Home LATEST NEWS ताजी बातमी रशियातील प्लेग संशोधकाचा मृत्यू; ‘ब्लॅक डेथ’चा जीवाणू पुन्हा चर्चेत आल्यावर ट्रम्प काय...

रशियातील प्लेग संशोधकाचा मृत्यू; ‘ब्लॅक डेथ’चा जीवाणू पुन्हा चर्चेत आल्यावर ट्रम्प काय म्हणाले?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

रशियातील प्लेग संशोधकाचा मृत्यू; 'ब्लॅक डेथ'चा जीवाणू पुन्हा चर्चेत आल्यावर ट्रम्प काय म्हणाले?

सायबेरियातील एका प्लेग संशोधन केंद्रात मृत्यू झालेल्या रशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या प्रकरणावर अमेरिका “अत्यंत गांभीर्यानं” लक्ष ठेवून आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

(प्लेग हा जीवाणूंमुळे होणारा गंभीर संसर्गजन्य आजार असून इतिहासातील ‘ब्लॅक डेथ’ साथीमागे हाच रोग कारणीभूत होता. उपचार न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो, मात्र अँटिबायोटिक्समुळे त्यावर उपचार शक्य आहेत)

अमेरिका या प्रकरणावर बारकाईनं नजर ठेवून आहे. या घटनेमुळे न्यूमोनिक प्लेग पसरण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे, मात्र घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे.

(न्यूमोनिक प्लेग हा प्लेगचा सर्वात धोकादायक प्रकार असून तो यर्सिनिया पेस्टिस या जीवाणूमुळे फुफ्फुसांमध्ये संसर्ग निर्माण करतो. संक्रमित व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकांमधून तो थेट दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो आणि उपचार न केल्यास जीवघेणा ठरू शकतो. ब्यूबोनिक प्लेगमध्ये संसर्ग लसिकाग्रंथींवर (लिंफ नोड्स) होतो, तर न्यूमोनिक प्लेग थेट फुफ्फुसांवर परिणाम करतो आणि तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडेही पसरू शकतो.)

रशियातील इरकुत्स्क प्रांताचे गव्हर्नर इगोर कोब्जेवनी या मृत्यूचं कारण ‘अज्ञात कारणांमुळे झालेला न्यूमोनिया’ असल्याचं सांगितलं. महिलेच्या कामाशी संबंधित ‘कोणताही सूक्ष्मजीव’ तिच्या ‘जैव नमुन्यांमध्ये’ आढळल्याची स्पष्ट झालेलं नाही, असं ते म्हणाले आहेत,

अद्याप सत्यता न पडताळलेल्या काही वृत्तांनुसार, ही महिला रोगजनकांनी भरलेली टेस्ट ट्यूब तुटल्यानंतर आजारी पडली होती किंवा ज्या भागात उंदरांमध्ये नैसर्गिकरित्या प्लेग आढळतो, त्या भागातून परतल्यानंतर तिला संसर्ग झाला असावा.

रशियातून प्लेग पसरण्याच्या धोक्याबाबत अमेरिकेची भूमिका काय असेल, असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी याबाबत रशियाशी चर्चा केलेली नाही असं सांगितलं.

ते म्हणाले, “तिथं अशी समस्या निर्माण झालेली पाहणं मला आवडत नाही. आम्ही मदत करू. कोणालाही (कोणत्याही प्रदेशात) अशा प्रकारची समस्या असेल, त्याला आम्ही नेहमी मदत करू.”

इगोर कोब्जेव यांनी रशियाची ग्राहक आणि आरोग्य देखरेख संस्था रोस्पोत्रेबनादझोरचा संदर्भ देत सांगितलं की, प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या मृत्यूनंतर प्लेग संस्थेतील इतर कोणत्याही कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे जावं लागल्याची माहिती नाही.

यावर देखरेख करणाऱ्या संस्थेनं सांगितलं, जैवसुरक्षा पथकानं इरकुत्स्कमधील अँटी-प्लेग इन्स्टिट्यूट ऑफ सायबेरिया अँड द फार ईस्टची तपासणी केली असून तिथं कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसल्याची स्पष्ट करण्यात आलं आहे,

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी नागरिकांना अफवांकडे लक्ष न देण्याचं आणि रोस्पोत्रेबनादझोरच्या अधिकृत निवेदनावर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं.

नक्की काय घडलं?

मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या सुमारे 200 लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे, असं रशियन माध्यमांनी गेल्या आठवड्यात वृत्त दिलं होतं.

जेव्हा एका पत्रकारानं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांना रशियातील संशयित प्लेग प्रकरणाबाबत ताजी माहिती विचारली, तेव्हा ते म्हणाले, “असं दिसतं की प्रयोगशाळेतील एका कर्मचाऱ्याला संसर्ग झाला होता आणि तो किमान प्रयोगशाळेच्या आत तरी पसरू शकतो, याची चिंता आहे.”

ते पुढं म्हणाले, “जर अशी कोणती गोष्ट प्रयोगशाळेबाहेर गेली, तर ती वेगानं पसरू शकते. म्हणूनच आम्ही यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. घाबरण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही. पण याकडे लक्ष देण्याची आणि परिस्थितीवर नजर ठेवण्याची नक्कीच गरज आहे आणि आम्ही तेच करत आहोत.”

रशियन माध्यमांनी मृत महिलेचं नाव डारिया असल्याचं म्हटलं आहे. तिचं वय सुमारे 20 वर्षं होतं. अलीकडेच डारियाने मंगोलियाच्या सीमेवरील बुर्यातिया प्रदेशाला भेट दिली होती.

रशियातील प्लेग संशोधकाचा मृत्यू; 'ब्लॅक डेथ'चा जीवाणू पुन्हा चर्चेत आल्यावर ट्रम्प काय म्हणाले?

यर्सिनिया पेस्टिस हा प्लेगचा जीवाणू 14 व्या शतकात युरोपमधील जवळपास अर्ध्या लोकसंख्येच्या मृत्यूस कारणीभूत ठरला होता. त्या काळात या साथीला ब्लॅक डेथ म्हणून ओळखलं जात होतं. हा जीवाणू मंगोलियालगतच्या बुर्यातिया प्रदेशात मर्मोटसारख्या उंदरांमध्ये आढळतो.

1920 च्या दशकात प्लेगचा उद्रेक झाल्यानंतरच अँटी-प्लेग इन्स्टिट्यूट ऑफ सायबेरिया अँड द फार ईस्टची स्थापना करण्यात आली होती.

रीडिंग विद्यापीठातील सेल्युलर मायक्रोबायोलॉजीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सायमन क्लार्क यांनी बीबीसी रेडिओ 4 च्या पीएम कार्यक्रमात सांगितलं, न्यूमोनिक प्रकारच्या यर्सिनिया पेस्टिस संसर्गावर उपचार न केल्यास तो जवळपास नेहमीच प्राणघातक ठरतो. मात्र अँटिबायोटिक्सच्या मदतीनं त्यावर उपचार करता येतात.

ते म्हणाले, “न्यूमोनिक प्लेग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो आणि हीच त्याबद्दलची मुख्य चिंता आहे.”

ते पुढं म्हणाले, “मात्र कोणत्याही संसर्गजन्य आजाराच्या उद्रेकाची बातमी ऐकल्यावर लोकांच्या मनात लॉकडाऊन आणि कोविडसारख्या गोष्टींची आठवण येते. पण इछं तसं काही होणार नाही.”

क्लार्क म्हणाले, “अनेकांना वाटतं, ‘अरे, प्लेग तर संपला, तो शेकडो वर्षांपूर्वी होता.’ पण तसं नाही.”

ते म्हणाले, “तो अजूनही अस्तित्वात आहे आणि जगातील काही भागांमध्ये मानवी आरोग्यासाठी धोका ठरतो. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे.”

हा रोगजनक जैविक शस्त्र म्हणून वापरण्याच्या संभाव्य हेतूनं त्याचा अभ्यास केला जाऊ शकतो का, असा प्रश्न वैज्ञानिकांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ते शक्य असल्याचं मान्य केलं.

क्लार्क म्हणाले, “ही घटना रशियात घडल्यामुळे लोकांचं लक्ष तिकडं जात आहे. मात्र मला वाटतं की मी याआधी दिलेलं स्पष्टीकरणच अधिक अचूक आहे.”

सुरत

1994 मध्ये सुरतमध्ये प्लेगचा उद्रेक झाला. त्याचा प्रसार नंतर भारतातील इतर शहरांमध्ये झाला होता. त्याचा प्रसार अवघ्या दोन आठवड्यांहून थोडा जास्त काळ टिकला. मात्र या घटनेमुळे देशभर अभूतपूर्व भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्याचे परिणाम जगभरातही जाणवले.

सुरुवातीला सुरतमधील डॉक्टरांना हा नेमका कोणता आजार आहे, हे ओळखता आलं नव्हतं. पण प्लेगचं निदान होताच तातडीने प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार सुरू करण्यात आले. प्रतिपिंडांसह (अँटीबॉडीज) इतर वैद्यकीय उपाययोजना केल्यामुळे हा रोग सुरत, दिल्ली, कलकत्ता, मुंबई आणि आसपासच्या भागांपुरताच मर्यादित राहिला.

या उद्रेकात 1,200 पेक्षा कमी लोकांना प्लेगची लागण झाल्याचं निदान करण्यात आलं होतं.

सन 2000 मध्ये करण्यात आलेल्या डीएनए-आधारित संशोधनाने सुरतमधील हा उद्रेक प्लेगचाच असल्याचं ठामपणे सिद्ध केलं. मात्र भारतात आढळलेल्या प्लेगच्या नमुन्यांमध्ये जगातील इतर भागांतील नमुन्यांच्या तुलनेत अधिक आनुवंशिक विविधता आढळल्याचंही या अभ्यासातून स्पष्ट झालं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूचे प्रकाशन)

SOURCE : BBC