अनेक गंभीर आजारांची पूर्वसूचना देणारी बाब ठरू शकते.
इमॅन्युएल जॅनिनी हे रोम टोर वर्गाटा विद्यापीठातील सेक्सोलॉजिस्ट आहेत. इमॅन्युएल यांनी अलीकडेच आजवरच्या पुराव्यांचं पुनरावलोकन करणारं एक अभ्यासपूर्ण पुस्तक संपादित केलं आहे. इमॅन्युएल यांच्या म्हणण्यानुसार हा “कोळशाच्या खाणीतील कॅनरी आहे”. कॅनरी हा एक पिवळ्या रंगाचा छोटा पक्षी असतो. या वाकप्रचाराचा अर्थ, हा येऊ घातलेल्या धोक्याचा किंवा संकटाचा इशारा असतो.
त्यामुळे लिंगाच्या ताठरतेशी संबंधित समस्येची चांगली तपासणी केल्यास डॉक्टर पुरुषांच्या आरोग्याच्या बाबतीतील काही गंभीर धोके आणखी मोठे होण्यापूर्वी त्यांचं निदान करू शकतात.
मात्र, अनेक पुरुष त्यांच्या लैंगिक आरोग्याविषयी बोलण्यास अनिच्छूक असतात. त्याचा अर्थ असा होतो की ते त्यांच्या आरोग्यासंदर्भातील भविष्यातील धोक्यांबद्दल जाणून घेण्याची मौल्यवान संधी गमावत आहेत.
या अतिशय सहजपणे आढळणाऱ्या तक्रारीबद्दल तुम्हाला काय माहित असलं पाहिजे आणि तुमच्या डॉक्टरांनी यासंदर्भात धोक्याचा इशारा का दिला पाहिजे यामागची कारणं पुढे दिली आहेत.
प्लंबिंगसारखी समस्या
अनेक आजारांप्रमाणे लिंगाच्या ताठरतेसंदर्भातील समस्येचं नेमकं प्रमाण किंवा व्याप्ती तुम्ही त्याची व्याख्या कशी करता आणि मोजमाप कसं करता यावर अवलंबून असते. त्यामुळे अभ्यासांनुसार, प्रौढ पुरुषांमध्ये जागतिक पातळीवर याचं प्रमाण 3 टक्के ते 76.5 टक्क्यांपर्यंत दिसून येतं. ही खूप मोठी श्रेणी किंवा पट्टा आहे.
मात्र सर्वात मोठ्या आणि अत्यंत सूक्ष्म स्वरुपात केलेल्या सर्वेक्षणांपैकी एकानं जवळपास 1200 व्यक्तींची तपासणी केली. यात त्यांनी तपशीलवार प्रश्नावली वापर केला. त्यातून त्यांना असं आढळून आलं की 40 वर्षे वयाच्या 39 टक्के पुरुषांना नियमितपणे कोणत्या तरी पातळीवर नपुंसकत्वाचा अनुभव येतो. तर पुरुषांच्या वयाच्या 70 व्या वर्षी हे प्रमाण 67 टक्क्यांपर्यंत वाढतं.
अनेक बाबतीत, लिंगाच्या ताठरतेची समस्या ही प्लंबिंगसारखी समस्या आहे. म्हणजेच ही समस्या शरीरातील रक्त प्रवाहातील अडथळे किंवा समस्येमुळे निर्माण होते. ज्याप्रमाणे पाण्याचे पाईप पाणी वाहून नेतात आणि त्या पाईपात अडथळा निर्माण झाला तर पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होतो. तसंच, काहीसं लिंगातील रक्त प्रवाहाच्या संदर्भात होतं.
लिंगाच्या लांबीभर दोन स्पंजसारख्या रचना असतात. त्यांना कॉर्पोरा कॅव्हरनोसा म्हणतात. सामान्यपणे त्या शिथिल किंवा ढिल्या असतात. जेव्हा पुरुष उत्तेजित होतो तेव्हा मेंदू लिंगाच्या धमन्यां (आर्टरी) भोवतीचे स्नायू शिथिल करण्याचे संदेश पाठवतो. त्यामुळे या दोन सिलिंडरसारख्या रचना म्हणजे कॉर्पोरा कॅव्हरनोसामधील रक्तप्रवाह वाढतो. त्यांचा विस्तार होतो तसा हे कॉर्पोरा कॅव्हरनोसा ताणले जातात. मग ते लिंगाच्या बाहेर रक्त वाहून नेणाऱ्या शिरांवर दाब टाकून ते आत अडवतात.
ज्याप्रमाणे एखाद्या फुग्यामध्ये हवा भरल्यावर तो फुगतो, हा अवयव विस्तारतो आणि ताठरतो. लिंगाच्या नलिकांमधून रक्ताचा प्रवाह कमी करणारी कोणतीही गोष्ट पुरुषाच्या लिंगाची ताठरता निर्माण करण्याच्या किंवा तो टिकवून ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम करते किंवा त्याला कमजोर करते.
फोटो स्रोत, Getty Images
ही समस्या अनेकदा मानसिक स्वरुपाची असते. ॲड्रेनॅलीन आणि कॉर्टिसॉल यांचा समावेश असलेला कोणत्याही तणावयुक्त प्रतिक्रियेमुळे आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावू शकतात. त्यामुळे कॉर्पोरा कॅव्हनोसामध्ये ताठरता येण्यापासून रोखलं जातं. जर तणावाची पातळी खूपच वाढलेली असेल तर त्यामुळे टेस्टोस्टेरॉनच्या निर्मितीमध्येही अडथळा निर्माण होऊ शकतो.
त्याचा परिणाम होऊन लिबिडो म्हणजे कामेच्छा कमी होऊ शकते आणि लैंगिक उत्तेजना कमी होऊ शकते. (ज्या लोकांना हायपोगोनॅडिझमसारखे ग्रंथीचे विकार असतात त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरॉनचं उत्पादनदेखील कमी झालेलं असतं. त्यामुळे त्याचीही यात भूमिका असू शकते.)
तणावाबरोबर अनेकदा एकप्रकारचा मानसिक विचलितपणा येतो. त्यामुळे लैंगिक संबंधावर लक्ष केंद्रित करणं कठीण होऊ शकतं.
आपल्या उत्क्रांतीच्या संदर्भात यामागे एक चांगलं कारण नक्कीच असणार. जर ताणतणावामुळे लैंगिक उत्तेजना थांबली असेल किंवा मंदावली असेल तर आपलं शरीर धोक्याच्या क्षणी बचाव करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी आपली संसाधनं जपून ठेवतं. “जर वातावरण धोकादायक असेल, तर प्रजनन न करणं महत्त्वाचं असतं,” असं जॅनिनी म्हणतात.
मात्र आधुनिक जगात ताणतणाव निर्माण होण्यामागे जीवघेणी किंवा जिवाला धोका नसलेली अनेक कारणं असतात. त्यामुळे ही संरक्षणात्मक यंत्रणा आवश्यकतेपेक्षा अधिकवेळा सक्रिय होऊ शकते.
ह्रदय आणि मेंदूशी संबंधित समस्या
अनेक प्रकरणांमध्ये, लिंगाच्या ताठरतेच्या समस्येतून आरोग्याच्या अधिक व्यापक समस्यांचे संकेत मिळू शकतात. हे ‘अथेरोस्क्लेरोसिस’मुळे उद्भवू शकतं. यात रक्तवाहिन्या कडक आणि अरुंद होतात. त्यामुळे ह्रदयविकाराचा मोठा धोका उद्भवतो.
लिंगाच्या रक्तवाहिन्या या शरीरातील सर्वात छोट्या रक्तवाहिन्यांपैकी एक असतात. त्यामुळे अनेकदा त्या सर्वात आधी निकामी होतात. त्यामुळे लिंगाच्या ताठरतेशी संबंधित समस्या अशा प्रकारच्या ह्रदय कमकुवत होण्याचा (हार्ट फेल्युअर) संकेत किंवा पूर्वसूचना ठरू शकते.
अलीकडच्या एका संशोधनात (शोधनिबंध) 1,54,794 व्यक्तींच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं. त्यात असं आढळलं की ज्या पुरुषांना लिंगाच्या ताठरतेशी संबंधित समस्या होती त्यांना कोरोनरी हार्ट डिसीज (ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांचा विकार) होण्याची शक्यता 59 टक्के अधिक होती. तर स्ट्रोक होण्याची शक्यता 34 टक्के अधिक होती.
फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC/ Getty Images
“रक्तवाहिन्यांच्या आरोग्याचं एक चांगलं मोजमाप किंवा लक्षण म्हणजे लिंगामध्ये चांगला ताठरपणा येणं,” असं मायकल कॅरोल म्हणाले. ते यूकेमधील मँचेस्टर मेट्रोपॉलिटन विद्यापीठात प्रजनन विज्ञानाचे तज्ज्ञ आहेत. तसंच ते ‘युवर नट्स: द सायन्स ऑफ हाऊ दे वर्क अँड व्हॉट इट मीन्स फॉर युवर फर्टिलिटी’ या आगामी पुस्तकाचे लेखक आहेत. हे पुस्तक आगामी काळात प्रकाशित होणार आहे.
जननेंद्रियाचं म्हणजे लिंगाचं खराब आरोग्य हे बौद्धिक, आकलनात्मक क्षमतेच्या ऱ्हासाचं लक्षण असू शकतं, याचे काही प्राथमिक किंवा तात्पुरत्या स्वरुपाचे पुरावेदेखील आहेत.
एका तैवानी अभ्यासात आढळलं आहे की ज्या पुरुषांना लिंगाच्या ताठरतेसंबंधी समस्या होती त्यांना 7 वर्षांच्या पाठपुराव्यादरम्यान डिमेन्शिया होण्याची शक्यता 68 टक्के अधिक होती. लिंगाप्रमाणेच आपला मेंदूदेखील ऊर्जा पुरवण्यासाठी आणि विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी चांगल्या रक्तपुरवठ्यावर अवलंबून असतो.
मधुमेहाशी असलेला संबंध
ज्या लोकांना मधुमेहाचा धोका असतो त्यांच्या बाबतीत लिंगाच्या ताठरतेशी संबंधित समस्येवर लक्ष ठेवणं विशेष महत्त्वाचं ठरू शकतं. कारण मधुमेहामुळे रक्ताभिसारण आणि मज्जासंस्थेच नुकसान होऊ शकतं. उदाहरणार्थ, रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढणं.
जर मधुमेहाचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं नाही तर रक्तातील साखरेची पातळी वाढणं ही सामान्यपणे आढळून येणारी बाब आहे. यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतीमधील प्रोटीनना रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज चिकटू शकतं. यामुळे रक्तवाहिन्यांचा लवचिकपणा कमी होऊ शकतो. या प्रक्रियेला ग्लायकेशन म्हणतात.
अथेरोस्क्लेरोसिसप्रमाणेच यात शरीराच्या ज्या भागांना रक्तप्रवाहाची सर्वाधिक गरज असते तिथे होणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो. यात लिंगामधील नाजूक रक्तवाहिन्यांवर याचा परिणाम सर्वात आधी होतो.
“मधुमेह आणि लिंगाच्या ताठरतेसंबंधित समस्या यांचा खूप मोठा संबंध असतो. ज्या पुरुषांना मधुमेह नसतो त्यांच्या तुलनेत टाईप टू मधुमेह असणाऱ्या पुरुषांना लिंगाच्या ताठरतेसंदर्भातील समस्या उद्भवण्याची शक्यता तीन पटीनं अधिक असते,” असं बोगडॅन व्लाचो म्हणतात. ते स्पेनमधील बार्सिलोनातील सँट पाऊ रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक आहेत.
फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC/ Getty Images
पुराव्यांच्या अलीकडेच करण्यात आलेल्या पुनरावलोकनात व्लाचो यांना असंही आढळलं की ज्या लोकांना फक्त मधुमेहाची समस्या आहे, त्यांच्या तुलनेत ज्यांना मधुमेह आणि लिंगाच्या ताठरतेची समस्या आहे त्यांच्यामध्ये ‘पेरिफेरल न्युरोपॅथी’ म्हणजे हात आणि पायांच्या मज्जातंतूंची हानी होण्याची शक्यता लक्षणीयरित्या अधिक असते.
तसंच या लोकांना रेटिनोपॅथीचा आजार होण्याचाही मोठा धोका असतो. यामुळे अंधत्व येऊ शकतं. तसंच जखम भरून न येण्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे काहीवेळा अवयव कापण्याची वेळ येऊ शकते.
तरीदेखील मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लिंगाच्या ताठरतेशी संबंधित समस्येची तपासणी करणं ही सामान्य किंवा प्रमाण पद्धत नाही. ” डॉक्टरांसारखे आरोग्य क्षेत्रात काम करणारे लोक रुग्णांबरोबर या विषयाबाबत बोलत नाहीत याचे पुरावे आहेत,” असं सँटियागो मार्टिनेझ म्हणतात. ते स्पेनमधील बार्सिलोना विद्यापीठात एंडोक्रिनोलॉजिस्ट आहेत. या अभ्यासांच्या पुनरावलोकनाचे ते सह-लेखक आहेत.
संभाव्य उपचार पद्धती
यूकेतील द युरोलॉजी फाऊंडेशननं एक सर्वेक्षण केलं होतं. त्यात आढळलं की लिंगाच्या ताठरतेची समस्या असलेल्या अर्ध्याहून अधिक पुरुषांनी वैद्यकीय मदत घेणं टाळलं होतं. या आजाराबद्दल वाटणारी लाज आणि चिंता यामुळे त्यांनी तसं केलं होतं. यात 20 टक्के पुरुषांनी तर असंही म्हटलं की त्यांच्या समस्येबद्दल डॉक्टरांकडे जाण्याऐवजी ते महिनाभर बिअर न पिणं पसंत करतील.
मात्र कॅरोल यांना वाटतं की लिंगाच्या ताठरतेची समस्या असलेल्या सर्व पुरुषांनी वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. यामुळे तुम्हाला तुमचं मोठं दु:ख आणि तणाव यापासून आराम मिळू शकतो. त्याचबरोबर तुमच्या एकंदरीत शारीरिक आरोग्याबद्दल मौल्यवान चर्चादेखील सुरू होऊ शकते. ती कदाचित तुमचा जीव वाचवणारी ठरू शकते.
“समस्येवर लवकर उपाय करणं ही महत्त्वाची बाब असते,” असं ते म्हणतात.
शेवटी लिंगाच्या ताठरतेची समस्या हा काही असाध्य आजार नाही. व्हायग्रा (सिल्डेनाफिल) सारखी औषधं लिंगामधील रक्तवाहिन्यांना विस्तारतात किंवा रुंद करतात.
मात्र काही अनुभवांवर आधारित पुराव्यांमधून दिसून येतं की जे लोक त्यांचं लैंगिक जीवन सुधारण्यासाठी या गोळ्या घेत आहेत त्यांच्या ह्रदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्यादेखील सुधारणा झाली आहे. यात ह्रदय निकामी होण्याचा धोका कमी होण्याचाही समावेश आहे. अर्थात ही गोष्ट अद्याप क्लिनिकल चाचण्यांमध्ये सिद्ध झालेली नाही.
(संशोधकांना व्हायग्राचे आता प्रसिद्ध झालेले दुष्परिणाम लक्षात येण्यापूर्वी सुरुवातीच्या काळात हे औषध मूळात उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी ह्रदय आणि रक्तवाहिन्यांवरील उपचार म्हणून विकसित करण्यात आलेलं होतं.)
या औषधांमुळे डिमेन्शिया होण्याची शक्यतादेखील कमी होऊ शकते आणि अल्झायमर्स हा आजार होण्याचा धोका दुपटीनं कमी झाला, असं एका अभ्यासातून आढळून आलं. यात 8,85,000 हून अधिक रुग्णांचं विश्लेषण करण्यात आलं होतं.
किमान तुम्ही जर लिंगाच्या ताठरतेच्या समस्येविषयी डॉक्टरांशी बोललात, तर ते उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) आणि अथेरोस्क्लेरोसिस सारख्या ह्रदय विकाराच्या सामान्य धोक्यांच्या संदर्भात तुमची
फोटो स्रोत, Getty Images
तपासणी करू शकतात. तसंच ते तुम्हाला लठ्ठपणासारख्या समस्यांवर मार्गदर्शन करू शकतात. या समस्यांमुळे ह्रदयाचं आरोग्य बिघडू शकतं.
काही प्रकरणांमध्ये आहारात केलेले बदल आणि व्यायाम यासारख्या सोप्या उपायांमुळेदेखील मदत होऊ शकते. ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या बाबतीत रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणं आवश्यक ठरतं.
अर्थात, मार्टिनेझ आणि व्लाचो यावर भर देतात की लिंगाच्या ताठरतेच्या समस्येवर या उपचार पद्धतींचे काय परिणाम होतात आणि ते इतर गुंतागुंतीचा धोकादेखील कमी करू शकतात का याबाबतीत संशोधन अजूनही खूपच सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
याशिवाय लिंगाच्या ताठरतेबाबतच्या समस्येमागच्या कारणांचा उलगडा करण्यासाठी मेहनत घेऊन खूप गांभीर्यानं काम करावं लागू शकतं. कारण ही समस्या पॉर्नचं व्यसन आणि लैंगिक इच्छेशी संबंधित मानसिक आरोग्याच्या समस्यांमधून देखील उद्भवू शकते.
“जर एखाद्या पुरुषाला मधुमेह किंवा ह्रदय-रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार असेल तर त्याचा संबंध जोडणं आणि त्यावर उपचार करणं सहसा सोपं असतं,” असं कॅरोल म्हणतात.
“मात्र जर त्यात मद्यपान आणि धूम्रपान यांच्यासारखे जीवनशैलीशी निगडीत घटकांबरोबर पॉर्नचा अतीवापर यासारख्या मानसिक किंवा वर्तनाशी संबंधित गोष्टींचा समावेश असेल तर या समस्येवर उपचार करणं अधिक कठीण होऊ शकतं. अनेकदा हे पुरुष त्यांच्या कृतींबद्दल उघडपणे सांगत नाहीत,” असं कॅरोल पुढे म्हणाले.
उक्रांतीच्या ओघात गमावलेलं हाड
आजच्या आपल्या आरोग्यसेवेत त्याचं स्पष्ट महत्त्व तर आहेच. मात्र त्याचबरोबर जॅनिनी या मुद्द्याचाही विचार करत आहेत की लिंग हे एकूणच आरोग्याचं निदर्शक असल्यामुळे किंवा त्याचा संकेत देत असल्यामुळे त्याचे मानवी उक्रांतीवर परिणाम झालेले असू शकतात.
एक प्रजाती म्हणून लिंग ताठर होण्याच्या बाबतीत मानव विलक्षण किंवा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. मानव यासाठी रक्तप्रवाहावर अवलंबून असतो. इतर बहुतांश वानरवर्गी प्राणी यात आपले सर्वात जवळचे नातेवाईक असलेले चिंपांझीदेखील आले, त्यांच्या लिंगामध्ये बॅक्युलम नावाचं हाड असतं. त्याचं वैशिष्ट्यं म्हणजे ते मागे घेता येणारं किंवा आकुंचन पावणारं असतं.
त्यांच्यातील लैंगिक उत्तेजनेच्या वेळेस लिंगाच्या ताठरपणासाठी आणि रक्तप्रवाह सक्रिय आणि रक्तवाहिन्या ताठ ठेवण्यासाठी हे हाड प्रसरण पावतं किंवा पुढे येतं. परिणामी मानवातील सर्वसाधारण पुरुषाचं लैंगिक किंवा क्रिया ज्याप्रमाणे त्याच्या एकूणच आरोग्याशी जशी घनिष्ठपणे जोडलेली असते, त्याप्रमाणे या प्राण्यांचं लैंगिक आयुष्य हे त्यांच्या एकंदरितच आरोग्याशी इतक्या घनिष्ठपणे जोडलेलं नसतं.
फोटो स्रोत, Getty Images
मग उक्रांतीमध्ये पुरुषामध्ये लिंगातील हे बॅक्युलम नावाचं हाड का निघून गेलं असावं आणि पुरुषामध्ये लैंगिक अकार्यक्षमता किंवा बिघाड आणि असुरक्षिततेची वाढलेली शक्यता का आली असावी? या वस्तुस्थितीनं अनेक उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञांना गोंधळात किंवा कोड्यात टाकलं आहे.
मात्र जॅनिनी यांना शंका वाटते की सर्वात योग्य, फिट जोडीदार कोण असेल आणि कोण त्यांच्या संततीला सर्वोत्तम जनुकं देईल, हे आपल्या महिला पूर्वजांना ओळखता यावं यासाठी म्हणून पुरुषांच्या लिंगामधील हे हाड निघून गेलं असावं.
“प्रजननासाठी आपण सर्वात महत्त्वाचं हाड गमावलं आहे ही खूप विचित्र गोष्ट आहे. कारण आपली प्रतिक्रिया खूपच अनिश्चित किंवा अंदाज बांधता न येणारी असते. मात्र याचा अर्थ असा आहे की हे दीर्घकालीन आजारांच्या बाबतीत एक परिपूर्ण बायोमार्कर म्हणजे जैविक घटक आहे,” असं जॅनिनी म्हणतात.
(डेव्हिड रॉबसन हे एक पुरस्कार-विजेते विज्ञान लेखक आणि लेखक आहेत. ‘द लॉज ऑफ कनेक्शन : 13 सोशल स्ट्रॅटेजीस दॅट विल ट्रान्सफॉर्म युवर लाईफ’ हे त्यांचं अलीकडचं पुस्तक जून 2024 मध्ये कॅननगेट (यूके) आणि पेगासस बुक्स (यूएसए आणि कॅनडा) यांनी प्रकाशित केलं. ते इंस्टाग्रामवर आणि थ्रेड्सवर @davidarobson या नावानं आहेत. तसंच ते सबस्टॅकवर ’60-सेकंद सायकॉलॉजी’ हे न्यूजलेटर लिहितात.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC






