Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Ari Michelson/ AUGUST
वैज्ञानिक अशा काही असामान्य व्यक्तींचा अभ्यास करत आहेत, ज्यांचं शरीर एचआयव्हीच्या विषाणूला नैसर्गिकरीत्या प्रतिकार करण्यास सक्षम आहे. म्हणजेच असे लोक ज्यांना एचआयव्हीचा संसर्ग होणार नाही. या लोकांचा अभ्यास करून HIV च्या संसर्गावर काही उपचार काढता येतील का याचे संशोधन सुरू आहे.
लॉरीन विलेनबर्ग (71 वर्षे) या अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅक्रामेंटोमध्ये राहणाऱ्या लँडस्केप डिझायनर होत्या. एचआयव्हीवर काम करणाऱ्या संशोधक किंवा वैज्ञानिकांसाठी तीन दशकांहून अधिक काळ त्या कुतुहलाची आणि अपवादाची बाब ठरल्या होत्या.
विलेनबर्ग यांना 1992 मध्ये एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं निदान झालं होतं. म्हणजेच त्या एचआयव्ही पॉझिटिव्ह ठरल्या होत्या. संसर्ग झाल्यानंतर एचआयव्हीचा विषाणूनं विलेनबर्ग यांच्या रोगप्रतिकार शक्तीवर हल्ला चढवून ती कमकुवत करून शेवटी त्यात त्यांचा मृत्यू होणं अपेक्षित होतं.
मात्र तसं होण्याऐवजी हा विषाणू त्यांच्या शरीरात दडपलेल्या स्थितीत किंवा नियंत्रित स्थितीत राहिला. त्यामुळे अनेक दशकं विलेनबर्ग या आजारावर कोणतंही औषध न घेता सामान्य आयुष्य जगू शकल्या.
“माझ्या डॉक्टरांनी मला नेहमीच सांगितलं आहे की HIVच्या संसर्गाला माझ्या रोगप्रतिकारक शक्तीनं दिलेला प्रतिसाद अतिशय वेगळा, वैशिष्ट्यपूर्ण होता. अनेक वर्षे त्यांना याबद्दल निश्चितच माहीत नव्हतं. मात्र मी इतरांपेक्षा वेगळी आहे हे माहीत त्यांना होतं,” असं विलेनबर्ग यांनी मला ऑगस्ट 2025 मधील एका मुलाखतीत सांगितलं होतं.
विलेनबर्ग यांचं या वर्षी एप्रिल महिन्यात निधन झालं. त्या बहुधा जगातील सर्वात प्रसिद्ध ‘एलिट कंट्रोलर’ होत्या. ही संज्ञा एचआयव्ही संसर्ग झालेल्या अतिशय अल्पसंख्येत असणाऱ्या लोकांसाठी वापरली जाते, ज्यांना कोणतंही औषध न देता, कोणताही वैद्यकीय हस्तक्षेप न करता त्यांच्या शरीरात एचआयव्हीचा विषाणू आपोआप नियंत्रणात राहतो.
एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या एकूण लोकांपैकी साधारणपणे 0.5 टक्के लोक या असामान्य गटात येतात. जगभरातील लाखो लोकांना एचआयव्हीवर मात करण्यासाठीची गुरुकिल्ली याच लोकांकडे असल्याचं वैज्ञानिकांना वाटतं.
विलेनबर्ग यांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर त्यातून त्यांचं वाचणं ही खूपच उल्लेखनीय गोष्ट ठरली. कारण 2022 मध्ये त्यांना चौथ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचं निदान झालं होतं. हा कर्करोग त्यांच्या फुप्फुसापासून ते मेंदूपर्यंत पसरला होता. त्यावरच्या उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. शस्त्रक्रिया आणि तीव्र औषधोपचारांमुळे त्यांचा ट्युमर किंवा गाठ कमी झाली.
कर्करोगाशी लढण्यासाठी त्यांना दिल्या जात असलेल्या औषधांमुळे त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती दाबली जात होती, कमी होत होती. अशा परिस्थितीत त्यांच्या शरीरात सुप्तावस्थेत असलेल्या एचआयव्हीच्या विषाणूनं डोकं वर काढून पुन्हा अचानक सक्रिय व्हायला हवं होतं.
मात्र संशोधकांनी जेव्हा विलेनबर्ग यांच्या पेशींची कसून तपासणी केली, तेव्हा त्यांच्या शरीरात स्पष्टपणे असण्यायोग्य HIVचा अंश आढळला नाही.
फोटो स्रोत, Ragon Institute
म्हणूनच 2025 च्या आंतरराष्ट्रीय एड्स सोसायटी परिषदेत शू यू वैज्ञानिकांसमोर उभ्या राहिल्या आणि त्यांनी एक नाट्यमय, महत्त्वाचं विधान केलं. त्यांनी जाहीर केलं की विलेनबर्ग कदाचित एचआयव्हीच्या संसर्गातून पूर्णपणे मुक्त झाल्या होत्या.
शू यू या एमआयटी आणि हार्वर्डमधील रॅगॉन इन्स्टिट्यूट ऑफ मास जनरल ब्रिघममध्ये वैद्यकशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्यांनी विलेनबर्ग यांच्या शरीरात एचआयव्हीच्या अस्तित्वाचा सखोल शोध घेतला होता.
ही उल्लेखनीय बातमी कटू-गोड स्वरूपाची होती. काही महिन्यांनी कर्करोगाशी लढा देणाऱ्या विलेनबर्ग यांचं त्याच आजारानं एप्रिल 2026 मध्ये निधन झालं.
मात्र त्यांनी मागे ठेवलेला वारसा अतिशय गहन, मोलाचा आहे. गेल्या शतकात उदयाला आलेल्या सर्वात विनाशकारी संसर्गजन्य आजारांपैकी एका आजारावर मात करता येऊ शकते, याचा तो पुरावा आहे.
“लॉरीन यांच्यासारख्या काही ‘एलिट कंट्रोलर्स’च्या शरीरात एचआयव्हीचा कोणताही सक्रिय विषाणू आढळत नाही. आम्ही अब्जावधी पेशींचं विश्लेषण केलं. मात्र त्यानंतरही तिथे खरोखरंच काहीही सापडलं नाही,” असं यू म्हणतात. ‘एलिट कंट्रोलर्स’ म्हणजे एचआयव्हीच्या विषाणूवर नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळवलेल्या व्यक्ती.
ही गोष्ट विशेषकरून महत्त्वाची आहे. कारण अत्यंत दुर्मिळ परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्तीला स्वत:हून एचआयव्हीचा विषाणू नष्ट करणं शक्य आहे असं त्यातून दिसून येतं किंवा सूचित होतं.
अर्जेंटिनामध्ये अशाच प्रकारे एका ‘एलिट कंट्रोलर’वर सखोल अभ्यास करण्यात आला आहे. त्यामधूनही अशीच आशादायी परिस्थिती दिसून येते आहे. ही एलिट कंट्रोलर तिशीतील एक अज्ञात महिला आहे. तिला ‘एस्पेरांझा’ (हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ ‘आशा’ असा होतो) रुग्ण म्हणून ओळखलं जातं. ती देखील एचआयव्हीच्या संसर्गातून संभाव्यरीत्या बरी झाल्याचं मानलं जातं.
या उल्लेखनीय कहाण्यांमुळे उत्साहित होऊन यू यांच्यासारखे वैज्ञानिक एलिट कंट्रोलर्सच्या जीवशास्त्राचा म्हणजे त्यांच्या शरीराचा सखोल अभ्यास करत आहेत. त्यांना वाटतं की एचआयव्ही संसर्गासह जगत असलेल्या 4.08 कोटी लोकांवर आधुनिक उपचार करता येतील असे महत्त्वाचे संकेत या लोकांच्या उल्लेखनीय रोगप्रतिकारक शक्तीमध्ये दडलेले आहेत.
आगामी वर्षांमध्ये यातून या आजारावर उपचार शोधण्यास किंवा विकसित करण्यास वैज्ञानिकांना मदत होऊ शकेल.
जीन डेझर्ट्स
सर्वसामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशिएन्सी व्हायरस) चा संसर्ग होतो तेव्हा हा विषाणू त्यांच्या शरीरात वेगानं पसरतो. पेशींच्या डीएनएमध्ये त्याचं जनुकीय गोष्टी जोडून तो त्याची प्रतिकृती तयार करतो. मग हा विषाणू रक्तप्रवाहाद्वारे ‘लिम्फ नोड्स’ म्हणजे ‘लसिका ग्रंथी’पर्यंत पोहोचतो.
तिथून तो शरीरातील रोगप्रतिकारक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या पांढऱ्या पेशींना लक्ष्य करून त्यांना नष्ट करतो. अशाप्रकारे तो रोगप्रतिकारक व्यवस्था नष्ट करण्यास किंवा निष्क्रिय करण्यास सुरुवात करतो.
जर या विषाणूवर उपचार करण्यात आले नाहीत, तर रुग्णांना एड्सचा (ॲक्वायर्ड इम्युन डेफिशिएन्सी सिंड्रोम) आजार होऊ शकतो. या आजारात शरीरातील रोगप्रतिकारक व्यवस्था इतर संसर्गांपासून रुग्णांचा बचाव करण्यास असमर्थ ठरते.
साधारणपणे 1990 च्या दशकाच्या मध्यात एचआयव्हीवर उपचार करणाऱ्या प्रभावी औषधांचा विकास झाला. ही औषधं ‘अँटीरेट्रोव्हायरल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. एड्सच्या विरोधातील ती अत्यंत निर्णायक घटना ठरली.
ही औषधं एचआयव्हीच्या विषाणूला स्वत:ची प्रतिकृती बनवण्यापासून रोखतात. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक व्यवस्था पूर्ण कोलमडणं रोखलं जातं. रोगप्रतिकारक व्यवस्था कोलमडणंच रुग्णाच्या मृत्यूला अखेरीस कारणीभूत ठरतं.
यामुळे लाखो लोकांना एचआयव्ही विषाणूचा संसर्ग होऊनदेखील तुलनात्मकरित्या सामान्य निरोगी आयुष्य जगता येतं.
एप्रिल 2026 मध्ये एका अभ्यासातून असंही दिसून आलं की दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलू-नतालसारख्या एचआयव्हीच्या संसर्गाचा हॉटस्पॉटमध्ये अँटीरेट्रोव्हायरल औषधाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे मानवी लोकसंख्येच्या उत्क्रांतीच्या प्रवासातदेखील बदल झाला होता.
कारण या औषधांमुळे अनेक जीव वाचले. यामुळे मानवी जीनोम म्हणजे जनुकीय रचनेमध्ये नैसर्गिक निवडीचा भाग म्हणून जे बदल झाले असते, ते रोखले गेले.
फोटो स्रोत, Getty Images
मात्र बहुतांश वेळा ही औषधं एचआयव्हीच्या विषाणूला पूर्णपणे नष्ट करत नाहीत. एचआयव्हीचे विषाणू शरीरातील वेगवेगळ्या पेशींमध्ये त्यांचे साठे तयार करतात. यात रक्त, लसिका ग्रंथी, मेंदू आणि आतड्यांचा समावेश असतो. यामुळे हा विषाणू अनेक वर्षे शरीरारात सुप्तावस्थेत राहू शकतो.
शरीरातील रोगप्रतिकारक पेशींनी त्याचा शोध घेऊन त्याला नष्ट करणं टाळण्यासाठी हा विषाणू म्युटेशन म्हणजे जनुकीय परिवर्तनाला सामोरं जातो.
विलेनबर्ग आणि एस्पेरांझा रुग्ण यांच्यासारख्या एलिट कंट्रोलर्सच्या बाबतीत मात्र हे नियम लागू होत असल्याचं दिसत नाही.
यासंदर्भातील सुरुवातीच्या अभ्यासांमधील निष्कर्षांमधून दिसतं की एलिट कंट्रोलर्स कोणत्याही औषधाच्या मदतीशिवाय या विषाणूला नियंत्रणात ठेवण्यास सक्षम असतात. कारण त्यांच्यामध्ये अद्वितीयष अशी जनुकं असतात.
ही जनुकं परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या त्यांच्या रोगप्रतिकारक व्यवस्थेला अधिक शक्तिशाली बनवतात किंवा खूप अधिक सक्रिय करतात. जुळवून घेणारी रोगप्रतिकारक व्यवस्था म्हणजे विषाणू आणि संसर्ग निर्माण करणाऱ्या इतर सूक्ष्मजीवांबद्दलची शरीराची दीर्घकालीन स्मृती.
विशेषकरून एलिट कंट्रोलर्समध्ये त्यांच्या बचाव किंवा संरक्षण यंत्रणेचा एक भाग एचआयव्ही विषाणूला रोखण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी खासकरून सज्ज असतो. याला सीडी8+ टी पेशी असं म्हणतात.
मात्र या अतिशय शक्तिशाली किंवा अतिशय सक्रिय सीडी8+ टी पेशी एचआयव्हीला वरवर पाहता अनिश्चित काळासाठी कसं काय दडपून ठेवू शकतात हा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. यू आणि इतरांनी 2020मध्ये 64 एलिट कंट्रोलर्सवर एक अभ्यास केला.
या अभ्यासातून समोर आलं की त्यांनी एचआयव्हीच्या विषाणूला ‘जीन डेझर्ट्स’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या डीएनएच्या मोठ्या भागांमध्ये बंदिस्त करून ठेवलं होतं. या ठिकाणी हा विषाणू फारसं नुकसान करू शकत नाही.
आपल्या सर्वांमध्ये ‘जीन डेझर्ट्स’ असतात. हा जीनोमचा विस्तीर्ण भाग असतो ज्यात वरवर पाहता संबंधित किंवा महत्त्वाचं काहीही नसतं. असं दिसतं की एलिट कंट्रोलर्सच्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशी एचआयव्हीच्या विषाणूला जनुकीय कोडच्या किंवा रचनेच्या या भागांमध्ये ढकलण्यास सक्षम असतात.
त्यांच्या शरीरावर प्रभाव टाकणाऱ्या किंवा प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या इतर कोणत्याही सक्रिय जनुकांपासून ते फार दूर असतात. या कारणामुळे एचआयव्हीचा विषाणू मूलत: अडकून पडतो. त्याला स्वत:ची प्रतिकृती तयार करण्यासाठी आणि पसरण्यासाठी आवश्यक असलेल्या जनुकीय यंत्रणेवर तो ताबा किंवा नियंत्रण मिळवू शकत नाही.
“अखंड असलेले विषाणू अजून तिथे आहेत. मात्र ते अशा भागात आहेत जिथे ते आता आणखी काहीही करू शकत नाही. यामुळे…कार्यात्मक उपायांचं स्वरुप काय असू शकतं याचा आम्हाला एक आराखडाच मिळाला,” असं यू म्हणतात.
फंक्शनल क्युअर किंवा कार्यात्मक उपाय म्हणजे आजाराचा पूर्ण नायनाट होत नाही, मात्र आजार पूर्णपणे नियंत्रणात आणला जातो.
इतकंच काय, संशोधनातून असंही आढळून आलं की अशीच प्रक्रिया ‘पोस्ट-ट्रीटमेंट कंट्रोलर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या आणखी एक विशेष गटातदेखील घडू शकते.
फोटो स्रोत, Getty Images
एलिट कंट्रोलर्सच्या उलट याप्रकारच्या लोकांना या विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी सुरुवातीला अँटीरेट्रोव्हायरल औषधांची आवश्यकता होती. मात्र दोन दशकं ही औषधं घेतल्यानंतर एचआयव्हीच्या विषाणूनं पुन्हा डोकं वर न काढता त्यांना उपचार थांबवता आले आहेत.
असं मानलं जातं की या प्रकरणांमध्ये औषधांचा उपयोग एचआयव्ही दडपण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार व्यवस्थेला या विषाणूला जीन डेझर्टमध्ये ढकलणं शक्य होतं.
नैसर्गिक मारक पेशी (नॅचरल किलर सेल्स)
सीडी8+ टी पेशी या यासंदर्भातील फक्त एक बाजू असू शकतात. गेल्या काही वर्षांमध्ये याबाबतीतील पुढील संशोधनातून रोगप्रतिकारक पेशींच्या आणखी एका वेगळ्या गटाला शोधून काढण्यात आलं आहे. या पेशी एचआयव्हीच्या विषाणूला जीन डेझर्टमध्ये वळवण्याच्या किंवा हाकलण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
अलीकडच्या एका अभ्यासात फ्रान्समधील रुग्णांच्या गटात काही धागेदोरे किंवा संकेत सापडले आहेत. रुग्णांच्या या गटाला ‘विस्कोन्टी कोहोर्ट’ म्हणून ओळखलं जातं. तो पोस्ट ट्रीटमेंट कंट्रोलर्स म्हणजे उपचारानंतर विषाणूंवर नियंत्रण मिळणाऱ्या रुग्णांचा सर्वात मोठा समूह आहे.
या विस्कोन्टी गटातील 30 व्यक्तींवर सुरुवातीला अँटीरेट्रोव्हायरलचे उपचार करण्यात आले. मात्र नंतर ते या औषधांशिवाय आणि विषाणू शरीरात असताना जगू शकले आहेत. म्हणजेच विषाणूवर नियंत्रण ठेवू शकले आहेत. काही जण तर 20 वर्षांहून अधिक काळ जगले आहेत.
या अभ्यासातून असं दिसून आलं की विस्कोन्टी रुग्णामध्ये त्यांच्या नॅचरल किलर सेल्स म्हणजे नैसर्गिक मारक पेशींच्या वर्तनावर प्रभाव टाकणारे जनुकीय प्रकार आढळतात. या नॅचरल किलर सेल्स म्हणजे एक प्रकारच्या रोगप्रतिकारक पेशी असतात. त्या एचआयव्ही विषाणूचा संसर्ग झालेल्या पेशींची ओळख पटवतात आणि त्यांना नष्ट करतात.
सीडी8+ टी पेशींच्या उलट नॅचरल किलर सेल्स जन्मजात किंवा नैसर्गिक रोगप्रतिकारक व्यवस्थेचा भाग आहेत. विषाणू, जिवाणूंसारख्या संसर्ग निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या विरोधातील ती शरीराची पहिली संरक्षक फळी असते. ती माणसाच्या जन्मापासूनच त्याच्या शरीरात अस्तित्वात असते.
क्रिस्तिना दोबॅगल या दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल हेल्थ लॅबोरेटरी सर्व्हिस आणि विटवॉटर्सरँड विद्यापीठात रोगप्रतिकारकशास्त्र विभागाच्या (इम्युनोलॉजी डिव्हिजन) प्रमुख आहेत.
फोटो स्रोत, Ari Michelson/ AUGUST
क्रिस्तिना यांच्या मते, एलिट कंट्रोलर्समध्ये नॅचरल किलर सेल्सदेखील विशेषकरून सक्रिय असल्याचं दिसून येतं. क्रिस्तिना दोबॅगल यांनी एका अभ्यासाचं नेतृत्व केलं. या अभ्यासातून दिसून आलं की एलिट कंट्रोलर्समध्ये सीडी69 हा रेणू मोठ्या प्रमाणात असणाऱ्या किंवा बाळगणाऱ्या नॅचरल किलर सेल्स अधिक प्रमाणात असतात. सीडी69 हा एक तथाकथित बायोमार्कर आहे. तो दर्शवितो की या पेशी सतर्क आहेत आणि प्रतिसाद देण्यासाठी सज्ज आहेत.
या तयार झालेल्या किंवा सज्ज असलेल्या नॅचरल किलर सेल्स एलिट कंट्रोलर्सच्या शरीरात सर्वत्र पसरलेल्या असू शकतात, असं दोबॅगल म्हणतात.
“त्या आतडे, लसिका ग्रंथी किंवा प्रजनन मार्गासारख्या शरीरातील अधिक खोल भागांमध्ये राहून कार्यरत असू शकतात. याच खोल भागांमध्ये एचआयव्हीचा विषाणू लपून राहतो आणि स्वत:ची प्रतिकृती तयार करतो,” असं त्या म्हणाल्या.
हे खरं असल्याचं जर पुढील संशोधनातून सिद्ध झालं तर उपचारात्मक लस (थेरेपेटिक व्हॅक्सीन) फक्त रक्तातच नाही तर लसिका ग्रंथी आणि इतर ऊतींमध्येदेखील नॅचरल किलर सेल्स सक्रिय करण्याचा प्रयत्न करू शकतात. एलिट कंट्रोलर्सच्या शरीरातील रचनेची किंवा स्थितीची नक्कल करणं हा त्याचा उद्देश असेल.
“एचआयव्हीवर उपचार करण्यातील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणजे हा विषाणू शरीरात खोलवर असलेल्या साठ्यांमध्ये लपलेला असतो. अत्यंत सक्रिय आणि कार्यक्षम असलेल्या नॅचरल किलर सेल्स एचआयव्हीच्या या छुप्या जागा शोधून त्यातून या विषाणूंना बाहेर काढून नष्ट करू शकतात,” असं दोबॅगल म्हणतात.
महिलांची भूमिका
सुरुवातीच्या टप्प्यात अशाप्रकारचे उपचार एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या महिलांसाठी सर्वात फायदेशीर ठरू शकतात, असं यू म्हणतात.
एलिट कंट्रोलर्स या गटात महिलांचं प्रमाण सर्वाधिक आहे. नवीन संशोधनातून समोर आलं आहे की महिलांच्या जन्मजात किंवा नैसर्गिक रोगप्रतिकारक व्यवस्थेमध्ये एचआयव्हीचा सामना करण्यासाठी अधिक सुसज्ज असलेल्या नॅचरल किलर सेल्स असण्याची शक्यता जास्त असते. अर्थात ऐतिहासिकदृष्ट्या या विषाणूचा नायनाट करण्यासाठी करण्यात आलेल्या बहुतांश चाचण्या पुरुषांवरच करण्यात आल्या आहेत.
“उपचाराशी संबंधित चाचण्या आणि अभ्यासांमध्ये आपण महिलांचा पुरेसा अभ्यास करत नाही. मात्र महिलांमध्ये एलिट कंट्रोलर्स होण्याची शक्यता 2 – 5 पट अधिक असते,” असं यू म्हणतात.
विलेनबर्ग त्यांच्यासारख्या एलिट कंट्रोलर्सचा अभ्यास करून मिळवलेल्या माहितीचा, ज्ञानाचा वापर अद्याप या विषाणूसह जगणाऱ्या लोकांवरील उपचारांमध्ये सुधारणा करताना कशाप्रकारे केला जाऊ शकतो याबाबत स्वत: उत्सुक होत्या.
“या संसर्गजन्य आजाराचा शेवट पाहण्याइतकं दीर्घायुष्य मला मिळावं, अशी माझी इच्छा आहे. जर माझ्या योगदानामुळे विज्ञानात भर पडली असेल, प्रगती झाली असेल, तर ती माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी लोकांसाठी आशेचा किरण बनण्याचा प्रयत्न करत राहीन,” असं विलेनबर्ग त्यांच्या निधनाच्या काही महिने आधी म्हणाल्या होत्या.
या संसर्गजन्य आजाराचा अंत पाहण्याइतकं दीर्घायुष्य विलेनबर्ग यांना लाभलं नाही. मात्र त्यांनी निर्माण केलेली आशा आजही कायम आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC







