Source :- BBC INDIA NEWS

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा पदोपदी सांगणाऱ्या पुण्यात यंदा एक वाद निर्माण झाला आहे. गणपती विसर्जन मिरवणूकीत डीजेला बंदी करावी अशी मागणी पुणेकर नागरिक असणाऱ्या विद्यानंद बापट यांनी केली आहे.
तर हे गणेशोत्सवाला बदनाम करण्याचं काम सुरू आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केला आहे. दरम्यान पुणेकरांनी मात्र आता ध्वनीप्रदुषणाविरोधात थेट आंदोलनाचीच भूमिका घेतली आहे.
काय घडलं?
पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळाचे कार्यकर्ते, अध्यक्ष, नागरिक, महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन या सगळ्यांसोबत समन्वय बैठक आयोजित करण्यात येते.
तशीच बैठक यंदाही आयोजित करण्यात आली होती. तेथे गणेशोत्सवाबद्दल कोणा नागरिकांना काही मुद्दे मांडायचे आहेत का असं जेव्हा विचारलं गेलं. तेव्हा या बैठकीत उपस्थित असलेल्या विद्यानंद बापट यांनी उभं राहून डीजे बंद करा अशी भूमिका मांडली.
मात्र बापट यांच्या भूमिकेनंतर उपस्थित गणेश मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. वाद वाढला आणि शेवटी बापट यांना पोलिसांच्या उपस्थितीत सभागृहाच्या बाहेर काढलं गेलं.

एकीकडे बापट यांना बाहेर काढलं जात असतानाच सुरू असलेला गोंधळ थांबवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी महापौर बोलतील असं जाहीर केलं.
महापौरांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होणार नाही, अशी भूमिका घेतली. तर पाठोपाठ भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुण्याच्या गणेशोत्सवासाठी कोणतेही निर्बंध नको, असं समाज माध्यमांवर पोस्ट करत जाहीर केलं.
तर भाजपचे नगरसेवक राघवेंद्र मानकर यांनी जर डीजेवर बंदी घातली तर गणपती बाहेरच काढणार नाही अशी भूमिका घेतली.
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना अनेक नागरिकांनी डीजे, ढोलताशा याच्या आवाजाचा त्रास होत आहे, अशी भूमिका घेत ऑनलाईन पिटीशन सुरू केली आहे आणि आंदोलनाचीही घोषणा केली.
खरंच ध्वनीप्रदुषण होतंय?
गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्यातल्या कॉलज ऑफ इंजिनियरींग अर्थात सीओईपीने मिरवणूकीतल्या आवाजाच्या पातळीचा अभ्यास केला आहे. त्यांची आकडेवारी सांगते की, मिरवणूकीदरम्यान आवाजाची पातळी ही सरासरी 90 डेसिबल्सच्या वर राहिली आहे. 2012 मध्ये ही पातळी 104.2वर पोहोचली होती.
2022 मध्ये आवाजाची पातळी होती 105.2 डेसीबल्स, 2023 मध्ये ही पातळी काहीशी कमी होऊन 101.2 वर आली, तर 2024 मध्ये आवाजाची पातळी 94.8 डेसीबल नोंदवली गेली.
फोटो स्रोत, Getty Images
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या नियमावली प्रमाणे औद्योगिक भागात डेसिबलची पातळी 75 तर निवासी भागात दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबलपर्यंत असावी.
तर शाळा कोर्ट आणि रुग्णालयांच्या परिसरात याचे प्रमाण 50 डेसिबल दिवसा आणि 40 डेसिबलपर्यंत असावे, असे नमूद करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळातच नव्हे तर त्याच्या आधी ढोल ताशा पथकांचा सराव सुरू होतो. त्याच्या आवाजाचाही त्रास होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी नोंदवण्यात आल्या आहेत.
आरोग्यावर परिणाम
सतत मोठ्याने आवाज ऐकत राहीलं तर त्याचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याचं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कान नाक घसा तज्ञ डॉ. सचिन गांधी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
कानाच्या रचनेचा आणि आपल्या ऐकू येण्याच्या यंत्रणेचा विचार केला तर मोठ्या आवाजाचा त्रास हा दिर्घकाळ टिकणारा असू शकतो, असं त्यांनी सांगितलं.
डॉ. गांधी म्हणाले, “मोठा आणि सततचा आवाज याचा प्रमुख आपल्या कानांवर परिणाम होतो. कानांमध्ये नस असते जी आपला आवाज बाहेरून मेंदूपर्यंत नेते. त्या नसेवर छोटे छोटे हेअर सेल्स असतात जे आपला आवाज कॅप्चर करतात आणि मेंदूपर्यंत पोहोचवतात.”
“हे हेअर सेल्स कानाच्या सुरुवातीला कानाच्या आतल्या बाजूला असतात. तिथे परिणाम होऊ शकतो. कारण तिथंच ते आपल्या आवाजाला एकाग्र करून आत नसेद्वारे मेंदूकडे पोहोचवतात.”

“त्यामुळे पहिला परिणाम हा आपल्या हेअर सेल्सवर होतो जेव्हा आपला आवाज किंवा मोठा आवाज कानाच्या आत जातो तेव्हा हे हेअर सेल्स डॅमेज झाल्यामुळे दोन प्रकारे कानांवर दुष्परिणाम होतो. एक ऐकायला कमी येणे, श्रवण शक्ती कमी होते आणि दुसरा याच्यापेक्षा गंभीर ठरू शकतो तो कानात सततचा किर्र असा आवाज येणे.”
“याला टिलिटस म्हणतात. आपल्याला ऐकायला कमी आलं तर त्याच्यावर आपण हिअरींग एडने उपचार करू शकतो किंवा दैनंदिन जीवनात उपाय काढू शकतो. मात्र दुसऱ्या प्रकारच्या दुष्परिणामावर उपचार नाही.”
फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय आपल्या मेंदूच्या कार्यक्षमता, एकाग्रता यावरही मोठ्या आवाजाचा परिणाम होतो. यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं आणि खूप काळ हा आवाज कानावर पडत राहिल्यास कार्डिओ व्हॅस्क्युलर रिस्क देखील वाढतं, असं डॉ. गांधी यांनी सांगितलं.
लहान मुलांवर याचा मोठा परिणाम होऊ शकत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
ढोल ताशे, झांजा यांच्या आवाजाचाही श्रवणशक्तीवर परिणाम करणारा असू शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दर गणेश विसर्जन मिरवणूकीनंतर कानाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या 50 ते 60 टक्क्यांनी वाढत असल्याचंही डॉ. गांधी नमूद करतात.
बापट यांची भूमिका नेमकी काय?
बीबीसी मराठीने विद्यानंद बापट यांची नेमकी भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या बैठकीत मांडलेली भूमिका ही अचानक घेतलेली नसून यासाठी अनेक महिने सातत्याने प्रयत्न करत असल्याचं स्ष्ट केलं.
आवाजाचा त्रास कमी व्हावा, नियम पाळले जावे यासाठी त्यांनी पोलीस आयुक्तांपासून प्रत्येक संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार तसंच भेटून भूमिका मांडली असल्याचं बापट यांनी स्पष्ट केलं.

बीबीसी मराठीशी बोलताना बापट म्हणाले, “मी पुण्यात नारायण पेठेत रहातो. पुण्यात पेठांमध्ये गणेशोत्सव किंवा मोठे उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे त्रास अधिक जाणवतो. गणपतीचे 10 दिवस सार्वजनिक वाहतूक पूर्ण बंद असते.”
“शेवटचे 2 दिवस वाहतूक पूर्ण बंद असते. त्यामुळे ध्वनीप्रदुषणाइतकाच रहदारीस होणारा अडथळा हाही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे.”
मिरवणूक आणि इतिहास
पुण्याच्या मिरवणूकांमध्ये हा दणदणाट पूर्वी नव्हता. मुळात पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ऐतिहासिक वारसा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळाच गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि या महोत्सवाने स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचं योगदान बजावलं.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा उत्सव सुरू ठेवायचा का याचीही चर्चा झाली. मात्र त्यावेळी स्वातंत्र्य मिळालं तरी सुराज्यासाठी उत्सव सुरू राहावा अशी भूमिका घेण्यात आल्याचं अभ्यासक सांगतात.
शहराची व्याप्ती लहान असल्याने अर्थातच मंडळांची संख्याही जास्त नव्हती. त्यामुळे मानाच्या गणपती पाठोपाठ इतर मंडळांची निघणारी मिरवणूक दुपारपर्यंत संपत असल्याचेही अभ्यासक सांगतात.
पूर्वी या मिरवणूकीत पेशवे पार्कमधली सुमित्रा हत्तीण ही मिरवणुकीच्या अग्रभागी असायची.

बीबीसी मराठीशी बोलताना सराफ म्हणाले, “स्वातंत्र्यापूर्वीचा गणेशोत्सव ही स्वातंत्र्याची चळवळ होती. कार्यकर्त्यांसाठी ती कार्यशाळा होती. त्यामुळे तो जो काही काळ होता तो स्वातंत्र्यानंतर आता या उत्सवाचा उपयोग काय असा अनेकांना प्रश्न पडला.”
“स्वातंत्र्य मिळालं आता हा उत्सव बंद करा अशी काही जणांनी हाकाटी चालू केली होती. परंतू परिवर्तनशीलता जर लक्षात घेतली तर हा उत्सव सुराज्याच्या चळवळीसाठी उपयुक्त ठरू शकतो अशी तेव्हाचे जे कोणी समाजाचे प्रतिष्ठित लोक होते त्यांना ही खात्री पटली.”
“जेव्हा लोकमान्य टिळक होते तेव्हा एक हाती ते नेतृत्व होतं. मात्र टिळकांनंतर विकेंद्रीत नेतृत्वात सुद्धा ही सुराज्याची चळवळ होऊ शकते आणि समाज प्रबोधनाच्या व्यासपीठावर सुद्धा अनेक जनमानसाला उपयुक्त विषय आपण मांडू शकतो,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
फोटो स्रोत, Getty Images
या उत्सवाचा समाज प्रबोधन करण्यातही महत्वाचा वाटा राहीला आहे. हिंदू मुस्लीम ऐक्य असो , शिक्षणाबाबतची जनजागृती असो, सैन्याचा सन्मान असो महत्त्वाच्या विषयांवर पुण्यातल्या मंडळांनी कायमच देखावे, भाषणं यातून जनजागृती केली आहे.
तुळशी बाग मंडळात स्पिकरचा मुद्दा मांडला गेला तेव्हा त्यांनी स्पिकर्सच्या उंची इतकी धान्यांची पोती ठेवून ती सामाजिक संस्थांना दान करायला सुरुवात केल्याचं सराफ सांगतात.
ईद विरुद्ध गणेशोत्सव
हा वाद सुरू असतानाच झालेल्या ईद ई मिलादमध्येही स्पिकर्सच्या भिंती आणि त्यावर नाचणारी मुलं हे दृश्य दिसलं.
काही व्हीडिओमध्ये स्पिकर्सच्या भिंती उभारून समोरासमोर आलेल्या दोन मिरवणूकांमध्ये वाद झाल्याचंही दृश्य दिसलं.
या दरम्यान आक्षेपार्ह गाणी वाजवली गेल्याची तक्रार भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी नोंदवली आहे.

मात्र बापट यांच्यासह इतरांकडून या कार्यक्रमांनाही डीजेच्या भिंती नको, अशी जाहीर भूमिका घेण्यात आली आहे.
याविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते पैंगबर शेख म्हणाले, ” गेल्या काही वर्षांमध्ये ईदच्या कार्यक्रमात हे दृश्य दिसत आहे. मात्र अशा प्रकारे ईदमध्ये मुलांनी स्पिकर्सवर नाचणं योग्य नाही.”
“पोलीस प्रशासन या कार्यक्रमांबाबत नेमकी काय भूमिका घेत आहे? त्यांनी काय कारवाई केली हे त्यांनी स्पष्ट करावं,” अशी मागणी त्यांनी केली.
भाजप नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका
दरम्यान या प्रकरणावरून भाजपमध्येच वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात असल्याचं दिसत आहे. एकीकडे धीरज घाटे या सणांवर प्रश्न का असं म्हणत असताना कसबा पेठेचे भाजप आमदार हेमंत रासने मात्र नियम पाळले जावे असा आग्रह धरत आहेत.
रासने म्हणाले, ” उत्सव निर्बंध मुक्त हा जो शब्द आहे तो मागच्या वर्षी मीच आणला. त्याच्या मागची मुळ भूमिका अशी आहे की आपल्याला स्वातंत्र्य हवं होतं त्याकरता लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती रस्त्यावर आणला.”
“त्यातून आपल्याला स्वराज्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळालं. परंतू स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही आणि निर्बंधमुक्त म्हणजे बेधूंद नाही या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. निर्बंधमुक्त म्हणजे रात्री 10 वाजता 12 वाजता देखावे बंद करायला लावणं, हॉटेल बंद करायला लावणं. त्याला येणाऱ्या नागरिकांना आनंद मिळावा पण तो चांगल्या पद्धतीने मिळावा.”

तर मर्यादीत स्वरूपात डीजे हवे असं म्हणताना घाटे म्हणाले, ” काही जण म्हणतात की साऊंड लावायचे नाहीत, रस्त्यात मंडप टाकायचे नाहीत, देखावे मोठे करायचे नाहीत, रस्त्यात स्थिर वादन करायचे नाही. पण या वादनाचा त्रास होतो म्हणणारे लोक कोण आहेत?”
“पुण्यात 10 हजार तरूण वादन करतात हे काय पाकिस्तानातून आले आहेत का? तुम्ही जेन झीचं कौतुक करता मग हे कोण आहेत?”
“गणेशोत्सव या विषयात मला असं वाटतं जी चुकीची भूमिका मांडली जाते, बदनाम केलं जातं उत्सवाला एका विशिष्ट विचारसरणीची मुलं या सोशल मिडीयावर बसून या उत्सवाला बदनाम करण्याचं काम करत आहेत असं माझं ठाम मत आहे.”
फोटो स्रोत, Getty Images
याचिका आणि आंदोलन
या वादानंतर पुण्यात डीजेला बंदी घालण्यासाठी ऑनलाईन पीटीशन सुरू करण्यात आली आहे. तर गेल्या वर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) यांचे नेते असणार्या सुनील माने यांनी डीजे विरहीत उत्सव साजरा केला जावा अशी भूमिका घेत कोर्टात धाव घेत कोर्टात याचिका दाखल केली.
तर भाजपमध्ये अनेक वर्षांपासून काम करणारे हेमंत लेले यांनीही ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होत असून सामाजिक एकजुटीसाठी सुरू केलेल्या उत्सवाला हे वेगळे स्वरूप मिळत असल्याचं म्हणलं आहे.
राजकीय पाठबळामुळे नियमांची अंमलबजावणी कमकुवत पडत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
पोलिसांची भूमिका
या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी डीजे तसेच विविध यंत्रांचा होणारा आवाज याची चाचणी घेतली. त्यात काही यंत्रांचा आवाज हा पातळीपेक्षा जास्त असल्याचं आढळल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतलं की, साधारण 4 बेस आणि 4 टॉपला मिरवणुकीसाठी परवानगी दिली जाऊ शकते. मात्र यात नियमावलीचे तसेच कोर्टाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




