Home LATEST NEWS ताजी बातमी लिझी बॉर्डनने खरंच आई-वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केली होती? 134 वर्षांनंतरही गूढ कायम

लिझी बॉर्डनने खरंच आई-वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केली होती? 134 वर्षांनंतरही गूढ कायम

5
0

Source :- BBC INDIA NEWS

लिझी बॉर्डनने खरंच आई-वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केली होती?

(महत्त्वाचं: या लेखातील काही तपशील वाचकांना अस्वस्थ वाटू शकतील.)

जून 1893 मध्ये लिझी बॉर्डनवर तिच्या वडिलांच्या आणि सावत्र आईच्या हत्येचा खटला चालला. न्यायालयाने यातून तिची निर्दोष मुक्तता केली. अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात गाजलेल्या अनुत्तरित रहस्यांपैकी एक बनले.

या घटनेवर अनेक कादंबऱ्या, चित्रपट आणि आता नेटफ्लिक्सवर नवीन मालिका देखील आली आहे.

कुख्यात मारेकऱ्यांच्या आयुष्याची नाट्यमय कहाणी दाखवत रायन मर्फी आणि इयान ब्रेनन यांनी नेटफ्लिक्सवरील ‘मॉन्स्टर’ ही खऱ्या गुन्ह्यांवर (ट्रू-क्राइम अँथॉलॉजी) आधारित मालिका लोकप्रिय केली आहे.

सिरीयल किलर जेफ्री डॅमर, वडिलांची हत्या करणारे भाऊ लायल आणि एरिक मेनेंडेझ आणि विस्कॉन्सिनमधील खुनी आणि स्मशानभूमी लुटणारा एड गीन यांच्या कहाण्याही या मॉन्स्टर मालिकेत दाखवण्यात आल्या आहेत.

या कहाण्यांमधून मर्फी एका प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात- ‘गुन्हेगार (मॉन्स्टर) जन्मतःच तसे असतात की परिस्थितीमुळे तसे बनतात?’

चौथ्या सीझनसाठी या दोघांनी लिझी बॉर्डनची कहाणी निवडली आहे. पण, तिच्या कहाणीवर आधारित काही तयार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या अनेक दशकांपासून कादंबरीकार, नाटककार, कवी, ऑपेरा संगीतकार आणि इतकंच काय रॉक संगीतकारांनाही या अंगावर काटा आणणाऱ्या भयानक घटनेनं प्रेरणा दिली आहे. ऑगस्ट 1892 मध्ये अमेरिकेतील लिझी बॉर्डनवर दोन भीषण हत्यांचे आरोप झाले होते.

अमेरिकेच्या गुन्हेगारी इतिहासात हे प्रकरण इतकं गाजलं की, आजही शाळकरी मुलं त्यावरचं एक छोटंसं गाणं म्हणतात. त्यात म्हटलं आहे की, “लिझी बॉर्डनने कुऱ्हाड घेऊन आईवर 40 वार केले आणि आपण काय केलं हे पाहिल्यानंतर वडिलांवर 41 वार केले.”

थरकाप उडवणारा गुन्हा

या गाण्यात खरा खुनी कोण होता, याबाबत कदाचित चुकीची माहिती असेल. त्यात हत्येसाठी केलेल्या वारांची संख्याही वाढवून सांगितली गेली असेल आणि शस्त्राबाबतही अचूक माहिती नसेल.

प्रत्यक्षात हत्येसाठी हॅचेट वापरण्यात आला होता. हे एका हाताने सहज वापरता येईल इतकं हलकं, छोट्या कुऱ्हाडीसारखं शस्त्र असतं.

पण, हत्याकांडाचा क्रम मात्र बरोबर सांगितला आहे. मॅसॅच्युसेट्समधील फॉल रिव्हर शहरात उन्हाळ्याच्या एका उष्ण सकाळी अँड्र्यू आणि ॲबी बॉर्डन यांची हत्या झाली.

सर्वात आधी ॲबीला लक्ष्य करण्यात आलं. ॲबी 64 वर्षांच्या होत्या. त्या अँड्र्यू यांच्या दुसऱ्या पत्नी आणि त्यांच्या दोन अविवाहित मुली- 41 वर्षांची एम्मा आणि 32 वर्षांची लिझी. या दोघींच्या त्या सावत्र आई होत्या.

एका तासाहून अधिक काळानंतर अँड्र्यू काही कामानिमित्त बाहेर जाऊन घरी परतले. त्यानंतर त्यांचीही हत्या करण्यात आली. लिझीने पोलिसांना बोलावलं. पोलीस जेव्हा घरात पोहोचले, तेव्हा त्यांना अँड्र्यू दिवाणखान्यातील सोफ्यावर मृतावस्थेत आढळून आले.

हॅचेटने केलेल्या 11 वारांमुळे त्यांचा चेहरा इतका विद्रूप झाला होता की त्यांना ओळखणंही कठीण जात होतं.

जून 1893 मध्ये लिझी बॉर्डनवर हत्येचा खटला चालला आणि न्यायालयाने तिची निर्दोष मुक्तता केली. पण तरीही ती आयुष्यभर संशयाच्या छायेतच राहिली.

हा गुन्हा इतका भयंकर होता की, सुरुवातीला पोलिसांना लिझीवर संशयही आला नाही. ती वरकरणी शांत स्वभावाची वाटत होती आणि फॉल रिव्हरमधील सेंट्रल काँग्रिगेशनल चर्चमध्ये शिकवायला जात असे.

परंतु, चौकशीदरम्यान तिच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. हत्येच्या सकाळी ती नेमकी कुठे होती, याबाबत ती वारंवार वेगवेगळी माहिती देत होती. त्या वेळी घरात केवळ लिझी आणि कुटुंबाची आयरिश मोलकरीण ब्रिजेट सुलिव्हन होत्या. लिझीची बहीण एम्मा सुट्टीसाठी बाहेरगावी गेली होती, तर घरात आलेला एक पाहुणाही बाहेर गेला होता.

याशिवाय, लिझी आणि तिच्या बहिणीने घरात कोणताही वाद किंवा तणाव असल्याचे नाकारले. पण, त्यांच्या मित्रांना आणि शेजाऱ्यांना घरातील तणावाची माहिती होती.

अँड्र्यू हे श्रीमंत होते, पण ते खूप काटकसरी होते. त्यांनी आपल्या मुलींना शहरातील फारशा चांगल्या नसलेल्या, एका पडक्या भागात राहायला भाग पाडलं होतं. घरखर्चातही त्या दोघींना काटकसर करावी लागत होती. परंतु दुसरीकडे, अँड्र्यू आपल्या नवीन पत्नीच्या कुटुंबाला मात्र पैसे द्यायचे.

हत्येच्या आदल्या दिवशी लिझीने विषारी प्रुसिक ॲसिड खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती एका स्थानिक औषध विक्रेत्याने पोलिसांना दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी लिझीला अटक करून तुरुंगात पाठवलं.

डिसेंबर महिन्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. एका मित्राने ग्रँड ज्युरींसमोर सांगितलं की, हत्येनंतर काही दिवसांनी लिझीने एक ड्रेस जाळला होता. तो ड्रेस तिचाच असल्याचं सांगितलं जात होतं.

यानंतर तिच्यावर हत्येचे अधिकृत आरोप ठेवण्यात आले आणि पुढील वर्षी जूनमध्ये तिच्यावर खटला चालवण्याची तारीख निश्चित करण्यात आली.

इतिहासकार आणि फॉल रिव्हरचे रहिवासी जोसेफ कॉन्फोर्टी यांनी ‘लिझी बोर्डन ऑन ट्रायल: मर्डर, एथनिसिटी अँड जेंडर’ या पुस्तकात या खटल्याबद्दल माहिती दिली आहे.

त्यांच्या मते, वडिलांच्या मृत्यूनंतर मिळालेल्या पैशातून लिझीने बोस्टनमधील एका प्रसिद्ध वकिलाची मदत घेतली. तिची बाजू मांडण्यासाठी सर्व पुरुष असलेल्या ज्युरीसमोर हा खटला चालला. त्या काळात ज्युरीमध्ये केवळ पुरुषांनाच स्थान मिळत असे.

कॉन्फोर्टी यांच्या म्हणण्यानुसार, ‘लिझीने स्वतःला असहाय आणि निरागस मुलगी’ म्हणून न्यायालयात सादर केलं. “तिच्या वकिलांनी तिला काळे कपडे घालण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ती न्यायालयात घट्ट कमरेचे कपडे (कॉर्सेट) आणि लांब झगा घालून येत असे. तिच्या एका हातात फुलांचा गुच्छ, तर दुसऱ्या हातात पंखा असत.”

न सुटलेलं गूढ, ज्याची चर्चा आजही सुरू

हत्येसाठी वापरलेलं शस्त्र कधीच सापडलं नाही. तसेच, लिझीने औषधांच्या दुकानात केलेल्या संशयास्पद भेटीचा पुरावाही न्यायालयाने ग्राह्य धरला नाही. त्यामुळे लिझीविरोधातील खटला ठोस पुराव्यांपेक्षा परिस्थितीजन्य पुराव्यांवरच आधारलेला होता.

लिझीमध्ये इतकी शारीरिक ताकद नव्हती आणि ती एवढी क्रूरही नव्हती, असं ज्युरींना वाटलं. सरकारी वकिलांनी तिला ‘हिंसक आणि विक्षिप्त खुनी’ म्हणून सादर केलं होतं. पण, ज्युरींनी थोड्या चर्चेनंतर लिझीला निर्दोष ठरवलं.

पण, या भीषण हत्यांसाठी लिझीशिवाय इतर कोणावरही कधी खटला चालला नाही. लिझी निर्दोष सुटली असली तरी तिच्यावरील संशय कायम राहिला. आयुष्यभर तिच्या गावातील अनेक लोकांनी तिच्यापासून अंतर ठेवलं, तिला बहिष्कृत केलं.

मग लिझी बॉर्डनची कथा आजही इतकी चर्चेत का आहे? विशेषतः लेखकांना तिच्या कथेनं इतकं आकर्षित का केलं?

“एखादी व्यक्ती निर्दोष सुटते, तेव्हा त्या प्रकरणाचा शेवट पूर्णपणे होत नाही,” असं ‘द ट्रायल ऑफ लिझी बॉर्डन’ या पुस्तकाच्या लेखिका कारा रॉबर्टसन यांनी बीबीसीला सांगितलं.

त्यांच्या मते, या प्रकरणात गुप्तहेर कथेसारख्या अनेक गोष्टी आहेत. संशयितांची संख्या कमी आहे, हत्येच्या वेळी कोण कुठे होतं, यावर बरंच काही अवलंबून आहे आणि जर लिझी बॉर्डनच खुनी होती, असं मानलं तर ही मानवी मनातील गुंतागुंत आणि भावनांची एक खोल कहाणी ठरते.

लेखकांनी लिझी बॉर्डन आणि तिच्या आसपासच्या लोकांवर आधारित अनेक कादंबऱ्या, कथा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कहाण्या लिहिल्या आहेत. 1982 मध्ये अँजेला कार्टर यांनी ‘द फॉल रिव्हर अॅक्स मर्डर्स’ ही अस्वस्थ करणारी कथा लिहिली. या कथेत हत्येच्या काही तास आधी नेमकं काय घडलं असावं, याची कल्पना यात मांडण्यात आली आहे.

‘लिटिल फायर्स एव्हरीव्हेअर’च्या लेखिका सेलेस्ट एनजी यांनी लिहिलं आहे की, या कथेत लिझीचं जग अक्षरशः तापलेलं, अस्वच्छ आणि भावनिकदृष्ट्याही घुसमटणारं असल्याचं जाणवतं. कुऱ्हाडीचा वार होताना मात्र आपल्याला दाखवलं जात नाही. आणि त्याची गरजही भासत नाही.

1975 मध्ये लिझी बॉर्डनची भूमिका साकारल्याबद्दल अभिनेत्री एलिझाबेथ माँटगोमेरी यांना एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

गेल्या अर्धशतकात या हत्याकांडावर आधारित 3 उल्लेखनीय चित्रपट तयार झाले आहेत. याची सुरुवात 1975 मध्ये ‘द लीजेंड ऑफ लिझी बॉर्डन’ या एबीसीच्या टेलिव्हिजन चित्रपटापासून झाली. या चित्रपटाचं समीक्षकांनीही कौतुक केलं होतं.

‘बिविच्ड’ या प्रसिद्ध मालिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री एलिझाबेथ माँटगोमेरी हिने लिझी बॉर्डनची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला एमी पुरस्काराचं नामांकनही मिळालं होतं.

या चित्रपटात लिझी बॉर्डनला शांत, अलिप्त आणि भेदक नजरेची महिला म्हणून दाखवलं आहे. हत्येची कबुली देणं लांब ती आपल्या मनातलंही काहीच कोणाला सांगत नाही.

चित्रपटात लिझी खरंच दोषी होती की नाही, याचं थेट उत्तर दिलं जात नाही. पण, कल्पनेवर आधारित स्वप्नवत दृश्यांमध्ये एलिझाबेथ माँटगोमेरी लिझीच्या भूमिकेत हातात कुऱ्हाड घेऊन दिसते.

2014 मध्ये लाइफटाइमच्या ‘लिझी बोर्डन टुक अ‍ॅक्स’ या टीव्ही चित्रपटात लिझी बॉर्डनची भूमिका अभिनेत्री क्रिस्टिना रिक्कीने साकारली. या चित्रपटात लिझीला आजच्या काळातील एका कटकारस्थानी आणि खोडकर मुलीच्या रूपात दाखवलं आहे.

हॉलिवूड रिपोर्टरच्या समीक्षणानुसार, रिक्कीने ही भूमिका खूप प्रभावीपणे साकारली. तिच्या चेहऱ्यावरचा राग आणि विक्षिप्तपणा तिने ठळकपणे दाखवला, त्याचबरोबर अभिनय अतिनाटकी वाटणार नाही याचीही काळजी घेतली.

यानंतर लाइफटाइमने पुढच्या वर्षी ‘द लिझी बॉर्डन क्रॉनिकल्स’ ही 8 भागांची मिनीसीरिजही सादर केली.

2018 मध्ये आलेल्या ‘लिझी’ या मानसशास्त्रीय थरारपटात लिझी बॉर्डनची भूमिका क्लोई सेव्हिनीने साकारली. या चित्रपटात लिझीची कहाणी स्त्रीवादी दृष्टिकोनातून मांडली आहे.

चित्रपटात लिझीला कुटुंबातील दडपण आणि अन्यायाला कंटाळलेली मुलगी दाखवलं आहे. तिचं घरातील मोलकरीण ब्रिजेट सुलिव्हन (क्रिस्टन स्टुअर्ट) हिच्यावर प्रेम असतं. अँड्र्यूने ब्रिजेटचं लैंगिक शोषण केल्याचंही चित्रपटात दाखवलं आहे. या पार्श्वभूमीवर लिझी हत्येचा मार्ग निवडते, अशी चित्रपटाची मांडणी आहे.

लिझी आणि ब्रिजेट यांच्यात प्रेमसंबंध असल्याची कल्पना 1984 मध्ये लेखक इव्हान हंटर यांनी त्यांच्या ‘लिझी’ या कादंबरीतही मांडली होती.

क्लोई सेव्हिनीने सुमारे 10 वर्षे या प्रकरणाचा अभ्यास केला. त्यानंतर तिने या चित्रपटाची निर्मिती केली आणि त्यात लिझीची भूमिकाही साकारली. तिच्या मते, लिझी ही ‘पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या अमेरिकन बंडखोरासारखी’ होती.

लिझीची कहाणी पुन्हा पडद्यावर

‘मॉन्स्टर: द लिझी बॉर्डन स्टोरी’ ही मालिका पाहणाऱ्यांना लिझीची भूमिका क्रिस्टिना रिक्कीने साकारलेल्या रूपापेक्षा क्लोई सेव्हिनीने साकारलेल्या रूपाच्या जवळची वाटू शकते.

या मालिकेत लिझीची भूमिका एला बीटी साकारत आहे. ती अभिनेते वॉरेन बीटी आणि अॅनेट बेनिंग यांची मुलगी आहे.

एलाच्या म्हणण्यानुसार, “या मालिकेत महिलांच्या मनातील दडपलेला राग आणि त्यांना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्यावर त्या कशा प्रतिक्रिया देतात, याचा वेध घेतला आहे.”

रायन मर्फी आणि इयान ब्रेनन यांनी तयार केलेल्या नेटफ्लिक्सच्या नव्या मालिकेत एला बीटी लिझी बॉर्डनची भूमिका साकारत आहे. (Credit: Netflix)

अलीकडेच एका मुलाखतीत रायन मर्फी म्हणाले की, लिझी बॉर्डन प्रकरणाचा अभ्यास करताना त्यांना खूप रस वाटला. त्यांच्या मते, या प्रकरणातून महिला आणि समाज यांच्यातील संबंधांवर प्रकाश पडतो. त्यामुळे 134 वर्षांपूर्वीची ही घटना असली, तरी तिचे विषय आजच्या काळाशीही सुसंगत आहेत.

‘मॉन्स्टर’ मालिकेच्या ट्रेलरवरून असं दिसतं की, यावेळीही लिझी बॉर्डन आणि ब्रिजेट सुलिव्हन यांच्यात जवळचे प्रेमसंबंध असल्याचं दाखवले जाणार आहेत.

लिझी बॉर्डन प्रकरणाचा 30 वर्षांहून अधिक काळ अभ्यास करून त्यावर लेखन करणाऱ्या कारा रॉबर्टसन यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांना याचं आश्चर्य वाटत नाही. अनेक कादंबरीकार आणि चित्रपट निर्मात्यांना मूळ कहाणी अपुरी वाटली आहे. त्यामुळे पूर्वी त्यांनी लिझीच्या आयुष्यात एका पुरुष प्रियकराची कल्पना केली. अलीकडच्या काळात मात्र त्यांनी तिच्या घरातीलच एका व्यक्तीला- म्हणजे मोलकरीण ब्रिजेटला- तिच्याशी जोडलं आहे.

परंतु, लिझी आणि ब्रिजेट यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं दाखवण्याला काही माहिती असलेल्या तथ्यांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतात, असं रॉबर्टसन सांगतात.

त्या म्हणतात, “त्यांच्यात प्रेमसंबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हेही खरं आहे की लिझी ब्रिजेटला तिच्या खरं नावाने कधीच हाक मारत नसे.” लिझी तिला मॅगी म्हणायची. मॅगी हे नाव याआधीच्या एका मोलकरणीचं होतं.

‘मॉन्स्टर’च्या या सीझनमधील एक वेगळी गोष्ट म्हणजे यात आणखी एका खुनाच्या प्रकरणाची कहाणी जोडण्यात आली आहे. ही घटना तुलनेने अलीकडच्या काळातील आहे.

काही दृश्यांमध्ये सारा पॉलसन फ्लोरिडातील आयलीन वूओर्नोसची भूमिका साकारताना दिसणार आहे. 1992 मध्ये 7 पुरुष ग्राहकांची हत्या केल्याप्रकरणी वूओर्नोसला दोषी ठरवण्यात आलं होतं.

लिझी बॉर्डन आणि आयलीन वूओर्नोस यांच्या कहाण्या एकत्र दाखवून मालिकेचे निर्माते एक व्यापक मुद्दा मांडताना दिसतात. पुरुषांच्या तुलनेत महिला हत्या करण्याची शक्यता कमी असली, तरी काही परिस्थितींमध्ये त्यांचा राग टोकाला जाऊन तो हिंसक होऊ शकतो.

लिझी बॉर्डनने या प्रकरणापूर्वी किंवा त्यानंतर कधीही हिंसक वर्तन केल्याचं आढळून आलेलं नाही. पण तिने खरंच हत्या करण्याच्या उद्देशाने हातात कुऱ्हाड उचलली असेल, तर तसं करण्यामागचं कारण काय होतं?

या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कधीच मिळणार नाही. त्यामुळे ‘मॉन्स्टर’ मालिकेत लिझी बॉर्डनने मांडलेला नवीन दृष्टीकोन हा या प्रकरणावरील शेवटचा निष्कर्ष ठरणार नाही.

ऑगस्ट 1892 मध्ये घडलेल्या या भीषण हत्याकांडाकडे भविष्यातही अनेक लेखक आणि कलाकार पुन्हा पुन्हा पाहतील. कारण आजही या गुन्ह्याचं गूढ पूर्णपणे समोर आलेलं नाही.

‘मॉन्स्टर: द लिझी बोर्डन स्टोरी’ ही मालिका 17 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC