Home LATEST NEWS ताजी बातमी शेअर बाजार घसरतोय, मग SIP बंद करावी की सुरू ठेवावी? तज्ज्ञ काय...

शेअर बाजार घसरतोय, मग SIP बंद करावी की सुरू ठेवावी? तज्ज्ञ काय सांगतात

3
0

Source :- BBC INDIA NEWS

एसआयपी

वाचन वेळ: 4 मिनिटे

नोएडामध्ये राहणारी विशाखा गेल्या दोन वर्षांपासून सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) गुंतवणूक करत आहे. सुरुवातीला तिला गुंतवणुकीचा हा पर्याय चांगला वाटला. पण नंतर शेअर-बाजारातले चढ-उतार आणि सोशल मीडियावरील तज्ज्ञांच्या वेगवेगळ्या मतांमुळे तिच्या मनात संभ्रम निर्माण व्हायला लागला.

नुकतंच SIP मधील एका गुंतवणूकीत तिला नुकसान सोसावं लागलं. त्यामुळे तिने ही गुंतवणूक मध्येच थांबवून आपले पैसे काढून घेतले.

शेअर बाजारात चढ-उतार होत असताना SIP मधली गुंतवणूक सुरू ठेवायची की नाही, हा आता त्यांच्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे.

अनेक तरुण नोकरी सुरू केल्यानंतर बचत आणि गुंतवणुकीचा विचार करायला लागतात. मात्र, कमी पगार, दर महिन्याचा खर्च आणि भविष्यातील गरजांचा विचार करता गुंतवणूक सुरू करणं सोपं नसतं. अशावेळी SIP हा पर्याय चांगला ठरू शकतो, ज्यामध्ये तुम्ही कमी रक्कम दर महिन्याला गुंतवू शकता.

पण SIP मधली गुंतवणूक खरंच सुरक्षित आहे का? SIP बद्दलच्या या आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसी हिंदीने ऑप्टिमा मनी मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक पंकज माथपाल आणि सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर पूनम रुंगटा यांच्याशी संवाद साधला.

SIP मधील वाढत्या गुंतवणुकीचे अर्थ काय?

असोसिएशन ऑफ म्युचुअल फंड्स इन इंडिया (AMFI)च्या आकडेवारीनुसार 30 सप्टेंबर 2025 रोजी SIP द्वारे केलेल्या गुंतवणुकीचं एकूण मूल्य म्हणजेच AUM हे 15.52 लाख कोटी होतं. म्हणजेच एका वर्षात SIP एयूएममध्ये जवळपास 2.34 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. ही वाढ 15 टक्के इतकी होती.

एएमएफआयच्या आकडेवारीनुसार 30 सप्टेंबर 2026 मध्ये SIP मधील गुंतवणूकीचा आकडा 32,490 कोटी रुपयांवर पोहोचला.

SIP मधील गुंतवणूक

एकीकडे SIP मधल्या गुंतवणुकीचा आकडा वाढत असतानाच दुसरीकडे अनेक जण त्यांच्या SIP चा कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच पैसे काढून घेताना दिसत आहेत. एएमएफआयच्या मते सप्टेंबर 2026 मध्ये एसआयपी बंद होण्याचं प्रमाण 78.53% होतं.

अर्थविषयक तज्ज्ञ पंकज माथपाल यांनी सांगितलं की, एसआयपीचा एक फायदा म्हणजे तुम्ही लहान रकमेपासूनही गुंतवणूक सुरू करू शकता. मोठी रक्कम जमा होण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. काही म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही दर महिन्याला 100 रुपये गुंतवूनही एसआयपी सुरू करू शकता.

पूनम रुंगटा यांनी म्हटलं, “100, 250 किंवा 500 रुपयांपासून सुरूवात करू शकता. तुम्ही गुंतवणुकीला सुरूवात करणं आणि त्याची सवय लावणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला जी रक्कम सहज शक्य आहे, त्यापासून सुरुवात करा.”

या वर्षी शेअर बाजारात झालेली घसरण

शेअर बाजारासाठी हे वर्ष चढ-उताराचं राहिलं. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडच्या मते 23 ऑक्टोबर 2026 पर्यंत सेन्सेक्समधे 14.19% आणि निफ्टी 50 मधे 13.51% ची घसरण दिसून आली.

अशा परिस्थितीत SIP मधे गुंतवणूक करणं युवा गुंतवणुकदारांसाठी फायद्याचं आहे की नाही, या प्रश्नाचं उत्तर देताना पंकज माथपाल यांनी म्हटलं की, मार्केट नेहमी एकसारखं नसतं. त्यात कधी मंदी असते, तर कधी तेजी. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. जसं की यावर्षी इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेलं युद्ध हेही शेअर मार्केटमधल्या घसरणीचं एक कारण आहे.

एसआयपी

पूनम रुंगटा यांनी म्हटलं की, सध्या शेअर बाजारात चढ-उतार सुरू आहे. ज्या लोकांनी पाच-सहा वर्षांपूर्वी SIP सुरू केली असले, त्यांचा परतावा अजूनही चांगला असू शकतो. पण ज्यांनी एक किंवा दोन वर्षांपूर्वी गुंतवणूक सुरू केली, त्यांचा परतावा कमी असू शकतो.

SIP म्हणजे काय?

एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे. यामध्ये तुम्ही एकरकमी पैसे गुंतवण्याऐवजी दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम गुंतवू शकता. हे रिकरिंग डिपॉझिट (आरडी) प्रमाणे आहे. पण त्यामध्ये परताव्याची खात्री नसते.

एसआयपी म्हणजे काय

पंकज माथपाल यांनी म्हटलं की, गुंतवणूकीचा हेतू पैसे वाचवणं आणि पैसे वाढवणं असतं. त्यासाठी एसआयपी हा एक चांगला पर्याय आहे. कारण यामध्ये तुम्ही कमी पैशांपासूनही सुरूवात करू शकता आणि मोठी रक्कम जमा व्हायची वाट पाहण्याची गरज नाही.

जर जेन झी कमी वयात एसआयपी सुरू करत असतील, तर त्यासाठी ठराविक वेळेची वाट पाहण्याची गरज नाहीये. एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना आपला दृष्टिकोन दीर्घकालीन असायला हवा.

स्टॉक आणि म्युचुअल फंडमध्ये काय फरक?

सेबीने दिलेल्या माहितीनुसार शेअर (स्टॉक) म्हणजे एखाद्या कंपनीमधली तुमची भागीदारी. जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही कंपनीचा शेअर खरेदी करते, तेव्हा ती त्या कंपनीचा शेअर होल्डर किंवा समभागधारक बनतो. शेअरची किंमत वाढली, तर फायदा होतो आणि जर किंमत कमी झाली तर नुकसान होऊ शकतं.

कंपनीची आर्थिक परिस्थिती तसंच अर्थव्यवस्थेमध्ये होणाऱ्या बदलांचा परिणामही शेअर्सच्या किमतीवर होतो.

दुसरीकडे, म्युचुअल फंड्स वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून पैसा एकत्र करून तो शेअर्स, बॉन्ड आणि रोख्यांमध्ये गुंतवतात. त्यामुळे गुंतवणूकदारांचा पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवला जातो. त्याचं व्यवस्थापन व्यावसायिक फंड मॅनेजर करतात आणि त्याबदल्यात शुल्क घेतात.

एसआयपी गुंतवणूक

शेअर मार्केट किंवा म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या प्रश्नांवर पंकज माथपाल यांनी सांगितलं की, जर तुम्हाला शेअर बाजाराची माहिती असेल आणि कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवायचे हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही थेट शेअर्समध्येच गुंतवणूक करू शकतात.

पूनम रुंगटा यांनी याच प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की, एसआयपीच्या माध्यमातूनही तुम्ही शेअर्संमध्येच गुंतवणूक करता. फक्त तुम्ही थेट शेअर खरेदी करता की म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून शेअरमध्ये पैसे गुंतवता एवढाच फरक असतो.

दीर्घकालीन विरुद्ध कमी कालावधीसाठीची गुंतवणूक

एएमएफआयच्या मते, म्युच्युअल फंडमध्ये कमी कालावधीसाठी तसंच दीर्घकालीन गुंतवणूक केली जाऊ शकते. हे गुंतवणूकदाराच्या आर्थिक उद्दिष्टं आणि गुंतवणुकीच्या कालावधीवर अवलंबून असतं. म्युच्युअल फंड्स हे इक्विटी (शेअर) आणि डेट (रोख्यांसारख्या गोष्टी) सारख्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. आपल्या गरजांच्या हिशोबाने त्यांची निवड केली जाऊ शकते.

पूनम रुंगटा यांनी सांगितलं की, एसआयपीकडे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहायला हवं. कमीत कमी पाच वर्षांचा कालावधी असला तर उत्तम. कमी कालावधीत मिळणारा परतावाही कमी असू शकतो, त्यामुळे गुंतवणूक करताना या गोष्टी समजून करायला हव्यात. बाजारातील चढ-उतार पाहून घाबरण्याची आवश्यकता नाही.

पंकज माथपाल यांनी सांगितलं की, जर तुम्ही पाच वर्षांसाठी गुंतवणूक करत असाल तर त्या दरम्यान मार्केट वर जाऊ शकतं किंवा कोसळूही शकतं. एसआयपीचा फायदा हा आहे की, तुमची गुंतवणूक नियमितपणे सुरू राहते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC