Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Vintage poster
पंजाबमधील पटियाला संस्थानात 28 जानेवारी 1928 ला एक कुस्ती होणार होती. त्या कुस्तीची जबरदस्त चर्चा होती. इतकी की भारताच्या अनेक संस्थानांमधील राजे-महाराजे आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांसह हजारो लोक ती कुस्ती पाहण्यासाठी जमले होते.
ही कुस्ती होती, ‘झिबिस्को’ म्हणून ओळखल्या जाणारा पोलंडचा पैलवान स्टॅनस्लाव साइगानीवोविच आणि गामा नावानं प्रसिद्ध झालेले ब्रिटिश राजवटीतील भारतातील पैलवान गुलाम हुसैन अर्थात ‘गामा’ यांच्यामध्ये.
काही वाचक असं म्हणतील की गामा यांचं खरं नाव गुलाम मोहम्मद होतं.
मात्र, सैयद आगा अश्अर लखनवी यांचं ‘गामा गमक’ हे पुस्तक, फहीमुद्दीन फहमी यांनी लिहिलेलं ‘रुस्तम-ए-जमां गामा’ हे गामा यांचं चरित्र आणि अख्तर हुसैन शेख यांनी लिहिलेलं ‘दास्तान-ए-तारीख-ए-पहलवानी’ हे पुस्तक, या सर्वांमधून असं दिसतं की गामा यांचं खरं नाव गुलाम हुसैन असंच होतं.
या सर्व पुस्तकांमध्ये जी माहिती नमूद करण्यात आली आहे, ती संस्थानांची सरकारी कागदपत्रं आणि महसूल रेकॉर्ड्समधून घेण्यात आली आहे. याव्यतिरिक्त स्वत: गामा, त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या चाहत्यांकडून मिळालेली माहिती आणि तपासून घेतलेल्या बाबींचा समावेश आहे.
गुलाम हुसैन उर्फ गामा यांचा जन्म 22 मे 1878 ला दतिया संस्थानात अजीज (पूर्ण नाव अब्दुल अजीज किंवा अजीज बख्श) यांच्या घरी झाला. हे आता सध्याच्या मध्य प्रदेशात आहे. अजीज यांचे वडील काश्मीरमधून अमृतसरला येऊन स्थायिक झाले होते. गामा यांच्या जन्माच्या वेळेस अजीज बख्श दतिया संस्थानात एक पैलवान होते.
अख्तर शेख यांच्यानुसार, गामा यांचं वय 6 वर्षांपेक्षा काही महिने कमी असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. तोपर्यंत त्यांनी गामाला कुस्तीची ओळख करून दिली होती.
गामा यांचा छोटा भाऊ इमाम बख्श याचा जन्म वडिलांच्या निधनानंतर दोन महिन्यांनी झाला. गामा यांचं संगोपन त्यांचे आजोबा नून (अमीर बख्श) पैलवान यांच्याकडे झाल्यामुळे गामा यांना ‘गामा नून वाला’ असंही म्हटलं जायचं.
नून पैलवान यांची हत्या झाली. त्यामुळे त्यांच्या मुलानं म्हणजे गामा यांचे मामा ईदा पैलवान यांनी गामा यांचा सांभाळ केला.
प्रशांत किदांबी यांनी ‘क्रिकेट कंट्री: ऐन इंडियन ओडिसी इन द एज ऑफ एम्पायर’ हे पुस्तक लिहिलं आहे. यात प्रशांत यांनी लिहिलं आहे की असं म्हटलं जातं की ईदा पैलवान यांनी वचन दिलं होतं की ते गामा यांना “त्यांच्या वडिलांची इच्छा होती, तसा चॅम्पियन पैलवान बनवतील.”
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गामा यांनी अत्यंक कडक व्यायाम पद्धतीचा अवलंब केला.
वयाच्या 10 व्या वर्षी 400 पैलवानांमध्ये सर्वाधिक बैठका
जोसेफ ऑल्टर यांनी ‘गांधीज बॉडी’ हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात ‘गामा द ग्रेट’ असं एक प्रकरण आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की गामानं वयाच्या फक्त 10 व्या वर्षी 400 पैलवानांमध्ये सर्वाधिक बैठका घातल्या.
रोनोजॉय सेन यांनी लिहिलं आहे की या स्पर्धेत 400 हून जास्त पैलवानांमधील शेवटच्या 15 पैलवानांमध्ये त्यांचा समावेश होता. वय कमी असल्यामुळे जोधपूरचे महाराजा जसवंत सिंह यांनी गामा यांना विजयी घोषित केलं आणि स्वत:कडे आश्रय दिला.
शेख आणि फहमी यांच्यानुसार, आयुष्याच्या उत्तरार्धात गामा म्हणाले होते, “किती सपाटे घातले याचा मला अंदाज नाही, मात्र माझे सर्व स्नायू आखडले होते. मी एक आठवडा खाटीवरून उठू शकलो नव्हतो.”
लखनवी यांनी लिहिलं की जोधपूरमध्ये जसवंत सिंह यांच्या सल्ल्यानुसार गामा यांचे दुसरे मामा बूटा पैलवान, यांनी गामा आणि इमाम बख्श या दोघांना उस्ताद माधो सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली दिलं. तिथे 4 वर्षांचं प्रशिक्षण होतं. जोधपूरच्या राजाच्या निधनानंतर गामा दतियाला परतले.
गामांचा 15 तास व्यायाम
लखनवी लिहितात की दतियाच्या बाहेर एका खूप मोठ्या बागेत असलेल्या सरकारी पीली कोठीमध्ये गामा यांनी एक आखाडा बनवला होता.
गामा दररोज 2 हजार दंड (पुश-अप्स किंवा डिप्स) मारायचे. जे पाय आणि नितबांचे स्नायू बळकट करण्यासाठी असायचे. ते 5 हजार उठाबशा मारायचे. तसंच 2 हजार हात मग्दूल (पैलवानांच्या व्यायामातील लाकडापासून बनवलेले हे गदा किंवा डंबेलसारखे पारंपारिक साधन) फिरवायचे.
फोटो स्रोत, The Daily Mirror
“एक जवळपास 5 मण वजनाचा दगडी पाट (जे मी पाहिलं), गामा पैलवान त्यांच्या गळ्यात टाकून संपूर्ण बागेला धावून एक फेरी मारत असत. ते अंतर एक मैलापेक्षा कमी नव्हतं. ते खूप कमी तेल मालिश करवून घ्यायचे.”
‘पहलवानों की दुनिया’ या पुस्तकाचे लेखक आणि भारतातील एक पैलवान बरकत अली यांनी लिहिलं आहे की दररोज पहाटे 2 वाजेपासून 10 वाजेपर्यंत गामा शरीराच्या खालच्या भागाचा व्यायाम करायचे. तर दुपारी 2 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शरीराच्या वरच्या भागाचा व्यायाम करायचे.
“ते दररोज संध्याकाळी 2 तास पायी चालायचे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की गामा 24 तासांमध्ये 15 तास व्यायाम करायचे.”
खुराक : 20 लिटर दूध, 6 कोंबड्या आणि बरंच काही
किदांबी यांच्यानुसार, इतका कठोर व्यायाम करण्यासाठी शरीराला ताकद मिळावी यासाठी ते यखनी (मांस आणि हाडांपासून तयार केलेला शोरबा किंवा सूप), मोठ्या प्रमाणात प्यायचे. याव्यतिरिक्त ते दररोज 20 लिटर दूध, अर्धा लिटर तूप, पाऊण किलो लोणी आणि 4 किलो फळं खायचे.
अख्तर हुसैन शेख यांच्यानुसार, गामा लहानपणी दररोज 500 डंटर (दंड) आणि तितकेच सपाटे घालायचे. वयाच्या 15 व्या वर्षी ते 3 हजार सपाटे आणि तितकेच दंड घालायचे. गामा 20 वर्षांचे झाल्यावर हे प्रमाण वाढून 5 हजार दंड आणि 3 हजार ते 4 हजार सपाट्यांपर्यंत पोहोचलं. तर वयाच्या 25 ते 50 व्या वर्षांपर्यंत ते सर्वसाधारणपणे दररोज 6 हजार सपाटे आणि 5 हजार दंड घालायचे.
“त्यांच्या खुराकात दररोज 6 कोंबड्या किंवा 5 शेर (जवळपास 4.5 किलो) मटणाच्या यखनीबरोबर पाव किलो तूप, 10 शेर दूध, अर्धा शेर तूप, पाऊण शेर बदाम आणि अनेक प्रकारचे मुरब्बे असायचे.”
भोपाळजवळच्या रीवा या संस्थानाचे राजा प्रताप सिंह यांच्या देखरेखीखाली देखील गामा राहिले. तिथे मीरा सिंह भक्खीवाला यांनी त्यांची कौशल्यं अधिक विकसित केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
किदांबी यांनी लिहिलं आहे की 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, गामा यांना दतिया संस्थानाच्या दरबारात पैलवान म्हणून ठेवून घेण्यात आलं. त्यांनी अनेक संस्थानांच्या नामांकित पैलवानांचा सातत्यानं पराभव केला आणि मोठं नाव कमावलं.
“त्यांनी सर्वात मोठा विजय गुलाम मोहिउद्दीनच्या विरुद्ध मिळवला होता. गुलाम मोहिउद्दीन हासुद्धा त्यावेळचा एक खूप ताकदवान, जबरदस्त पैलवान होता.”
“इतक्या वर्षांमध्ये फक्त रहीम सुल्तानी वाला हाच एक असा पैलवान होता, जो गामा यांच्यासमोर टिकाव धरू शकला. या दोन्ही पैलवानांमध्ये 1907 ते 1909 या दरम्यान 3 कुस्त्या झाल्या. मात्र त्यातून कोणीही स्पष्टपणे विजेता ठरू शकला नाही. असं असूनही त्या दशकाच्या अखेरीपर्यंत बहुतांश समीक्षक गामा यांना भारतातील सर्वात मोठा पैलवान मानू लागले होते.”
लखनवी यांच्यानुसार स्वत: गामा यांनी त्यांच्या 16 मोठ्या कुस्त्यांबद्दल बोलताना वयाच्या 12 व्या वर्षी पहिली कुस्ती जिंकल्याचं सांगितलं होतं.
शेख यांनी लिहिलं आहे की गुलाम मोहिउद्दीन याच्याविरुद्धच्या या कुस्तीला उस्ताद लोक ‘अध-मिनटी’ कुस्ती म्हणतात. या विजयाबद्दल दतियाच्या संस्थानिकांनी गामा यांना 20 हजार रुपये आणि 22 शेर वजनाची चांदीची गदा बक्षीस दिली.
‘फक्त रहीम सुल्तानीच टक्कर देऊ शकला’
रहीम सुल्तानी वाला याच्याविरुद्धची पहिली कुस्ती बरोबरीत सुटण्यावर गामा यांनी त्याला ‘एक प्रकारचा विजय’ असं म्हटलं होतं. कारण त्यांच्या मते “भारतात त्या वेळेस त्याच्या तोडीचा दुसरा पैलवान नव्हता.”
नंतर इंदूर आणि लाहोरमध्ये देखील गामा यांची त्याच्याच विरोधातील कुस्ती बरोबरीत राहिली. मात्र त्यांच्या मते अलाहाबाद (आताचं प्रयागराज) मध्ये “देवानं मला विजयी केलं आणि रुस्तम-ए-हिंदची गदा मला मिळाली.”
शेख यांनी लिहिलं आहे, “रहीम, रुस्तम-ए-जमाच्या तावडीत सापडला. डाव इतका यशस्वी होता आणि प्रहार इतका जोरदार होता की अतुलनीय कौशल्य असूनही प्रतिस्पर्धी पैलवान आखाड्यात चितपट झाला. अनेक वर्षांच्या संघर्षावर अखेर निर्णय झाला. ते कुस्तीचं पंचेचाळीसावं मिनिट होतं. रहीमनं त्याचा पराभव मान्य केला.”
गामा यांचं म्हणणं होतं, “जर कोणी मला टक्कर देऊ शकलं, तर ते रहीम बख्श होते. त्यांच्यामुळेच मला प्रसिद्धी मिळाली.”
“हुसैन बख्श मुल्तानी यांना एकापेक्षा जास्त वेळा पराभूत केलं. प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या लाहोरमधील आगमनाच्या वेळेस हातू खान मुल्तानी यांच्यासोबत कुस्तीचा एक सामना नियोजित होता. मात्र ते आले नाहीत. प्रिन्स बहादूर यांनी मला रुस्तम-ए-हिंदची गदा दिली.”
परदेशातील कुस्तींमध्ये देखील कधीच पराभव नाही
फोटो स्रोत, Getty Images
गामा यांनी जागतिक स्तरावर नाव कमावलं आणि ते अपराजित राहिले.
‘जॉन बुल वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये भाग घेण्यासाठी 1910 साली गामा यांना लंडनला पाठवण्यात आलं. गामा, त्यांचा भाऊ आणि दोन इतर पैलवान यांच्यासाठीची सर्व व्यवस्था सरत कुमार मित्रा या एका बंगाली कोट्यधीशानं केली. ऑल्टर यांनी लिहिलं आहे की दुर्दैवानं गामा यांची उंची तुलनेनं कमी होती, त्यामुळे त्यांना अधिकृतपणे स्पर्धेत उमेदवार म्हणून घेण्यात आलं नाही.
“मात्र एका स्थानिक थिएटरनं त्यांना साप्ताहिक 250 पौंड स्टर्लिंगच्या बदल्यात प्रदर्शनी सामन्यांमध्ये भाग घेण्याची नोकरी देऊ केली. या अनौपचारिक व्यासपीठावरून गामा यांनी लंडनमधील जागतिक स्तरावरील सर्व पैलवानांना लढण्याचं आव्हान दिलं. त्यांनी जाहीर केलं की जो पैलवान त्यांच्यासमोर 5 मिनिटं टिकाव ठरू शकेल, त्याला ते 5 पौंड देतील.”
“गामा यांच्याविरुद्ध कुस्ती खेळण्यासाठी उतरलेले सर्व पैलवान खूप कमी वेळातच पराभूत झाले. अशाप्रकारे त्यांना अधिकृत स्पर्धेत जागा मिळाली. तिथे त्यांची लढत वर्ल्ड चॅम्पियन झिबिस्कोबरोबर झाली.”
किडांबी यांच्यानुसार, दोन्ही पैलवान समोरासमोर येताच, पोलंडचा हा पैलवान (झिबिस्को) लगेच जमिनीवर झोपला आणि कुस्ती लढण्याचे सर्व प्रयत्न टाळत राहिला.
“गामा यांनी सर्वप्रकारे प्रयत्न करून आणि स्टेडियममधील 8 हजार प्रेक्षकांनी घोषणा देऊनदेखील झिबिस्को त्याच्या या स्थितीतून हलला नाही. शेवटी अडीच तासांहून थोडा अधिक वेळ झाल्यानंतर ही ‘अनिर्णित’ लढत थांबवण्यात आली.”
“मग संतापलेल्या प्रेक्षकांमधील काही झुंडी विरोध करण्यासाठी मैदानात उतरल्या. तेव्हा लढतीचा निकाल लागावा यासाठी पुढील आठवड्यात पुन्हा कुस्ती ठेवण्यात आली.”
“अर्थात गामा ठरलेल्या वेळेस स्टेडियममध्ये पोहोचले. मात्र झिबिस्कोचा ठावठिकाणा नव्हता. त्यामुळे गामा यांना विजयी घोषित करण्यात आलं. तसंच त्यांना 250 पौंड बक्षीस देण्यात आले. खासदार होरेशियो बॉटमली यांनी त्यांना ‘जॉन बुल गोल्डन बेल्ट’ देखील भेट दिला. याला रुस्तम-ए-जमा यांचं प्रमाणपत्र मानण्यात आलं होतं.”
गामा आणि त्यांचे सहकारी 1912 मध्ये पटियालाचे राजे भूपिंदर सिंह यांच्याकडे नोकरीस लागले. त्यांना दरमहा 500 रुपये पगार ठरवण्यात आला. तर उर्वरित पैलवानांना 100 रुपयांपासून ते 30 रुपयांपर्यंत पगार निश्चित करण्यात आला.
झिबिस्कोनं 18 वर्षांनी पुन्हा आव्हान दिलं
झिबिस्कोच्या पराभवानंतर 18 वर्षांनी पटियालामध्येच त्याच्या आव्हानानुसार पुन्हा कुस्ती ठेवण्यात आली.
त्यावेळेस ‘हिंदुस्तान टाइम्स’नं लिहिलं होतं की या कुस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या स्टेडियममध्ये ‘एक लाखांहून अधिक लोक’ घोषणा देत होते.
जोसेफ ऑल्टर यांनी ‘गांधीज बॉडी’ या त्यांच्या पुस्तकातील ‘गामा दे ग्रेट’ या प्रकरणात लिहिलं आहे की लढत 4 वाजता सुरू होणार होती. मात्र झिबिस्को उशीरा आल्यामुळे ती सव्वा चार वाजता सुरू झाली.
“कुस्तीला सुरुवात होताच, गामा यांनी 300 पौंड वजनाच्या या पोलंडच्या पैलवानाचा एक पाय पकडला आणि दुसरा जमिनीवरून हवेत उचलला. काही क्षणातच झिबिस्को चितपट झालेला होता.”
रोनोजॉय सेन यांनी ‘नेशन ॲट प्ले: अ हिस्ट्री ऑफ स्पोर्ट इन इंडिया’ या पुस्तकात लिहिलं आहे, “गामा सिंहासारखे झेपावले आणि फक्त 30 सेकंदातच झिबिस्कोला जमिनीवर पाडलं.”
“सर्व बाजूंनी जोरदार आणि सतत घोषणा दिल्या जात होत्या. गामा अर्धा मिनिट झिबिस्कोवर बसून होते, मग पंचांनी त्यांना विजेता आणि वर्ल्ड चॅम्पियन घोषित केलं.”
ऑल्टर यांच्यानुसार, “पटियालाच्या महाराजांनी गामा यांना आलिंगन दिलं आणि मौल्यवान मोत्यांचा एक हार स्वत:च्या गळ्यातून काढून त्यांना घातला.”
मग मिरवणूक काढण्यात आली. त्यात महाराजांच्या हत्तीवर बसलेले गामा पुढे होते. त्यांना बक्षीस म्हणून चांदीची एक गदा, 6 हजार रुपयांचं वार्षिक वेतन आणि एक गाव इनाम म्हणून देण्यात आलं.
या विजयामुळे वृत्तपत्रांमध्ये गामा यांच्याच नावाची चर्चा होती. तसंच वृत्तपत्रांमध्ये झिबिस्कोचे उद्गारदेखील छापले होते. ते म्हणजे, “गामा, तुम्ही खरंच सिंह आहात.”
रुस्तम-एम-जमा हा गामा यांचा किताब पक्का करणारी ही लढत अपेक्षेपेक्षा खूपच छोटी ठरली.
पैलवानांचे इतिहासकार अख्तर हुसैन शेख यांच्या मते, स्वत: गामा म्हणायचे, “ज्यानं घड्याळ पाहिलं, तो कुस्ती पाहू शकला नाही. ज्यानं सिगारेट पेटवली, तोदेखील कुस्ती पाहू शकला नाही.”
सेन यांनी लिहिलं आहे की आयोजकांनी विजेचे दिवे आणि सर्च लाईट यांची व्यवस्था केली होती. कारण त्यांना वाटलं होतं की जर लंडनमधील 1910 च्या लढतीप्रमाणे कुस्ती दोन तासांहून अधिक काळ चालली, तर प्रकाशाची आवश्यकता भासेल.
पीटरसनचा पराभव
फोटो स्रोत, Google
पटियालाच्या लढतीनंतर जेस पीटरसन, जो स्वत:ला सर्व चॅम्पियन्सचा चॅम्पियन म्हणवून घेत असे, यानं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या संपादकांना पत्र लिहून गामा यांना आव्हान दिलं.
पॅरिसमध्ये राहणाऱ्या पीटरसनाचा दावा होता की त्यानं झिबिस्कोचा 3 वेळा पराभव केला आहे. त्यानं महाराजांना कुस्तीच्या लढतीची व्यवस्था करण्याचं विनंती केली.
ही लढत 1929 च्या सुरुवातीला पटियालामध्ये 10 हजार प्रेक्षक आणि पटियाला आणि जवळपासच्या संस्थानांच्या राजपरिवारांसमोर झाली. या लढतीमध्ये देखील गामा यांनी सहनपणे विजय मिळवला.
गामा यांना अशाप्रकाची आव्हानं देशातून आणि परदेशातून मिळत राहिली. मात्र ते नेहमीच अजिंक्य राहिले.
शाही किल्ल्यासमोरील मिंटो पार्कमध्ये 1 एप्रिल 1912 ला गामा आणि बुद्धू ब्राह्मण यांच्यात कुस्ती झाली.
अख्तर शेख यांनी लिहिलं आहे की हात पकडताच गामा यांनी ‘एकरी पट’ मारून, कव्हरचा वापर करत प्रतिस्पर्ध्याला खाली दाबलं. मग मानेवर हात ठेवून त्यांनी बुद्धूला पलटी मारायला लावली. तज्ज्ञ याचं वर्णन असं करतात, गामानं “पुढे ठेवलं, त्याला फिरवलं आणि सरळ केलं.”
एकरी पट या डावात एक पैलवान अचानक प्रतिस्पर्ध्याचा एक पाय पकडून त्याचं संतुलन बिघडवून टाकतो आणि त्याला चितपट करतो.
बरकत अली म्हणतात की 55 ते 65 वर्ष वय असताना गामा यांनी काही व्यायामांचं प्रमाण थोडं कमी केलं होतं.
लखनवी यांच्यानुसार, जॅक वूड यांनी 1940 मध्ये ‘मँचेस्टर गार्डियन’मध्ये लिहिलं होतं की गामा हा सध्याच्या काळातील सर्वात मोठा पैलवान आहे. त्यावेळेस गामा यांचं वय 60 वर्षांचं होतं.
“ते 3 हजार कुस्त्या खेळले आहेत. मात्र त्यांचा कधीही पराभव झाला नाही.”
गामा काही दिवस लाहोरमध्ये राहायचे तर काही दिवस पटियालामध्ये राहायचे. मात्र 1947 ला देशाची फाळणी झाल्यानंतर गामा पटियालातून लाहोरला गेले.
शेख यांच्यानुसार, गामा यांच्यासोबत त्यांचा भाऊ इमान बख्श आणि त्यांचे पुतणे भोलू बंधूंदेखील लाहोरमध्येच स्थायिक झाले. नंतर एक काळ असाही आला, जेव्हा गामा यांचे भाऊ इमाम बख्श, गामा यांच्या रुस्तम-ए-जमाचे रखवालदार बनले.
गामा लाहोरला गेल्यानंतर त्यांचं घर केसर सिंह पैलवान यांना मिळालं. ते नंतर रुस्तम-ए-हिंद बनले.
फोटो स्रोत, Newspaper archives
गामा यांच्या आयुष्याची शेवटची वर्षे
गामा आणि फहीमुद्दीन फहमी यांचे आजोबा करीम बख्श जवळचे मित्र होते. बालपणानंतर त्यांची कराचीमध्ये गामा यांच्याशी भेट झाली. तिथे त्यांनी एक ट्रान्सपोर्ट सेवा सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी फहमी यांना मॅनेजर केलं होतं.
फहमी लिहितात, “काहीजण म्हणतात की त्यांचं नाव गुलाम मोहम्मद होतं. काहीजणांना वाटतं गुलाम बख्श होतं. मात्र त्यांचं खरं नाव गुलाम हुसैन होतं.”
“ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी ‘रेफ्यूजी रिहॅबिलिटेशन फायनान्स कॉर्पोरेशन’मधून 10 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यासाठीच्या सर्व कागदपत्रांवर गुलाम हुसैन उर्फ गामा याच नावाची नोंद झाली होती.”
गामा यांना 1954 मध्ये उच्च रक्तदाबाची समस्या सुरू झाली. मग कराचीतील व्यवसाय गुंडाळून ते लाहोरला परतले. सोबत ते फहमीला देखील घेऊन गेले. गामा फहमी यांना प्रेमानं चाचा असं म्हणायचं.
गामा यांना ह्रदयविकाराचा पहिला झटका येण्यापूर्वी, लाहोरमधून जगातील सर्व पैलवानांना शेवटचं खुलं आव्हान देण्यात आलं होतं.
फहमी यांनी लाहोरमध्ये त्यांच्यासोबत राहत त्यांचं चरित्र पूर्ण केलं.
‘प्राथमिक शाळा’ नापास, मात्र साहित्य आणि शेरो-शायरीची आवड
फहमी यांच्यानुसार, ते अनेकदा अभिमानानं म्हणत असत की ‘ते प्राथमिक शाळा नापास’ आहेत, मात्र त्यांची उर्दू उत्तम होती आणि पंजाबी अगदी दर्जेदार होती. खुद्द गामा यांच्या मते, लंडनमध्ये चार महिने वास्तव्य केल्यानंतर त्यांना इंग्रजीदेखील बऱ्यापैकी येऊ लागलं होतं.
“आज जर शेरोशायरीची महफिल सजली असेल, तर उद्या एखाद्या प्रसिद्ध कथाकाराची गोष्ट आनंदानं ऐकली जात असे. कधी इक्बाल यांच्या ‘बांग-ए-दरा’चा काळ असतो, तर कधी ‘दिवान-ए-बेदम’चा! हिंदी कवींचे दोहे म्हणजे कवितादेखील त्यांना आठवत असत.”
फहमी म्हणतात, “मी जोपर्यंत रुस्तम-ए-जमा यांच्यासोबत राहिलो, ते पहाटे 4 वाजता उठत असत. हवामान कसंही असो, ते अंगावर फक्त एक लंगोट घालून आखाड्यात जायचे. तिथे ते सराव करून थंड पाण्यानं आंघोळ करायचे. त्यानंतर दुसऱ्या कामाकडे लक्ष द्यायचे.”
लखनवी यांनी लिहिलं आहे की नंतर रावी नदीच्या किनाऱ्यावर एक गवताचं छत असलेला बंगला बनवण्यात आला. थंडीच्या दिवसात ते एका झाडाच्या सावलीत पडून राहायचे.
मात्र, मग ए. बी. राजपूत यांनी लाहोरमध्ये जाऊन गामा यांची भेट घेतली. त्यांनी ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ बॉम्बे’ या इंग्रजी साप्ताहिकाच्या 7 फेब्रुवारी 1960 च्या अंकात लिहिलं की कुस्तीच्या आपल्या कौशल्यानं जगाला चकित करणारा दिवा आता शेवटचे क्षण मोजतो आहे.
गामा यांच्या आजारपणाची बातमी ऐकून झिबिस्कोनं त्यांची विचारपूस करण्यासाठी पत्र लिहिलं. त्यानं लिहिलं, “मी हजारो पैलवानांशी कुस्ती खेळलो. मात्र ज्या सहजपणे गामानं मला हरवलं, तसं दुसरं कोणीही करू शकलं नाही.”
गामा यांनी त्याला उत्तर देत, विचारपूस करण्यासाठी आभार मानले.
गामा यांचं कुलसुम नवाज यांच्याबरोबर काय नातं होतं?
फोटो स्रोत, Getty Images
गामा यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर, वजीर बेगम या त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून त्यांना 5 मुलं झाली. मात्र त्यातील कोणीही वाचू शकलं नाही. त्यांना 4 मुली होत्या.
गामा यांची एक मुलगी, रजिया बेगमचं लग्न डॉक्टर मोहम्मद हफीज यांच्याशी झालं. त्यांची मुलगी म्हणजे गामा यांची नात कुलसुम यांचं लग्न पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी झालं.
अख्तर शेख यांनी लिहिलं आहे की 22 मे 1960 बेगम गामा यांना रावीपलीकडच्या बागेत जावं लागलं. गामा यांच्याबरोबर त्यांची मुलगी गीती आरा होती. त्यांच्याकडून वचन घेतलं की त्यांच्यानंतर ती आईची काळजी घेईल आणि त्यांच्यासमोर रडणार नाही. मग गामा यांनी हात उचलून त्यांना आशिर्वाद दिले.
दोन लाडू खाल्ले
इतक्या वेळात वजीर बेगमदेखील तिथे आल्या. गामा म्हणाले की खूप लांबचा प्रवास आहे. आंघोळ केली पाहिजे. गामा यांनी आंघोळ केली. कुटुंबाच्या मदतीनं कपडे बदलले. विशेषकरून लंगोट बदलला (ते नेहमी लंगोट घालायचे). गीती आरा यांनी केस विंचरले. औषधं बंद करण्यास सांगितलं आणि दोन लाडू मोठ्या आवडीनं खाल्ले.
मग 23 मे 1960 या दिवशी गामा रोजच्या प्रमाणे पहाटेच्या अजानच्या आधी उठले आणि ते थोडं पाणी घटाघटा प्यायले. नंतर ते मुलीला म्हणाले, “आता जाऊन झोप. मी आता आणखी कोणाला त्रास देणार नाही.”
ते रुस्तम-ए-जमा, जगप्रसिद्ध पैलवान गामा यांचे शेवटचे शब्द होते. त्यांनी तीनवेळा दीर्घ श्वास घेतले. वजीर बेगम अचानक त्यांच्या जवळ गेल्या. त्या म्हणाल्या की जर त्रास होत असेल तर पालथं झोपा.
ज्या व्यक्तीला कधी चितपट होणं माहित नव्हतं, त्याला हा पालथं होण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र ते आता असे पालथे, चित झाले की मग कधीच उठले नाहीत.
लाहोरमध्ये दरबार पीर मक्कीच्या जवळ एका छोटाशा कब्रस्तानात गुलाम हुसैन उर्फ गामा नून वाला, रुस्तम-ए-जमां यांना दफन करण्यात आलं. एका बाजूला शेर-ए-बब्बर इमाम बख्श रुस्तम आहेत, तर दुसऱ्या बाजूला हमीदा रहमानी वाला रुस्तम-ए-हिंद आहेत.
जवळच गामा कल्लू वाला यांची कबरदेखील आहे. गामा कल्लू वाला तेच गामा आहेत, ज्यांचं खरं नाव गुलाम मोहम्मद होतं.
झिबिस्कोचा जन्म 1879 मध्ये झाला होता. झिबिस्को आणि गामा जवळपास एकाच वयाचे होते. गामा यांच्या निधनानंतर 7 वर्षांनी 1967 मध्ये झिबिस्कोचं निधन झालं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC







