Home LATEST NEWS ताजी बातमी विधान परिषदेच्या 17 पैकी 16 जागांवर महायुती विजयी; नाशिकमध्ये धक्कादायक निकाल

विधान परिषदेच्या 17 पैकी 16 जागांवर महायुती विजयी; नाशिकमध्ये धक्कादायक निकाल

4
0

Source :- BBC INDIA NEWS

महाराष्ट्र विधानसभा

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 11 जागांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी 6 जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्यामुळे उर्वरित 11 जागांचे निकाल आज जाहीर झाले.

विधान परिषदेच्या या जागांसाठीचं मतदान 18 जून रोजी पार पडलं होतं. एकूण 17 जागांपैकी तब्बल 16 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

तर नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून महायुतीतील शिंदे गटाच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का दिला आहे. भाजपचे बंडखोर असलेले गोकुळ गीते यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला आहे.

एकूण 17 जागांपैकी भाजपने 11, शिंदेंच्या शिवसेनेने 4, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर निवडणूक लढवली होती.

महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराला या निवडणुकीत विजय मिळवता आलेला नाही. भाजपने 11 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला 3 जागांवर विजय मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे.

विधान परिषदेच्या कोणत्या जागेवर नेमका कोण विजयी झाला आहे, हे जाणून घेऊया.

17 पैकी 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये रवींद्र फाटक (ठाणे), अनिकेत तटकरे (कोकण), विक्रम काकडे (पुणे), प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर), दुष्यंत चतुर्वेदी (यवतमाळ) आणि अरुण लखानी (वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर) यांचा समावेश होता.

तर उर्वरित नाशिक, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, सोलापूर, भंडारा-गोंदिया, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर या जागांवर निवडणूक लढवली गेली.

उर्वरित 11 जागांचे निकाल :

  • छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट (भाजप)
  • भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
  • सांगली-सातारा – धैर्यशील कदम (भाजप)
  • परभणी-हिंगोली – सय्यद खान (शिवसेना)
  • सोलापूर – राजेंद्र राऊत (भाजप)
  • धाराशिव-लातूर-बीड – बसवराज पाटील (भाजप)
  • नागपूर – राजीव पोतदार (भाजप)
  • जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप)
  • अमरावती – प्रवीण पोटे (भाजप)
  • नांदेड – अमर राजूरकर (भाजप)
  • नाशिक – गोकुळ गीते (अपक्ष)

एका जागेचा अपवाद वगळता महायुतीने या निवडणुकीत वर्चस्व राखलं आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

विधान परिषद निवडणूक कशी होते?

विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेसाठी थेट निवडणूक प्रक्रिया नसते. राष्ट्रपती निवडणूक आणि सिनेटसारख्या निवडणुकांमध्ये वापरली जाणारी पसंतीक्रमाची पद्धत येथे वापरली जाते.

निवडणुकीसाठी मतदारांना जितके उमेदवार उभे असतील, तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो.

संबंधित मतदारसंघातील मतदारसंख्या आणि उमेदवारांची संख्या यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतो. निर्धारित कोट्याएवढी प्रथम पसंतीची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पहिल्या पसंतीची मतं कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीच्या मतांद्वारे कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी ठरतो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीक्रमातील उमेदवार विजयी होऊ शकतो. त्यामुळे कोणाचंही मतदान वाया जात नाही.

विधानसभा

फोटो स्रोत, MLS.ORG.IN

विधान परिषद निवडणुकीत सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुप्त मतदान. राज्यसभा निवडणुकीत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना आपलं मत पक्षाला दाखवावं लागतं. मात्र विधान परिषद निवडणुकीत आमदार गुप्त मतदान करतात. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली जाते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC