Home LATEST NEWS ताजी बातमी अब्दुल अल-सैयद यांचं भारतासोबत आहे ‘हे’ खास नातं, ज्यांनी अमेरिकेच्या मिडटर्म निवडणुकीत...

अब्दुल अल-सैयद यांचं भारतासोबत आहे ‘हे’ खास नातं, ज्यांनी अमेरिकेच्या मिडटर्म निवडणुकीत जिंकून इतिहास रचलाय

3
0

Source :- BBC INDIA NEWS

मिशिगनमधून विजय मिळविणारे अब्दुल अल-सैयद त्यांची पत्नी डॉक्टर सारा जुकाकू यांच्यासोबत.

अमेरिकेतील मिशिगनमधून अब्दुल अल सैयद हे डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर म्हणून निवडून आले आहेत. अमेरिकेच्या सिनेटमध्ये निवडून जाणारे अब्दुल अल-सैयद हे पहिले मुस्लीम आहेत. त्यांचं भारतासोबतही खास कौटुंबिक नातं आहे. त्यांच्या पत्नी डॉ. सारा जुकाकू यांचं कुटुंब मूळ कर्नाटकातील भटकळ या गावातील.

सारा यांचे आजोबा जुकाकू शमशुद्दीन यांच्यामुळेच भटकळमध्ये वीज पोहोचली होती. ते या भागातले पहिले वकीलही होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री बीडी जत्ती (1958-1962) यांच्या सरकारमध्ये उपमंत्री होते.

डॉ. सारा जुकाकू यांचे दुसरे एक नातेवाईक एसएम याह्यासुद्धा वकीलच होते. त्यानंतर तेही मुख्यमंत्री देवराज उर्स (1972-1977 आणि 1978-1980) यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी या भागातील शिक्षणासाठी महत्त्वाचं काम केलं.

व्यवसायाने डॉक्टर असलेले अल-सैयद हे अमेरिकेतील पहिले मुस्लिम सिनेटर बनले आहेत. त्यांना या निवडणुकीत 50 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली. त्यांच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाचे माइक रोजर्स होते. त्यांना 45 टक्के मतं मिळाली.

डॉक्टर अल-सैयद यांनी याआधी कोणतंही राजकीय पद सांभाळलं नव्हतं.

या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला पराभवाचा धक्का बसला. हाती आलेल्या निकालांनुसार, अमेरिकेच्या संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटमध्ये आता डेमोक्रॅटिक पक्षाचे 54 आणि रिपब्लिकन पक्षाचे 44 सदस्य आहेत.

दुसरीकडे अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे 228 आणि रिपब्लिकन पक्षाचे केवळ 139 सदस्य आहेत.

या सभागृहात बहुमताचा आकडा 218 आहे आणि अजून 68 जागांचे निकाल येणं बाकी आहे. म्हणजेच दोन्ही सभागृहात डेमोक्रॅटिक पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे.

‘अरब असण्यापेक्षाही मी जास्त भारतीय’

निवडणूक प्रक्रियेदरम्यान आपल्या विरुद्ध चालविण्यात आलेल्या मोहिमेबद्दल बोलताना अल-सैयद यांनी म्हटलं की, “माझं लग्न एका दक्षिण भारतीय कुटुंबात झालं आहे. आमच्या लग्नाला 20 वर्षं पूर्ण झाली आहेत. आता मी कुटुंबाचाच एक भाग आहे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण मी अरब असण्यापेक्षाही जास्त भारतीय आहे.”

डॉक्टर सारा यांची आत्या आणि बालरोगतज्ज्ञ डॉक्टर आलिया नाझनीन जुकाकू या भटकळमध्येच राहतात. बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना त्यांनी म्हटलं, “आम्ही खूप खूश आहोत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. अल-सैयद काही वर्षांपूर्वीच भटकळ आणि बंगळुरूला आले होते.”

मिशिगनमधून विजय मिळविणारे अब्दुल अल-सैयद त्यांची पत्नी डॉक्टर सारा जुकाकू यांच्यासोबत.

त्यांनी पुढे म्हटलं की, “ते अतिशय हसतमुख, लोकांमध्ये मिळून-मिसळून राहणारे आणि मदतीला तयार असणारे आहेत. त्यांच्यासोबत वेळ घालवणं हे आनंददायी असतं. त्यांना आमच्या भटकळ भाषेतील काही शब्द बोलता येतात. डॉक्टर सारा यांचं कुटुंब इंग्रजीमधूनच संभाषण करतं.”

डॉक्टर आलिया यांचे भाऊ डॉक्टर तैयब जुकाकू आहेत. ते अब्दुल अल-सैयद यांची पत्नी डॉक्टर सारा यांचे वडील आहेत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर तैयब अमेरिकेला गेले होते.

डॉक्टर सारा यांचा जन्म आणि त्यांचं संगोपन, शिक्षण सगळं अमेरिकेतच झालं.

डॉक्टर आलिया या शमशुद्दीन यांच्या धाकट्या कन्या. शमशुद्दीन यांचं निधन 1964 साली वयाच्या 51व्या वर्षी झालं होतं.

मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये झाली होती पहिली भेट

डॉक्टर सारा आणि अल-सैयद यांची भेट मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये झाली होती. दोघेही ऱ्होड्स स्कॉलर होते.

अल-सैयद यांनी मिशिगन युनिव्हर्सिटी आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केलं. ते साथरोगतज्ज्ञ (Epidemiologist) आहेत.

2015 साली डेट्रॉइट आरोग्य विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या नियुक्तीची मोठी चर्चा झाली.

डॉक्टर सारा यांच्या आते भावाने म्हटलं की, माझे मामा डॉक्ट तैयब वर्षातून एकदा सगळ्या कुटुंबाचा एक स्नेहमेळावा आयोजित करायचे. सैयद यांच्या भारतात येण्याचं कारणही तेच होते.”

त्यांनी या लेखात आपलं नाव प्रसिद्ध करू नये, असं म्हटलं.

डॉ. सारा यांचे वडील डॉ. तैयब वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेला गेले.

डॉक्टर आलिया यांनी म्हटलं, “सैयद हे खूप प्रतिभावान आहेत आणि सर्व लोकांची परिस्थिती चांगली असावी यासाठी धडपडणारे आहेत. ते एलजीबीटीक्यू समुदायासह इतरांच्या अधिकारांसाठीही संघर्ष करत आहेत. ते मानवतेसाठी काम करत आहेत.”

त्यांनी पुढे म्हटलं, “माझे वडील (शमशुद्दीन) यांना भटकळमध्ये खूप प्रतिष्ठा होती. आम्हाला त्यांच्या वारशाचा अभिमान आहे. सैयद माझ्या वडिलांचा वारसा पुढे चालवतील अशी आशा आम्हाला आहे.”

डॉक्टर आलिया यांनी म्हटलं की, त्यांचे वडील अतिशय गरीब कुटुंबातून आले होते.

त्यांनी म्हटलं, “ते दिवसातून केवळ एकच वेळ जेवण करायचे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करावं लागायचं. माझे आजोबा एमएम सिद्दीकी यांनी त्यांना कायद्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली आणि त्यांचं लग्न करून दिलं.

अब्दुल अल-सय्यद यांनी आपल्या विजयाचे श्रेय पत्नी डॉ. सारा यांनाही दिले.

डॉक्टर आलिया यांनी सांगितलं, “मुख्यमंत्री जत्ती यांच्या सरकारात पाच वर्षं उपमंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांचं निधन झालं. माझ्या आईने सांगितलं की, त्यांनी जाताना 25 रुपयेही शिल्लक ठेवले नव्हते. माझ्या आईला 10 मुलांच्या शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागला.”

डॉक्टर सारा यांच्या एका आते भावाने म्हटलं की, “माझे आजोबा आणि अल-सैयद यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक साम्यं आहेत. ते प्रामाणिक, स्पष्टवक्ते आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी कटीबद्ध आहेत. माझे अजून एक मामा एसएम याह्याही असेच होते. त्यांनी देवराज उर्स यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलं होतं.”

याह्या हे एक प्रामाणिक आणि भ्रष्टाचार-मुक्त मंत्री म्हणून ओळखले जात होते.

भारत ते अमेरिकेपर्यंत विस्तारलेलं कुटुंब

शमशुद्दीन यांचं कुटुंब भटकळ, बंगळुरू आणि अमेरिकेमध्ये विस्तारलं आहे. या कुटुंबातील बहुतांश सदस्य हे डॉक्टर किंवा इंजिनिअर आहेत.

डॉक्टर आलिया यांनी म्हटलं, “माझे पती स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी आणि मी परदेशात काम केलं आहे. पण आमच्या कौटुंबिक मुळांशी जोडले राहण्याच्या उद्देशाने आम्ही परत आलो आहोत. भटकळमध्ये डॉक्टरांची संख्या कमी आहे. दुसरीकडे डॉक्टर सहज उपलब्ध होतात.”

डॉक्टर सारा यांचे आजोबा एमएम सिद्दीकी यांनी भटकळमध्ये अंजुमन हमी-ए-मुस्लिमीनची स्थापना केली होती.

मिशिगनमधून विजय मिळविणारे अब्दुल अल-सैयद त्यांची पत्नी डॉक्टर सारा जुकाकू यांच्यासोबत.

ही संस्था नर्सरी स्कूलपासून इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत शैक्षणिक संस्थांचा कारभार पाहते. शमशुद्दीन यांनी समाजातील सर्व घटकांना विचारात घेऊन अजुमनचं काम पुढं नेलं होतं.

अल-सैयद यांनी आपली संपत्ती जाहीर करताना सांगितलं होतं की, डॉक्टर सारा यांच्या नावाने बंगळुरूमध्ये एक प्रॉपर्टी आहे, जी भाड्याने दिली आहे.

शिगनमध्ये अब्दुल अल-सैयद यांचे समर्थक.

निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवसांमध्ये अल-सैयद यांच्यासाठी परिस्थिती जास्तच आव्हानात्मक बनली होती. त्यांच्याच डेमोक्रॅटिक पक्षातील सहकारी हेली स्टीव्हन्स यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माइक रोजर्स यांना समर्थन देण्याची घोषणा केली. हेली स्टीव्हन्स यांना डॉक्टर अल-सैयद यांनी पक्षाच्या नामांकनाच्या शर्यतीत थोड्याच फरकाने हरवलं होतं.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह अनेक उदारमतवादी डेमोक्रॅटिक नेत्यांनी अल-सैयद यांच्या प्रचार मोहिमेला समर्थन दिलं होतं. अल-सैयद यांनी अमेरिकन सैन्याने इस्रायलला केलेल्या मदतीवर टीका केली होती. तसंच अब्जाधीशांवर टॅक्स लावून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी निधी उभारण्याचंही आश्वासन दिलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC