Source :- BBC INDIA NEWS
Getty Images
वाचन वेळ: 5 मिनिटे
कधीकाळी मेनका गांधी यांचं हसणं ऐकून सोनिया गांधी त्यांच्या खोलीत जात आणि त्यांना विचारत असत की, एवढं हसायला काय झालं? त्यानंतर तिथेच बसून मेनका यांच्या मित्र-मैत्रिणींबद्दल किंवा त्या वाचत असलेल्या पुस्तकाबद्दल गप्पा ऐकत असत.
सोनिया गांधी यांची मुलगी प्रियंका गांधीही अनेकदा काकू मेनका यांच्या खोलीत बसून त्यांच्या गोष्टी ऐकत असे. हा त्या काळातला प्रसंग आहे, जेव्हा मेनका यांचं संजय गांधींशी लग्न झालं होतं आणि त्या गांधी कुटुंबात ‘धाकटी सून’ म्हणून दाखल झाल्या होत्या.
सोनिया गांधी लिहितात,की सुरुवातीला घरात धाकट्या जाऊबाईचं येणं त्यांना आवडलं होतं. मात्र, हळूहळू दोघींच्या नात्यात आणि घरातील वातावरणात बदल होत गेला.
घरातील कर्मचारी त्यांना ‘बहूरानी’, तर मेनका गांधी यांना ‘छोटी बहू’ म्हणत असत, असं सोनिया गांधी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
सोनिया गांधी यांनी त्यांच्या ‘बिलाँगिंग: ए जर्नी ऑफ लव्ह’ या नव्या पुस्तकात मेनका यांच्यासोबतच्या नात्याच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते मेनका यांनी घर सोडेपर्यंतच्या घटनांना उजाळा दिला आहे.
हार्परकॉलिन्स इंडियाने 10 नोव्हेंबर 2026 रोजी 526 पानांचं हे पुस्तक भारतात प्रकाशित केलं आहे.
या पुस्तकात सोनिया गांधींनी त्या काळातील अनेक क्षणांच्या आठवणी सांगितल्या असून, त्याबद्दल बरीच चर्चा होत आहे.
घरात ‘धाकट्या सुने’चं आगमन
त्यानंतर वर्षभराच्या आत त्यांचं लग्न झालं, त्यावेळी मेनका फक्त 18 वर्षांच्या होत्या.
सोनिया गांधी मेनका यांची आठवण उत्साही, मनमिळाऊ आणि बोलकी तरुणी म्हणून करतात.
त्यांच्या मते, मेनका यांच्या येण्याने सुरुवातीला घरातील वातावरण बदललं आणि त्यांना धाकट्या बहिणीसारखी धाकटी जाऊ मिळाली होती.
Sanjeev Verma/Hindustan Times via Getty Images
सोनिया लिहितात की, कधीकधी मेनका यांचं हसणं ऐकून त्या त्यांच्या खोलीत जात आणि त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी होत असत.
प्रियंका गांधी यांचंही काकू मेनका यांच्याशी चांगलं जमायचं. सोनिया यांच्या म्हणण्यानुसार, प्रियंका अनेकदा मेनका यांच्या खोलीत बसून त्यांच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत असे.
मात्र, काही काळानंतर घरात छोट्या-छोट्या गोष्टींवरून तणाव वाढू लागला, असं सोनियांनी पुढे लिहिलयं.
सोनिया गांधी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलेल्या या उल्लेखांबाबत मेनका गांधी किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
‘बहूरानी’ आणि ‘छोटी बहू’ या संबोधनांमागे काय होतं?
घरातील कर्मचारी सोनिया यांना ‘बहूरानी’ आणि मेनका यांना ‘छोटी बहू’ असं संबोधत असत.
सोनिया लिहितात की, त्यांच्या दृष्टीने त्या दोघीही घरातील मुलींसारख्याच समान होत्या आणि कुटुंबात दोघींनाही समान स्थान होतं.
मात्र, कदाचित मेनका यांनी या दोघींसाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या संबोधनांकडे आपल्याला कमी महत्त्व दिलं जात असल्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं असावं, असं त्यांना वाटत असल्याचं सोनिया गांधींनी पुस्तकात म्हटलं आहे.
सोनिया यांच्या मते, जेव्हा कधी त्यांना मेनका यांचा बोलण्याचा सूर उद्धट वाटायचा, तेव्हा त्या घरातील शांतता टिकवून ठेवण्यासाठी सहसा गप्प राहत असत.
मात्र, एखादी गोष्ट मर्यादेपलीकडे जात असल्याचं वाटलं, तर तेव्हा त्या देखील कठोर शब्दांत उत्तर देत असत.
T.C.Malhotra
मेनका यांच्यासारख्या मनमिळाऊ आणि लोकांमध्ये मिसळायला आवडणाऱ्या तरुणीसाठी संयुक्त कुटुंबात स्वतःला जुळवून घेणं सोपं नव्हतं, असंही सोनिया मान्य करतात.
त्यांच्या मते, घरातील प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असायचा. त्यामुळे मेनका यांना घरातील वातावरण बंधनकारक आणि कंटाळवाणं वाटत असावं.
सोनिया लिहितात की, जेव्हा मेनका संजय गांधी यांच्यासोबत राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहु लागल्या, तेव्हा त्या नव्या वातावरणात काहीशा रुळल्यासारख्या दिसू लागल्या.
मात्र, याच काळात कुटुंबातील तणावही वाढू लागला. सोनिया यांच्या मते, मेनका यांच्यासोबतच्या त्यांच्या नात्यातही हळूहळू दुरावा निर्माण झाला.
संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर काय बदललं?
23 जून 1980 रोजी संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.
सोनिया गांधी यांच्या आठवणींनुसार, त्यानंतर कुटुंबासमोर एक नवा प्रश्न उभा राहिला होता की, मेनका यांना काँग्रेसमध्ये कोणती राजकीय भूमिका द्यावी?
सोनिया लिहितात की, त्यावेळी इंदिरा गांधी मेनका यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याच्या बाजूने नव्हत्या.
त्यांच्या मते, 23 वर्षांच्या मेनका या जबाबदारीसाठी अजून खूप लहान आहेत, असं इंदिरा गांधी यांना वाटत होतं. त्यांचं बाळही त्यावेळी अवघ्या तीन महिन्यांचं होतं. त्यामुळे त्यांनी बाळाच्या संगोपनासाठी वेळ द्यावा, असं इंदिरा गांधी यांना वाटत होतं.
मेनका यांना आपल्या राजकीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पुढे भरपूर वेळ मिळेल, असं इंदिरा गांधी यांचं मत होतं.
मात्र, मेनका यांच्या मनात वेगळ्याच राजकीय योजना होत्या हे लवकरच स्पष्ट झालं, असं सोनिया लिहितात.
या मतभेदांचा परिणाम हळूहळू कुटुंबातील नात्यांवरही होऊ लागला.
मेनका यांनी घर का सोडलं?
सोनिया गांधी यांच्या म्हणण्यानुसार, इंदिरा गांधी शासकीय दौऱ्यावर लंडनमध्ये होत्या, त्यावेळी त्यांना मेनका घरातून आपलं सामान बाहेर काढत असल्याचं कळालं.
लंडनहून परतल्यानंतर इंदिरा गांधी यांनी मेनका यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले.
सोनिया यांच्या मते, इंदिरा गांधी यांनी त्यांना, ज्या राजकीय हालचालींवर त्यांचा आक्षेप होता त्या थांबवाव्यात अथवा दुसरीकडे राहायला जावं, असं सांगितलं.
यावर मेनका यांनी इंदिरा गांधी यांना एक पत्र पाठवलं. या पत्रात अनेक आरोप करण्यात आले होते, असं सोनिया लिहितात.
एनडीटीव्हीने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील उताऱ्यानुसार, मेनका घर सोडत असताना आणि इंदिरा गांधी यांच्यासोबत त्यांचा वाद सुरू असताना राजीव गांधी आणि सोनिया गांधी घरी उपस्थित नव्हते.
असं असूनही मेनका यांनी घर सोडण्यामागे इंदिरा गांधी यांच्यासोबतच राजीव आणि सोनिया यांनाही जबाबदार धरलं, असं सोनिया लिहितात.
या संपूर्ण प्रकरणाला अशा प्रकारे सार्वजनिक स्वरूप देण्यात आलं की, घरातील वादाची चर्चा राजकीय वर्तुळापासून प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचली, असा आरोप सोनिया यांनी केला आहे.
Chandradeep Kumar/The India Today Group via Getty Images
पुस्तकात सोनिया गांधी लिहितात की, मेनका यांनी घर सोडण्याची घटना आणि त्यानंतर झालेला प्रचार पाहता, आजच्या काळात त्याला ‘रिअॅलिटी शो’ असं म्हटलं गेलं असतं.
सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील या आठवणींची सुरुवात मेनका यांच्या हसण्याने आणि दोघींमधील सहज संवादाने होते.
मात्र, पुस्तकाच्या शेवटापर्यंत हेच नातं कौटुंबिक आणि राजकीय आरोपांच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसतं.
अशा प्रकारे सोनिया गांधी यांनी आपल्या आत्मचरित्रात मेनका यांच्यासोबतच्या नात्याची दोन अगदी वेगवेगळी चित्रं सादर केली आहेत.
पहिलं चित्र आहे त्या ‘धाकट्या सुनेचं’ आहे, जिचं हसणं ऐकून सोनिया उत्साहाने त्यांच्याकडे जात असत. तर दुसरं चित्र अशा नात्याचं आहे, ज्यामध्ये मतभेद इतके टोकाला गेले की घराच्या चार भिंती ओलांडून त्यांचं सार्वजनिक आणि राजकीय वादात रूपांतर झालं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




