Home LATEST NEWS ताजी बातमी अस्लम इनामदार : चहाच्या टपरीपासून आंतरराष्ट्रीय पदकापर्यंत; असा आहे कबड्डीच्या पोस्टरबॉयचा संघर्ष

अस्लम इनामदार : चहाच्या टपरीपासून आंतरराष्ट्रीय पदकापर्यंत; असा आहे कबड्डीच्या पोस्टरबॉयचा संघर्ष

6
0

Source :- BBC INDIA NEWS

अस्लम इनामदार

26 सप्टेंबरचा दिवस… एक तर शनिवार आणि त्यात दुसऱ्या दिवशीच्या गणपती विसर्जनाची लगबग असं महाराष्ट्राच्या घराघरातलं चित्रं… पण त्याचवेळी जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्सच्या कबड्डी फायनला थरार पाहण्यासाठी सगळीकडे टीव्हींसमोर गर्दी झालेली होती.

सुवर्ण पदकासाठी भारतासमोर होता इराणचा संघ… शेवटची दोन मिनिटं शिल्लक होती… भारत 37 आणि इराण 30 असे पॉइंट असल्यानं सामना कोणत्याही दिशेला झुकू शकेल अशी शक्यता असल्यानं तणावही होता…

त्याचवेळी मराठी मातीतला एक कबड्डीपटू रेडसाठी आला आणि अत्यंत जोखीम पत्करत त्यानं आणखी दोन पॉइंट मिळवत सगळ्यांचाच तणाव काहीसा कमी करण्याचा प्रयत्न केला…

त्याचा फायदा झाला आणि शेवटी 39-33 च्या फरकानं भारतानं सुवर्णपदक जिंकलं… भारताच्या सुवर्णपदकाला ही झळाळी देणारा तो मराठमोळा कबड्डीपटू म्हणजे अस्लम इनामदार.

कबड्डीच्या वर्तुळामध्ये गेल्या काही वर्षांत अत्यंत चर्चेत असलेल्या नावांमध्ये अस्लमचा समावेश होतो. पण आज यशाच्या शिखरावर असलेल्या अस्लमचा प्रवास मात्र अत्यंत खडतर असा राहिला आहे.

आईला 300 रुपयांसाठी भांडी धुणी करावी लागणं किंवा स्वतः अस्लमला चहाच्या टपरीवर, टॉयलेट स्वच्छ करण्यासारखी कामं करावी लागणं, असा संघर्ष त्यानं अनुभवला.

त्यानंतरच त्याला कबड्डीच्या मॅटवर यश मिळालं आणि त्यानं ते यश अशा पातळीपर्यंत पोहोचवलं की आज सगळीकडे त्याची चर्चा होत आहे.

एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अस्लम इनामदारचा एका छोट्याशा गावापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपटू बनण्याचा हाच प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत.

टाकळीभान ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश

कबड्डीपटू अस्लम इनामदार हा मूळचा अहिल्यानगरमधील टाकळीभान या गावचा. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. पण त्याला संघर्षही खूप करावा लागला. अस्लमनं स्वतः TEDx Talks मध्ये त्याच्या यशाचा प्रवास सांगितला तेव्हा याबाबत सांगितलं होतं.

अस्लमने कबड्डी खेळायला सुरुवात केल्यानंतर त्याला यश मिळवण्यासाठी वाट पाहावी लागली. भावाला खेळताना पाहिलं आणि त्याला कबड्डी बाबत आवड निर्माण झाली. त्यातून 2009-10 च्या दरम्यान त्यानं कबड्डी खेळायला सुरुवात केली.

त्याचा यातला रस वाढत गेला आणि हा खेळ त्याच्यासाठी पॅशन बनला. त्यामुळं यातच नाव करण्याची त्याची इच्छा दृढ होत गेली. त्यासाठी त्यानं स्वतःला सरावात झोकून दिलं.

त्यामुळंच सुरुवातीला फार काही सुविधा मिळाल्या नाही आणि आर्थिक समस्या असतानाही त्यानं खेळात मात्र खंड पडू दिला नाही. त्यामुळंच कबड्डीच्या व्यावसायिक लीगपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला तब्बल दशकभर वाट पाहावी लागली. पण एकदा संधी मिळाल्यानंतर त्यानं मागे वळूनही पाहिलं नाही.

अस्लम इनामदार

महाराष्ट्राच्या कर्णधारपदापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन मोठी पदकं मिळवण्यापर्यंत त्यानं मजल मारली.

अस्लमने भारतासाठी दोन सुवर्णपदकं जिंकली आहेत. तर महाराष्ट्रासाठी खेळताना त्याच्या नावावर सहा पदकं आहेत. त्यात तीन रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे.

त्याचबरोबर प्रो कबड्डी लीगमध्येही त्यानं चांगला नावलौकिक मिळवला. पुणेरी पलटन संघाला स्पर्धेमध्ये एक विजेतेपद मिळवून देण्यातही त्याचा मोठा वाटा होता.

आईने धुणी-भांडी करून वाढवलं

अस्लमनं त्याला कबड्डी खेळण्याची आणि संघर्षातही टिकून राहण्यासाठीची सर्वाधिक प्रेरणा त्याच्या आईकडून मिळाली असल्याचं तो सांगतो.

त्याच्या आणि कुटुंबाच्या संघर्षाबाबत बोलताना अस्लमनं म्हटलं की, “माझ्या कबड्डीच्या कारकि‍र्दीत माझ्या कुटुंबाचा संघर्ष खूप मोठा आहे. माझ्या वडिलांचं 2011 मध्ये निधन झालं. त्यानंतर माझ्या आईवर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आली होती.

“आम्ही पाच भावंडं होतो, स्वतःचं घर नव्हतं, स्वतःची शेती नव्हती आणि आमच्याकडे पैसेही नव्हते. त्या अत्यंत कठीण अशा परिस्थितीत आईने आम्हाला सांभाळलं.”

कुटुंबाचा उदरनिर्वाह चालण्यासाठी अस्लमची आई अनेक ठिकाणी धुण्या भांड्याचं काम करायची असं तो सांगतो.

अस्लम इनामदार

“मुलं उपाशी राहू नये यासाठी आईनं अनेक लोकांच्या घरामध्ये कामं केली. त्यावेळी परिस्थिती अशी होती की, महिन्याला अवघे 300 रुपये मिळायचे. आईसाठी तेही खूप होते. त्यासाठीही ती कायम झटत असायची. मी हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर पाहिलं आहे.

मग जर माझी आई एवढ्या कठीण परिस्थितीत सगळं करू शकते, तर मी आयुष्यात काही का करू शकत नाही? प्रश्न मला पडायचा. जगात कोणीही तुमच्यासाठी सगळं करून देणार नाही. काही मिळवायचं असेल तर स्वतःला मेहनत करावी लागेल, हे आईने आम्हाला शिकवलं,” असं तो सांगतो.

त्याच्या भावांनीही खूप कामं करून कुटुंबांना हातभार लावल्याचं त्यानं सांगितलं.

‘स्पर्धांसाठी रेल्वे सीटखाली झोपून प्रवास’

आईचा हा स्वभाव आणि शिकवण यामुळं अस्लमनंही मेहनत घ्यायला सुरुवात केली. कुटुंबाला हातभार लावता यावा म्हणून त्यानंही अनेक कामं केली.

अस्लम सांगतो की, त्यानंही चहाच्या हॉटेलमध्ये, ज्यूस सेंटरवर, इतरांच्या शेतामध्ये कामं केली. वेळप्रसंगी अगदी टॉयलेट स्वच्छ करण्यासारखी पडेल ती कामं केल्याचं अस्लमनं एका मुलाखतीत सांगितलं आहे.

कबड्डी खेळायला लागल्यानंतर अस्लम गावांमध्ये प्राईज मॅच खेळायचा. त्यानंतर 14 वर्षांचा असताना तो महाराष्ट्रभरात होणाऱ्या कबड्डीच्या स्पर्धांच्या शोधात राहायला लागला. त्यासाठी त्यानं तेव्हा महाराष्ट्रभर प्रवासही केला.

स्पर्धांसाठी वेगवेगळ्या शहरांत रेल्वेने जायला तिकिटाचे पैसे त्याच्याकडं नसायचे. त्यावेळी वेळप्रसंगी रेल्वेच्या सीटखाली झोपून गेल्याची आठवण त्यानं सांगितली.

अस्लम इनामदार

या स्पर्धांमध्ये खाण्यासाठी मिळणाऱ्या पदार्थांवर आणि कधी कधी एका वडापाव वर दिवस काढावे लागल्याचं तो सांगतो. कधी कधी तर उरलेलं अन्न असलं तर ते नंतर खाण्यासाठी म्हणून तो बॅगेतही भरून घ्यायचा.

भावाला पाहून सुरुवात आणि भावाकडूनच विरोध

कबड्डीमध्ये आजवर केलेला प्रवास आणि त्यातून मिळवलेल्या यशामध्ये भावाचा आणि इतर काही वरिष्ठ खेळाडूंचा वाटा असल्याचंही अस्लम आवर्जून सांगतो.

अस्लमचा मोठा भाऊ क्लबसाठी कबड्डी खेळत होता. बाहेर गेलं की लोक आपल्या भावाचं नाव कबड्डीपटू म्हणून आदरानं घेत असल्याचं त्याला जाणवलं. त्याचा भाऊ म्हणून ओळख मिळत होती.

जर या खेळामुळं आपल्या भावाचं आणि इतरांचं एवढं नाव होत असेल, आणि लोक ओळखत असतील तर आपणही या खेळामध्ये नाव कमवायला हवं असं अस्लमला वाटलं आणि त्याच्या कबड्डीची सुरुवात झाली.

पण असं असलं तरी नंतर अस्लमला त्याच्या भावानेच विरोध केला होता. त्याचं कारणही तसंच होतं. कबड्डीमुळं करिअरमध्ये आपल्याला फार काही मदत झाली नाही त्यामुळं अस्लमनं त्यावर फार लक्ष न देता अभ्यासात लक्ष द्यावं असं त्यांना वाटत होतं.

पण कदाचित नियतीलाही अस्लमनं कबड्डी खेळावं हेच वाटत असावं.

अस्लम इनामदार

“2011 मध्ये वडिलांचं निधन झाल्यानंतर अंदाजे सहा महिन्यांनी माझा भाऊ पोलिसात भरती झाला. त्यानंतर माझ्या कबड्डीच्या प्रवासाला वेगळी दिशा मिळाली. मला सरावाची संधी मिळू लागली. भाऊही हळूहळू पाठिंबा देऊ लागला. बाहेरून माझ्या खेळाचं कौतुक त्याला कळू लागलं होतं. त्यामुळं भावाचा माझ्यावरचा विश्वास वाढत गेला,” असं अस्लम सांगतो.

या सर्वामुळं अस्लमला पाठबळ मिळत गेलं आणि त्यानं मेहनत सुरू ठेवत एक एक पायरी चढायला सुरुवात केली.

ठाणे-करिअरचा टर्निंग पॉईंट

अस्लम कबड्डी खेळू लागला होता. गावामध्ये आजुबाजुच्या परिसरात त्याचं नाव होत होतं. पण त्याचं वर्तुळ मर्यादित होतं. या खेळाचं नेमकं मोठं रूप त्याला माहिती नव्हतं. गावात प्राईज मॅच असायच्या हीच मोठी कबड्डी असं तेव्हा वाटायचं.

पण कबड्डीतच पुढे काहीतरी करायचं असं ठरवून अस्लम ठाण्याला गेला आणि तो त्याच्या जीवनातला मोठा टर्निंग पॉइंट ठरला असं अस्लम आवर्जून सांगतो. ठाण्यात गेल्यानंतर त्याचा मित्र राजूने त्याला त्याच्या कुटुंबासोबत राहू दिलं.

अस्लम इनामदार

तिथं गेल्यावर कबड्डीचं एक वेगळं जग अस्लमला समजलं. गावात खेळताना कॉर्पोरेट संघांबद्दल फारसं काही माहिती नव्हतं. पण, ठाण्यात गेल्यावर एअर इंडिया, युनियन बँक यांसारख्या कॉर्पोरेट टीम असतात आणि वेगवेगळ्या भागातल्या खेळाडूंना त्या संधी देतात हेही त्याला समजलं.

“माझ्यासाठी तो खूप मोठा टर्निंग पॉइंट होता. अशा टीममध्ये खेळण्यासाठी पैसे मिळतात हे समजलं. त्यानंतर आपण गावापुरतं मर्यादित राहायचं नाही, पुढं जायचं असं मी ठरवलं,” असं अस्लम सांगतो.

दुखापतीमुळं अडथळा

कबड्डीतच करिअर करायचं हे ठरवल्यानंतर 2014 मध्ये एका दुखापतीमुळं अस्लमची दोन ते तीन वर्षे वाया गेली.

“माझ्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. त्यावेळी कुटुंबाची स्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळं उपचारासाठी पैसे नव्हते. म्हणून उपचार आणि शस्त्रक्रियेसाठीही अनेक अडचणी आल्या,” असं तो म्हणतो.

अस्लम इनामदार

पायाची शस्त्रक्रिया करण्यासाठी अस्लमला अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागले. शेवटी एका शासकीय योजनेच्या माध्यमातून पायाची शस्त्रक्रिया करून घेतल्याचं त्यानं सांगितलं.

2014 मध्ये सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेतील कबड्डीचे सामने त्यानं त्या दुखापतीत टीव्हीवरच पाहिले. पण मैदानापासून दूर असला तरी त्या काळात तो बरंच काही शिकला होता.

पण या सगळ्यावर मात करत तो ठामपणे पुढं जात राहिला. त्याचं मोठं फळ मिळालं कारण जीवनातला यशाचा मोठा टप्पा म्हणजे प्रो कबड्डी लीग त्याची वाट पाहत होतं.

प्रो कबड्डी लीग ते महाराष्ट्राचा कर्णधार

अस्लमनं जवळपास दहा वर्ष मेहनत केल्यानंतर अकराव्या वर्षी त्याला प्रो कबड्डी लीगची संधी मिळाली. या स्पर्धेच्या आठव्या हंगामात त्याचं पदार्पण झालं.

त्याच्यासाठी ही जीवनातली मोठी संधी ठरली होती. या पहिल्याच संधीत त्याची कामगिरीही अत्यंत खास झाली होती. पदार्पण केल्यानंतर पहिल्याच हंगामात त्यानं त्याच्या संघासाठी 190 गुण मिळवल्याचं त्यानं सांगितलं.

तिथून सुरू झालेला या व्यावसायिक स्पर्धेचा प्रवास सुरू असून अस्लम सध्या या स्पर्धेतील पुणेरी पलटन संघाचा कर्णधार आहे.

“या टीमचं मी सलग अनेक हंगामांपासून नेतृत्व करत आहे. वयाच्या 25 व्या वर्षी माझ्यावर ही जबाबदारी आली. एवढ्या कमी वयात सलग तीन-चार हंगाम नेतृत्व करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, सोबतच मोठी जबाबदारीही आहे,” असं तो सांगतो.

अस्लम इनामदार

स्पर्धेच्या दहाव्या हंगामात पुणेरी पलटननं अस्लमच्या नेतृत्वात संघाचं पहिलं विजेतेपद मिळवलं. शिवाय गेल्या वर्षीच्या 12 व्या हंगामातही संघ फायनलपर्यंत पोहोचला होता.

“कर्णधार म्हणून फक्त स्वतःचा खेळ करून चालत नाही. टीममधल्या खेळाडूंना सोबत घेऊन चालावं लागतं. त्यांचा माझ्यावर विश्वास असावा लागतो आणि माझाही त्यांच्यावर विश्वास असावा लागतो,” असं तो म्हणाला.

महाराष्ट्राचा कर्णधार बनल्यानंतर त्यानं कामगिरीचा आलेख चढता ठेवला असून त्यात प्रगती करत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अस्लमला 2023-24 साठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारानं गौरवण्यातही आलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC