Home LATEST NEWS ताजी बातमी चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करायच्या आहेत? आहारात ‘हे’ 3 प्रकारचे पदार्थ असायलाच हवेत

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करायच्या आहेत? आहारात ‘हे’ 3 प्रकारचे पदार्थ असायलाच हवेत

3
0

Source :- BBC INDIA NEWS

महिला

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या आहेत आणि स्किन छान तजेलदार ठेवायची आहे? मग आहारात ताज्या भाज्या, हेल्दी फॅट्स म्हणजे चांगले मेदयुक्त पदार्थ आणि आंबवलेले पदार्थ असायलाच हवेत.

आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव म्हणजे आपली त्वचा… आणि हीच त्वचा आपल्याला आयुष्यभर साथ देते. ती आपल्याला छान तरुण तर ठेवतेच पण त्वचेची व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्या आरोग्यालाही त्याचा मोठा फायदा होतो.

पण आपले शरीर आणि बाहेरील जग यामधील एक संरक्षक कवच असल्याने त्वचेलाच सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. लेबनिज रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायर्नमेंटल मेडिसीनमधील त्वचाविकारशास्त्राचे प्राध्यापक जीन क्रूटमन यांच्या मते हवेचे प्रदूषण, ओझोन आणि बदलणारे हवामान यांसारखे पर्यावरणातील अनेक घटक त्वचेवरील वाढत्या वयाच्या खुणा दिसण्यासाठी कारणीभूत ठरतात.

अनेक वर्षं आपल्याला वाटत होतं की उन्हातल्या फक्त ‘अल्ट्राव्हायोलेट‘ किरणांमुळेच त्वचेवर वाढत्या वयाचा प्रभाव दिसतो. पण हे पूर्णपणे खरं नाही,” असं क्रूटमन सांगतात. “सूर्यप्रकाशातले इतरही किरण अगदी साधा उजेड आणि इन्फ्रारेड किरणसुद्धा त्वचेवर वाढत्या वयाचा प्रभाव दिसण्यास कारणीभूत ठरू शकतात.”

फळं

ते पुढे सांगतात की, अगदी वाढलेला उकाडा किंवा तापमानही त्वचेचा तजेला लवकर घालवू शकतं. आणि शेवटी राहतो तो वाढत्या वयाचा भाग. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं त्वचेला ताणून ठेवणारा आणि आकार देणारा मुख्य घटक म्हणजेच ‘कोलॅजन‘ हळूहळू कमी होऊ लागतो मग चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात.

पण त्वचेचा तजेला टिकवून ठेवण्यासाठी आपण अनेकदा एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. ती गोष्ट म्हणजे आपला आहार. चांगल्या फॅट्सपासून ते पोटासाठी गुणकारी असणाऱ्या आंबवलेल्या पदार्थांपर्यंत, आहारात नेमका कशाकशाचा समावेश असावा, ते पाहूया.

1) रंगीबेरंगी फळं आणि भाज्या

आपली त्वचा निरोगी आणि छान ठेवण्यासाठी वनस्पतीजन्य आहार किती गरजेचा आहे, हे अनेक संशोधनांतून सिद्ध झालं आहे. आहारात जास्तीत जास्त रंगीबेरंगी फळं आणि भाज्यांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. कारण त्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. ते प्रदूषण आणि कडक उन्हामुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचं रक्षण करतात.

गाजर, सिमला मिरची आणि टोमॅटोमध्ये ल्युटीन, लायकोपीन आणि बीटा-कॅरोटीनसारखे ‘कॅरोटीनॉइड्स’ मुबलक प्रमाणात असतात.

फ्रेडरिक शिलर युनिव्हर्सिटी जेना येथील फूड केमिस्ट्रीचे प्रोफेसर वोल्कर बोहम सांगतात की, “हे घटक शरीरातील फॅट्समध्ये जमा होतात आणि उन्हाच्या हानिकारक यूव्ही किरणांपासून त्वचेचं आपोआप रक्षण करतात.”

सनस्क्रीन वापरणं महत्त्वाचं असलंच, तरी लोक सहसा खूप वेळ उन्हात बाहेर पडायचं असेल तरच ते लावतात. रोजच्या रोज लावणं अनेकांकडून टाळलं जातं, असं बोहम सांगतात. अशा वेळी ‘कॅरोटीनॉइड्स’युक्त पदार्थांचं नियमित सेवन शरीराला वर्षभर नैसर्गिकरीत्या उन्हापासून संरक्षण देणारा एक बेसिक थर मिळवून देतं.

यासोबतच टोमॅटो किंवा गाजरासोबत ऑलिव्ह ऑइलसारख्या चांगल्या फॅट्सचा थोडासा वापर केल्यास, ही अँटीऑक्सिडंट्स शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत होते.

बीटा-कॅरोटीनचे रूपांतर आपल्या शरीरात व्हिटॅमिन A मध्ये सुद्धा होते जे त्वचेच्या पेशींच्या वाढीसाठी आणि त्वचेचे इन्फेक्शनपासून रक्षण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं.

याशिवाय कॅरोटीनॉइड्स त्वचेच्या पेशींमध्ये ‘हायलुरोनिक ॲसिड‘ तयार करण्यास मदत करतात. हा घटक त्वचेचा घट्टपणा आणि लवचिकता टिकवून ठेवतो. बाजारात मिळणाऱ्या अनेक मॉइश्चरायझर्स आणि ‘अँटी-एजिंग’ क्रीम्समध्ये हाच घटक मुख्यत्वे वापरलेला असतो.

हेच घटक त्वचेतील कोलॅजन वाढवण्यासाठीही मदत करू शकतात. एका संशोधनात असं दिसून आलं की, ज्या महिलांनी सलग 10 महिने दररोज कॅरोटीनॉइड्सचे सप्लिमेंट्स घेतले त्यांच्या त्वचेमधील कोलॅजन आणि लवचिकता (इलास्टिन) सुधारल्याचे स्पष्ट दिसले. म्हणजेच हे घटक कॉलेजन तुटण्यापासून किंवा कमी होण्यापासून रोखू शकतात.

आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर रंगीबेरंगी फळं आणि भाज्या खाल्ल्यामुळे त्वचेला एक छान, हेल्दी ‘ग्लो’ मिळतो, हेही सिद्ध झालं आहे.

याचा खरा फायदा मिळवायचा असेल तर हे पदार्थ रोजच्या आहारात नियमितपणे खाणं गरजेचं आहे, असं क्रूटमन सांगतात. “तुम्ही कोणताही अँटीऑक्सिडंटयुक्त आहार घेत असलात तरी पर्यावरणातील घटकांपासून त्वचेचं रक्षण होण्यासाठी आणि त्याचा स्पष्ट फरक दिसण्यासाठी साधारण 8 ते 10 आठवड्यांचा वेळ लागतोच.”

याशिवाय वाढत्या वयातही त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी आंबा खाणं खूप फायदेशीर ठरतं, असंही एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे.” कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी डेव्हिसच्या व्हिव्हियन फॅम यांनी मेनोपॉज झालेल्या महिलांवर केलेला एक अभ्यास पाहूया.

या अभ्यासातील महिलांनी 16 आठवडे दर आठवड्याला 4 वेळा 85 ग्रॅम आंबा खाल्ला. संशोधकांच्या असं लक्षात आलं की, यामुळे चेहऱ्यावर आधीपासून असलेल्या सुरकुत्यांचा आकार तर कमी झालाच पण नव्यानं येणाऱ्या सुरकुत्यांचं प्रमाणही घटलं.

स्टिकी राईस आणि आंबा

यावर अजून अधिक संशोधन होणं बाकी असलं, तरी संशोधकांचा असा अंदाज आहे की हा चांगला परिणाम आंब्यामध्ये असणाऱ्या कॅरोटीनॉइड्स, तसेच ‘फ्लॅव्होनॉइड्स’ आणि ‘मॅन्जिफेरिन’सारख्या अँटीऑक्सिडंट्समुळे दिसून येत असावा. पण एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, याच अभ्यासात असं दिसून आलं की ज्या महिलांनी दररोज साधारण 250 ग्रॅम आंबा खाल्ला, त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या उलट वाढल्या.

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी डेव्हिसमधील पोषणतज्ज्ञ आणि या अभ्यासाचे सह-लेखक प्रोफेसर रॉबर्ट हॅकमन यांच्या मते, असं नेमकं का झालं हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. पण आंब्यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक साखरेच्या जास्त प्रमाणामुळे कदाचित असं घडलं असावं.

“आमचा असा अंदाज आहे की साखरेमुळे त्वचेतील घटकांचं काही प्रमाणात नुकसान झालं असावं,” असं हॅकमन सांगतात. हा अभ्यास जरी छोट्या प्रमाणावर झालेला असला तरी त्यानंतर केलेल्या दुसऱ्या एका संशोधनातही अगदी असेच निकाल समोर आले आहेत, असं ते सांगतात. अर्थात हे नवीन संशोधन अजून अधिकृतपणे प्रसिद्ध व्हायचं आहे.

आंबा आणि संत्री-मोसंबीसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतं. हे व्हिटॅमिन शरीरात कोलॅजनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतं आणि अँटीऑक्सिडंट म्हणून काम करून उन्हामुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचं रक्षण करतं.

संशोधनातून असं समोर आलं आहे की, व्हिटॅमिन सी मुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि त्वचेवर पडणारे काळे डाग किंवा पिग्मेंटेशन कमी होतं. याच कारणामुळे अनेक स्किनकेअर प्रॉडक्ट्समध्ये आणि सप्लिमेंट्समध्ये व्हिटॅमिन सी चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, असं क्रूटमन सांगतात.

2) चांगले फॅट्स

मला एरव्ही बदाम किंवा अक्रोड खायला फारसं आवडत नाही. पण आता मी त्याचे बारीक तुकडे करुन सॅलडमध्ये घालायला सुरुवात केली आहे आणि खरं सांगायचं तर मला ही नवी चव अपेक्षेपेक्षा जास्त आवडली.

कारण भरपूर ड्रायफ्रूट्स आणि बिया खाणं आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं, म्हणून मी ते करते.

एका संशोधनात असं दिसून आलं आहे की, ज्या लोकांनी सलग 16 आठवडे इतर स्नॅक्सऐवजी रोज बदाम खाल्ले त्यांच्या चेहऱ्यावर इतर लोकांच्या तुलनेत सुरकुत्या खूपच कमी दिसल्या.

नट्समध्ये म्हणजे बदाम, अक्रोड आणि बियांमध्ये भरपूर असणारं व्हिटॅमिन E त्वचेच्या पेशी खराब होण्यापासून वाचवतं आणि चेहऱ्यावर वाढत्या वयाचा प्रभाव पटकन दिसू देत नाही. व्हिटॅमिनची E ची शरीरात कमतरता असली की त्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. अगदी साधी जखम झाली तरी ती लवकर भरून येत नाही. बदाम, हेझलनट्स, पाइन नट्स आणि अनेक प्रकारच्या बियांच्या तेलातून हे व्हिटॅमिन आपल्याला सहज मिळतं.

शिवाय या नट्स मध्ये ‘ओमेगा-6 फॅटी ॲसिड्स’ असतात. हे घटक त्वचेचा वरचा नैसर्गिक थर चांगला पक्का ठेवतात ज्यामुळे त्वचेतला ओलावा टिकून राहतो आणि त्वचा कोरडी पडत नाही.

आपल्या त्वचेसाठी गुणकारी असणारा आणखी एक चांगलं फॅट म्हणजे ‘ओमेगा-3‘. हा घटक प्रामुख्याने तेलकट मासे आणि शेवाळ यामध्ये आढळतं.

सालमन, तारली आणि बांगडा यांसारख्या माशांमध्ये ओमेगा-3 भरपूर प्रमाणात असतं. काही अभ्यासांतून असं दिसून आलं आहे की, हे मासे खाल्ल्यानं त्वचेची उन्हाप्रती असणारी संवेदनशीलता कमी होते, त्यामुळे कडक उन्हामुळे त्वचेचं होणारं नुकसान टाळायला मदत होऊ शकते. याव्यतिरिक्त, असे फॅटी मासे त्वचेतील नैसर्गिक कॉलेजन टिकवून ठेवायला आणि त्वचेवर येणारी सूज किंवा जळजळ कमी करायलाही मदत करतात.

3) पोटासाठी गुणकारी अन्नपदार्थ

जेव्हा आपण आहारात ताजी फळं, भाज्या, नट्स आणि विविध प्रकारच्या बिया यांचा समावेश करतो तेव्हा आपल्या पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना त्याचा मोठा फायदा होतो. आणि पर्यायानं आपल्या त्वचेलाही. याचं कारण म्हणजे आपलं पोट आणि त्वचा हे एकमेकांशी अतिशय घट्ट जोडलेले आहेत. संशोधक या परस्परसंबंधाला ‘गट-स्किन ॲक्सिस‘ असं म्हणतात.

आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचा वनस्पतीजन्य आहार घेतो तेव्हा पोटातील हे बॅक्टेरिया असे काही घटक तयार करतात जे शरीरातील सूज-जळजळ कमी करतात आणि अँटीऑक्सिडंट्ससारखं काम करतात. हॅकमन यांच्या मते, याचा थेट आणि चांगला परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येतो.

पोटातील चांगले बॅक्टेरिया जितके जास्त निरोगी राहतील तितकी आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते आणि त्यामुळे त्वचेच्या तक्रारी दूर व्हायला मदत होते.

हे फायदे मिळवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे आहारात जास्तीत जास्त विविध प्रकारच्या वनस्पतीजन्य पदार्थांचा समावेश करणं. यामध्ये फळं आणि भाज्या, डाळी, कडधान्ये, संपूर्ण धान्ये (गहू, ज्वारी, बाजरी इत्यादी), तसेच औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा समावेश होतो. असा आहार घेतल्याने मानसिक ताण कमी होतो, शांत झोप लागते. आणि सोरायसिससारख्या त्वचेच्या विकारांपासूनही संरक्षण मिळतं.

तसेच सॉकरक्राऊट , किमची, कोम्बुचा किंवा दही यांसारखे आंबवलेले पदार्थ पोटातील चांगल्या बॅक्टेरियांच्या पोषणासाठी खूप फायदेशीर ठरतात.

वयाच्या साठीत असताना तीस वर्षांचे तरुण दिसावं असं वाटणं ठीक आहे.. पण चांगला आणि सकस आहार घेतला तर पुढची कित्येक वर्षे त्वचा निरोगी राहायला नक्कीच मदत होईल.. आणि हो लक्षात ठेवा, सनस्क्रीन लावायला मात्र आजिबात विसरू नका…!

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC