Source :- BBC INDIA NEWS

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील अलीगंज भागात एका खाजगी कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 मुलांचा मृत्यू झाला असून, अन्य चार जण जखमी झाले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितलंय की, या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अपघातानंतर अग्निशमन दलाची शोधमोहीम पूर्ण झाली आहे.
यापूर्वी, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी म्हटलं होतं की, “मी स्वतःच्या डोळ्यांनी 11-12 मृतदेह पाहिले आहेत.”
त्यानंतर, जेव्हा एका पत्रकारानं विचारलं की “इथून 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत,” तेव्हा उपमुख्यमंत्री म्हणाले, “मी 14 किंवा 13 पाहिले आहेत.”
उपमुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?
याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले की, “या घटनेत एकूण 14 मुले आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून, चार मुले जखमी झाली आहेत. त्यांना केजीएमयू (KGMU) ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे.”
“या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. माननीय मुख्यमंत्री अलीगडमधील त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करून इथे येत आहेत.
जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळवून देणं, हीच प्राथमिकता आहे. संपूर्ण सरकार बाधित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत देऊ.
शोध मोहीम पूर्ण झाली असून आता आतमध्ये कुणीही नाही. संपूर्ण इमारतीची तपासणी करण्यात आली आहे,” असंही ते म्हणाले.
फोटो स्रोत, ANI
या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यात हयगय केली जाणार नाही, असंही उपमुख्यमंत्री म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेबाबत निवेदन जारी केलं आहे. ते अलीगडच्या दौऱ्यावर होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते लखनौकडे रवाना झाले आहेत.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, “लखनौमध्ये एक दुर्घटना घडली आहे. तिथे आगीच्या विळख्यात काही मुले अडकली होती. त्यामध्ये काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशासन घटनास्थळी मदतकार्यात गुंतले आहे.”
योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ (X) वरील एका पोस्टद्वारे शोकग्रस्त कुटुंबांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
त्यांनी लिहिलं की, “लखनौमधील एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची आणि अनेकजण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे.”
मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांबद्दल माझ्या अत्यंत संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरं होण्याची आशा करतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




