Source :- BBC INDIA NEWS

तमाशा

फोटो स्रोत, अण्णासाहेब काळे

महाराष्ट्राला इथल्या संस्कृती-परंपरा, भौगोलिक स्थान आणि लोकांच्या अभिरुचीमुळे जेवढ्या लोककला लाभल्या आहेत, तेवढ्या देशातल्या कोणत्याही राज्यात खचितच असतील. अशा या लोककलांच्या मांदियाळीत विदर्भ आणि कोकणातला काही भाग वगळला तर सर्वदूर सादर केली जाणारी कला म्हणजे तमाशा.

तमाशाचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे प्रचंड म्हणावी अशी लोकप्रियता लाभलेल्या तमाशाचे नाव काढले की पांढरपेशा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडळींच्या चेहऱ्यावर पटकन आठ्या पडतात. जगभरात अशी दुसरी कोणतीही ‘शापित कला’ नसेल.

तमाशाचा उगम कसा झाला?

तमाशाचा उगम नेमका कधी झाला याबद्दल अनेकांनी लिहिले आहे. या सर्वांच्या मताचा सार काढला तर असे लक्षात येते की, शिवकाळात औरंगजेबाच्या फौजा मराठी मुलखात खूप मोठ्या कालावधीसाठी तळ ठोकून होत्या. बराच काळ आपल्या कुटुंबापासून दूर राहिलेल्या या शिपाईगड्यांना काहीतरी मनोरंजन हवे होते. त्यावेळी महार, मांग, डोंबारी, डवरी, गोंधळी ही मंडळी गायन-वादन क्षेत्रात निपुण होती.

या कलाकारांना बोलावून मुघल शिपाई गड्यांनी आपले मनोरंजन करायला सुरुवात केली. यातल्याच एखाद्या देखण्या तरुण मुलाला स्त्री वेश देऊन नाच करायला सांगितला. अतिशय विस्कळीत स्वरुपात सादर केल्या जाणाऱ्या या सादरीकरणाला या शिपाई गाड्यांनी ‘तमाशा’ हे नाव दिले. तमाशाच्या या मांडणीला काही अभ्यासकांनी छेद देऊन तमाशात त्यापूर्वी नाचे पोरं आली होती अशीही मांडणी केली आहे.

तमाशा अभ्यासक विश्वनाथ शिंदे यांच्या मतानुसार, तमाशाचे रूप सिद्ध होताना तमाशाने येथील अनेक नाट्यात्मक लोककला प्रकारांकडून अनेक गोष्टी स्वीकारल्या आहेत. गोंधळ, वाघ्या मुराळीचे जागरण, दशावतार अशा लोककलांकडून काही ना काही घेऊन त्यावर आपला ठसा उमटवला आणि तमाशाला अधिक रंजनप्रधान केले. त्यामुळे आपल्याकडील विविध विधीनाट्ये आणि तमाशा यांचा खूप नजीकचा संबंध आहे हे स्पष्ट होते.

तमाशाचा उगम नेमका कधी झाला याबद्दल अनेकांनी लिहिले आहे.

फोटो स्रोत, Dr. Santosh Khedlekar

मुघल शिपाईगड्यांच्या रंजनासाठी सुरु झालेल्या तमाशाने असंख्य स्थित्यंतरे बघितली आहेत. औरंगजेबाच्या निधनानंतर मुघल सैन्य पुन्हा आपल्या प्रांतात रवाना झाले, परंतु नाच्या पोरांचा तमाशा हळूहळू महाराष्ट्राच्या मातीत रुजायला लागला.

लोकांच्या मनोरंजनाच्या कल्पना इतक्या वेगवेगळ्या होत्या की त्यात तमाशासारखा ओबडधोबड कलाप्रकार रुजायला सुमारे पाऊणशे वर्षे जावी लागली. शिवकाळात तमाशाचा उदय झाला असला तरी पण त्याकाळातील तमाशा कलाकारांची किंवा लावणीकारांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. अपवाद फक्त जानकोजी नावाच्या लावणीकाराचा. यानंतर तंजावर येथे मध्वनाथ यांच्या काही लावण्या उपलब्ध झाल्या. या लावण्यांचा काळ इसवी सन 1765 च्या दरम्यानचा असावा, असे मानले जाते.

उत्तर पेशवाईत शाहिरांना राजाश्रय मिळायला लागला आणि शाहीर मंडळी पुणे शहराकडे आकृष्ट होऊ लागली. पेशवाईत राजाश्रय मिळालेल्या ज्या सहा शाहिरांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो त्यात ज्येष्ठत्वाचा मान असलेले संगमनेरचे शाहीर अनंत फंदी उर्फ अनंत घोलप (1744 ते 1819), संगमनेर जवळच्याच सध्याच्या नाशिक जिल्ह्यातील वावी या गावाचे शाहीर परशराम, पुण्याचे शाहीर होनाजी बाळा (होनाजी आणि बाळा हे दोन स्वतंत्र शाहीर होते), सोलापूरचे शाहीर राम जोशी, कोकणातल्या मुरुडचे शाहीर प्रभाकर उर्फ प्रभाकर जनार्दन दातार, जेजुरीचे शाहीर सगनभाऊ यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.

तमाशाचा विस्तार कसा झाला?

पुण्यात पेशवाईच्या काळात तमाशाबरोबरच लावणीला राजाश्रय होता. पुढे जाऊन लावणी ही तमाशाचा एक अभिन्न भाग झाली. याच काळात तमाशा आणि लावणी लोकाश्रयही मिळायला लागला होता. नानासाहेब पेशव्यांच्या काळात खास लावणी सादरीकरणासाठी ‘बावनखणी’ ही इमारत बांधण्यात आली. या बावनखणीची सुरुवात कशी झाली, याबाबतचा किस्साही मोठा रंजक आहे.

नानासाहेब पेशवे यांना आत्माराम राजाराम या अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्रात ‘साहेबी, जातेसमयी ताकीत केली की, खबरदार रहाणे, पोरींची निगा करणे. तालीम उत्तमप्रकारे करवीत जाणे. त्यानुसार त्यांसी खाणे जेवणे उत्तम प्रकारे करवीत जाणे व गावयाची तालीम उत्तम प्रकारे काशीबा पांच सात घटका देत आहेत. यावरून पुण्यात लावणी रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसून येते.

दादू इंदुरीकर यांच्या गाढवाच लग्न या लोकनाट्याचे दुर्मिळ छायाचित्र

फोटो स्रोत, Dr. Santosh Khedlekar

पण काही काळातच पेशवाई संपली आणि देशावर इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाले. मात्र तमाशा काही प्रमाणात समाजात रुजला असल्याने तो हळूहळू का होईना वाटचाल करीत होता. 1850 च्या सुमारास उमा बाबू सावळजकर यांनी ‘मोहना बटाव’ हे वगनाट्य सादर केले. तमाशातले हे पहिले वगनाट्य. शाहिरी कवने, लावण्या यांच्या जोडीला तमाशाला वगनाट्य मिळाले. त्याकाळचा विचार केला तर लोकांना एखादी विस्मयकारक गोष्ट ऐकायला मिळायची ती वर्षातून एखाददुसऱ्या वेळी गावात आलेल्या कीर्तनकार बुवांच्या आख्यानात.

तमाशात मात्र त्या त्या पात्रांची वेशभूषा करून कलाकार मंडळी अभिनय करून संवाद म्हणत असल्याने लोकांना ती घटना जणूकाही आपल्या डोळ्यासमोर घडते आहे असे वाटायचे. इथूनच खऱ्या अर्थाने तमाशा लोकाश्रयावर जगायला लागला, मात्र तरीही त्याची लोकप्रियता मर्यादित होती.

लावणी आणि तमाशा

1880 च्या दरम्यान मुंबईत कापड गिरण्यांचे जाळे विस्तारत होते. खेड्यापाड्यातून तरुण मंडळी पोटापाण्यासाठी मुंबईत जात होती. तोवर सिनेमाचा उदय झालेला नसल्याने मुंबईत तमाशा रुजायला लागला होता. याच काळात पठ्ठे बापूराव आणि भाऊ फक्कड या तमाशा सृष्टीतील गंधर्वांचे आगमन झाले. या दोघांचा काळ म्हणजे तमाशा आणि लावणीचा उत्कर्षाचा काळ म्हणता येईल. त्याकाळातील वाहतुकीच्या सोयी आणि रसिकांचा प्रतिसाद यावर लावणी तमाशाचे खेळ चालायचे. बापूराव आणि भाऊ फक्कड हे दोघेही स्वतः उत्तम कवी असल्याने त्यांनी पुन्हा एकदा तमाशाचे रुपडे बदलवून टाकले. सध्या जो तमाशा सादर होतोय त्याची मांडणी, बांधणी या दोघांनी करून दिल्याप्रमाणेच आहे.

संगमनेर तालुक्यातली पवळाबाई ही तमाशा सृष्टीतली पहिली महिला कलाकार. 1887 ते 1890 या दरम्यान पवळाचे तमाशा रंगभूमीवर आगमन झाले आणि मराठी मुलखात एकच खळबळ उडाली. तोवर तरुण मुले साडी नेसून तमाशात नृत्य करायची. एवढेच कशाला महाराष्ट्रात संगीत नाटक हा कलाप्रकार याच काळात लोकप्रिय होत होता, या नाटकातही तेव्हा आणि नंतरची अनेक वर्षे पुरुष मंडळीच स्त्रियांच्या भूमिका करायचे.

1880 च्या दरम्यान मुंबईत कापड गिरण्यांचे जाळे विस्तारत होते. खेड्यापाड्यातून तरुण मंडळी पोटापाण्यासाठी मुंबईत जात होती. तोवर सिनेमाचा उदय झालेला नसल्याने मुंबईत तमाशा रुजायला लागला होता.

फोटो स्रोत, अण्णासाहेब काळे

विसावे शतक सुरु झाले आणि तमाशाला सर्वार्थाने पूरक वातावरण मिळाले. मराठी मुलखात अनेक तमाशा फड उदयाला आले. कुणी बैलगाडीतून तर कुणी पायी प्रवास करून तमाशाचे खेळ सादर करायचे. इकडे मुंबईत मात्र तमाशासाठी अनेक थियेटर उभारले गेले. बांगडीवाला थियेटर, पिला हाऊस थियेटर, एलफिस्टन थियेटर, हनुमान थियेटर अशा ठिकाणी मुंबईतली चाकरमानी मंडळी तमाशाला गर्दी करू लागली. यानंतर 1913 मध्ये भारतात मूकपट आल्यावर आणि त्यानंतर 1932 मध्ये बोलपट आल्यावर ‘आता तमाशा संपणार’ अशा चर्चा रंगल्या. मात्र, या सगळ्या चर्चा हवेत विरून गेला. पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, शिवा संभा कवलापुरकर, अर्जुन वाघोलीकर, हरिभाऊ वडगावकर, दगडोबा साळी, भाऊ मांग नारायणगावकर, शंकरराव अवसरीकर, बाबुराव मोकाशी या आणि अशा अनेक तमासगिरांनी तमाशाचा स्वतंत्र रसिकवर्ग तयार केला. महत्वाचे म्हणजे तत्कालीन तमाशाचे स्वरूप बघितले तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, त्यावेळी तमाशाच्या जडणघडणीत विविध जातीधर्माच्या लोकांचे योगदान होते.

1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारतात तमाशाला चांगले दिवस येतील, असे वाटत असतानाच 1948 मध्ये तमाशावर अश्लीलतेचा आरोप करून तात्कालीन सरकारने तमाशावर बंदी आणली. मात्र त्यावेळी समाजात मोठा मानसन्मान असलेली व तमाशावर मनापासून प्रेम करणारी काही मंडळी तमाशाच्या मदतीला धावून आली. आबासाहेब मुजुमदार, बापूसाहेब जिंतीकर, पोपटलाल शहा, अहमदशेठ तांबे आदींनी प्रयत्न करून ही बंदी उठवली आणि पुन्हा एकदा तमाशा जोमाने सुरु झाला. तुकाराम खेडकर, दत्तोबा तांबे, दादू इंदुरीकर, माधवराव नगरकर आदी मंडळींनी स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात तमाशा लोकप्रिय केला.

बदलत्या काळानुसार बदलता तमाशा

स्वातंत्र्योत्तर काळात तमाशात अनेक बदल झाले. तमाशात पहिल्यांदा गाड्या आल्या, तमाशाला सर्कसप्रमाणे तंबू आले, ध्वनी व्यवस्थेसाठी ध्वनिक्षेपक वापरले जाऊ लागले. खेड्यापाड्यात पारावर किंवा चावडीच्या ओट्यावर होणारा तमाशा तंबूत सादर होऊ लागला. सिनेमामुळे प्रेक्षकांच्या तामाशाकडूनही अपेक्षा उंचावल्या होत्या. पारंपरिक लावण्या, पोवाडे इतर कवनांबरोबर लोक सिनेमातल्या गाण्यांची मागणी करू लागले.

मुळात तमाशा उदयाला आला तो प्रेक्षकांच्या मागणीवरून आणि प्रत्येक काळात तो काळाप्रमाणे बदलला आहे. आज तीन दशकाहून अधिक काळापासून तमाशा लोकप्रिय का आहे, याचा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येईल की तमाशा ही अतिशय लवचिक लोककला आहे. काळानुसार प्रेक्षकांची अभिरुची जाणून घेऊन तमाशा बदलत गेला त्यामुळेच आज त्याचे अस्तित्व टिकून आहे. अनेकजण तमाशावर आक्षेप घेताना तो प्रेक्षकशरण झाला, असा आरोप करतात. हा आरोप काही अंशी सत्य असला तरी मुळात तमाशा ही कला लोकाश्रयावर अवलंबून असलेली कला आहे. लोक जर तमाशाला आले तरच तमासगिराचे पोट भरणार आहे. त्यामुळे, प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार तमाशा बदलत गेला हेही आपण समजून घेतले पाहिजे.

अनेकजण तमाशावर आक्षेप घेताना तो प्रेक्षकशरण झाला, असा आरोप करतात. हा आरोप काही अंशी सत्य असला तरी मुळात तमाशा ही कला लोकाश्रयावर अवलंबून असलेली कला आहे.

फोटो स्रोत, अण्णासाहेब काळे

तमाशाचा प्रभाव इतका की 1960 ते 1980 च्या दशकापर्यंत ग्रामीण भागात सिनेमा लोकप्रिय झाला तो तमाशापट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिनेमांमुळे. अर्थात तमाशापट म्हणवल्या जाणाऱ्या आजवरच्या सर्व सिनेमात फक्त लावणी वगळली तर तमाशातले काहीच नाही. तमाशापट म्हणवल्या जाणाऱ्या बहुतांशी सिनेमात तमाशा विद्रूपच केला गेला आहे. तमाशात कधीच नसलेला गोंड्याची टोपी घालून बायकी हेल काढून बोलणारा नाच्या हा सिनेमावाल्यांचा जावईशोध आहे. अशा नाच्या तमाशाच्या इतिहासात कधीही नव्हता आणि आजही नाही.

स्वातंत्र्योत्तर काळात तमाशाची मुख्य ओळख होती ‘वगनाट्य.’ या काळात धार्मिक, ऐतिहासिक, रजवाडी, सामाजिक वगनाट्यांनी महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले. रात्री नऊ साडेनऊला सुरु होणारा तमाशा तांबडे फुटेपर्यंत रंगायचा. वर्षभर शेतात राबणारा शेतकरी, कष्टकरी वर्ग गावाच्या यात्रेत यायचा तेव्हा खळखळून हसायचा, तमाशाला दाद द्यायचा. तमाशाची ही उर्जा त्याला पुढे वर्षभर पुरायची. हा काळ म्हणजे तमाशातली सरदार ही परंपरा दृढ करणारा काळ होता. तमाशा ही अशी कला आहे की, तमाशाच्या बोर्डावर ज्याचे नाव आहे ती व्यक्ती प्रेक्षकांना स्टेजवर हवी असते. हे तमाशा फडमालक म्हणजे याकाळातले दिग्गज सरदार. ज्यांना तमाशात अभिनय, गायन, वादन, दिग्दर्शन अशी सर्व कामे येतात ती मंडळी सरदार म्हणून ओळखली जाते. बहुतांशी सरदार हे तमाशाचे मालक असायचे. माधवराव नगरकर, तुकाराम खेडकर, दत्तोबा तांबे, दादू इंदुरीकर, दत्ता महाडिक, गुलाबराव बोरगावकर, साहेबराव नांदवळकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, शिवराम बोरगावकर, भिका – भीमा आदींनी तमाशात सरदार म्हणून मोठा लौकिक मिळवला.

तमाशाची विस्कटलेली आर्थिक घडी

1980 नंतर महाराष्ट्रात दुरचित्रवाणीचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढायला लागले, कृष्णधवल सिनेमे मागे पडून सिनेमा रंगीत झाला होता, ऑर्केस्ट्रा नावाचा कलाप्रकार सर्वत्र लोकप्रिय होऊ लागला होता. गावोगाव टुरिंग टॉकीज सुरु झाल्या होत्या, खेड्यापाड्यात सहकारी साखर कारखान्यांच्या गणेशोत्सवात पुण्या मुंबईची नाटके आणि ऑर्केस्ट्रा दाखवले जात होते. याच काळात तमाशा रसिकांच्या अपेक्षा वाढल्या. त्यांना तमाशात सिनेमा, नाटक, ऑर्केस्ट्रा असे सगळे काही असावे असे वाटायला लागले.

हीच गोष्ट त्यावेळी रघुवीर खेडकर यांनी हेरली. आपला पारंपरिक बाज कायम ठेऊन प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीला स्वीकारणे ही काळाची गरज होती. मुळात तमाशा ही लवचिक कला. तमाशाने हा बदल पटकन टीपला. तमाशात रंगीबेरंगी लाईट्सच्या प्रकाशात आधुनिक वाद्यांच्या साथीने गाणी सादर होऊ लागली.

तमाशा

फोटो स्रोत, अण्णासाहेब काळे

रंगीबेरंगी कपड्यात सिनेमातल्या हिरो-हिरोईनप्रमाणे तमाशातले कलाकार नाचू लागले. हा बदल एवढ्यापुरता मर्यादित नव्हता. लोकांना वगनाट्यात तेच तेच पारंपरिक वग नकोसे वाटू लागले. सिनेमात ज्याप्रमाणे प्रासंगिक विषय हाताळले जात होते तसे तमाशातही घडायला लागले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर ‘जन्माला ये इंदिरा पुन्हा’ हा व याच विषयावरील इतर वग प्रचंड गाजले. मानवत हत्याकांड, राजीव गांधी यांची हत्या, नागपूरच्या गुंड अक्कू यादव याची माहिलांच्या जमावाने केलेली हत्या असे विषय तमाशात प्रचंड गाजले.

तमाशाचे हे बदले स्वरूप प्रेक्षकांना आपलेसे करीत होते. मात्र, दुसरीकडे तमाशाची तमाशाची आर्थिक घडी विस्कटायला सुरुवात झाली. पूर्वी तमाशात काम करणे हे मोठेपणाचे लक्षण मानून अनेक युवक सुरुवातीला बिगारी म्हणून तमाशात कामाला यायचे. त्यातल्या ज्यांच्याकडे योग्यता असायची ते पुढे नावलौकिकही मिळवायचे. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या ठिकाणी औद्योगिक वासाहती उभ्या रहात होत्या. सिंचनाच्या सोयी वाढल्याने शेती आणि दुग्ध व्यवसाय बहरत होता. गावोगाव रोजगाराच्या संधी निर्माण होत होत्या यामुळे गाव सोडून तमाशाबरोबर वर्षातले आठ महिने फिरायला तरुण मंडळी अनुत्सुक होती. याचा तमाशावर मोठा परिणाम व्हायला लागला. सध्या तर अनेक तमाशात बिगारी काम करायला एकही महाराष्ट्रीय माणूस नाहीये. उत्तर प्रदेशातून काही तरुण तमाशा सिझनच्या काळात आठ नऊ महिने महाराष्ट्रात येतात आणि काम करतात.

तमाशाची सद्यस्थिती काय आहे?

सध्या कलाकार म्हणून जी मंडळी तमाशात येत आहे त्यांच्या अपेक्षा वाढल्या वाढल्या. कलाकारांना त्यांच्या पगारच्या चार सहा महिन्यांचा पगार उचल म्हणून द्यावा लागतोय. ही रक्कम फडमालक खासगी सावकाराकडून उचल घेऊन पुढे कलाकारांना बिनव्याजी देत आहेत, दुसरीकडे तमाशातल्या गाड्यांची संख्या प्रतिष्ठेची मानली जाऊ लागल्याने प्रत्येक तमाशाकडे किमान चार ट्रक आणि दोन लग्झरी बसेस आवश्यक मानल्या जाऊ लागल्या आहेत. कधीकाळी एका तमाशा फडात चार सहा नृत्यांगना असायच्या पण आता तमाशा ठरवायला आलेली यात्रा कमिटीची मंडळी तमाशात किती ‘बाया’ आहेत यावर सुपारीचा दर ठरवू लागले आहेत. चार सहा नृत्यांगानांची जागा आता पंचवीस तीस नृत्यांगनांनी घेतली आहे. अतिशय अल्पशिक्षित असलेली तमाशा फडमालक मंडळी खासगी सावकारांकडून उचलमागे उचल उचलीत गेली आणि इथेच घात झाला.

तमाशा

फोटो स्रोत, अण्णासाहेब काळे

कधीकाळी महाराष्ट्रात 25-30 तमाशा फड वर्षातले सुमारे सव्वादोनशे दिवस तमाशाचा दौरा करायचे. आज 2026 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तंबू घेऊन वर्षातले सव्वादोनशे दिवस तमाशाचा दौरा करणारे अवघे आठ फड शिल्लक आहेत. याखेरीज तंबू न घेता व तिकीट न लावता केवळ ठराविक सुपारी घेऊन फक्त यात्रा काळात उघड्यावर तमाशे करणारे सुमारे सव्वाशे फड आहेत. काही वर्षांपूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सर्वत्र रात्री दहानंतर ध्वनिक्षेपक लावण्यावर बंदी आल्यानंतर तर तमाशाची अवस्था आणखी बिकट झाली आले. मुळात तमाशा हा रात्री जेवणखाण झाल्यावर निवांतपणे तब्येतशीर आनंद घ्यायचा लोककला प्रकार. परंतु, या आदेशामुळे तमाशाचे कंबरडेच मोडले आहे.

तमाशा एका अवघड वळणावर उभा

सुमारे तीनशे वर्षाहून अधिक काळापासून महाराष्ट्राचे रंजन करणारा तमाशा आज एका अवघड वळणावर उभा आहे. यापूर्वीही तमाशावर अनेक संकटे आली होती पण तेव्हा तमाशाने त्यावर मात करून आपली घोडदौड चालू ठेवली होती. दरम्यानच्या काळात अनंत फंदी, पठ्ठे बापूराव, तुकाराम खेडकर अशा काही मंडळींनी तमाशाला नवी दिशा देण्याचे काम केले. या सर्व गोष्टींचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की तमाशा काळानुरूप बदलत गेला आणि त्या त्या काळातील वातावरण, प्रेक्षकांची अभिरुची यांचा करून तत्कालीन तमासगीरांनी त्यात बदल केले म्हणून तमाशा टिकून राहिला आहे. कदाचित येणाऱ्या काळातही तमाशाला पुन्हा एकदा असा ‘मसीहा’ लाभेल…

गुलाबबाई संगमनेरकर, कांताबाई सातारकर आणि रघुवीर खेडकर

फोटो स्रोत, अण्णासाहेब काळे

आज रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यातून महाराष्ट्राच्या गाव गाड्यातील सगळ्याच लोक कलाकारांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. तमाशा रसिकांनी तर या पुरस्काराचे अतिशय उत्स्फुर्तपणे स्वागत केले आहे. ज्यांनी कधीच तमाशा बघितला नाही असे लोकही कुजबुजत का होईना तमाशाबद्दल जाणून घेताना दिसत आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून तमाशाला येणाऱ्या काळात अधिक व्यापक लोकाश्रय आणि तितकाच व्यापक राजाश्रय लाभेल असे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. यातून तमाशा पुन्हा एकदा या असंख्य संकटाच्या राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे यशोशिखराकडे झेप घेईल अशी आशा बाळगू या.

(लेखक तमाशा या विषयाचे अभ्यासक असून, महाराष्ट्र शासनाच्या तमाशासाठीच्या राज्य पुरस्कार समितीचे माजी समिती सदस्य व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी सदस्य आहेत.)

या लेखासाठी लेखकानं खालील संदर्भ वापरले :

  • मराठी लावणी वाङ्मय – डॉ. गंगाधर मोरजे
  • शाहिरी वाङ्मयाच्या धारा – विश्वनाथ शिंदे
  • अनंत फंदी यांच्या कविता व लावण्या – डॉ. मधुकर काशीनाथ मोंढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC