Home LATEST NEWS ताजी बातमी दिवसा सतत झोप येतेय? वारंवार जांभया, डोळे मिटतात? जाणून घ्या याचा धोका

दिवसा सतत झोप येतेय? वारंवार जांभया, डोळे मिटतात? जाणून घ्या याचा धोका

2
0

Source :- BBC INDIA NEWS

दिवसा सतत झोप येणं धोकादायक ठरू शकतं; कारणं आणि उपाय जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images

  • Published

  • वाचन वेळ: 6 मिनिटे

सकाळी झोपून उठलं तरी झोप झाली नसल्यासारखं वाटणं. मग दिवसभरात जरा मोकळा वेळ मिळालं की पडावसं वाटणं किंवा संधी मिळाली की डोळे मिटायला लागणं, असा प्रकार तुम्ही पाहिला असेल. पण दिवसा सतत झोप येणं ही तितकीशी साधी गोष्ट नाही.

सतत डोळे झाकायला लागले, कामाच्यावेळेत किंवा गाडी चालवताना झोप अनावर होऊ लागली तर त्यामागे गंभीर कारणं असू शकतात.

‘एक्सेसिव्ह डे टाइम स्लीपिनेस’ म्हणजेच दिवसा अतिप्रमाणात झोप येण्याची समस्या हे केवळ आळशीपणाचं लक्षण नसून, शरीरातल्या अनेक बिघाडांची ती सूचनाच असू शकते.

बदललेली जीवनशैली, स्क्रीन टाइमचा अतिरेक, मानसिक ताण, अपुरी झोप, शिफ्टमध्ये काम करणं यांसारख्या गोष्टींमुळे ही समस्या वाढताना दिसत आहे.

याचा परिणाम केवळ कामाच्या उत्पादकतेवरच होत नाही… तर अपघाताचा धोका, मानसिक आरोग्यावर परिणाम, तसेच दीर्घकालीन आजारांचा धोका वाढवू शकतो. अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात किंवा ‘मी थकलोय’ असं म्हणून ते बाजूला सारतात. पण सतत झोप येणं हा एक ‘हेल्थ वॉर्निंग सिग्नल’ असू शकतो.

मग दिवसा झोप का येते? ही झोप म्हणजे सामान्यपणे येणारा थकवा आहे की एखाद्या झोपेच्या आजाराचं लक्षण? आणि यावर उपाय काय असू शकतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

दिवसा सतत झोप येण्यामागची कारणं

दिवसभर झोप येण्याची कारणं ही एका घटकावर थांबत नाहीत तर ती अनेक शारीरिक आणि मानसिक कारणांच्या एकत्र परिणामातून निर्माण होतात.

सर्वात सामान्य कारण म्हणजे रात्री पुरेशी आणि चांगल्या दर्जाची झोप न मिळणं. उशिरापर्यंत स्क्रीनसमोर वेळ घालवणं, अनियमित झोपेची वेळ, किंवा रात्री वारंवार जाग येणं यामुळे शरीराचं नैसर्गिक निद्रा-चक्र (स्लीप सायकल) बिघडतं.

तसंच, ‘स्लीप अप्निया‘सारख्या झोपेच्या विकारांमध्ये व्यक्ती झोपेत श्वास घेण्यात अडथळा येतो, ज्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो.

दिवसा सतत झोप येण्यामागची कारणं

फोटो स्रोत, Getty Images

मानसिक आरोग्याशी संबंधित समस्याही यासाठी कारणीभूत असतात. उदाहरणार्थ नैराश्य (डिप्रेशन) किंवा अतिरेकी ताण यांचाही झोपेवर मोठा परिणाम होतो. काही औषधांचे साइड इफेक्ट्स, मद्यपान, किंवा कॅफिनचा अतिरेक हेदेखील झोपेचं संतुलन बिघडवू शकतात.

याशिवाय, थायरॉइडसारखे हार्मोनल बदल, मधुमेह, किंवा लठ्ठपणासारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांमुळेही दिवसा झोप येण्याची समस्या वाढू शकते. त्यामुळे ही समस्या केवळ सवयींपुरतीच न ठेवता तिच्यामागची कारणं समजून घेणं गरजेचं असतं.

दिवसा सतत येणारी झोप आणि नेहमीचा थकवा यात काय फरक आहे?

आता श्रमामुळे, भरपूर शारीरिक काम केल्यामुळे किंवा अतिव्यायाम केल्यामुळे, धावपळीमुळे आलेला थकवा आणि या सतत झोप येण्याच्या स्थितीमध्ये फरक आहे, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे.

रोजच्या कामामुळे, धावपळीमुळे किंवा शेतकरी-कष्टकरी यांच्या रोजच्या कामामुळे त्यांना येणारा थकवा हा सामान्य आहे. विश्रांती, आहार, निद्रा यामुळे आपल्याला पूर्ववत होता येतं.

दिवसा सतत येणारी झोप आणि नेहमीचा थकवा यात काय फरक आहे?

फोटो स्रोत, Getty Images

दिवसा अत्याधिक झोप येणं (EDS) म्हणजे दिवसभरात, व्यक्तीने जागृत आणि सतर्क राहणे अपेक्षित असतानाही वारंवार किंवा अनावरपणे झोप येण्याची प्रवृत्ती. हे सामान्य थकव्यापेक्षा वेगळे आहे.

थकवा म्हणजे शारीरिक किंवा मानसिक दमल्याची भावना. थकलेल्या व्यक्तीला ऊर्जा कमी वाटू शकते, परंतु ती सामान्यतः जागी राहू शकते. याउलट, EDS असलेल्या व्यक्तीला बैठकीदरम्यान, संभाषण करताना किंवा वाहन चालवितानाही डोळे उघडे ठेवणे कठीण जाऊ शकते.

रात्रीची झोप अपुरी राहाण्याचा प्रकार दीर्घकाळ चालला तर मात्र प्रश्न निर्माण होतो. झोपेची कमतरता कालांतराने ‘स्लीप डेट’ (Sleep Debt) निर्माण करते. मेंदूला पुरेशी आणि पुनरुज्जीवन करणारी, झीज भरुन काढणारी झोप मिळाली नाही तर सतर्कता, एकाग्रता, स्मरणशक्ती आणि प्रतिक्रिया देण्याची क्षमता कमी होते. यामुळे दिवसभर अनावर वाटणारी झोप सतत येऊ लागते.

दिवसा सतत अत्याधिक झोप येण्याची लक्षणं कोणती?

  • वारंवार जांभया येणे
  • एकाग्रतेत अडचण येणे
  • सकाळी डोकेदुखी होणे
  • चिडचिडेपणा, विस्मरण
  • नकळत डुलकी लागणे
  • दैनंदिन कामांदरम्यान झोप येणे
  • ही EDS ची सुरुवातीची सामान्य लक्षणे आहेत.

EDS मुळे काय त्रास होऊ शकतो?

EDS मुळे निर्णयक्षमता कमी होऊ शकते, कामातील उत्पादकता घटू शकते, चुका वाढू शकतात आणि रस्ते अपघातांचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो.

अगदी सौम्य स्वरूपातील झोपही प्रतिक्रिया देण्याच्या क्षमतेवर असा परिणाम करू शकते, हा काही प्रमाणात मद्यप्राशनामुळे होणाऱ्या परिणामांसारखा असतो.

EDS होण्याची सर्वाधिक शक्यता कोणाला?

रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, संगणक किंवा इतर स्क्रीनचा वापर करणं, जास्त ताणतणाव, कॅफीनचं अति सेवन आणि झोपेच्या वेळांमधील अनियमितता यामुळे शरीराच्या जैविक घड्याळात (Body Clock) अडथळे निर्माण होतात. यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते आणि दिवसा झोप येण्याचं प्रमाण वाढतं. याप्रकारच्या सवयी असल्या तर दिवसा सतत अत्याधिक झोप येण्याची शक्यता असते.

त्यामुळे शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी, आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिक, वाहनचालक, वैमानिक, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि विद्यार्थी यांना अनियमित दिनचर्येमुळे अधिक धोका असतो. तसेच, वयोमानानुसार झोपेतील बदल आणि इतर वैद्यकीय समस्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्येही EDS आढळू शकतो.

मग डॉक्टरांकडे कधी जायचं?

आपल्याला दिवसा येणारी ही सततची अनिवार झोप आरोग्याची समस्या आहे, याचं निदान डॉक्टरच करू शकतात. त्यासाठी आपण लक्षणांकडे लक्ष दिलं पाहिजे.

डॉक्टरांची मदत कधी घ्यायची हा प्रश्न आम्ही डॉ. अनिरुद्ध मोरे यांना विचारला. ते ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजिस्ट सल्लागार आहेत.

मग डॉक्टरांकडे कधी जायचं?

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, “पुरेशी झोप घेतल्यानंतरही दिवसा सतत झोप येत असेल, त्यामुळे कामकाज किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल किंवा अचानक डुलक्या लागण्याचे प्रसंग घडत असतील, तर वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. सतत राहणारा EDS हा एखाद्या झोप विकाराचा किंवा न्यूरोलॉजिकल आजाराचा संकेत असू शकतो.”

डॉ. अनिरुद्ध मोरे पुढं म्हणाले, “आधुनिक जीवनशैली झोपेसाठी अधिकाधिक प्रतिकूल होत चालली आहे. वाढते कामाचे तास, डिजिटल उपकरणांचा वाढलेला वापर, ताणतणाव, शिफ्टमध्ये काम करण्याची पद्धत आणि लठ्ठपणाचे वाढते प्रमाण ज्याचा स्लीप ॲप्नियाशी जवळचा संबंध आहे… यांमुळे EDS चे प्रमाण वाढत आहे. अनेक लोक “मी खूप व्यग्र आहे” असे समजून या समस्येकडे दुर्लक्ष करतात; परंतु प्रत्यक्षात ते एखाद्या झोप विकाराचे लक्षण असू शकते, ज्याकडे योग्य वेळी लक्ष देणे आवश्यक आहे.”

रात्रीची झोप का आवश्यक आहे? झोपेत काय होत असतं?

मानव जैविकदृष्ट्या अशा प्रकारे तयार झाला आहे की दिवसा तो सक्रिय राहतो आणि रात्री शरीराची पुनर्बांधणी (रिकव्हरी) करण्यासाठी झोपतो. ही प्रक्रिया मुख्यतः दोन घटकांनी नियंत्रित केली जाते.

पहिली म्हणजे, दिवसभरात मेंदूत अ‍ॅडेनोसिन नावाचं रसायन हळूहळू साठत जातं. जागेपणाचा कालावधी जितका वाढतो, तितकी झोप घेण्याची गरज (sleep pressure) वाढत जाते.

दुसरी प्रक्रिया म्हणजे, सूर्यास्तानंतर प्रकाश कमी झाल्यावर मेंदूतील पाइनियल ग्रंथीतून मेलाटोनिन या हार्मोनचा स्राव वाढतो. हे हार्मोन शरीराला झोपेची तयारी करण्याचा संकेत देतं आणि जागेपणातून झोपेकडे जाण्याची प्रक्रिया सुरू होते.

रात्रीची झोप का आवश्यक आहे? झोपेत काय होत असतं?

फोटो स्रोत, Getty Images

ही झोप का आवश्यक आहे असा प्रश्न आम्ही जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे न्युरोलॉजी विभागाचे डायरेक्टर असणाऱ्या डॉ. जॉय देसाई यांना विचारला.

डॉ. देसाई म्हणाले, “झोपेमुळे शरीराचं योग्यरीतीने पुनरुज्जीवन होण्यासाठी काही मूलभूत अटी पूर्ण होणं आवश्यक आहे. त्यात दररोज सात ते आठ तासांची झोप, सूर्यास्तानंतर चार तासांच्या आत झोप लागणं, आणि स्लीप अप्निया किंवा रेस्टलेस लेग्स सिंड्रोम (RLS) यांसारख्या झोपेच्या आजारांचा अभाव. या सवयी जास्तीत जास्त नियमित असतील, तितकं झोपेमधून होणारी पुनरुत्थान (रिव्हायव्हल) आणि पुनर्बांधणी (रिस्टोरेशन)ची प्रक्रिया अधिक चांगली होते. याचा अर्थ, योग्य झोप घेतलेली व्यक्ती दिवसभरातील सोळा तास जागी आणि सतर्क राहून जगाशी सक्रिय संवाद साधू शकते.”

रात्रीची झोप का आवश्यक आहे? झोपेत काय होत असतं?

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या झोपेत अतिशय महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात, असं डॉ. जय देसाई सांगतात. झोपेमध्ये आपल्या शरीरात, मेंदूत कोणत्या गोष्टींची कामं होतात हे त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले, “रक्तदाबाचं नियमन, रक्तातील साखरेचं नियंत्रण, चरबी (मेद) साठवण्याची प्रक्रिया संतुलित ठेवणं, स्मरणशक्तीचं एकत्रीकरण (मेमरी कन्सॉलिडेशन), भावनांचं स्थिरीकरण, आणि झोपेदरम्यानच कार्यरत असलेल्या glymphatic प्रणालीद्वारे मेंदूमधील संभाव्य हानिकारक प्रथिनांची सफाई झोपेत होत असते. त्यामुळे ज्यांना झोपेचे विकार आहेत आणि तसंच ज्यांना दिवसभर झोप येते, त्यांच्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे जीवनशैलीशी संबंधित आजार आढळतात, तसेच त्यांना स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.”

झोपेच्या चांगल्या सवयी- स्लीप हायजिनसाठी आवश्यक गोष्टी

  • रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची एक ठरलेली वेळ पाळणं.
  • शक्यतो ती दिवस-रात्र चक्राशी जुळलेली असावी.
  • शक्यतो सकाळच्या वेळेत व्यायाम करणं.
  • उठल्यानंतर काही मिनिटं सूर्यप्रकाशात राहणं, ते झोपेच्या सायकलसाठी फायदेशीर ठरतं.
  • दुपारी 3 नंतर कॉफी आणि मद्यपान मर्यादित ठेवणं ही चांगली सवय आहे.
  • झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ करणं झोप लागण्यास मदत करतं.
  • सूर्यास्तानंतर एका तासाच्या आत रात्रीचं जेवण पूर्ण करणं झोपेच्या पुनर्बांधणी प्रक्रियेला चालना देतं.
  • झोपण्यापूर्वी शांत होण्यासाठी योग्य दिनक्रम तयार करणं उपयुक्त ठरतं.
  • स्क्रीन बंद करणं, खोलीतील प्रकाश मंद करणं आणि खोलीचं तापमान कमी ठेवणं हे सर्व फायदेशीर आहे.
झोपेच्या चांगल्या सवयी- स्लीप हायजिनसाठी आवश्यक गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC