Home LATEST NEWS ताजी बातमी पाच मजली बंगला, टेस्ला कार आणि IAS चा रुबाब; पोलिसांनी पकडलं तर...

पाच मजली बंगला, टेस्ला कार आणि IAS चा रुबाब; पोलिसांनी पकडलं तर निघाला नकली अधिकारी

6
0

Source :- BBC INDIA NEWS

बिहारच्या खगरिया जिल्ह्यातील पोलिसांनी मनीष गुप्ता नावाच्या एका बनावट आयएएस अधिकाऱ्याला अटक केली असून, त्याच्याकडे टेस्ला कार आहे.

फोटो स्रोत, Ranveer Kumar

बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील पोलिसांनी 8 ऑगस्टला मनीष कुमार उर्फ मनीष कुमार गु्प्ता नामक व्यक्तीला अटक केली. मात्र, पोलिसांना त्याला त्यांच्या वाहनातून पोलीस ठाण्यात नेता आलं नाही.

त्याऐवजी पोलिसांनाच मनीष कुमारच्या महागड्या टेस्ला गाडीत मागच्या सीटवर बसून ठाण्यापर्यंत जावं लागलं. तर, मनीष मात्र गाडीत फ्रंट सीटवर बसलेला होता.

असं काय घडलं की पोलिसांना मनीषला त्याच्याच महागड्या टेस्ला कारच्या पुढच्या सीटवर बसवून पोलीस ठाण्यात न्यावं लागलं?

यामागचं कारण म्हणजे, ही महागडी टेस्ला कार एफएसडी म्हणजेच ‘फुल सेल्फ ड्रायव्हिंग’ आहे.

याबाबत बोलताना घटनास्थळी उपस्थित असलेले स्थानिक पत्रकार रणवीर कुमार म्हणाले की, “मनीषने पोलिसांना सांगितलं की, जोपर्यंत तो पुढच्या सीटवर बसणार नाही तोपर्यंत कार काही जागेवरून हलणार नाही. त्यानंतर मनीष गुप्ता आणि त्याचा ड्रायव्हर पुढच्या सीटवर तर पोलीस अधिकारी मागच्या सीटवर बसले. आता ती कार पोलीस ठाण्यात असल्याने तिला पायायला लोक गर्दी करत आहेत.”

दरवर्षी पुराचा फटका बसणाऱ्या खगडिया जिल्ह्यातली ही घटना आहे.

मनीष गुप्ता हा आपण आयएएस अधिकारी असल्याचा दावा करायचा. याच आरोपावरून 8 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.

खगडियामधील गोगरी पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर गेल्या 10 वर्षांपासून राहणारा मनीष गुप्ता, परिसरात आपल्या आयएएस पदाचा डौल मिरवत असे.

तो स्वतःची ओळख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा अंडरकव्हर एजंट आणि केंद्रीय दक्षता आयोगाचा अधिकारी अशी करून देत असे.

खगडिया जिल्ह्याचे एसपी भानू प्रताप सिंह यांनी मनीष गुप्ताचे हे दावे ‘वरवर पाहता खोटे’ असल्याचे आढळून म्हटले आहे.

मनीष गुप्ता आहे तरी कोण?

बिहारमधील खगडिया जिल्ह्यातील गोगरी बाजारात गेल्यास तेथे एक आलिशान पाच मजली बंगला दिसून येतो. स्थानिकांच्या मते, “गोगरीच्या मुख्य बाजारात एवढं आलिशान घर कुणाचंही नाही.”

याच घरात 49 वर्षीय मनीष कुमार एकटाच राहत होता.

8 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 2 वाजता गोगरी पोलीस ठाण्याचे पोलीस गुप्त माहितीच्या आधारे मनीष कुमारच्या घरी पोहोचले.

गोगरीचे पोलीस ठाणे प्रभारी अरविंद कुमार यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, “चष्मा आणि हाफ पँट घातलेला एक माणूस घरासमोर फेरफटका मारत होता. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव मनीष कुमार गुप्ता असल्याचे सांगितले आणि आपण आयएएस अधिकारी असल्याचे म्हणाला.

पांढरा टी-शर्ट घातलेला मनीष त्याच्या टेस्ला गाडीत बसतानाचा फोटो, याच गाडीतून तो पोलीस ठाण्यात पोहोचला होता.

फोटो स्रोत, Ranveer Kumar

एफआयआरमध्ये नमूद माहितीनुसार, “त्याने त्याच्या मोबाईलमध्ये त्याचे ओळखपत्र दाखवले. त्यावर केंद्रीय दक्षता आयोगाचे नाव आणि ओळखपत्र क्रमांक 0577102 तसेच ‘चीफ सिक्युरिटी ऑफिसर’ असे नमूद होते. पुढील चौकशीदरम्यान त्याने स्वतःला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा अंडरकव्हर एजंट असल्याचे सांगितले. याची पडताळणी करण्यात आली असता हा दावा प्रथमदर्शनी बनावट असल्याचे आढळले.”

एफआयआरमध्ये नमूद माहितीनुसार, मनीष कुमारच्या घरासमोर काळ्या रंगाची टेस्ला कार आणि पांढऱ्या रंगाची सफारी कार उभी होती. सफारीवर भारत सरकार असा बोर्ड लावलेला होता.

या दोन्ही वाहनांबाबत विचारणा केली असता मनीष कुमारने ती दोन्ही वाहने आपली असल्याचे कबूल केले.

दरम्यान, प्रकरण संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी मनीष गुप्ताला अटक करत त्याच्या घराची झडती घेतली.

29 ब्रँडची विदेशी दारू आणि बाराशिंग्याची शिंगेही जप्त

गोगरीचे एसडीपीओ चंदन कुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, “मनीष गुप्ताला चार भाऊ आहेत. त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे आणि मनीष गुप्ताला सोडून बाकी सर्वजण खगडियाबाहेर राहतात. त्यांच्यापैकी एक भाऊ परदेशात, बहुधा इंग्लंडमध्ये राहतो, तर उर्वरित दोन भावांपैकी एक दिल्लीमध्ये काम करतो. या घरात मनीष गुप्ता एका केअरटेकरसोबत राहत होता.”

मनीष कुमारच्या घराची झडती घेण्यासाठी पोलिसांना अनेक तास लागले.

पोलिसांनी मनीषच्या घरातील स्वयंपाकघर आणि व्हरांड्यात ठेवलेल्या कपाटातून 31 लिटर विदेशी दारू जप्त केली.

मनीष हा गोगरी पोलीस ठाण्यानजीक असलेल्या पाच मजली बंगल्यात एकटा राहतो. त्याचा घराची झडती घ्यायला पोलिसांना कित्येक तास लागले.

फोटो स्रोत, Ranveer Kumar

खगडिया पोलिसांनी पत्र परिषदेद्वारे तब्बल 29 ब्रँडेड दारूची नावे जाहीर केली आहेत. विदेशी दारूव्यतिरिक्त सुमारे 10 लिटर बिअर आणि 30 लिटर सोडा वॉटर देखील जप्त करण्यात आले आहे.

मनीषकडून एकूण 20 क्रेडिट कार्ड, 8 डेबिट कार्ड, 4 चेकबुक, तसेच अॅपल कंपनीचे 2 लॅपटॉप आणि 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

मनीषच्या घरातून जप्त करण्यात आलेली क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि चेकबुक यापैकी बहुतांश मनीष कुमारच्या नावावर आहेत. मात्र, काही कागदपत्रं आर. एन. कुमार, मुकेश कुमार गुप्ता आणि अजित कुमार यांसारख्या इतर व्यक्तींच्या नावावरही आहेत.

याशिवाय मनीषच्या घरातून बाराशिंग्याची दोन शिंगे देखील जप्त करण्यात आली आहेत.

अस्खलित इंग्रजी, देहबोली आणि एकटे जीवन

या मनीष कुमारने इतक्या सहजपणे लोकांची फसवणूक कशी केली? या प्रश्नावर स्थानिक पत्रकार रणवीर कुमार सांगतात की, मनीषचे वडील परमेश्वर प्रसाद गुप्ता स्थानिक केडीएस कॉलेजमध्ये शिकवत होते. त्यांनी यापूर्वी काही मालमत्ता खरेदी केली होती.

मनीषच्या घराबाहेर सध्या एक मोठी विस्तीर्ण बाग आहे, तिथे पूर्वी शेती केली जात असे. सुमारे सहा वर्षांपूर्वी मनीषने त्या शेताचे बागेत रूपांतर केले आणि एक आलिशान घर बांधण्यास सुरुवात केली.

ते पुढे सांगतात, “या घराच्या बाहेर दोन पहारेकरी नेहमी सिक्युरिटी गार्डप्रमाणे बसलेले असायचे आणि कोणालाही घराच्या आत प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. मनीष एकटाच राहत होता आणि तो कोणाशीही फारसा मिसळत नसे. तो दहावीच्या परीक्षेत खगडियातून पहिला आला होता, मात्र याची पुष्टी होऊ शकली नाही.”

मनीष अविवाहित आहे.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान, मनीषने आपण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा अंडरकव्हर एजंट असल्याचे सांगितले.

फोटो स्रोत, Ranveer Kumar

एसडीपीओ चंदन कुमार सांगतात की, “मनीष गेल्या काही वर्षांपासून युपीएससीची तयारी करत होता. तो अस्खलित इंग्रजी बोलत असे. त्यामुळे तो आयएएस अधिकारी नाही, असा कोणालाही संशय आला नाही.”

एसपी भानू प्रताप सिंह यांनीही या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, “मनीष गेल्या आठ-दहा वर्षांपासून आपण आयएएस अधिकारी असल्याचा दावा करत होता, पण तो कायद्याच्या कचाट्यातून वाचत राहिला. “त्याने आपली देहबोली अशा प्रकारे विकसित केली होती की तो एखाद्या अधिकाऱ्यासारखाच वाटत असे.”

पोलीस कोठडीची प्रतीक्षा

9 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये बीएनएसच्या कलम 204, 205, 212, 213, 318(2), 319(2), 336(3) आणि 340(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासोबतच जम्मू आणि काश्मीर वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1978 मधील कलम 51 देखील लावण्यात आले आहे.

दरम्यान, मनीषच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या दारूच्या संदर्भात स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

मनीष कुमारविरोधात लावण्यात आलेली बीएनएसची कलमे प्रामुख्याने लोकसेवक असल्याचे भासवणे, फसणुकीच्या हेतूने एखाद्या चिन्हाचा किंवा प्रतीकाचा वापर करणे आणि बनावट कागदपत्रे तयार करणे यांसारख्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत.

मनीष कुमारला सध्या खगडिया येथील विभागीय कारागृहात ठेवण्यात आलं आहे.

गोगरीचे एसडीपीओ चंदन कुमार यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, “या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOU) पथकाने एकदा भेट दिली आहे. आम्हाला अद्याप मनीष गुप्ताची रिमांड मिळालेली नाही. सोमवारपर्यंत कोठडी मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

बीबीसी हिंदीने एसपी भानू प्रताप सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी व्हॉट्सअॅपवरील संदेशांनाही प्रतिसाद दिलेला नाही.

परदेशातही मालमत्ता असण्याची शक्यता

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, “मनीष कुमार बिहारमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लोकांची फसवणूक करत होता. पोलीस सध्या मनीष कुमारच्या मालमत्तेचे मूल्यांकन करत आहेत.”

दरम्यान, अनेक माध्यमांनी मनीष कुमारकडे 100 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे वृत्त दिले आहे. असं असलं तरी या दाव्याची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही.

मनीष कुमारच्या अटकेनंतर खगडियाचे एसपी भानू प्रताप सिंह म्हणाले, “टेस्लासारखी गाडी सामान्यत: आढळून येत नाही. या प्रकरणात आम्ही आर्थिक गुन्हे शाखेसह (EOU) अनेक तपास यंत्रणांची मदत घेत आहोत.”

मनीषने स्वतःला भारत सरकारचा वरिष्ठ अधिकारी म्हणून भासवण्यासाठी या वाहनाचा वापरही केला.

फोटो स्रोत, Ranveer Kumar

त्यांनी पुढे सांगितलं की, मनीष गुप्ताच्या मालमत्तेचे मूल्यांकन केले जात आहे. तसेच ही मालमत्ता त्याने कशाप्रकारे आणि कोणत्या माध्यमातून मिळवली, याचाही तपास केला जात आहे.

“या प्रकरणात आर्थिक फसवणुकीसोबतच लोकांना धमकावण्यात आले आणि त्यांच्यात दहशत निर्माण करण्यात आली आहे,” असं ते म्हणाले.

मनीषची बिहारसोबतच परदेशातही मालमत्ता असल्याची माहिती आम्हाला मिळाली असून त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा मोठ्या स्तरावर तपास केला जात असून आणखी काही अटक होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC