Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, PrajwalBhalerao/BBC
-
Published
-
वाचन वेळ: 5 मिनिटे
बुलढाणा जिल्ह्यातलं छोटंसं गाव धामणगाव. गावाचा मुख्य व्यवसाय शेती, गावात एक मंदिर, एक चौक, एक हॉटेल आणि एक महावितरणचं कार्यालय.
महाराष्ट्राच्या कुठल्याही गावात असतं असं हे चित्र. पण या गावात बाईकवरून फिरणाऱ्या, महावितरणमध्ये काम करणाऱ्या एका लेकीचा अनेकांना अभिमान आहे. त्यांचं नाव ज्योती आहेर.
महावितरणमध्ये गेल्या चार वर्षांपासून काम करणाऱ्या ज्योती बुलढाणा जिल्ह्यातल्या धामणगावात वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारी सोडवतात. सोशल मीडिया, माध्यमं आणि तिच्या विभागात त्यांची ओळख महिला ‘महिला वायरमन’ अशी असली तरी गावकऱ्यांसाठी त्यांची ती लेक आहे.
कंबरेला प्लायर, मागे लोखंडी पोल चढण्यासाठीचे बूट, खांद्यावर सुरक्षेचा बेल्ट आणि हातात कामासाठी लागणारे साहित्य. ज्योती यांचा हा पेहराव आता गावकऱ्यांना नेहमीचा झालाय.
गावाच्या चौकात एक वयोवृद्ध आजोबा त्यांना हात करून थांबवतात. “केलं ना काल?” ते विचारतात.
“केलं… कालच केलं. बारा-एक वाजता,” ज्योती आहेर उत्तर देतात आणि पुन्हा पुढची तक्रार सोडवायला निघतात.
ही काही मोठी घटना नाही. पण धामणगावात ज्योती यांची ओळख समजून घ्यायची असेल, तर एवढा प्रसंग पुरेसा आहे.
गावात वीज गेली, काही बिघाड झाला किंवा कुठे लाईन बंद पडली की अनेकांचा पहिला फोन त्यांच्याकडेच येतो.
‘पुरुषांचं मानलं गेलेलं काम’
वीज वितरण व्यवस्थेतील फिल्डवरचं काम अनेक दशकांपासून पुरुषांचं क्षेत्र मानलं जात होतं. पोल चढणं, फ्यूज बदलणं, तुटलेल्या लाईन दुरुस्त करणं किंवा पावसात, वादळात बाहेर पडून वीजपुरवठा सुरळीत करणं अशी कामं करताना फारशा महिला दिसत नव्हत्या.
महावितरणने 2013 मध्ये महिलांना लाइनस्टाफच्या पदांवर संधी देण्यास सुरुवात केली. त्या काळात सुमारे 2,200 महिला ‘विद्युत सहाय्यक’ म्हणून भरती झाल्या, तर 2013 मधील एका वृत्तानुसार 2,206 महिलांची टप्प्याटप्प्याने भरतीसाठी निवड झाली होती.

2024 मधील एका बातमीनुसार, महावितरणमध्ये सुमारे 55 हजार कर्मचारी असून त्यापैकी जवळपास 10 हजार महिला आहेत.
ज्योती त्या बदलाचा भाग आहे. पण त्यांच्याशी बोलताना आपण काही वेगळं करत आहोत, अशी जाणीवही त्यांना नसल्याचं दिसतं.
‘ड्युटीचं टायमिंग फिक्स नसतं’
“लाईट गेली की लगेच फोन येतात. ड्युटीचा टायमिंग काय फिक्स नाही आमच्या. चोवीस तास, केव्हा फोन आला तेव्हा जावं लागतं. अर्ध्या रात्रीसुद्धा.”
धामणगाव सेक्शनमध्ये काम करत असलेल्या ज्योती यांच्यासोबत एक दिवस घालवताना त्यांच्या या वाक्याचा अर्थ प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो.
पहिली तक्रार गावाबाहेरच्या शेतात होती. आम्ही दुचाकीने तिथपर्यंत गेलो. त्यानंतर जवळपास एक किलोमीटर पायपीट करत एका लोखंडी पोलपर्यंत पोहोचलो. त्या पोलवर एक जुनी डीपी होती.
फोटो स्रोत, PrajwalBhalerao/BBC
पोलवर चढण्याआधी ज्योतीने सर्वात आधी कार्यालयाला फोन केला. संबंधित लाईनचा वीजपुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. खात्री झाल्यानंतरच तिने सुरक्षेचा पट्टा बांधला, हातमोजे घातले आणि पोलवर चढायला सुरुवात केली.
पोलवर चढणं हा या कामाचा फक्त एक भाग आहे. संबंधित लाईन बंद आहे, याची खात्री करण्यापासून ते काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सावधगिरी आवश्यक आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर ती खाली उतरली. सुरक्षित अंतरावर गेल्यावर पुन्हा कार्यालयाला फोन करून वीजपुरवठा सुरू करण्यास सांगितलं. काही मिनिटांत त्या भागात पुन्हा वीज आली.
‘पहिल्यांदा पोल चढताना…’
आज लोखंडी पोल सहज चढणाऱ्या ज्योती पहिल्यांदा मात्र घाबरल्या होत्या. अप्रेंटिसशिपच्या काळात प्रशिक्षण सुरू असताना सरावासाठीच्या खांबावर त्यांना चढायला सांगितलं गेलं.
“मी म्हटलं, ‘मॅडम, मी कशी चढू?'” त्यावर उत्तर आलं, “‘जा… पडलीस तर मी दवाखान्यात नेईन.'”
ज्योती कसाबसा पोल चढल्या. त्यानंतर आठ दिवस सराव केला. “आता मी लोखंडी पोल सहज चढते,” त्या हसत सांगतात.
फोटो स्रोत, PrajwalBhalerao/BBC
ज्योती यांच्या कंबरेला कायम एक प्लायर अडकवलेला असतो. “हा माझा जीव की प्राण आहे. हा सोडून मी कुठेच जाऊ शकत नाही.” सुरक्षेसाठीचा बेल्ट, हातमोजे, बूट, अर्थिंग रॉड आणि प्लायर प्रत्येक वस्तू त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे.
त्या स्वतःला कधीच ‘धाडसी’ म्हणत नाही. पण त्यांचं काम पाहताना धाडस हा रोजच्या कामाचा भाग असल्याचं लक्षात येतं. ज्योती यांच्या लक्षात राहिलेली एक घटना त्या आजही सांगतात.
एका संध्याकाळी संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. डीपीचा फ्यूज गेला होता. फोनवर फोन येत होते. त्या वेळी त्यांच्यासोबत इतर कोणताही कर्मचारी नव्हता.
“मग धाडस केलं. गावातले काही मित्र मदतीला आले. फ्यूज टाकण्याचा प्रयत्न सुरू असतानाच डीपीत मोठा स्पार्क झाला. सगळे लोक घाबरून गेले. अंगाला कापरं सुटलं.”
असे प्रसंग ज्योतीच्या कामाचा भाग आहेत. सुरुवातीला घाबरलेली ज्योती आता या कामात सराईत झाल्या आहेत.
‘वर्दी घालायचीच होती’
ज्योती यांच्यासाठी ही नोकरी फक्त रोजगार नाही. लहानपणी त्यांनाही इतर मुलांसारखंच वर्दीचं आकर्षण होतं. “पोलीस व्हायचं होतं. नाहीतर आर्मीमध्ये जायचं होतं,” पण उंची कमी पडली. ते स्वप्न अपूर्ण राहिलं. मात्र वर्दी घालण्याची इच्छा कायम राहिली.
महावितरणच्या भरती यादीत नाव आलं, तो दिवस आजही त्यांना स्पष्ट आठवतो. “खूप आनंद झाला.” त्या दिवशी त्यांच्या कुटुंबानं आणि गावकऱ्यांनी मिळून पाच-सात किलो साखर वाटली.
ज्योती यांचे वडील चालक आहेत. चार मुलांना शिकवताना त्यांनी प्रत्येकाला समान संधी दिली. ज्योती स्वतःला अभ्यासात ठिकठाक पण खेळात पुढे होते, असं सांगतात. त्यांच्या कुटुंबातील त्या पहिल्या सरकारी कर्मचारी ठरल्या.
ज्योती यांच्या कार्यालयात कनिष्ठ अभियंता पदावर काम करणारे सुमित खबुतरे, त्यांच्याबद्दल बोलताना अभिमान लपवत नाहीत.
त्यांच्या मते, फिल्डवरचं काम महिलांसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असतं. पण ज्योती यांनी ते केवळ स्वीकारलं नाही, तर अनेकदा त्या पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने, काही वेळा त्यांच्यापेक्षाही चांगलं काम करतात, असं ते म्हणाले.
“तिने आम्हालाही महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला शिकवलं,” असं ते म्हणाले. धामणगावात ज्योती यांच्यासोबत फिरताना हे शब्द खरे वाटतात.
फोटो स्रोत, PrajwalBhalerao/BBC
गावातल्या महिला त्यांच्याकडे अभिमानाने पाहतात. तर अनेकांसाठी त्या आता इतक्या परिचित झाल्या आहेत की तिचं पोल चढणंही रोजचंच दृश्य बनलं आहे.
ज्योती यांवा मी विचारलं, “तुम्हाला मी वायरमन म्हणलेलं आवडेल की वायरवुमन?” त्या काही क्षण थांबल्या. “लोक तर मला नावानेच हाक मारतात… ज्योती म्हणतात.”
त्यानंतर त्या सहज म्हणाल्या, “वायरवुमन म्हटलं काय… वायरमन म्हटलं काय… काम तर एकच करणार ना?”
दिवसभर तिच्यासोबत फिरल्यानंतर माझ्या लक्षात राहिलेलं एक दृश्य म्हणजे शेतातून चालणाऱ्या ज्योती. एका हातात अर्थिंग रॉड, कंबरेला प्लायर, खांद्यावर जबाबदारी. शरीरानं सडपातळ असलेली ही तरुणी चालताना मात्र एखाद्या अनुभवी कर्मचाऱ्याचा आत्मविश्वास घेऊन चालत असते.
कामाचं श्रेय मिळालं नाही तरी त्यांना त्याचं फारसं वाटत नाही. “लोकांच्या समस्या दूर होतात… आम्हाला खूप समाधान आहे. आम्ही केलं म्हणून त्यांचं काम झालं… बस्स.”
कदाचित म्हणूनच धामणगावात वीज गेली की लोक महावितरणला नाही, तर थेट ज्योती यांनाच फोन करतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




