Source :- BBC INDIA NEWS
Deepak Gupta/Hindustan Times via Getty Images
वाचन वेळ: 3 मिनिटे
लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये सैनिकांची भरती करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेत एक मोठा बदल करण्यात आला आहे.
या बदलानंतर, 75 टक्के अग्निवीरांना अतिरिक्त दोन वर्षांची मुदतवाढ मिळेल.
जुन्या नियमांनुसार, चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर केवळ 25 टक्के अग्निवीरांना कायम केलं जात असे आणि उर्वरित 75 टक्के जणांना सेवेतून काढून टाकलं जात असे.
संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे की, “पूर्व-निश्चित तरतुदींनुसार गुणवत्तेच्या आधारावर 25 टक्के अग्निवीरांना संरक्षण दलांमध्ये नियमित रोजगार दिला जाईल. उर्वरित अग्निवीरांना त्यांच्या इच्छेनुसार दोन वर्षांचा अतिरिक्त सेवा कालावधी दिला जाईल.”
दोन वर्षांची अतिरिक्त सेवा पूर्ण झाल्यावर, सर्व अग्निवीरांना त्यांच्या इच्छेनुसार आणि निवडीचे निकष पूर्ण केल्यास नियमित सैनिक म्हणून समाविष्ट केलं जाईल.
केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी अग्निपथ योजनेतील या बदलाला मंजुरी दिली. याला ‘सेकंड टूर ऑफ ड्युटी’ असं म्हटलं जात आहे.
@PIB_India
मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान, संरक्षण दल प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणी म्हणाले की, “आपणास माहीत आहेच की, 25 टक्के अग्निवीरांना गुणवत्तेच्या आधारावर सशस्त्र दलात समाविष्ट केलं जाईल. यापूर्वी, या योजनेत अशी तरतूद होती की 75 टक्के अग्निवीर नागरी जीवनात परततील.”
ते म्हणाले की, “मात्र, आता उर्वरित 75 टक्के अग्निवीरांना या योजनेअंतर्गत दोन वर्षांचा अतिरिक्त सेवा कालावधी दिला जाईल. हा कालावधी पूर्ण झाल्यावर, सर्व इच्छुक अग्निवीरांना विहित निकषांच्या आधारे निवड करून सशस्त्र दलांमध्ये समाविष्ट केलं जाईल.”
मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “यामुळे निवडीचे निकष पूर्ण करणाऱ्या सर्व इच्छुक अग्निवीरांना चार किंवा सहा वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर नियमित सैनिक म्हणून सामील होण्याची संधी देखील मिळेल.”
त्यांनी लिहिलंय की, “हा निर्णय आमच्या संरक्षण दलांमधील दीर्घकालीन संरचनात्मक सुधारणांशी सुसंगत आहे. भविष्यातील आव्हानांसाठी अधिक तरुण, अधिक सक्षम आणि अधिक सज्ज सैन्यदल तयार करणं, हा यामागील उद्देश आहे.”
राजनाथ सिंह यांच्या मते, “हे केवळ एक भरती धोरण नाही, तर युद्धाच्या बदलत्या स्वरूपानुसार भारतीय सैन्याला तयार करण्याच्या दिशेनं उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे.”
अग्निपथ योजना
@rajnathsingh
- अग्निपथ योजना काय आहे?
अग्निपथ योजना ही भारतीय लष्कराच्या तीन शाखांमध्ये, म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदल, जवान, हवाई सैनिक आणि खलाशी या पदांवर भरतीसाठी संरक्षण मंत्रालयानं सुमारे चार वर्षांपूर्वी सुरू केलेली एक योजना आहे.
सध्याच्या योजनेनुसार, चार वर्षांनंतर गुणवत्तेच्या आधारावर केवळ 25 टक्के अग्निवीरांनाच कायमस्वरूपी नोकरी दिली जाते.
बुधवारी झालेल्या घोषणेनंतर, अग्निवीरांचा कार्यकाळ चार वर्षांवरून सहा वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
जर तुमचे वय साडे सतरा ते एकवीस वर्षांच्या दरम्यान असेल, तर तुम्ही या योजनेअंतर्गत भरती होण्यासाठी अर्ज करू शकता.
- अग्निपथ योजनेअंतर्गत तिन्ही सेवांमधील अधिकाऱ्यांचीही भरती केली जाते का?
नाही, ही योजना अधिकारी पदांसाठी नाही. त्यांच्यासाठी वेगळी भरती प्रक्रिया आहे.
- अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या सैनिकांच्या कामाची परिस्थिती आणि भत्ते इतर सैनिकांपेक्षा वेगळे असतात का?
सशस्त्र दलांच्या तिन्ही शाखांनी सांगितलं आहे की, कामाची परिस्थिती आणि सर्व भत्ते पूर्वीप्रमाणेच राहतील. अग्निवीरांना शिधा, गणवेश आणि प्रवासाशी संबंधित सर्व भत्ते मिळतात.
मात्र, अग्निवीरांना महागाई भत्ता आणि लष्करी सेवेचं वेतन मिळत नाही.
Santosh Kumar/Hindustan Times via Getty Images
सहा वर्षांच्या सेवेनंतर सैन्य सोडणाऱ्या अग्निवीरांना कोणत्याही प्रकारचं निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी, कॅन्टीन सुविधा आणि आरोग्य सुविधा मिळण्याचा हक्क असेल का?
लष्करानं जाहीर केलं आहे की, सेवेदरम्यान अग्निवीरांना सैन्यात सेवा बजावताना उपलब्ध असलेल्या आरोग्य आणि कॅन्टीन सुविधा मिळतील.
परंतु सहा वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर, ते कोणत्याही प्रकारच्या पेन्शन किंवा ग्रॅच्युइटीसाठी पात्र राहणार नाहीत, तसेच त्यांना माजी सैनिकांसाठी उपलब्ध असलेल्या वैद्यकीय आणि कॅन्टीन सुविधांचा लाभही घेता येणार नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




