Home LATEST NEWS ताजी बातमी ‘मी झोपलेली असताना माझा जोडीदार माझ्यावर बलात्कार करत होता, याची मला कल्पनाच...

‘मी झोपलेली असताना माझा जोडीदार माझ्यावर बलात्कार करत होता, याची मला कल्पनाच नव्हती’

7
0

Source :- BBC INDIA NEWS

46 वर्षीय ॲडेल ओव्हरटन आणि 44 वर्षीय स्टीव्हन युडेन हे 13 वर्षांहून अधिक काळ एकत्र राहत होते. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Adelle Overton

“मला वाटत होतं की, हे माझ्या आयुष्यातील सर्वात चांगलं नातं होतं. पण त्याने जे काही केलं होतं, त्याची कबुली दिली, आणि सर्वच बदलून गेलं.”

ॲडेल ओव्हरटन तिचा बॉयफ्रेंड स्टीव्हन युडेनला एक आदर्श जोडीदार मानत होती. ते दोघेही मागील 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

दोघांची भेट एका झॉम्बी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. दोघांच्या आवडीनिवडी सारख्याच होत्या. ओव्हरटन सांगते की, युडेन खूप प्रेमळ आणि काळजी घेणारा होता. ती जेव्हा आजारी होती, तेव्हा तिची काळजी घेण्यासाठी युडनने नोकरीही सोडली होती.

डर्बी येथील आपल्या घराच्या सोफ्यावर बसलेली ओव्हरटन म्हणते, “तो खूप चांगला होता. माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि आजही मी त्याच्यावर थोडं-फार प्रेम करतेच.”

ओव्हरटनचा युडेनवर पूर्ण विश्वास होता. पण युडेननेच ओव्हरटनवर बलात्कार केल्याचं मान्य केल्यानंतर हा विश्वास तुटला.

ओव्हरटन म्हणतात, “मला लगेचच जाणवलं की माझा विश्वासघात झाला आहे. त्यापूर्वी कोणत्याही नात्यात मला इतकं सुरक्षित कधीच वाटलं नव्हतं.”

ओव्हरटनवर ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार सुरू असताना युडेन तिची काळजी घेत होता. मात्र, नंतर त्यानेच पोलिसांना सांगितलं की, ओव्हरटन औषधांच्या प्रभावाखाली असताना त्याने तिच्यावर बलात्कार केला होता.

ओव्हरटन म्हणते, “मला वाटत होतं की, मी त्याला चांगलं ओळखते. परंतु, आता मला कळत नाही की तो नेमका कोण होता. आता तो मला अनोळखी माणसासारखा वाटतो.”

“तो 13 वर्षांपासून माझ्यासोबत राहत होता. माझ्या मुलांना वाढवण्यातही त्याने मला मदत केली.”

“मला वाटत होतं की मी सुरक्षित आहे, पण तसं नव्हतं.”

युडेन सध्या तुरुंगात आहे. ओव्हरटनने आपल्यासोबत जे घडलं, त्याबद्दल बोलण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या अनुभवामुळे इतरांना मदत होईल, अशी तिला आशा आहे.

ओव्हरटन आणि युडेन या दोघांची भेट 2009 मध्ये नॉटिंघममध्ये एका झॉम्बी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी ओव्हरटन 29 वर्षांची, तर युडेन 27 वर्षांचा होता.

युडेन मेकअप आणि अभिनयाचं काम करत होता, तर ओव्हरटन कलाकार होती. त्यावेळी दोघेही वेगवेगळ्या नात्यांमध्ये होते. मात्र, त्यांची मैत्री कायम होती आणि ते एकमेकांच्या संपर्कात होते.

ते अखेर 13 जानेवारी 2012 रोजी रिलेशनशिपमध्ये आले. ओव्हरटनला ती तारीख अजूनही आठवते.

ओव्हरटनने म्हटलं, युडेनसोबतचं नातं तिच्या आधीच्या नात्यांपेक्षा खूप वेगळं होतं.

ती म्हणते, “तो नेहमी आनंदी आणि माझी काळजी घेणारा होता. त्याने मला प्रेमाची जाणीव करून दिली.”

युडेन आणि ओव्हरटन एकमेकांसोबरत डेट करायला सुरुवात करायच्या आधीपासूनच एकमेकांचे मित्र होते.

त्यांची भेटही एका वेगळ्या पद्धतीने झाली होती आणि त्यांचं एकत्र आयुष्यही काहीसं वेगळं होतं. दोघेही एका कंपनीसाठी प्रोफेशनल झॉम्बी म्हणून काम करत होते. ही कंपनी लोकांसाठी झॉम्बी सर्व्हायव्हल हॉरर अनुभवाचे कार्यक्रम आयोजित करत असत.

झॉम्बीची भूमिका करण्यासाठी ओव्हरटनला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावं लागत होतं. परंतु, एहलर्स-डॅनलोस सिंड्रोममुळे 2017 मध्ये तिला हे काम सोडावं लागलं.

यानंतर 2018 च्या सुरुवातीपासून युडेन तिची काळजी घेऊ लागला.

ती म्हणते, “त्याने माझ्यासाठी जवळपास सर्व काही केलं.”

पण आता मागे वळून पाहताना ओव्हरटनला (जिला डेल या नावानेही ओळखलं जातं) वाटतं की, युडेन हळूहळू तिच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू लागला होता.

ती म्हणते, “मी काय काय करू शकते, हे सगळ्यांना सांगायला त्याला खूप आवडायचं.”

“जर कोणी मला एखादं काम करण्यास सांगितलं, तर तो लगेच म्हणायचा, ‘मला वाटत नाही की डेल हे करू शकेल. त्यापेक्षा दुसरं काही करूया.'”

दोघांनी एका इव्हेंट कंपनीसाठी झॉम्बीची भूमिका केली होती.

फोटो स्रोत, Adelle Overton

पण आता ओव्हरटनना कळलं आहे की, युडेनचं वागणं तिच्या कल्पनेपेक्षाही खूप वेगळं आणि धक्कादायक होतं.

2020 मध्ये ब्रेस्ट कॅन्सरसाठी केमोथेरपी सुरू असताना ओव्हरटनला पहिल्यांदा याबद्दल संशय आला होता.

ती म्हणते, “माझ्या शरीराला काहीतरी जाणवलं होतं की काय, मला माहीत नाही. पण तो माझ्यासोबत असं करत असतानाच मला जाग आली.”

“त्याने अनेक कारणं सांगितली. तो म्हणाला, ‘मला वाटलं तू जागी होतीस आणि तुला काय होतंय हे माहीत आहे.'”

“त्या वेळी आम्ही खूप तणावातून जात होतो. आणि तो म्हणत होता की, त्याच्याकडून हे चुकून झालं.”

त्यामुळे ओव्हरटनने आपल्या मनात आलेल्या संशयाकडे दुर्लक्ष केलं.

ती म्हणते, “कदाचित ते खोटं मानणं सोपं होतं. कारण खरं काय घडलं असेल, याचा विचार करणं खूप कठीण होतं.”

ओव्हरटन सांगते की, तिच्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबीयांना युडेन हा एक आदर्श जोडीदार वाटत होता.

फोटो स्रोत, Adelle Overton

पण त्यानंतर ओव्हरटनला झोप येणं कठीण होऊ लागलं.

ती म्हणते, “कदाचित माझ्या मनात कुठेतरी झोपताना मला असुरक्षित वाटत होतं.”

ओव्हरटन सांगते की, युडेनसोबत जवळीक साधणंही तिच्यासाठी कठीण होऊ लागलं होतं. तिच्यासोबत पूर्वी झालेल्या लैंगिक शोषणाच्या वाईट आठवणी तिला पुन्हा येऊ लागल्या होत्या.

“त्या वेळी मला वाटलं की, मी हे सगळं माझ्या जुन्या वाईट अनुभवाशी जोडतेय. त्यामुळे मी त्याच्यावर आणि त्याने केलेल्या गोष्टीवर जास्तच रागावतेय, असं मला वाटलं.”

“मी स्वतःला दोषी मानू लागले.”

अखेर युडेनने सत्य मान्य केलं

युडेनने तब्बल 5 वर्षांनंतर, म्हणजे 2025 पर्यंत ही गोष्ट मान्य केली नव्हती. शेवटी त्याला स्वतःला आतड्यांच्या कॅन्सरचे निदान झाले आणि त्यावर उपचार सुरू असताना त्याने हा गुन्हा कबूल केला.

ओव्हरटन म्हणते, “मला वाटतं, त्याच्या मनात काहीतरी चाललं असावं. कारण आता तो मी ज्या परिस्थितीतून जात होते, ती वेगळ्या नजरेने पाहत होता.”

“तो म्हणू लागला की, जेव्हा माझ्यावर उपचार सुरू होते, तेव्हा तिने माझी नीट काळजी घेतली नाही.”

हे ऐकल्यावर ओव्हरटनला 5 वर्षांपूर्वीची घटना आठवली. त्यावेळी झोपेतून उठल्यावर तिने युडेनला तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवताना पाहिलं होतं. ती म्हणते, “मी त्याला लगेचच दूर ढकललं.”

“2025 मध्ये मी त्याला विचारलं, ‘तुला नेमकं काय म्हणायचं आहे? मी तुझी काळजी घेतली नाही, म्हणजे काय? मी काय केलं नाही?'”

अखेरीस युडेनने ओव्हरटनसमोर आपण केलेला गुन्हा मान्य केला.

ओव्हरटनच्या मते, ही चर्चा 2 दिवस सुरू होती. यादरम्यान युडेनने एका मित्राला फोन करून आपण काय केलं, हे त्याला सांगितलं. त्यानंतर घरी परतल्यावर त्याने ओव्हरटनसमोरही आपला गुन्हा कबूल केला.

ओव्हरटनला आपला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं आणि तिला त्याची खूप घृणाही वाटली. तरीही तिने हे नातं लगेचच संपवलं नाही. कारण ती युडेनवर अवलंबून होती आणि ती त्याच्यावर प्रेमही करत होती.

ओव्हरटन आधीपासूनच लैंगिक अत्याचाराच्या वाईट अनुभवातून सावरण्यासाठी थेरपी घेत होती. तिने थेरपीच्या सत्रात याचा उल्लेख ही केला होता.

ती म्हणते, “एका थेरपिस्टने मला या परिस्थितीतून बाहेर पडायला मदत केली. कारण मी पूर्णपणे खचून गेले होते. मी ओक्साबोक्सी रडत होते, ‘मी काय करू? त्याला हे करण्यापासून कसं थांबवू?'”

“त्यांनी मला सांगितलं, ‘त्याला घराबाहेर काढ आणि पोलिसांना फोन कर.’ त्याच दिवशी नंतर त्यांनी सांगितलं की, सुरक्षेबाबत त्यांची एक बैठक झाली होती आणि ते या प्रकरणाची माहिती पोलिसांना देणार आहेत. तेव्हा मला जाणवलं की, आता हे प्रकरण माझ्या हातात राहिलेलं नाही.”

ओव्हरटनसमोर गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी युडेनला अटक केली.

फोटो स्रोत, Derbyshire Police

हे प्रकरण ब्रिटनमधील डर्बीशायर पोलिसांच्या डिटेक्टिव्ह सार्जंट एलेनोर किर्टन यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं.

त्या म्हणतात, “सर्वात आधी मी ॲडेलशी (ओव्हरटन) संपर्क केला.”

“जे काही घडलं होतं, त्यामुळे ती खूपच अस्वस्थ झाली होती.”

ओव्हरटनची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी युडेनला अटक केली.

एलेनोर म्हणतात, “मी त्याची चौकशी घेतली तेव्हा त्याने लगेचच आपण केलेला गुन्हा मान्य केला.”

“त्याने लगेचच ओव्हरटनवर बलात्कार केल्याचं मान्य केलं. तपास इतक्या लवकर पुढे जाणं ही खूपच असामान्य गोष्ट होती.”

युडेनवर बलात्काराचे 2 आरोप ठेवण्यात आले होते. नंतर त्याने न्यायालयात आपला गुन्हा मान्य केला. त्याला 6 वर्षे आणि 8 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

किर्टन यांच्या मते, ओव्हरटनने पुढे येऊन घेतलेल्या निर्णयामुळे इतर महिलांचं संरक्षण करण्यास मदत झाली.

त्या पुढे म्हणतात, “तिच्या धाडसामुळे आणि ठामपणामुळे आम्ही इतर अनेक लोकांना वाचवू शकलो. कारण हा व्यक्ती पुढेही अशाच प्रकारचे गुन्हे करू शकला असता.”

“जर कोणाला वाटत असेल की, त्यांच्यासोबतही असं काही घडत आहे, तर त्यांनी आमच्याकडे येऊन याबद्दल बोलावं, असं मी आवर्जून सांगेन. कारण आम्ही नक्कीच काहीतरी मदत करू शकतो. हे प्रकरण त्याचंच उदाहरण आहे.”

डिटेक्टिव्ह सार्जंट एलेनोर किर्टन म्हणतात की, ओव्हरटन यांनी दाखवलेल्या धाडसामुळे इतर महिलांचं संरक्षण करण्यास मदत झाली आहे.

परंतु, 13 वर्षे सोबत राहिलेल्या आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या युडेनने झोपेत आपल्यावर बलात्कार का केला, हे ओव्हरटनला अजूनही समजून घेणं कठीण जात आहे.

ती म्हणते, “समोरची व्यक्ती कोणतीच प्रतिक्रिया देत नसताना कोणाला त्यातून आनंद कसा मिळू शकतो, हे मला समजत नाही. हीच गोष्ट मला अजूनही कळत नाही.”

“हे कसं सांगावं, मला माहीत नाही. त्याला महिलांसोबत झोपण्याची आवड होती.”

“त्याला मी झोपी जावं असं वाटत होतं. तो काय करत आहे, हे मला कळू नये, असंही त्याला वाटत होतं.”

ओव्हरटनला संशय आहे की, युडेन तिच्या औषधांमध्ये काहीतरी मिसळून तिला गुंगीच्या अवस्थेत ठेवत होता. या औषधांवर त्याचं पूर्ण नियंत्रण होतं.

ओव्हरटन सांगते की, ती आणि युडेन 13 वर्षे एकत्र राहिले.

फोटो स्रोत, Adelle Overton

ती सांगते, “माझ्याकडे औषधांच्या छोट्या-छोट्या डब्या होत्या. तोच माझ्यासाठी सगळी औषधं काढून द्यायचा.”

“मला दाट संशय आहे की, मला झोपेत ठेवण्यासाठी तो मला गरजेपेक्षा जास्त औषधं देत होता.”

किर्टन सांगतात की, पोलिसांच्या मते हे एक ‘वेगळं प्रकरण’ होतं. त्यामुळे फॉरेन्सिक आणि टॉक्सिकॉलॉजी तपासातून युडेनने असं केलं होतं की नाही, हे सिद्ध होऊ शकलं नाही.

याशिवाय, याबाबत न्यायालयात कोणताही पुरावा सादर करण्यात आला नाही.

पण युडेनने पोलिसांना सांगितलं की, ओव्हरटनची केमोथेरपी सुरू असताना त्याने तिच्यावर एकदा बलात्कार केला होता. केमोथेरपीमुळे व्यक्ती खूप थकलेली असतात.

किर्टन म्हणतात, “मला वाटतं, त्यानेच त्या वेळी याचा उल्लेख केला होता. त्याने सांगितलं की, ओव्हरटनवर केमोथेरपी सुरू होती. या घटनेच्या वेळी ती औषधांच्या प्रभावाखाली असावी, असंही त्याने मान्य केलं.”

ॲडेल ओव्हरटनची मुलगी शेरी ओव्हरटन म्हणते की, तिला आपल्या आईचा अभिमान आहे. कारण तिच्या आईने 'आपल्या हक्कासाठी आवाज उठवला.'

युडेनवर ओव्हरटनवर 2 वेळा बलात्कार केल्याचा आरोप होता. पण, ओव्हरटनला वाटतं की त्याने असं अनेक वेळा केलं असावं.

“त्याने मला सांगितलं की, त्याने माझ्यासोबत असं 7 ते 8 वेळा केलं होतं,” असं ओव्हरटन सांगते.

तिची मुलगी शेरी ओवरटन म्हणते की, युडेनने केलेल्या गुन्ह्यांचा तिच्या आईवर झालेला परिणाम पाहणं तिच्यासाठी खूप कठीण होतं.

शेरी म्हणते, “आता ती खूप बदललेली वाटते. तिचा आत्मविश्वास खूप कमी झाला आहे, हे मला जाणवतंय.”

“मला याचाही खूप अभिमान आहे की, तिने हिंमत दाखवली, पोलिसांशी आणि न्यायालयाशी ती बोलली आणि आपल्या हक्कासाठी ठामपणे उभी राहिली.”

ओव्हरटनला आशा आहे की, तिच्या कहाणीमुळे लोकांना हे समजेल की, ज्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे, अशा व्यक्तींकडून होणारा छळ किंवा त्रास सहन करण्याची गरज नाही.

ती म्हणते, “मला वाटतं, याबद्दल बोलणं गरजेचं आहे. कारण माझ्यासोबत जे घडलं, त्यामुळे मला विचार करायला भाग पडलं की, माझ्यासारख्या किती आजारी लोकांच्या आयुष्यावर दुसऱ्याच व्यक्तीचं नियंत्रण असतं.”

ती म्हणते, “सर्व सत्य समोर आल्यानंतर काही महिने मला वाटत होतं की, कदाचित माझी काळजी घेतल्याच्या बदल्यात मला हे सहन करावं लागलं. कदाचित ती जवळीक साधणे अपेक्षित असावं. पण तसं नव्हतं. आणि इतर कोणालाही असं करण्याची गरज नाही.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC