Home LATEST NEWS ताजी बातमी सौदी अरेबियामध्ये अडकले शेकडो भारतीय; उमराह यात्रेकरूंनी बीबीसीला काय सांगितलं?

सौदी अरेबियामध्ये अडकले शेकडो भारतीय; उमराह यात्रेकरूंनी बीबीसीला काय सांगितलं?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

दिल्लीचे इम्रान खान (डावीकडे) आणि मुंबईचे इम्रान शेख (उजवीकडे) त्यांच्या गटातील इतर सदस्यांसह मक्का येथे अडकले आहेत.

सौदी अरेबियातील हवाई हल्ल्यांचा धोका आणि सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, भारतीय विमान कंपन्यांनी त्या देशातून येणाऱ्या-जाणाऱ्या विमान उड्डाणांवरील बंदी वाढवली आहे.

भारतीय दूतावासानं दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसनं 24 ऑक्टोबरपर्यंतची उड्डाणं रद्द केली आहेत, तर आकासा एअरनं 27 ऑक्टोबरपर्यंतची उड्डाणं रद्द केली आहेत.

सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर 10 ऑक्टोबर रोजी येमेनी हुथी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या सुरक्षाविषयक चिंतांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आणि अनेक भारतीय जखमी झाले आहेत.

दरम्यान, इंडिगोनं विविध शहरांमधील आपल्या विमानसेवा रद्द करण्याचा कालावधी वाढवला आहे.

एअरलाइननं दिलेल्या माहितीनुसार, रियाधला येणारी आणि जाणारी विमानसेवा 31 ऑक्टोबरपर्यंत रद्द राहील, तर जेद्दाह, दम्माम आणि मदिना इथं जाणारी विमानसेवा 27 ऑक्टोबरपर्यंत रद्द राहील.

विमानसेवा रद्द झाल्यानं अनेक भारतीय उमराह यात्रेकरू तिथं अडकले आहेत.

बीबीसी न्यूज हिंदीनं या मुद्द्यावर मक्कामध्ये उपस्थित असलेल्या दिल्लीतील इम्रान खान आणि मुंबईतील इम्रान शेख यांच्याशी संवाद साधला आहे.

इम्रान खान 30 सप्टेंबर रोजी मक्का या ठिकाणी पोहोचले होते, तर इम्रान शेख सुमारे दीड महिन्यापूर्वीच तिथं गेले होते.

सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या भारतीयांची परिस्थिती काय आहे?

उमराहसाठी मक्का या ठिकाणी गेलेल्या दिल्लीच्या इम्रान खान यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, ते 30 सप्टेंबर रोजी आपल्या ग्रुपसह तिथं पोहोचले होते आणि 15 ऑक्टोबरला इंडिगोनं परत येणार होते.

मक्का येथे अडकलेले भारतीय यात्रेकरू

पण त्यांच्या विमानाचं उड्डाण रद्द झाल्यामुळे ते जाऊ शकले नाहीत. ते म्हणाले की, “माझ्याशिवाय इथे असे इतरही गट आहेत ज्यांच्याकडे तिकीट नाही. सर्वात मोठी समस्या तर त्या लोकांची आहे जे एजंटसोबत आले होते, पण तो एजंट त्यांना सोडून पळून गेला आहे.”

आता अशा लोकांकडे राहण्यासाठी, खर्चासाठी काहीच शिल्लक रक्कम उरली नाहीये. काही लोक परत जाण्यासाठी विमानतळावर गेले, पण विमान रद्द झाल्यामुळे ते दुसऱ्या कोणत्यातरी पर्यायाच्या आशेनं विमानतळावरच थांबले आहेत.

ते पुढे म्हणाले की, “सौदी एअरलाइन्सचं जे थेट तिकीट उपलब्ध होतं, ते आता पुढच्या महिन्याच्या 10 ते 15 तारखेपर्यंत दिसत नाही. लोकांना दुसरा कोणताही पर्याय मिळत नाहीये.”

तुम्हाला भारत सरकार आणि दूतावासाकडून काही मदत मिळाली का?

मुंबईहून मक्का इथं आलेले इम्रान शेख अजूनही तिथंच असून, सध्या परिस्थिती स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी पुढे सांगितलं की, जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाकडून त्यांना अन्न पुरवलं जात आहे.

त्यांच्या अंदाजानुसार, “मोठ्या संख्येनं भारतीय मक्का इथं अडकले आहेत.” ते पुढे म्हणाले की, “सध्या आम्ही विमानसेवा पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहोत.”

त्यांनी सांगितलं की, भारतीय वाणिज्य दूतावास आणि सरकार मदत करत आहेत. ते पुढे म्हणाले की, “आम्हाला अधिकाऱ्यांकडून थेट फोन आला नाही. त्यांचे ट्विट पाहिल्यानंतर आम्ही स्वतः त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना प्रवाशांची यादी पाठवली.”

दुसरीकडे, इम्रान खान म्हणाले की त्यांना जेद्दाहमधील भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून फोन आला होता.

ते म्हणाले की, “आम्हाला आलेला फोन, तुमचे यात्रेकरू ठीक आहेत की नाही, त्यांना हॉटेलची सोय करून दिली आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी होता. एक हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला आहे.”

ते पुढे म्हणतात की, “पण असे अनेक लोक आहेत जे अडकले आहेत आणि त्यांच्याकडे साधी माहितीसुद्धा नाही. ते हेल्पलाइन नंबरवर फोन करून माहिती कशी मिळवणार?”

व्हिसाची मुदत संपण्याची शक्यता आहे का?

इम्रान शेख म्हणाले की, उमराह यात्रेकरूंना व्हिसा संपण्याची समस्या भेडसावत नाही.

व्हिसाची वैधता एक वर्ष असून सौदी अरेबियातील वास्तव्याचा कालावधी 90 दिवसांचा आहे.

सहसा उमराह पॅकेज 15 दिवसांचे असते.

व्हिसा अजूनही वैध आहे. सौदी सरकारनं त्याची वैधता एका वर्षापर्यंत वाढवली असून, त्याचं नूतनीकरणही करता येतं.

आम्हाला आशा आहे की 90 दिवसांच्या वास्तव्याचा कालावधी संपण्यापूर्वी विमान प्रवासाचा प्रश्न सुटेल.

इम्रान खान म्हणाले की, विमान रद्द झाल्याची बातमी सर्वप्रथम 12 ऑक्टोबर रोजी आली होती आणि त्यानुसार आता फक्त 12 दिवस झाले आहेत.

सौदी अरेबियावर हुथी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यानंतर अनेक भारतीय विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहेत.

ज्यांच्याकडे सौदी चलन नाही ते काय करत आहेत?

मक्का इथं अडकलेल्या इम्रान खान यांनी सांगितलं की, सौदी सरकारनं इथं शिबिरं उभारली आहेत, त्यामुळे ज्यांच्याकडे रियाल नाहीत त्यांनी काळजी करण्याची गरज नाही.

ते म्हणाले की, “विविध ठिकाणी शिबिरं उभारण्यात आली आहेत, जिथं दुपारी आणि संध्याकाळी बिर्याणी, ज्यूस, चिकन रोल्स आणि पाणी दिलं जात आहे. तिथून जेवण घेण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत.”

इथं राहण्यासाठी हॉटेल आहे. दुसरा पर्याय म्हणजे, तुम्ही ज्या कार्यालयामार्फत आलात, त्यामार्फत पैसे भरणं. कोणत्याही हाजीवर पैसे भरण्यासाठी दबाव टाकला जात नाही. तुमच्याकडे पैसे असतील तर भरा, अन्यथा तुम्ही ज्या कार्यालयामार्फत आलात त्याचा सर्व तपशील आम्हाला द्या. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून पैसे वसूल करू.

इम्रान शेख यांनी असंही सांगितलं की, उमराह यात्रेकरूंकडील चलन संपलं असून त्यांना अन्न आणि पेय पुरवलं जात आहे.

ते म्हणाले की, “ज्या प्रवाशांचे नातेवाईक किंवा मित्र सौदी अरेबियामध्ये राहतात, ते त्यांच्याकडून कर्ज घेऊन आपला खर्च भागवत आहेत. याशिवाय, भारतातील काही लोकही त्यांना मदत करत आहेत.”

सौदी अरेबिया

रस्ते मार्गानं आणि नंतर विमानानं युएईला जाता येतं का?

इम्रान खान यांनी सांगितलं की, कनेक्टिंग फ्लाईट्स खूप महाग असून, त्यांचं भाडं 60 हजार ते 70 हजार रुपये दाखवलं जात आहे.

ते सांगतात की, “एक पर्याय म्हणजे इथून दुबईला जाऊन तिथून विमान पकडणं. तुम्ही 30-35 हजार रुपयांमध्ये येऊ शकता, पण त्यासाठी ट्रान्झिट व्हिसा लागतो आणि तो लगेच उपलब्ध होत नाही.”

त्यांनी दुसऱ्या पर्यायाबद्दल सांगितलं की, “व्हिजिट व्हिसा मिळवण्याचा पर्याय आहे, पण त्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. यासाठी सात ते साडेसात हजार रुपयांचं वेगळं शुल्क भरावं लागतं.”

इम्रान शेख म्हणाले की, उमराह यात्रेकरूंचे अनेक गट दुबई, कतार आणि ओमानमार्गे भारतात परत येत आहेत. अनेक यात्रेकरू ओमान आणि मस्कतमार्गे बसने देखील निघाले आहेत.

परत येण्यासाठी दुबई हा देखील एक पर्याय आहे, कारण तिथं मोठ्या संख्येनं भारतीय राहतात आणि अनेक प्रवाशांचे नातेवाईकही तिथं आहेत.

मात्र, बसने दुबईला पोहोचायला सुमारे 24 तास लागतात, त्यानंतर तिथून विमानानं भारतात यावं लागतं.

याचा कुटुंबांवर काय परिणाम होत आहे?

इम्रान खान म्हणतात की, आपल्या मोठ्या कुटुंबांसह उमराहसाठी गेलेल्या यात्रेकरूंना खर्च उचलणं अत्यंत कठीण होत आहे.

ते म्हणाले की, “दोन-तीन लोकांसाठी हे ठीक आहे, पण जी मोठी कुटुंबं आली आहेत त्यांना जास्त अडचणी येत आहेत. 5-6 लोकांची कुटुंबं आली आहेत. त्यांची अडचण अशी आहे की त्यांना प्रत्येक व्यक्तीसाठी 50 हजार रुपयांचं स्वतंत्र तिकीट काढावं लागतं, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या तिकिटाचं बिल 3 लाख रुपये होतं.”

“कारण, ज्या कंपन्यांनी विमानसेवा रद्द केली, त्यांनी आम्हाला 100 टक्के परतावा घेण्यास सांगितलं. 100 टक्के परतावा म्हणजे 17 हजार किंवा 18 हजार रुपये परत मिळणं, पण परतीचे तिकीट 50 हजार किंवा 60 हजार रुपयांचं येत आहे. आम्हाला 35 ते 36 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च येत आहे.”

इम्रान शेख म्हणाले की, एअरलाइन्स त्यांच्या वॉलेटमध्ये परतावा देत आहेत. आता, जर आपल्याला दुसऱ्या एअरलाइनचं तिकीट बुक करायचं असेल, तर आपल्याला थेट आपल्या बँक खात्यातून पैसे भरावे लागतील. मग, जुन्या तिकिटाच्या बदल्यात मिळालेल्या वॉलेट बॅलन्सचा वापर आपण कसा करणार?

त्यांनी मागणी केली की ही रक्कम थेट बँक खात्यात जमा व्हावी.

उमराह यात्रेकरूंना मदत करणारे लोक

मुलांना कोणत्यासमस्यांना सामोरं जावं लागत आहे?

बीबीसीसोबतच्या संभाषणात दोन्ही तरुणांनी सांगितलं की, जेव्हा त्यांची मुलं आजारी पडतात तेव्हा त्यांना खूप समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

इथं सर्दीवरचं औषध थेट मेडिकल स्टोअरमधून मिळत नाही. डॉक्टरांकडून तपासून घेतल्याशिवाय तुम्हाला ते मिळणार नाही.

जरी इथं तपासणी आणि औषधे मोफत असली तरी, आधी डॉक्टरांना भेटावं लागतं. काही कुटुंबांनी सांगितलं की इथली औषधं त्यांच्या मुलांवर लागू पडत नाहीत.

लोकांना मोठ्या विमानांनी परत आणलं पाहिजे: ओवैसींची मागणी

एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी दावा केला आहे की, भारतातील सुमारे 4 हजार उमराह यात्रेकरू गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून मदिना, जेद्दाह आणि मक्का इथं अडकले आहेत.

त्याच्या मते, ट्रॅव्हल एजंटकडून त्यांना कोणतीही मदत मिळत नसल्यामुळे या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ओवैसी म्हणाले की, हे सर्व प्रवासी इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडियामार्फत सौदी अरेबियाला गेले होते. त्यांनी असा दावा केला की, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) या तीन विमान कंपन्यांना जेद्दाहसाठी विमानसेवा चालवण्यास परवानगी देत ​​नाही.

ओवैसी यांनी मागणी केली की, डीजीसीएनं या विमान कंपन्यांना ए321 सारख्या मोठ्या विमानांचा वापर करून उड्डाणं करण्यास तत्काळ परवानगी द्यावी, जेणेकरून सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या सर्व भारतीय उमराह यात्रेकरूंना परत आणता येईल.

सौदी अरेबिया

सरकारचा दावा, ‘एका आठवड्यात 3 हजार भारतीय परतले’

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की, गेल्या एका आठवड्यात सौदी अरेबियातून सुमारे 3 हजार उमराह यात्रेकरू भारतात परतले आहेत.

जयस्वाल यांच्या म्हणण्यानुसार, या प्रवाशांव्यतिरिक्त, गेल्या एका आठवड्यात उपलब्ध विमानांमधून 10 हजारहून अधिक सामान्य उमराह यात्रेकरू देखील भारतात परतले आहेत.

त्यांनी सांगितलं की की, रियाधमधील भारतीय दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास बाधित प्रवाशांच्या लवकर परतीसाठी संबंधित विमान कंपन्या आणि टूर ऑपरेटर्सच्या संपर्कात आहेत.

उर्वरित उमराह यात्रेकरूंच्या परतीसाठीच्या व्यवस्थेवरही चर्चा सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास, स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीनं, बाधित यात्रेकरूंना आवश्यक ती मदत पुरवत आहेत.

भारतीय प्रवाशांना मदत करण्यासाठी नियंत्रण कक्ष

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, सौदी अरेबियामध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी रियाधमधील भारतीय दूतावासात आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावासात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

सध्याच्या परिस्थितीबाबत भारतीय नागरिकांना नियमितपणे सूचनाही जारी केल्या जात आहेत, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

रियाधमधील भारतीय दूतावासाने प्रवाशांच्या मदतीसाठी +966-554412016 आणि +966-542126784 हे फोन क्रमांक जारी केले आहेत. सौदी अरेबियामधून 8002471234 या टोल-फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येतो. +966-536216082 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेशही पाठवता येतात.

जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने +966-12-2614093 आणि +966-556122301 हे फोन नंबर जारी केले आहेत. +966-536209704 या व्हॉट्सॲप नंबरवर संदेश देखील पाठवता येतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC