Source :- BBC INDIA NEWS

देऊळबंद 2

फोटो स्रोत, Snehal Tarde/Facebook

भक्तिपर चित्रपट मराठी सिनेमासाठी नवीन नाहीत. 1990-2000च्या दशकांत आलेल्या अनेक चित्रपटांत स्वस्त व्हिज्युअल इफेक्ट्स, आक्रस्ताळा अभिनय आणि सरधोपट भक्तिकथा दिसत असत. ‘देऊळ बंद’ मालिका मात्र तिच्या पटकथात्मक रचनेमुळे वेगळी ठरते.

पारंपरिक भक्तीपटांत देव एखाद्या आस्तिक नायकाला दर्शन देतो; इथे मात्र देव एका नास्तिकालाच दिसतो. आसपासचे आस्तिक शेवटपर्यंत वंचित राहतात, तर नास्तिकाच्या आयुष्यातील प्रश्न सोडवत त्याचे अखेरीस आस्तिकीकरण केले जाते.

ही रचना रंजक असली, तरी तिच्यातील वैचारिक चौकट लक्षवेधी आहे. चित्रपट नास्तिकतेला वैध तात्विक भूमिका म्हणून न मांडता, एका नैतिक-आध्यात्मिक उणिवेसारखे पाहतो. त्यामुळे नास्तिक पात्राचा प्रवास हा विचारांच्या देवाणघेवाणीपेक्षा ‘दुरुस्ती’च्या कथानकासारखा वाटतो.

नास्तिकतेचे सरसकटीकरण

पहिल्या चित्रपटातील राघव शास्त्रीसारखा (गश्मीर महाजनी) वैज्ञानिक नास्तिक अहंकारी, आक्रस्ताळा आणि भावनिकदृष्ट्या खुजा दाखवला जातो.

विज्ञानाच्या मर्यादा दाखवत ‘जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते’ ही परिचित आणि अतार्किक मांडणी चित्रपट करतो.

या चित्रपटांतील नास्तिक पात्रे देव आणि आस्तिकांची सतत खिल्ली उडवतात. परिणामी, भारतीय नास्तिक आणि बुद्धिप्रामाण्यवादी परंपरेची गुंतागुंत नाकारून नास्तिकतेचे सरसकटीकरण केले जाते.

वादविवादाचा आभास निर्माण होतो; पण प्रत्यक्षात श्रद्धेच्या बाजूनेच कथानक झुकलेले राहते.

देऊळबंद

फोटो स्रोत, Snehal Tarde/Facebook

हिंदी सिनेमातही नास्तिकतेला अनेकदा भावनिक प्रवासात रूपांतरित करण्यात आले आहे. मात्र, उमेश शुक्लाच्या ‘ओह माय गॉड!’सारख्या (2012) चित्रपटांनी संघटित धर्म, अध्यात्माचे व्यापारीकरण आणि धार्मिक ढोंगीपणावर टीका केली होती. त्यातील नास्तिक पात्राला शिक्षा होत नाही. उलट, त्याच्या संशयातून श्रद्धेला मानवी रूप मिळते.

‘देऊळ बंद 2’ मात्र धर्मसंस्थेपेक्षा श्रद्धेचे भावनिक पुनर्स्थापन करण्यात अधिक रस घेतो. येथे नास्तिकता ही चर्चेस पात्र बौद्धिक भूमिका नसून एका विरक्त अवस्थेसारखी मांडली जाते.

हे विशेषतः महाराष्ट्राच्या विवेकवादी परंपरेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरते. फुले, आंबेडकर आणि प्रबोधनकर ठाकरे यांच्यापासून पुढे आलेल्या परंपरेने अंधश्रद्धा आणि संस्थात्मक धर्मातील सामाजिक शोषणावर कठोर टीका केली होती. त्या तुलनेत ‘देऊळ बंद 2’ नास्तिकतेकडे तात्विक भूमिकेपेक्षा कथानकात ‘सुधारता’ येण्याजोग्या जगद्‌दृष्टीसारखे पाहतो.

शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाचं सुलभीकरण

‘देऊळ बंद 2’मध्ये शेतकरी आत्महत्या हा मुद्दा केंद्रस्थानी आहे. तुकाराम पायगुडे (मंगेश देसाई) हा शेतकरी त्याच्या हक्कांसाठी आंदोलन करीत असतो, त्यात त्याला अपयश येते.

या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याची पत्नी संगीता (स्नेहल तरडे) त्याची ज्या स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा असते त्यांनाच वेठीस धरते.

वारुळाला दगडं मारून स्वामी तिथून प्रकटतील अशी अपेक्षा मनी बाळगून असलेलं नास्तिक स्त्री पात्र आणि भवताली पापभिरू आस्तिक (ज्यात एक मुस्लीम व्यक्तीही आहे) आपल्याला दिसतात.

शेतकरी आत्महत्या हा मुद्दा त्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने विविध मार्गांनी केलेला प्रवास आणि विनोदी प्रसंगानंतर (स्वामींप्रमाणेच) अचानक प्रकटतो. (आता प्रेक्षकांना ही आत्महत्या दिसली नाही इथवर ठीक, परंतु स्वामींना तिची चाहूलही लागलेली असू नये आणि त्यापुढे जात त्यांनी ती रोखू नये, हे जरा अशक्यप्राय कोटीतील वाटते.)

त्यानंतर चित्रपटातील स्वामी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न हाती घेतात.

ब्रह्मांडनायक असूनही त्यांची शक्ती केवळ एक गाव आणि एका तालुक्यापुरती का मर्यादित राहते, स्वामी एका तालुक्यातील आत्महत्या थांबवतात, पण उर्वरित महाराष्ट्राचे काय असे अवघड प्रश्न विचारू नयेत.

देवाची परीक्षा आहे आणि प्रश्नपत्रिका त्या तालुक्यातल्या नास्तिक व्यक्तीने काढलेली आहे.

शेतकरी (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

अशात चित्रपटातल्या स्वामींची एजन्सी आणि अथॉरिटी नक्की काय आहे, ते त्यांच्याच श्रीमंत भ्रष्टाचारी भक्ताला इतकी सूट का देतात, त्यांच्या पापी भक्तांना किंवा खरंतर कुणालाही ते मुळातून सुतासारखे सरळ का करत नाहीत असे प्रश्न नक्कीच पडतात.

स्वामी त्यांच्याच परमभक्ताची आत्महत्या का बरं रोखत नाहीत? किंबहुना आत्महत्या केली म्हणजे तो त्याच्या कर्माने गेला आणि त्याला मोक्ष मिळणार नाही, असे सोपे मत ते का व्यक्त करतात? हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे.

चित्रपटातले स्वामी व्यवस्थेला प्रश्न विचारत नाहीत किंवा ती समूळ बदलू पाहत नाहीत, यामागे त्यांची इच्छाशक्ती कमी पडते की चित्रपटकर्त्यांचे सामर्थ्य कमी पडते, हा प्रश्न चित्रपटकर्त्यांनी स्वतःला विचारायला हवा.

हा चित्रपट म्हणजे शेतकरी आत्महत्येच्या आणि शेतातील पिकाच्या बाजारभावाच्या मुद्द्याचं प्रचंड सुलभीकरण आहे.

व्यवस्थेतील कृषी, सामाजिक आणि राजकीय अपयशांना वैयक्तिक आयुष्यातील नैतिकता, श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्तित्वाची संकटे म्हणून सादर करतो. त्याद्वारे भक्तीपूर्ण नाट्याच्या माध्यमातून स्ट्रक्चरल (व्यवस्थात्मक, संरचनात्मक) दुःखाचे अ-राजकीयकरण करतो.

देऊळबंद 2

फोटो स्रोत, Snehal Tarde/Facebook

म्हणजे काय, तर चित्रपट शेतकऱ्यांच्या आत्महत्येला संरचनात्मक हिंसेचे लक्षण मानत नाही.

अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकारं, भ्रष्ट मंत्री आणि व्यापारी, असे तोंडी लावण्यापुरते उल्लेख त्यात जरूर आहेत. परंतु, झालेल्या आत्महत्यांसाठी त्यांना जबाबदार धरण्याइतपत इच्छाशक्ती आणि बळ चित्रपटकर्त्यांमध्ये व पर्यायाने चित्रपटातही नाही.

कारण, कोणतं सरकार, कोणता पक्ष, कोण मंत्री, इ. मुद्दे त्यांना अडचणीत आणू शकतात. त्यामुळेच मग सिनेमा जणू एका पोकळीत घडतो. त्यापुढे जात तो शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे एकूणच प्रश्न हा मुद्दा खरं तर ढासळलेली श्रद्धा, भावनिक एकाकीपणा किंवा नैतिक अधःपतनाची कथा म्हणून सादर करतो.

पत्रकार पी. साईनाथ यांनी भारताच्या कृषी संकटावरील आपल्या वार्तांकनात वारंवार मांडल्याप्रमाणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या केवळ भावनिक उद्रेकातून नव्हे, तर व्यवस्थात्मक, संरचनात्मक अपयशातून उद्भवतात.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या या केवळ वैयक्तिक शोकांतिका नसून, त्या धोरणात्मक बदल, कर्ज संरचना, नवउदारमतवादी सुधारणा आणि शासनाच्या माघारीचे परिणाम आहेत.

शेतकऱ्यांच्या दुःखाकडे भावनिक दुर्बलता म्हणून पाहणारा चित्रपट

शेतीची दुर्दशा केवळ आर्थिक नसून तो अस्तित्वाचा प्रश्न बनलेला आहे. शेतकरी अशा व्यवस्थांमध्ये अडकले आहेत, ज्या त्यांचे जगणेच अपमानकारक आणि अनिश्चित बनवतात.

‘देऊळ बंद 2’ या दुःखाकडे भावनिक दुर्बलता किंवा आध्यात्मिक पोकळी म्हणून पाहतो.

हा चित्रपट दुःखाला वैयक्तिक स्वरूप देतो. संकटाचे मूळ आर्थिक व्यवस्था किंवा प्रशासकीय रचनेत शोधण्याऐवजी, तो निराशेचे नैतिकीकरण करतो आणि त्यावर उपाय म्हणून आध्यात्मिक लवचिकतेचा तुलनेनं साधासोपा प्रस्ताव मांडतो.

चित्रपटामध्ये जगण्याचा, अस्तित्वाचा भार (बर्डन ऑफ सर्वायवल) अंतिमतः संस्था किंवा व्यवस्थांवर नव्हे, तर व्यक्तीच्या सदसद्विवेकबुद्धीवर पडतो.

शेतकरी (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

तुम्ही ‘विक्टिम ब्लेमिंग’ ही संज्ञा ऐकली असेल, ज्यात कुठल्याही घटनेत पीडित व्यक्तीलाच दोष देऊन ते कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे छुपे समर्थन केले जाते.

‘देऊळ बंद 2’मध्ये ‘सुसाइड शेमिंग’ केले जाते. आत्महत्या करू पाहणाऱ्या व्यक्तीची आत्महत्या रोखल्यानंतर आसपासची पात्रं आणि साक्षात स्वामी त्यांची खरडपट्टी करतात.

भावनिक नाट्यावर भर देत व्यवस्थेची जबाबदारी झटकणारा सिनेमा

सिनेमात आणखी एक उद्बोधक प्रसंग आहे. पाटील नावाचे एक पात्र (देवेंद्र गायकवाड) दुसऱ्या एका निम्नजातीय व्यक्तीकडे जाऊन म्हणते की, ‘तुझ्या हातात कला आहे. माझ्याकडे बांबू आहेत. एरवी माझ्या तिरडीच्या कामी येणं अपेक्षित असलेले हे बांबू वापरून आपण धंदा करू. एक सेकंद जात बाजूला ठेवू, आपण एकत्र काम करू.’

थोडक्यात, स्वामी अवतरल्यावर या तालुक्यातले लोक जातीपातीही विसरतात. पण, एक सेकंदासाठीच बरं का! समूळ उच्चाटन वगैरे फोल अपेक्षा कुणी बाळगू नयेत!

या चित्रपटात स्वामी समर्थ संत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, इत्यादींना उद्धृत करतात. परंतु, हा चित्रपट आणि त्यातल्या चर्चाविश्वाची गोम अशी की, तुकाराम, तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांना अपेक्षित असलेला विचार आणि विद्रोह ना स्वामींना रुचेल, ना त्यांच्या भक्तांना.

त्यामुळेच तर इतर अनेक भारतीय भावूक चित्रपटांप्रमाणेच, हा चित्रपटदेखील सामाजिक विरोधाभास राजकीयदृष्ट्या न हाताळता भावनिकदृष्ट्या हाताळतो.

रवी वासुदेवन यांनी केलेल्या मांडणीनुसार क्षोभनाट्य हे सामायिक भावनिक अनुभव आणि नैतिक सुबोधतेच्या माध्यमातून प्रेक्षकवर्ग घडवते.

भारतीय चर्चाविश्वात अनेकदा व्यवस्थेवरील टीका टाळून गरिबीचे भावनिकीकरण केले जाते. या चित्रपटातदेखील भावनिक नाट्यावर भर दिल्याने व्यवस्थेतील उणिवा दाखवून द्यायची जबाबदारी चटकन झटकता येते.

शेतकरी (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

चित्रपटाचे भावनिक विश्व त्यातील भक्तीपूर्ण एकमतामध्ये सहभागी होणाऱ्यांभोवती, अर्थात आस्तिकांभोवती फिरते.

जणू, समाज हा एक सांस्कृतिक अवकाश म्हणून केवळ भक्तिरसात लीन आस्तिकांपुरता मर्यादित आहे, आणि नास्तिक व अल्पसंख्याक अस्मितांना त्यात काहीच स्थान नाही, अशी ही चमत्कारिक मांडणी आहे.

इथे नागेश भोसले दिग्दर्शित ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ (2009) या चित्रपटाचा दाखला देणं अपरिहार्य ठरतं. कारण, त्याच क्षोभनाट्याचा प्रभावी वापर केलेला आहे.

शेतकरी मित्राचा आत्महत्येने मृत्यू झाल्यावर राजाराम (मकरंद अनासपुरे) कृषी मंत्र्याला गावातून फिरवत-फरफटत व्यवस्थेतील उणिवा आणि त्यांचे भीषण परिणाम दाखवतो.

‘देऊळ बंद 2’मध्ये मात्र कुणीतरी तारणहार येईल आणि सगळ्या समस्या (भले पीडितांवर दोषारोप ठेवून का होईना) सोडवेल, असा पोकळपणा ठळकपणे दिसतो.

या साऱ्याचा परिणाम असा की, हा चित्रपट भावनिक दिलासा आणि आध्यात्मिक एकमताच्या माध्यमातून समकालीन मराठी मध्यमवर्गीय प्रेक्षकांच्या चिंता संबोधित करतो. मात्र, त्या चिंता, त्या अस्वस्थता मुळातून कशा काढून टाकता येतील, यावर काम करण्यात ना समाजाला रस दिसतो, ना सिनेमाला!

‘देऊळ बंद 3’ची टॅगलाइन ‘आत्मनिर्भर भारत’ अशी आहे. बाकी प्रेक्षक सुज्ञ आहेत, असं म्हणतात!

(या लेखात व्यक्त केलेली मतं लेखकाची वैयक्तिक आहेत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC