Home LATEST NEWS ताजी बातमी जिनांच्या आजाराचं गुपित कळलं असतं, तर पाकिस्तान तयार झाला नसता? जिना आणि...

जिनांच्या आजाराचं गुपित कळलं असतं, तर पाकिस्तान तयार झाला नसता? जिना आणि दोन भारतीय डॉक्टरांचं कनेक्शन

6
0

Source :- BBC INDIA NEWS

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना

फोटो स्रोत, Getty Images

पिंग-पाँगच्या बॉलपेक्षा काहीसे मोठे दोन काळे गोलाकार डाग, त्यांच्याभोवती तयार झालेलं पांढरं वर्तुळ आणि फुफ्फुसांवर पसरलेले पांढऱ्या डागांचे गुच्छ हे दाखवत होते की क्षयरोगाने (टीबी) फुफ्फुसांना हळूहळू पोखरून काढलं होतं.

हा पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या फुफ्फुसांचा एक्स-रे होता.

लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांनी त्यांच्या ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’ या पुस्तकात लिहिलं आहे की, “जून 1946 मध्ये मुंबईतील डॉ. जल रतनजी पटेल आणि रेडिओलॉजिस्ट डॉ. जल डीबू यांनी हा एक्स-रे पाहूनच लक्षात आणलं होतं की आजार इतका बळावला आहे की जिना कदाचित आणखी एक किंवा दोन वर्षेच जगू शकतील. मात्र, जिना यांच्या विनंतीवरून दोन्ही डॉक्टरांनी हा अहवाल स्वतःपुरताच मर्यादित ठेवला.”

पाकिस्तानच्या स्थापनेनंतर 79 वर्षांनी, या दोन्ही पारशी डॉक्टरांना त्यांच्या त्यांनी हे ‘गुपित ठेवून असामान्य काम केल्यामुळे’ पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘निशान-ए-कायद-ए-आझम’ देण्यासाठी नामांकित करण्यात आलं आहे.

पाकिस्तानचे नियोजनमंत्री आणि पुरस्कार समितीचे अध्यक्ष अहसन इक्बाल यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिलं, “हे असं गुपित होतं, ज्याची गणना अनेक इतिहासकार विसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या आणि इतिहासाची दिशा बदलणाऱ्या रहस्यांमध्ये करतात.”

“जिनांच्या आजाराची माहिती त्यांच्या राजकीय विरोधकांना आणि ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना झाली असती, तर कदाचित भारताची फाळणी टळली असती आणि पाकिस्तानच्या निर्मितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं.”

जिनांची बिघडत चाललेली प्रकृती

जिनांची ढासळत चाललेली प्रकृती आणि त्यांच्या शरीरावर पडणारा प्रचंड ताण जगाच्या नजरेपासून लपून राहिला होता.

अकबर अहमद यांनी त्यांच्या ‘जिना, पाकिस्तान अँड इस्लामिक आयडेंटिटी: द सर्च फॉर सलादीन’ या पुस्तकात लिहिलं आहे, “जिनांचा उत्तम पेहराव आणि त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांची शारीरिक प्रकृती चांगली नसल्याचं वास्तव लपून राहिलं होतं.”

“1938 पासून ते त्यांच्या मज्जासंस्थेवर आणि शारीरिक ताकदीवर पडणाऱ्या ताणाबद्दल सातत्याने तक्रार करत होते. त्यानंतर ते वारंवार आजारी पडू लागले. मात्र त्यांचा आजार गुप्त ठेवण्यात आला.”

लेखक हेक्टर बोलिथो यांनी मे 1952 मध्ये मुंबईत डॉ. पटेल यांची भेट घेतली. हेक्टर बोलिथो यांनी त्यांच्या ‘जिना: क्रिएटर ऑफ पाकिस्तान’ या पुस्तकात लिहिलं आहे की, डॉ. पटेल यांनी त्यांना सांगितलं होतं की सप्टेंबर 1944 मध्ये त्यांनी जिनांची तपासणी केली, तेव्हा त्यांचा रक्तदाब जवळपास 90 होता.

'जिना: क्रिएटर ऑफ पाकिस्तान'

फोटो स्रोत, OUP

डॉ. पटेल यांनी सांगितलं होतं, “त्यावेळी ते पूर्ण समर्पणाने काम करत होते, मात्र ते खूप कृश आणि अशक्त झाले होते. त्यांनी छातीत दुखत असल्याची आणि खोकल्याचीही तक्रार केली होती. त्यांच्या फुफ्फुसांच्या खालच्या भागात न्यूमोनिया पूर्णपणे बरा झालेला नसल्याचे संकेत दिसत होते.”

“मी त्यांना कॅल्शियमची इंजेक्शन्स, ताकद वाढवणारी औषधं आणि शॉर्ट-वेव्ह डायाथर्मी उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यांचा खोकला थांबला आणि विश्रांतीसाठी ते डोंगराळ भागात गेले. ते परत आले तेव्हा त्यांचं वजन 18 पाउंडने वाढलं होतं. ही बातमी वर्तमानपत्रांमध्ये छापून आली आणि त्यासोबत माझं नावही प्रसिद्ध झालं.”

“मी मिस्टर जिनांकडे गेलो आणि कोणीतरी मूर्खपणा करून ही बातमी वर्तमानपत्रापर्यंत पोहोचवल्याचं सांगितलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं, ‘तो मूर्ख मीच होतो.’ शेवटी, ज्याने माझी इतकी चांगली सेवा केली, त्या व्यक्तीचे मी आभार का मानू नयेत?”

आजार बळावत चालला होता

अकबर अहमद यांच्या मते, 1945 च्या पहिल्या सहा महिन्यांतही जिना बहुतांश काळ आजारी होते.

त्याच वर्षी इस्फहानी संग्रहात समाविष्ट असलेल्या 9 ऑक्टोबरच्या एका पत्रात त्यांनी कबूल केलं होतं, “ताण इतका जास्त आहे की तो मी कसाबसा सहन करू शकतो.”

“त्यांचे डॉक्टर, डॉ. जल पटेल आणि डॉ. दिनशॉ मेहता यांनी त्यांना विश्रांती घेण्यासाठी, प्रकृती सुधारण्यासाठी आणि कामाचा वेग काहीसा कमी करण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानसाठीचा संघर्ष सुरू झाला होता आणि जिनांकडे असलेला वेळ झपाट्याने कमी होत चालला होता.”

लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांनी लिहिलं आहे की, जिना आयुष्यभर त्यांच्या कमकुवत फुफ्फुसांमुळे नाजूक प्रकृतीशी झुंजत राहिले.

“मे 1946 च्या अखेरच्या दिवसांत शिमल्यात मुस्लिम लीगचे हे नेते पुन्हा एकदा ब्रॉन्कायटिसच्या विळख्यात सापडले. जिनांची विश्वासू बहीण फातिमा त्यांना रेल्वेने मुंबईला घेऊन आल्या. मात्र प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती आणखी खालावली. फातिमांनी तातडीने डॉ. पटेल यांना बोलावून घेतलं. त्यांच्या रुग्णाची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचं डॉ. पटेल यांच्या लगेच लक्षात आलं.”

मोहम्मद अली जिना एका संचलनात

फोटो स्रोत, Keystone/Getty Images

1970 च्या दशकाच्या सुरुवातीला लॅरी आणि डॉमिनिक त्यांच्या पुस्तकासाठी संशोधन करत असताना डॉ. पटेल यांनी त्यांना जिनांच्या उपचारांची गोपनीय फाइल दाखवली. त्यावर केवळ ‘एम.ए. जिना’ असं लिहिलं होतं.

तोपर्यंत जिनांचा एक्स-रे करणारे रेडिओलॉजिस्ट डॉ. जल डीबू यांचं निधन झालं होतं. त्यामुळे लॅरी यांनी त्यांची मुलगी होमी यांच्याशी संपर्क साधला. होमी यांनी त्यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये काम केलं होतं. त्यांनीही डॉ. पटेल यांनी दिलेल्या माहितीसारखीच माहिती दिली.

पटेल आणि डीबू यांचा निष्कर्ष होता की, आजार अशा टप्प्यावर पोहोचला होता, जिथे त्यावर उपचार करणं शक्य नव्हतं.

1975 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’ या पुस्तकातून लॅरी आणि डॉमिनिक यांनी पहिल्यांदाच हे गुपित जगासमोर आणलं.

पुस्तकानुसार, डॉ. पटेल यांनी जिनांना इशारा दिला होता की, मुंबई रेल्वे स्थानकावर स्वागतासाठी जमलेल्या गर्दीचा सामना करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तर ते बेशुद्ध होऊन कोसळू शकतात.

“त्यामुळे पटेल यांनी त्यांना आधीच ट्रेनमधून उतरवून रुग्णालयात नेलं. तिथेच पटेल यांना त्या गुपिताचा उलगडा झाला, जे पुढे भारतातील सर्वाधिक सुरक्षित गुपित बनलं.”

पाकिस्तानची निर्मिती होईपर्यंत जिनांची प्रकृती खूपच खालावली होती.

फोटो स्रोत, Douglas Miller/Keystone/Getty Images)

डॉ. पटेल यांच्या म्हणण्यानुसार, “त्यांनी जिनांना सांगितलं की त्यांची शारीरिक ताकद आपल्या अंतिम मर्यादेच्या जवळ पोहोचली आहे. त्यांनी आपल्या कामाचा ताण मोठ्या प्रमाणात कमी केला नाही, अधिक विश्रांती घेतली नाही, सिगारेट सोडली नाही आणि शरीरावर पडणारा ताण कमी केला नाही, तर त्यांच्याकडे आयुष्यातील आणखी एक किंवा दोन वर्षांपेक्षा अधिक काळ उरलेला नाही.”

पटेल यांच्या मते, “ही कटू बातमी ऐकूनही जिनांच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना उमटली नाही. त्यांच्या पिवळसर चेहऱ्यावर किंचितही हालचाल झाली नाही. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, एखाद्या सॅनेटोरियमच्या बिछान्यावर पडून राहण्यासाठी आपल्या आयुष्याचा संघर्ष सोडून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

“कबरेशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना त्यांनी आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट बनवलेल्या कामापासून दूर करू शकत नव्हती. म्हणजेच इतिहासाच्या या नाजूक वळणावर भारतातील मुस्लिमांचं नेतृत्व करणं.”

“आपल्या विरोधकांना आपण मृत्यूच्या जवळ पोहोचलो आहोत, हे समजलं तर आपली संपूर्ण राजकीय रणनीती बदलू शकते, याची जिनांना जाणीव होती. ते कदाचित जिनांच्या मृत्यूची वाट पाहू लागले असते आणि त्यानंतर मुस्लिम लीगच्या नेतृत्वात असलेल्या, त्यांच्यापेक्षा अधिक ‘लवचिक’ लोकांच्या माध्यमातून आपलं स्वप्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असता.”

‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’मध्ये लिहिलं आहे की, दर दोन आठवड्यांनी डॉ. पटेल जिनांना गुप्तपणे काही इंजेक्शन्स देत असत. त्यामुळे त्यांना थोडी ताकद मिळायची आणि जिना पुन्हा कामाला लागायचे.

“त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन करण्याचा कोणताही गंभीर प्रयत्न केला नाही. असामान्य धैर्य आणि दृढनिश्चयाच्या जोरावर जिना आपल्या आयुष्याच्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करत राहिले.”

अकबर अहमद यांच्या मते, पाकिस्तानची निर्मिती होईपर्यंत जिनांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला होता.

“ते क्षयरोगाने (टीबी) ग्रस्त होते. त्यांची अतिशय जास्त धूम्रपान करण्याची सवय ज्यात ते त्यांच्या आवडत्या ‘क्रेव्हन ए’ ब्रँडच्या दररोज सुमारे 50 सिगारेट्स ओढत आणि सततचा प्रचंड व्यस्तपणा यांचाही त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला होता.”

31 जुलै 1947 रोजी, पाकिस्तानच्या स्थापनेच्या काही आठवडे आधी, जिना मुंबईतील आराम बाग कब्रस्तानात त्यांच्या पत्नी रतनबाई (रत्ती) यांच्या कबरीवर गेले. कदाचित आपण पुन्हा कधीही मुंबईत येऊ शकणार नाही, याची त्यांना जाणीव होती.

पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर जिना पुन्हा एकदा व्यस्त झाले. मात्र, त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि कामाच्या पद्धतीत काही सुधारणा नक्कीच झाली.

‘मी खूप थकलो आहे’

हेक्टर बोलिथो यांनी लिहिलं आहे की, फेब्रुवारी 1948 च्या सुरुवातीला पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे जुने पारशी मित्र जमशेद नसरवानजी एके दिवशी कराचीच्या गव्हर्नमेंट हाऊसच्या बागेत त्यांना शोधत असताना एका बाकापर्यंत पोहोचले. तिथे जिना अर्धवट झोपेच्या अवस्थेत बसले होते.

जिनांनी डोळे उघडले आणि म्हटलं, “मी खूप थकलो आहे, जमशेद, खूप थकलो आहे.”

बोलिथो यांच्या मते, पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी जिना नेहमी इतके व्यस्त असायचे की अशा प्रकारे बाहेर बसून डुलकी घेण्याची कल्पनाही त्यांच्यासाठी अशक्य होती.

“पण आता ते कधीकधी बागेत बसून काही क्षण शांतपणे विचार करत राहायचे आणि नंतर थोड्या वेळासाठी झोपून जायचे. कधी बागेत फेरफटका मारताना खाली वाकून एखादं फूल तोडायचे आणि ते आपल्या कोटावर लावायचे.”

मोहम्मद अली जिना त्यांच्या बहीण फातिमा जिना यांच्यासोबत.

फोटो स्रोत, Getty Images

बोलिथो यांच्या मते, त्याच फेब्रुवारी महिन्यात एका सकाळी ‘द स्टेट्समन’चे माजी संपादक इयान स्टीफन्स जिनांची भेट घेण्यासाठी गेले.

त्यांनी नंतर लिहिलं, “त्यावेळी पाकिस्तानचे निर्माते मृत्यूच्या दिशेने वाटचाल करत आहेत, याची कोणालाही जाणीव नव्हती. त्यांच्या फुफ्फुसांवर क्षयरोगाचा गंभीर परिणाम झाला होता. याची कोणालाही माहिती नव्हती आणि काही महिन्यांनंतर याच आजाराने त्यांचा जीव घेतला.”

भेटीच्या शेवटी जिना म्हणाले, “लोक म्हणतात की मी आजारी होतो. मी आजारी नव्हतो. मला फक्त थकवा जाणवतो. मी आता तरुण नाही, माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत… त्यामुळे जेव्हा मी थकतो, तेव्हा विश्रांती घेतो. मी माझ्या डॉक्टरांना निघून जायला सांगतो. त्यांनी माझ्याभोवती विनाकारण घुटमळत राहावं, असं मला वाटत नाही.”

बोलिथो यांच्या मते, साडेतीन वर्षांपूर्वी मुंबईतील डॉक्टरांनी दिलेली चिंताजनक माहिती जिनांनी आपल्या मनात एक गुपित म्हणून जपून ठेवली होती.

जुलै 1948 पर्यंत जिनांचा फुफ्फुसांचा जुना आजार आणखी गंभीर झाला होता. त्यामुळे त्यांना बलुचिस्तानमधील दुर्गम पर्वतीय ठिकाण असलेल्या झियारत येथे नेण्यात आलं. तिथली हवा तुलनेने विरळ होती. मात्र झियारतमध्येही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

जिनांचे डॉक्टर इलाही बख्श यांनी त्यांच्या रक्ताच्या तपासण्यांचा आणि छातीच्या एक्स-रेचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर असा निष्कर्ष काढला की, जिनांचा जुना फुफ्फुसांचा आजार अशा टप्प्यावर पोहोचला होता, ज्यावर कोणताही उपचार शक्य नव्हता.

बहुधा याच काळात जिनांचे काही मित्र त्यांच्या उपचारासाठी प्रयत्न करत होते.

अनोळखी फोन कॉल

डॉक्टर आणि लेखक डॉ. फ्रँक रायन यांनी त्यांच्या ‘ट्युबरक्युलोसिस: द ग्रेटेस्ट स्टोरी नेव्हर टोल्ड’ या पुस्तकात लिहिलं आहे, “मला वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी दूतावासातून काही रहस्यमय फोन कॉल आले. त्यात मला तातडीने कराची, पाकिस्तानला यावं लागेल, असं सांगण्यात आलं. मात्र ज्या व्यक्तीची तपासणी करायची होती, तिचं नाव किंवा आजार याबद्दल मला काहीही सांगण्यात आलं नाही.”

“या प्रकरणाचं स्वरूप जाणून घेण्याचे आणि समजून घेण्याचे माझे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. काही दिवसांनी मला फोन आला की, आता माझ्या सेवांची आवश्यकता नाही, कारण रुग्णाचा मृत्यू झाला आहे.”

फ्रँक रायन यांनी लिहिलं आहे की, दोन-तीन वर्षांनी ते सॅन फ्रान्सिस्कोला गेल्यानंतर एक डॉक्टर त्यांना भेटायला आले.

“या फोन कॉल्समागे तेच होते आणि तो रुग्ण दुसरा-तिसरा कोणी नसून जिना होते, असं त्यांनी मला सांगितलं. ते जिनांचे वैयक्तिक डॉक्टर राहिले होते. आता या सगळ्या प्रकरणात गोपनीयता का ठेवण्यात आली होती, हेही स्पष्ट झालं. काही वर्षांपूर्वी पास्चर इन्स्टिट्यूटमध्ये माझं व्याख्यान ऐकणाऱ्या आणि माझे काही प्रकाशित लेख वाचलेल्या त्या डॉक्टरांनी माझ्याशी संपर्क साधला होता.”

“मोहम्मद अली जिना यांना फुफ्फुसांचा जुना क्षयरोग (टीबी) झाला होता. त्यावर पहिल्यांदा त्यांचे डॉक्टर डॉ. पटेल यांनी जून 1946 मध्ये उपचार केले होते.”

महत्त्वाचं गुपित

‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’मध्ये लिहिलं आहे की, एप्रिल 1947 मध्ये लॉर्ड लुई माउंटबॅटन, जवाहरलाल नेहरू किंवा मोहनदास गांधी यांना या असाधारण गुपिताची माहिती असती, तर कदाचित भारताची फाळणी टाळता आली असती.

“आपल्या मुस्लिम बांधवांसाठी स्वतंत्र राष्ट्र मिळवून देण्याच्या निर्धारावर जिना इतके ठाम होते की, त्यांनी अखेरच्या व्हाइसरॉयला हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं.”

डॉमिनिक यांनी नंतर सांगितलं की, जेव्हा त्यांनी हे गुपित लॉर्ड माउंटबॅटन यांच्यासमोर उघड केलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यावेळी जिनांच्या आजाराची गंभीरता आपल्याला माहीत असती, तर कदाचित पाकिस्तान अस्तित्वातच आलं नसतं, असं त्यांचं मत होतं.

“मला त्यावेळी हे सगळं माहीत असतं, तर इतिहासाची दिशा वेगळी असती. मी स्वातंत्र्य देण्याचा निर्णय अनेक महिन्यांसाठी पुढे ढकलला असता. पाकिस्तान अस्तित्वात आलं नसतं.”

“ते म्हणाले, ‘माझा विश्वासच बसत नाही!’ त्यानंतर मोठं आश्चर्य व्यक्त करत ‘ओह गॉड!’ असं म्हणत ते धापा टाकू लागले. त्यांचे नेहमी शांत असलेले निळे डोळे तीव्र भावनेने आकसले होते.”

पुस्तकानुसार, हे गुपित इतक्या काळजीपूर्वक लपवून ठेवण्यात आलं होतं की, ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेलाही याची पूर्णपणे माहिती नव्हती.

लॉर्ड माउंटबॅटन यांच्यासोबत मोहम्मद अली जिना आणि जवाहरलाल नेहरू.

फोटो स्रोत, Getty Images

अखेर 11 सप्टेंबर 1948 रोजी फुफ्फुसांच्या क्षयरोगामुळे (टीबी) जिनांचं निधन झालं.

पाकिस्तानचे नियोजनमंत्री आणि पुरस्कार समितीचे अध्यक्ष अहसन इक्बाल यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिलं की, डॉ. जल रतनजी पटेल आणि डॉ. जल डीबू यांच्या व्यावसायिक निष्ठेने, नकळत का होईना, पाकिस्तानची निर्मिती शक्य करणाऱ्या परिस्थितीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

भारत सरकारने डॉ. जल रतनजी पटेल यांना 1962 मध्ये देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण प्रदान केला होता.

पाकिस्तानने यावर्षी 14 ऑगस्ट रोजी डॉ. जल रतनजी पटेल आणि डॉ. जल डीबू यांच्यासाठी ‘निशान-ए-कायद-ए-आझम’ सन्मानाची घोषणा केली आहे. हा सन्मान पुढील वर्षी 23 मार्च रोजी एका समारंभात औपचारिकरित्या प्रदान केला जाईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC