Home LATEST NEWS ताजी बातमी कुणी ठरवलं बायकांची भाषा पुरुषांच्या भाषेपेक्षा वेगळी असायला पाहिजे? – ब्लॉग

कुणी ठरवलं बायकांची भाषा पुरुषांच्या भाषेपेक्षा वेगळी असायला पाहिजे? – ब्लॉग

2
0

Source :- BBC INDIA NEWS

जंतर-मंतरवरील पोरी 'फ्रेंड्स'ना रागात बोलल्या तर बिघडलं कुठे?

फोटो स्रोत, Getty Images

बालवयात खेळताना चीटिंग करणाऱ्या मैत्रीणीला मी दिलेली शिवी जशीच्या तशी आजही माझ्या लक्षात आहे. माझी शिवी ऐकून रडीचा डाव खेळणाऱ्या मैत्रिणीने घरी ‘चुगली’ केली.

मला करेक्ट करण्यासाठीच जन्म घेतलेल्या, श्यामच्या नव्हे, तर शिल्पाच्या आईने मला त्या शिवीसाठी धोपटून काढले आणि चीटिंग करणाऱ्या मैत्रिणीचे अश्रू घरातले चॉकलेट देऊन पुसून काढले.

खिडकीतून चॉकलेट खात खात अंगठा दाखवत मला खिजवणारी मैत्रीण आता मोठी झालीय. पण ती आजही रडीचा डाव खेळते आणि व्हॉट्सअपवर मॅसेज टाकते, “जंतरमंतरवर झाले ते योग्य नाही हा. मुलींची भाषा… शिव शिव शिव… इतक्या शिव्या देतात त्या मुली कसल्या. हे आपले भारतीय संस्कार नाहीत बरे. ही आपली संस्कृती नाही.”

फxxx ऑफ… मी तिला आजही बोलते.

कुणी ठरवलं बायकांची भाषा पुरुषांच्या भाषेपेक्षा वेगळी असायला पाहिजे? अ, आ, इ, ई ही वर्णमाला जशी मुलांना शिकवली जाते, तशी भ… भा.. भैं…ची बाराखडी मुली शिकणार नाहीत का? ज्या गावच्या बाभळी, त्याच गावच्या बोरी ना.

क्रिकेटच्या मैदानावर आवर्जून एखाद्या रविवारी जाऊन पाहा. विराटभाऊ, धोनीबिनीची स्टाईल मारणाऱ्यांच्या तोंडातून बॅटमधून रन निघणार नाहीत, एवढ्या शिव्या निघत असतात.

मुलं सहज एकमेकांना भेटले तरी शिव्या घालतात. मग जंतर-मंतरवर पोरींनी एका विशिष्ट भूमिकेतून ओरडून, गाणी गाऊन, टाळ्या वाजवत, रिदममध्ये शिव्या घातल्या तर भारतीय सभ्य समाजाला एवढी मिरची का लागतेय?

ज्या अशिष्ट भाषेत मुली व्यक्त झाल्या, ती भाषा आधीपासूनच या पुरूषप्रधान समाजात प्रचलित होती ना. सार्वजनिक अवकाशात मुलींनी काय बोलावे, काय बोलू नये, हे सांगणारे चिटर चॅप्टर वडीलधारी माणसं आता जेनझीला नकोत.

ऐंशीच्या दशकात कवी नामदेव ढसाळ यांना जे म्हणायचं होतं, तेच आता जंतर-मंतरवर जमलेल्या पिढीने त्यांच्या बेधडक बोल्ड भाषेतून करून दाखवलं आहे.

“मी तुला शिव्या देतो,

तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो,

तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो,

तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो,

इव्हन मी आई-बापाला शिव्या देतो

बांबलीच्यानो इथे जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात

आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलेत”

(गोलपीठा, 1973)

जंतर-मंतरवरील पोरी 'फ्रेंड्स'ना रागात बोलल्या तर बिघडलं कुठे?

फोटो स्रोत, Getty Images

दलित पँथरचा झेंडा हातात घेऊन संसदेला ‘रंडीखाना’ संबोधणाऱ्या सर्वहारा नामदेव ढसाळांची ही अभिव्यक्ती तेव्हाच्या प्रस्थापितांच्या पचनीही पडली नव्हती. विद्रोहच्या या धगधगीत आविष्काराला मराठीतील एका नामवंत साहित्यिकाने ‘मराठी भाषा आता रसाळ नामदेवापासून ढसाळ नामदेवापर्यंत पोहचली आहे’ असे म्हणत हिणवले होते. कमअस्सल ठरविले होते.

खरतर 13व्या शतकात संत नामदेवांनी भक्तीसंप्रदायाचा पाया रचून महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाहीची सुरुवात केली होती. त्यामुळेच पंढरीच्या विठ्ठलावर दासी जनाबाई रागावू शकत होती. तर ‘शब्दांचीच शस्त्रे’ हातात धरणारे संत तुकाराम त्याच विठ्ठलाला ‘रे विठ्ठला’ असे अनौपचारिक भाषेत संबोधू शकत होते.

प्रत्यक्ष परमेश्वराला ‘अरे तुरे’ करण्याची परंपरा आपल्या भक्तीसंप्रदायात असताना जर जंतर-मंतरवरचे ‘फ्रेंडस’ संसदेत बसलेल्या ‘फ्रेंडस’ना रागात बोलले तर बिघडले कुठे?

‘बिग ब्रदर’ला मुलींनी दिलेल्या शिव्यांमुळे एवढा संताप यायचे कारणच काय? मुलींनी असभ्य भाषा वापरली म्हणून त्यांचा ‘मेल इगो’ दुखावला तर नाही ना?

पण कुणी हर्ट झाले म्हणून आंदोलनात उतरलेल्या मुली आता थांबणाऱ्या नाहीत. खिळे असलेल्या लाठ्यांचे वार, पॅलेट गनच्या गोळ्या, टिअर गॅसचा अश्रू सामना या बेधडक भाषेच्या जोरावरच त्यांनी केला.

पोरींना आता राग आलाय, त्यांची आता सटकलीय. त्यांचा भवताल इतका शेमलेस झालाय की, अर्वाच्च बोलण्याशिवाय दुसरे शस्त्र त्यांच्या हाती उरलेले नाही.

स्वस्तात शिक्षण उपलब्ध नाही, आई-बाबांच्या सेविंगमधून शिक्षण विकत घेतले तर मार्केटमध्ये नोकऱ्या नाहीत, कॉर्पोरेटची गुलामी करावी की गीगवर्करसारखे गुलाम व्हावे एवढाच चॉईस त्यांच्या हातात आहे.

बलात्काराचा गुन्हेगार जेलमधून सुटून त्यांचा सत्कार नेत्यांनी करावा. पॉक्सोचा कलम लागलेल्या म्हाताऱ्याने देवपुरूष म्हणून पॅरोलवर सुटावे या सगळ्या परिस्थित जेनझी मुलींनी शिव्या नाही द्यावे तर काय करावे?

कशी व्यक्त करावी त्यांची वेदना? कोणत्या भाषेत त्यांच्या दुःखाची गाणी गावी? व्यक्त होण्यासाठी उपलब्ध भाषेतील कोणते वाक्यप्रचार, अलंकार, अवतरणचिन्हे निवडावीत?

या अपरिहार्यतेतूनच ‘कॉक्रोच’ मुलींनी रील्स, मीम्स, पॉप आर्ट, ग्राफिटी, स्लोगन रॅप यांची बेमालूम सरमिसळ करत आपली एक नवीन दृकश्राव्य भाषा निर्माण केली. कारण भाषा माणसाला जन्म देत नसते, तर माणूस भाषेला जन्म देत असतो.

जंतर-मंतरवरील पोरी 'फ्रेंड्स'ना रागात बोलल्या तर बिघडलं कुठे?

फोटो स्रोत, Getty Images

आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसुत म्हणतात :

“प्रकाश गेला

तिमिर हरपला

काय म्हणावे या स्थितीला

झपूर्झा… गडे झपूर्झा…”

(झपूर्झा, 1893)

मराठी भाषेतील कोणत्या शब्दकोशात ‘झपूर्झा’ या शब्दाचा अर्थ सापडतो? केशवसुतांना त्यांच्या मनात उचंबळून आलेल्या भावनांना ध्वनीत करण्यासाठी शब्दच सापडत नव्हता, तेव्हा त्यांनी या शब्दाची निर्मिती केली. जा पोरी जा… जा पोरी जा… या वाक्याला च्रकाकार गतीने म्हटले तर शब्द तयार होतो झपूर्झा.

जंतर-मंतरवर पोरींनी ‘झ… फ… च… म…’ ही भाषा वापरली, ते याच नवनिर्मितीच्या निकडीतून.

भारतीय स्वातंत्र्याला नुकतीच 79 वर्षे पूर्ण झाली. आज आपल्या घरातील मुलींनी स्वतंत्र होण्याच्या दिशेने एक दमदार पाऊल उचललं आहे.

चित्रविचित्र फॅशन करणाऱ्या, सदैव मोबाईलमध्ये रमणाऱ्या या मुलींनी जंतरमंतर, रांची, पटना, मेघालय, मुंबई, पुणे, बडोदा, तामिळनाडू, मेघालय, आसाम अशा भारतातल्या चारही दिशांच्या प्रदेशात जमिनीवर उतरून रस्ते घोषणांनी निनादून सोडले.

‘वास्तेगुणहुईया’ असे ओरडत त्यांनी जीभेवरचे भाषेचे बंधन धुडकावून लावले. शतकानुशतके प्रचलित असणाऱ्या भाषेच्या वापराच्या संकेतापासून मुक्त झाल्या.

पण आता संघर्षाच्या पुढच्या टप्प्यावर या भाषेला त्यागावे लागणार आहे. कारण अश्लील भाषेतील सगळ्या शिव्या स्त्रिंयाची योनी, तिची लैंगिकता, निषिद्ध लैंगिक संबध या सामग्रीवर उभी आहे.

स्त्रियांना नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेतून काळाचे अनेक टप्पे पार करत या शिव्यांनी आजचा प्रचलित भाषेतील अर्थ घेतलेला आहे. अश्लील भाषा स्त्रीदेहाचे विटंबन करते, तिच्यावर आक्रमण करते, अपमान करते. त्यामुळे जेनझीने प्रतिकाराच्या एका टप्प्यावर या अशिष्ट भाषेला त्यागणे म्हणजेच पुढे जाणे आहे.

जंतर-मंतरवरील पोरी 'फ्रेंड्स'ना रागात बोलल्या तर बिघडलं कुठे?

फोटो स्रोत, Getty Images

जेन झीसकट बूमर, मिलेनियल, अल्फा आपल्या सगळ्यांनाच आता भाषेच्या नवीन व्याकरणाची निर्मिती करावी लागणार आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांना आयाबहिणींवरून शिव्या द्यायच्या म्हणजे त्यांचा अपमान नाही का? अकार्यक्षम नेतृत्वाला हिजडा, बुळा म्हणून हिणवताना आपण एलजीबीटीक्यूंच्या हक्कांवर आक्रमण करत नाही का? वांझ, नपुंसक हे शब्द शिव्या नाहीत, तर स्त्रीपुरूषांची केवळ प्रजननक्षमता आहे. या शब्दांची अश्लील अशी असणारी व्याख्याच बदलावी लागणार आहे.

या जगात सगळ्यात अश्लील जर काही असते, तर ते आहे असत्य.

सगळ्यात कुरूप काय असेल तर तो आहे खोटारडेपणा.

सगळ्यात अनैतिक काही असेल तर ती आहे लबाडी.

त्यामुळेच दमनकारी राजकीय प्रणाली, दांभिक धार्मिकता आणि किडलेली समाजव्यवस्था यांचे वाभाडे काढण्यासाठी संविधानिक शब्दांचा आधार घ्यायची गरज आहे.

या आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरलेल्या मुलींना नवीन सनदशीर मार्गावर चालणारी भाषिक संस्कृती निर्माण करावी लागणार आहे.

जंतर-मंतरवरील पोरी 'फ्रेंड्स'ना रागात बोलल्या तर बिघडलं कुठे?

फोटो स्रोत, Getty Images

भाषेचे हे सुपरस्ट्रकचर रचण्यासाठी हे स्ट्रक्चर ज्या शोषणावरच्या इन्फ्रास्ट्रचरवर आधारलेले आहे, ते बदलावे लागणार आहे. तसेच, या मुलींना त्यांच्या शरीराभोवती चाललेल्या पॉलिटिक्सबद्दल सजग व्हायची गरज आहे.

मार्केटनं स्त्रियांचे वस्तुकरण केले आहे. ऑनलाईन सेल, सेक्सी बोटॅक्स, ब्युटी अ‍ॅप, डान्स रील, फिल्टर यांच्या मोहमयी दुनियेत सुखी स्त्रीचे एक फेक व्हर्जन तयार झाले आहे.

फोटो आणि इमोजीच्या चित्रभाषेत चिरंतन स्त्रीत्व हरवू लागले आहे. त्या हरवलेल्या आदिम स्त्रीला पुन्हा शोधण्याची गरज आहे.

इडनच्या गार्डनमधील अ‍ॅडम आणि इव्हच्या गोष्टीमधील निषिद्ध सफरचंद ज्ञानाचे होते. इव्हने हे फळ खाण्याचा गुन्हा केला आणि आखिल मानवजात निर्माण झाली.

निर्मितीच्या अफाट क्षमता असलेली हीच स्त्री आज भारतात जंतर-मंतरवरून पुढे चालत निघाली आहे, पुढे जाणार आहे. तिच्या स्वांतत्र्याचे आपण स्वागत करूयात.

माझ्या लहानपणीच्या मैत्रीणीला मी मेसेज केलाय, ‘स्वातंत्र्याचं चांगभलं. तुला इव्हची गोष्ट सांगायची आहे गं… कधी भेटणार गं?

(शिल्पा कांबळे या प्रसिद्ध लेखिका असून, या लेखात व्यक्त केलेली मतं त्यांची वैयक्तिक आहेत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC