Source :- BBC INDIA NEWS

मेस्सीनं हॅटट्रिक करून क्लोसच्या विक्रमाची बरोबरी केली

फोटो स्रोत, Getty Images

तो फुटबॉलच्या विश्वातील दिग्गज, बड्या खेळाडूंचा दिवस होता. मात्र इतक्या मोठ्या फुटबॉलपटूंच्या उपस्थितीत देखील लिओनेल मेस्सी हाच आकर्षणाचं मुख्य केंद्रबिंदू ठरला. त्याचा कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

फ्रान्सच्या किलियन एमबाप्पे आणि नॉर्वेच्या एर्लिंग हॅलंड यांनी विश्वचषकात प्रत्येकी दोन गोल करून उत्तम सुरुवात केली होती.

पण त्यानंतर काही तासांतच फुटबॉल विश्वचषकाचे मैदान आणखी एका सामन्यासाठी सज्ज झाले होते.

या सामन्याचं मुख्य आकर्षण होता लिओनिल मेस्सी. या सामन्यात त्याने हे पुन्हा सिद्ध केलं की हा पूर्णपणे मेस्सीचा शो आहे.

मेस्सीची ही विश्वचषकातील पहिली हॅट्रिक होती. विश्वचषकात 16 गोल करण्याच्या विक्रमाशी केलेली बरोबरी होती. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती. ती म्हणजे वय हे त्याच्या खेळातील अडसर नसून तो अजूनही मैदानावर अधिराज्य गाजवतोय हे मेस्सीनं सर्वांच्या लक्षात आणून दिलं.

अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव केला. या जबरदस्त विजयाच्या केंद्रस्थानी मेस्सीच होता. तिन्ही गोल मेस्सीच्याच नावे होते.

कॅन्सस सिटीच्या क्षितिजापलीकडे सूर्य मावळत असताना 38 वर्षांचा मेस्सी इतिहास घडवत होता. सहा विश्वचषकांमध्ये खेळणारा इतिहासातील तो पहिला खेळाडू ठरला होता.

त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या एक दिवस आधी त्यानं ही कामगिरी केली होती.

20 वर्षांनंतरदेखील खेळातील जादू कायम

मेस्सीनं 2006 च्या जर्मनीतील विश्वचषकात पदार्पण केलं होतं. त्यावेळेस तो 18 वर्षांचा होता.

20 वर्षांनंतरदेखील फुटबॉलच्या या महान सुपरस्टार पैकी एक असलेल्या मेस्सीने आपल्या देशासाठी 200 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि आपल्या प्रतिभेची झलक सर्वांना दाखवली.

मात्र या सामन्यात मेस्सीनं पहिला गोल झळकावल्यानंतर काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. कारण अर्ध्या तासाचा खेळ झाल्यानंतर मेस्सीचा बूट आयसा मँडीच्या टाचेच्या वरच्या बाजूला लागला होता. मात्र असं होऊनही यासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही. आणि त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला.

स्टेडियमच्या आत आणि बाहेर मोठ्या संख्येने मेस्सीचे चाहते उपस्थित होते.

फोटो स्रोत, Getty Images

नंतर मेस्सी म्हणाला, “माझं कुटुंब, माझा संघ-माझे सहकारी, जे नेहमीच माझ्या पाठीशी असतात, त्यांच्याबरोबर या क्षणाचा आनंद घेणं हा खरोखरंच एक सुंदर क्षण आहे.”

“या संघात अतिशय एकजूट आहे आणि तो खूपच मजबूत आहे. मला खूप छान वाटतं आहे. एका कठीण सामन्यात आम्हाला विजय मिळाला ही आमच्यासाठी सुदैवी गोष्ट होती. पहिल्याच सामन्यात विजयी कामगिरीनं सुरुवात करणं महत्त्वाचं असतं.”

तो पुढे म्हणाला, “मी माझ्या चाहत्यांचा ऋणी आहे. कारण अर्जेंटिनाला या खेळाचं किती प्रचंड वेड आहे, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं स्टेडियम आम्ही पुन्हा एकदा पाहिलं.”

“आता मी ज्या गोष्टीचा अनुभव घेतोय तो माझ्यासाठी एक प्रकारचा बोनसच आहे. मी स्वत:ला सुदैवी, नशीबवान मानतो. कारण व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही पातळ्यांवर माझी स्वप्नं पूर्ण झाली आहे. किंबहुना मी स्वप्नात पाहिलं होतं त्यापेक्षा जास्तच मला मिळालं आहे.”

अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कॅलोनी म्हणाले, “मेस्सीचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. गेल्या 20 वर्षांपासून त्यानं आम्हाला अशा थक्क करणाऱ्या गोष्टी पाहायची सवय लावली आहे. त्याला खेळताना पाहणाऱ्या प्रत्येकाला तो प्रेरणा देतो.”

‘विश्वचषकातील पहिलाच गोल असल्यासारखा मेस्सीचा जल्लोष’

या सामन्यात पुढे काय घडणार आहे याची झलक सुरुवातीला पाहायला मिळाली होती.

सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला मेसी डिफेन्सला चकवत पुढे गेले आणि त्यांनी चेंडू अल्जेरियाचा गोलरक्षक लुका झिदानच्या पुढून नेटमध्ये टाकला. मात्र ‘ऑफसाईड’ दिल्यामुळे हा गोल रद्द ठरला आणि स्वप्नवत सुरुवात होण्याची संधी हुकली.

तरीही चाहत्यांनी जल्लोष केला, जणू काही त्यांच्या संघाने विश्वचषकच जिंकला होता. पत्रकारांनी एकमेकांकडे पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता. जे घडणार होते, त्याची चाहूल लागली होती. हे फक्त थोडा वेळ लांबले होते.

मग सामन्यातील 18 व्या मिनिटाला मेस्सीचा तो खास क्षण आला. गोलपासून 25 यार्डांवर असताना मेस्सीनं चेंडू त्याच्या डाव्या पायाकडे घेतला आणि एक अफलातून वक्राकार फटका मारत फुटबॉल गोलच्या उजव्या कोपऱ्यात वरच्या दिशेला मारला.

मेस्सीने आपला पहिला गोल करताच, स्टेडियममधील चाहत्यांनी आनंदाने जल्लोष सुरू केला.

फोटो स्रोत, Getty Images

अल्जेरियाचा गोलरक्षक झिदान, फ्रान्सचा दिग्गज फुटबॉलपटू झिनेदिन झिदानचा मुलगा आहे. मेस्सीचा गोलकडे पाठवलेला फुटबॉल अडवण्यासाठी त्यानं दोन्ही हात लांबवले. मात्र या फटक्यात प्रचंड ताकद होती. गोल झाल्यानंतर मेस्सी भावूक झाला होता. हा त्याचा विश्वचषकातील 14 वा गोल होता. त्यानंतर या गोलचा आनंद साजरा करताना कॅन्सस सिटी स्टेडियम चाहत्यांच्या जल्लोषानं दुमदुमून गेलं. ती एका ऐतिहासिक संध्याकाळची सुरुवात होती.

एव्हरटनचा माजी मिडफिल्डर असलेला लिओन ओस्मान म्हणाला त्याप्रमाणे, “मेस्सी जणूकाही हा त्याचा विश्वचषकातील पहिलाच गोल असल्यासारखा जल्लोष करतो आहे. त्याच्याकडे इतकी जबरदस्त क्षमता आहे की त्याचं वय वाढतच नाही आणि ते त्याच्या खेळाच्या आडच येत नाही असं वाटतं. एक अप्रतिम पास होत फुटबॉल त्याच्या पायांपर्यंत पोहोचला. मग अपेक्षेनुसार त्यानं त्याचं रूपांतर एक जबरदस्त गोलमध्ये केलं.”

मेस्सी

फोटो स्रोत, Chris Brunskill/Fantasista/Getty Images

मेस्सीनं फुटबॉलच्या या व्यासपीठावर पदार्पण केल्याला दोन दशकं उलटून गेली आहेत. तो त्याचा विक्रमी 27 वा विश्वचषक सामना खेळत होता. मात्र वयाच्या या टप्प्यावर देखील त्याच्या खेळाची जादू कायम आहे. संपूर्ण सामनाभर मेस्सी सतत गोल करण्याच्या संधी शोधत होता. अर्जेंटिनाच्या पुढील चालीचा अंदाज घेत होता. तो तंदुरुस्त, वेगवान आणि धोकादायक खेळाडू वाटत होता.

सामन्यात 60 मिनिटांनंतर मेस्सीनं पुन्हा एक गोल केला. झिदानच्या एका महागड्या चुकीमुळे फुटबॉल मेस्सीकडे आला. नेहमीच्या संयमानं मेस्सीन चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवला. ते केल्यानंतर तो विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात गोल करणाऱ्या खेळाडूच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून फक्त एक गोल मागे होता. हा गोल केल्यानंतर तो विश्वचषकात दोन गोल करणारा सर्वात वयस्कर फुटबॉलपटू ठरला.

या क्षणापर्यंत तरी वयाचा मेस्सीच्या क्षमतेवर, खेळावर कोणताही परिणाम झालेला नाही. वयाची 35 वर्षे झाल्यानंतर मेस्सीनं विश्वचषकात 10 गोल केले आहेत. या स्पर्धेत हॅरी केन, दिएगो मॅराडोना, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि थिएरी हेन्री या दिग्गज खेळाडूंनी प्रत्येकानं त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या गोलपेक्षा मेस्सीनं केलेल्या गोलची संख्या जास्त आहे. थोडक्यात मेस्सीनं त्यांच्यापेक्षा अधिक गोल विश्वचषकात केले आहेत.

तो ऐतिहासिक क्षण

सामन्याच्या 76 व्या मिनिटाला मेस्सीनं त्याची हॅट्रिक पूर्ण केली. बदली खेळाडू निको गोन्झालेझ यानं पास दिल्यानंतर मेस्सीनं गोल केला. जणूकाही विधिलिखितच होतं.

या गोलनंतर मेस्सीनं मिरोस्लाव क्लोस या जर्मनीच्या खेळाडूच्या विक्रमाची बरोबरी केली. आता विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वाधिक गोल खेळाडूंच्या पंक्तीत तो जाऊन बसला आहे.

मग मेस्सीनं हात उंचावून, आकाशाकडे पाहत आणि अर्जेंटिनाच्या हजारो चाहत्यांच्या तोंडातून त्याच्या नावाचा जयघोष ऐकत तो ऐतिहासिक क्षण अनुभवला. मेस्सीसाठीदेखील हा विशेष क्षण होता. मग संपूर्ण स्टेडियम चाहत्यांच्या जल्लोषात बुडून गेलेलं असताना मेस्सीनं तिथे असलेल्या त्याच्या हजारो समर्थकांचे आभार मानले.

जेव्हा त्याच्या जागी बदली खेळाडू आला आणि तो मैदानातून बाहेर गेला, तेव्हा सर्व प्रेक्षक उठून उभे राहिले आणि त्यांनी त्याला मानवंदना दिली. स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट आणि संपूर्ण कॅन्सास सिटीमध्ये त्याचं नाव घुमत होतं.

मेस्सीनं मिरोस्लाव क्लोस या जर्मनीच्या खेळाडूच्या विक्रमाची बरोबरी केली. आता विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वाधिक गोल खेळाडूंच्या पंक्तीत तो जाऊन बसला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

सामन्याची शेवटची शिटी वाजल्यानंतरदेखील अर्जेंटिनाचे हजारो चाहते जल्लोष सुरू ठेवत स्टेडियममध्येच थांबले होते.

स्टेडियममध्ये जणूकाही निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा समुद्रच होता. तिथे ढोल सतत वाजत होते आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांचा तुफानी जल्लोष सुरू होता.

अनेकांनी पाठीवर मेस्सीचं नाव लिहिलेल्या जर्सी घातल्या होत्या. तर काहींनी त्यांच्या अंगावर काढलेले मेस्सीचे टॅटू दाखवले. प्रत्येक संभाषणात मेस्सीचं नाव होतं, तोच सर्वत्र व्यापलेला होता.

त्याच्या चाहत्यांसाठी तो फक्त फुटबॉलपटू नाही, तर त्याहूनही अधिक आहे. अर्जेंटिनाचे चाहते मेस्सीचं वर्णन ‘हिरो’, ‘आदर्श’, ‘आमचा मुलगा’ अशा शब्दांनी करत होते.

चार वर्षांपूर्वी अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देण्यासाठी तो प्रेरणास्रोत ठरला होता. मेस्सीचा खेळ इतका जबरदस्त आहे की तो त्याच्या देशाला आणखी एक स्पर्धा जिंकून देणार नाही, असं कोण म्हणेल?

कॅन्सस सिटी चीफ्सचा क्वार्टरबॅक स्थानावर खेळणारा खेळाडू पॅट्रिक महोम्स हा सहसा या स्टेडियममधील आकर्षणाचं केंद्र असतो. मात्र इतरांप्रमाणेच त्याच्यावर देखील मेस्सीच्या जादूनं गारुड केलं होतं. तोही थक्क होऊन पाहत होता.

सुपरस्टार्सच्या त्या दिवशी, अर्जेंटिनाचा जा चिरतरुण फुटबॉलपटू त्या सर्वांपेक्षा वरचढ ठरला.

रेड कार्ड मिळालं नाही हे मेस्सीचं नशीब होतं?

सामन्याच्या पूर्वांधात जर एका गोष्टीसाठी मेस्सीला पंचांनी रेड कार्ड दाखवलं असतं, सगळं चित्रच बदललं असतं. त्यावेळेस अर्जेंटिनाचा संघ 1-0 नं आघाडीवर होता.

मेस्सीचे बूट मँडीच्या पोटरीला खालच्या बाजूला लागल्याचं दिसत होतं. मात्र रेफरी शायमॉन मार्सिनियाक किंवा व्हिडिओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) या दोघांनीही त्यासंदर्भात पुढील कारवाईची गरज वाटली नाही.

मँचेस्टर सिटीचा माजी डिफेंडर नेडूम ओनुओहा ईएसपीएनला म्हणाला, “त्यावेळेस रेड कार्ड दाखवायला हवं होतं.”

तो म्हणाला, “त्या क्षणाकडे दुर्लक्ष झालं. खेळाडून जेव्हा जमिनीवर पडलेला होता, तेव्हा मेस्सीच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. कारण त्यानं असं काहीतरी केलं होतं, ज्यामुळे तो अडचणीत येऊ शकला असता.”

अर्जेंटिनामध्येही लोकांनी मोठ्या स्क्रीनवर सामन्याचा आनंद घेतला.

फोटो स्रोत, Getty Images

फ्रान्स आणि आर्सेनलचा माजी स्ट्रायकर थिएरी हेन्री, फॉक्स स्पोर्ट्सला म्हणाला, “अशा प्रकारच्या परिस्थितीचं जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे विश्लेषण करता तेव्हा त्यामध्ये खेळाडूचा हेतू खूप महत्त्वाचा ठरतो.”

“तुम्ही जेव्हा ते दृश्य पुन्हा पाहता तेव्हा तुम्हाला स्पष्टपणे दिसतं की लिओनेल मेस्सीचं लक्ष फुटबॉलवर आहे. तो फुटबॉलचा हाताळण्याचा प्रयत्न करतो आहे. कोणालाही दुखापत करण्याचा त्याचा हेतू नाही.”

“हो, तिथे संपर्क झाला आहे. ते पाहताना थोडं विचित्र वाटतं. मात्र प्रत्येक वेळेस खेळाडूंमध्ये टक्कर झाली की रेड कार्ड दिलं जात नाही.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC