Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
भारत हा जगातील सर्वात मोठा आंबा उत्पादक देश आहे. देशात आंब्यांच्या विविध प्रकारच्या जाती आहेत आणि त्यांच्या चवीचे चाहते जगभरातील अनेक देशांमध्ये आहेत.
जपान देखील अशाच देशांपैकी एक आहे. परंतु, यावर्षी जपानमध्ये राहणाऱ्या लोकांना भारतीय आंब्यांचा स्वाद घेता येणार नाही.
जपानने यावर्षी भारतीय आंब्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे.
कीटक नियंत्रणाची प्रक्रिया (पेस्ट कंट्रोल) योग्य प्रकारे न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जपानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
यापूर्वी 1980 च्या दशकातही जपानने भारताकडून आंब्यांची खरेदी थांबवली होती.
हा एक खबरदारीचा निर्णय होता. भारतातील फळांवर असलेले किडे-कीटक, त्यांची अंडी किंवा अळ्या तिथे पोहोचू शकतात आणि त्यामुळे जपानच्या शेतीचं नुकसान होऊ शकते, अशी जपानला भीती होती.
नेमका अडथळा काय?
साधारण 2 दशकांनंतर भारतीय आंब्यांसाठी जपानचे दरवाजे पुन्हा खुले झाले, पण आता इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.
सुमारे 2 दशकांनंतर जपानने भारताकडून होणारी आंब्यांची आयात पुन्हा थांबवली आहे. भारतातील ट्रीटमेंट सुविधांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी आंब्यांच्या हंगामात जपान आपले काही निरीक्षक दिल्लीला पाठवतो. हे अधिकारी एका विशेष प्रक्रियेद्वारे आंब्यांची तपासणी करतात. त्याला ‘व्हेपर हीट ट्रीटमेंट’ (बाष्प उष्णता उपचार) म्हणतात.
ही प्रक्रिया आंब्यांना किडे किंवा कीटक आणि त्यांच्या अंड्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी केली जाते. यामध्ये फळांना काही वेळ गरम हवा असलेल्या चेंबरमध्ये ठेवले जाते. त्यामुळे फळांच्या आत असलेले कीटक आणि अळ्या नष्ट होतात.
फोटो स्रोत, Dhiraj Singh/Bloomberg via Getty Images
यावर्षी तपासणीदरम्यान आंब्यांच्या प्रक्रियेमध्ये (ट्रीटमेंट) काही त्रुटी आढळून आल्या.
त्यानंतर जपानच्या योकोहामा प्लांट प्रोटेक्शन असोसिएशनने एक अधिसूचना जारी करून भारतीय आंबे स्वीकारण्यास नकार दिला.
जपानी अधिकारी पूर्णपणे समाधानी होईपर्यंत भारतातून येणाऱ्या आंब्यांची आयात बंद केली जाईल, असं असोसिएशनने म्हटलं आहे.
नेमका आंब्यांचा हंगाम शिगेला पोहोचला आहे आणि त्याचवेळी हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.
आधीच अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे निर्यातदार प्रभावित झाले आहेत.
सागरी मार्गांमध्ये आलेल्या अडथळ्यांमुळे शिपिंग विमा (इन्शुरन्स) वाढला आहे. त्यामुळे जहाज कंपन्यांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
याचा परिणाम केवळ आंब्यांवरच नाही, तर इतर वस्तूंच्या निर्यातीवरही होऊ शकतो.
तज्ज्ञांचं मत काय आहे?
बीबीसीशी बोलताना सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे माजी संशोधन संचालक शैलेंद्र राजन म्हणाले, “जर कोणत्याही मालाच्या खेपेत ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रेसिड्यू (अवशेष) किंवा इतर त्रुटी आढळून आल्या, तर तो माल थांबवला जातो. प्रत्येक देशाचे स्वतःचे नियम असतात, पण जपानची गणना सर्वात कडक बाजारपेठांमध्ये केली जाते.”
“तेथील अधिकारी अगदी छोट्या चुकांकडेही दुर्लक्ष करत नाहीत. त्यांच्या गरजा लक्षात घेऊनच ‘व्हेपर हीट ट्रीटमेंट’ सुरू करण्यात आली. कारण त्यांना फ्रूट फ्लायपासून (फळमाशी) संरक्षण हवं होतं.”

जपानने भारतीय आंब्यांवर बंदी घातल्यामुळे इतर देशांमध्येही आपल्या आंब्यांची मागणी कमी होऊ शकते का?
यावर शैलेंद्र राजन म्हणतात की, भारत सर्वाधिक आंबे आखाती देशांना निर्यात करतो. तिथले नियम जपानइतके कडक मानले जात नाहीत.
त्यांच्या मते, या बंदीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही.
प्रत्येक देशाचे स्वतःचे नियम आणि गुणवत्ता मानक असतात. त्यामुळे निर्यातदार देशांना त्यानुसार स्वतःला तयार करावं लागतं, असंही ते नमूद करतात.
या नियमांनुसार भारतही आपल्या व्यवस्थेत सुधारणा करत आहे.
जपानला याआधीही अशी समस्या आली होती
अनेक देश फळे आणि भाज्या आयात करण्यापूर्वी व्हेपर हीट ट्रीटमेंटची मागणी करतात. जेणेकरून त्यांच्या देशात कोणत्याही प्रकारचे रोग पसरू नये. जपान या बाबतीत खूप कडक मानला जातो.
या कडक नियमांमागे जपानचा जुना अनुभव आहे. 1970 च्या दशकात देशाच्या दक्षिण भागात फळमाशीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे आंबा, पपई आणि इतर अनेक फळांच्या लागवडीवर त्याचा परिणाम झाला होता.
फोटो स्रोत, Raj K Raj/Hindustan Times via Getty Image
ही समस्या संपवण्यासाठी जपानने मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली.
ही प्रक्रिया खूप वेळखाऊ आणि महागडी होती. ती पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागली.
याच अनुभवामुळे तिथे शेती आणि आयातीचे नियम खूप कडक झाले. आज तिथे ‘झिरो पेस्ट टॉलरन्स’ म्हणजेच कीटकांबाबत शून्य सहनशीलता धोरण आहे.
सुमारे 2 दशकापूर्वीची बंदी हटवण्यासाठी भारतात अनेक व्हेपर हीट ट्रीटमेंट (व्हीएचटी) प्लांट सुरू करण्यात आले आणि निर्यात पुन्हा सुरू झाली होती.
भारतामध्ये आंब्याचे उत्पादन सर्वाधिक
भारत हा आंब्याचं उत्पादन करणारा सर्वात मोठा देश आहे. ॲग्रीकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (एपीईडीए) आकडेवारीनुसार, जगातील एकूण आंबा उत्पादनापैकी सुमारे 40 ते 45 टक्के आंबे भारतात तयार होतात.
येथे सुमारे 1 हजार प्रकारचे आंबे आढळून येतात. यातील मोठा भाग देशातच वापरला जातो.
उत्तरेपासून ते दक्षिण भारतापर्यंत आंब्यांच्या विविध जाती आणि स्वाद आहेत. ताज्या फळांशिवाय आंब्याचे अनेक प्रकारे जतनही केले जाते. त्यामुळे सर्वात मोठा उत्पादक देश असूनही आंब्यांची निर्यात फारशी होत नाही.
फोटो स्रोत, Bhaskar Paul/The The India Today Group via Getty Images
एपीईडीएच्या माहितीनुसार, 2024-25 मध्ये देशातून सुमारे 30 हजार टन ताज्या आंब्यांची निर्यात झाली. यामधील सर्वाधिक आंबे यूएई, अमेरिका, ब्रिटन, कुवेत आणि कतार या देशांना पाठवले गेले.
जपान आणि भारत यांच्यातील करारानुसार काही विशेष आंब्यांच्या जातींची निर्यात केली जात होती. त्यात अल्फान्सो (हापूस), केसर, बंगनापल्ली, लंगडा, चौसा आणि मलिका या प्रकारांचा समावेश आहे.
हापूस आंब्याला आधीपासूनच खूप पसंत केलं जातं. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि देवगड येथे पिकणारा हा आंबा त्याच्या स्वाद, सुगंधामुळे विशेष ओळखला जातो.
जपानी बाजारपेठेत या जातीच्या आंब्याकडे लक्झरी फळ म्हणून पाहिलं जात होतं, पण आता त्यावर अनिश्चित काळासाठी बंदी आली आहे.
विविध व्यापार अहवालांनुसार, भारतातून जपानला दरवर्षी साधारणपणे काहीशे टन ते सुमारे 2 हजार मेट्रिक टन आंबे पाठवले जात होते.
हे एकूण निर्यातीच्या 1 टक्क्यांपेक्षाही कमी प्रमाण मानले जाते.
बंदीवर एवढी चर्चा का?
तज्ज्ञांच्या मते इथे समस्या प्रमाणाची (क्वांटिटी) नाही, तर गुणवत्तेची आहे. गुणवत्ता नियंत्रणासाठी ओळखल्या जाणाऱ्या देशाने भारतातून आंबे घेणं बंद केलं आहे.
जपानसारख्या देशासाठी हा केवळ आंब्यांचा प्रश्न नाही, तर संपूर्ण निर्यात व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे.
त्यांच्या मते, या निर्णयाचा ‘सिग्नल इफेक्ट’ होऊ शकतो. म्हणजे एका निर्णयामुळे इतर देश किंवा लोकही तशाच प्रकारे विचार करू लागतात.
म्हणजे याचा परिणाम फक्त जपानपुरता मर्यादित राहील असे नाही, तर इतर परदेशी बाजारपेठांसाठीही तो एक सिग्नल किंवा इशारा ठरू शकतो.

भारतासाठी ही अडचण नेमकी अशा वेळी आली आहे, जेव्हा आंब्यांचं पीक (विशेषतः अनेक प्रीमियम जातींचे आंबे) आधीच खराब झाले आहेत.
बीबीसीशी बोलताना लखनौच्या मँगो ग्रोव्हर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष एस. इन्सराम अली म्हणाले, “जपानमधून एक टीम आली होती, त्यांनी आंबे नाकारले. आम्हाला हे निर्यातदारांमार्फतच समजलं. सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे.”
आंब्यांच्या उत्पादनाबाबत इन्सराम अली म्हणतात, “हिवाळ्यामध्ये कडाक्याची थंडी आणि नंतर अचानक तापमान वाढल्यामुळे फळांच्या उत्पादनावर परिणाम झाला. उत्तर प्रदेशमध्ये आंब्यांचे उत्पादन पूर्वीच्या तुलनेत खूप कमी झाले आणि जे झाले तेही वादळामुळे खराब झाले.”
“यंदा आंब्यांचा हंगाम कदाचित जूनमध्येच संपू शकतो,” अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC







