Home LATEST NEWS ताजी बातमी नेपाळमध्ये पूर आला की भारताला का धडकी भरते? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

नेपाळमध्ये पूर आला की भारताला का धडकी भरते? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

3
0

Source :- BBC INDIA NEWS

नेपाळमध्ये पूर आला की भारताला का धडकी भरते? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

फोटो स्रोत, Getty Images

नेपाळमधील भयंकर पुरानं असाही धोका समोर उभा केलाय, जो केवळ नेपाळच्या सीमांपर्यंत मर्यादित राहत नाही.

हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांतून वाहातात. मात्र, तज्ज्ञांच्या मते, नेपाळमधील पूर आणि भारतावर होणारा परिणाम यांच्यातला संबंध हा फक्त पाण्याच्या प्रवाहापुरता मर्यादित नाही, तर हा संबंध त्यापेक्षा फारच अधिक गुंतागुंतीचा आहे.

काही वेळेस पुराचे लोंढे डोंगराळ भागातून वेगानं खाली येतात आणि त्यांच्यासोबत विपुल प्रमाणात चिखल, दगड आणि गाळ-राडारोडा घेऊन येतात. तर काहीवेळेस हा पूर मैदानी भागात पोहोचेपर्यंत नद्या आपली तीव्रता गमावतात आणि सामान्य प्रकारच्या पुराचं स्वरुप धारण करतात.

नेपाळमध्ये पूर आला की भारताला का धडकी भरते? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

फोटो स्रोत, Getty Images

हे पाणी भारतात संकटाचं कारण ठरेल की नाही, हे केवळ नेपाळमध्ये किती पाऊस पडला यावर अवलंबून नसतं. तर भारतातील पाऊस, नद्यांमधली पाणीपातळी, तटबंदी (लोंढे- प्रवाह रोखण्यासाठी करण्यात आलेली), पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था आणि विकासकामं यांचाही त्यावर परिणाम होतो.

नेपाळमधील पूर ही भारतासाठी एक धोक्याची घंटा आहे. नेपाळमध्ये असलेलं पाणी दक्षिणेकडं भारताच्या दिशेनं वाहत येतं हे एक कारण आहेच. त्याहून भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये एक सामाईक अशी विशाल आणि वेगानं अस्थिर होत चाललेली हिमालयीन नद्यांची प्रणाली आहे, हे त्यातलं महत्त्वाचं कारण आहे.

नेपाळमधील किती नद्या भारतात वाहत येतात?

नेपाळमध्ये 6,000 हून अधिक नद्या आहेत. त्यांपैकी बहुतेक नद्या दक्षिणेकडे वाहत भारतात प्रवेश करतात आणि पुढे गंगेत मिळतात.

तिथं नद्यांच्या तीन नदीप्रणाली किंवा खोरी आहेत. पूर्वेकडे कोसी, मध्यभागी गंडकी (भारतात गंडक) आणि पश्चिमेकडे कर्णाली (भारतात घाघरा), तर पश्चिम सीमेवर महाकाली (शारदा) नदी आहे.

नदी

फोटो स्रोत, Universal Images Group via Getty Images

शिवालिक आणि चुरे पर्वतरांगांतून उगम पावणाऱ्या बागमती, कमला, राप्ती आणि बाबई यांसारख्या एक डझन लहान नद्या तुलनेनं कमी परिचित आहेत. मात्र, त्यांची पाणलोट क्षेत्रं लहान आणि उताराची असल्यामुळं त्या अधिक वेगानं आणि अनपेक्षितपणे पूर आणू शकतात.

इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट (ICIMOD) चे जलतज्ज्ञ मनीष श्रेष्ठ यांच्या मते, नेपाळमधून 7 ते 9 प्रमुख नद्या भारतीय मैदानात प्रवेश करतात आणि त्या भारतातील पुरांसाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत.

भारताच्या केंद्रीय जल आयोगाने कोसी, गंडक, बागमती आणि घाघरा या काही सीमापार असलेल्या महत्त्वाच्या नद्यांची नोंद केली आहे.

भारतातल्या कोणत्या राज्यांना धोका?

बिहार हे भारतातील सर्वाधिक पूरग्रस्त राज्य आहे. उत्तर बिहारमधील जवळपास तीन-चतुर्थांश भाग अधिकृतपणे पूरप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

बिहारमध्ये पूर आणणाऱ्या जवळपास सर्व प्रमुख नद्यांचा उगम नेपाळमध्ये होतो. यामध्ये कोसी नदी सर्वात कुप्रसिद्ध असून तिला ‘बिहारचं दुःख’ असं म्हटलं जातं. त्यानंतर गंडक, बागमती आणि कमला या नद्या येतात.

मात्र, हा धोका केवळ बिहारपुरता मर्यादित नाही.

पूर्व उत्तर प्रदेशला घाघरा, राप्ती आणि गंडक नद्यांमुळं धोका संभवतो. गोरखपूर, बहराइच, लखीमपूर खीरी आणि श्रावस्ती हे जिल्हे नियमितपणे प्रभावित होतात.

कोसी नदीचा पूर

फोटो स्रोत, Getty Images

उत्तराखंड राज्यात महाकाली-शारदा नदी प्रणाली सामाईक आहे. तर उत्तर बंगालमध्ये मेची आणि महानंदा नद्या येतात.

ICIMOD चे जलतज्ज्ञ प्रदीप मान डांगोल म्हणतात, “संख्येच्या दृष्टीने बिहार सर्वाधिक प्रभावित आहे. उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याकडे अनेकदा पुरेसं लक्ष दिलं जात नाही.”

बिहारवर या पुराचा सर्वाधिक भार आहे, पण उत्तर प्रदेशला ही बसणारा फटका तितकाच असून त्याकडे बहुतांशवेळा दुर्लक्ष होतं.

नेपाळमध्ये पूर आला तर भारताचं भवितव्य कोण ठरवतं?

जलतज्ज्ञांच्या मते, ही प्रक्रिया तीन टप्प्यांत समजून घेता येते :

पहिला टप्पा आहे पाऊस. तो कुठे पडतो आणि किती तीव्र असतो.

भारतात पोहोचणारे पुराचे उच्चांक अनेकदा उंच हिमालयात तयार होत नाहीत. ते शिवालिक, चुरे आणि तराई भागात तयार होतात, तिथे उभे-खडे उतार असलेल्या लहान पाणलोट क्षेत्रांवर मुसळधार मान्सून पाऊस पडतो.

दुसरा टप्पा म्हणजे नदी.

नेपाळमधील नद्या पर्वतांमधून मैदानी भागात उतरताना मोठ्या प्रमाणात गाळ आणतात आणि त्याचा संचय करतात. त्यामुळं त्या अनेक शाखांमध्ये विभागलेल्या, सतत दिशा बदलणाऱ्या प्रवाहांचं रूप धारण करतात.

नेपाळमध्ये पूर आला तर भारताचं भवितव्य कोण ठरवतं?

फोटो स्रोत, Getty Images

तिसरा टप्पा म्हणजे पाणी भारतात पोहोचल्यानंतरची परिस्थिती.

पूर किती भीषण ठरेल हे त्या पाण्याला पुढे कोणत्या परिस्थितींचा सामना करावा लागतो यावर अवलंबून असतं. भारतातील त्या काळातील पाऊस, गंगेतील पाणीपातळी, तटबंदी व बंधारे, पूरक्षेत्रातील रस्ते, रेल्वेमार्ग, वस्त्या आणि त्यामुळे अडथळा निर्माण होणारी निचऱ्याची व्यवस्था यांचा त्यात समावेश होतो.

“सीमेपर्यंत पोहोचणाऱ्या पाण्यासाठी प्रामुख्यानं नेपाळमधील पाऊस जबाबदार असतो. पण ते पाणी भारतात आल्यानंतर पूर किती गंभीर होईल, तितकंच हे भारतातील परिस्थितींवर अवलंबून असतं,” असं ICIMODचे आपत्ती जोखीम नियंत्रण विभागाचे इंटरव्हेन्शन मॅनेजर शाश्वत संन्याल सांगतात.

2008 च्या कोसी पुराने काय दाखवून दिलं?

नदीत पात्राच्या क्षमतेपेक्षा खूप कमी पाणी वाहत होतं. तरीही आपत्ती आली कारण तटबंदी फुटला, हे 2008 मधील कोसी पुरानं दाखवून दिलं.

नेपाळमधील कोसी नदीची तटबंदी फुटल्यानंतर बिहारमध्ये जवळपास 400 जणांचा मृत्यू झाला. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा पूर नदीतील एरव्ही येतो तसा असामान्य अशा प्रवाहामुळे आलेला नव्हता.

IIT कानपूरचे भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक राजीव सिन्हा यांच्या मते, नदीतील जलप्रवाह तिच्या वहनक्षमतेच्या केवळ दहाव्या भागाइतकाच होता. ही आपत्ती अनेक दशकांपूर्वी बांधलेल्या आणि योग्य देखभाल न झालेल्या तटाला भगदाड पडल्यामुळे घडली.

सिन्हा म्हणतात, “1950 आणि 1960 च्या दशकात बांधलेल्या तटबंदी योग्य प्रकारे सांभाळल्या गेल्या नाहीत. त्यांची झीज झाली आणि अखेरीस त्या कमकुवत झाल्या. नदीनं याच ठिकाणी तट फोडला आणि जिथं कदाचित गेल्या 100 वर्षात पूर आला नव्हता अशा भागात प्रवेश केला.”

संन्याल यांच्या मते, हा एक संरचनात्मक अपयशाचा परिपाक होता.

नेपाळ भारताला किती आधी इशारा देऊ शकतो?

संन्याल यांच्या म्हणण्यानुसार, सामान्य मान्सून पुरांसाठी भारताला “सुमारे 12 तासांपासून ते 2 दिवसांपर्यंतची पूर्वसूचना मिळू शकते.” हे पाणी किती वेगानं खाली वाहतं यावर अवलंबून असतं.

कोसी आणि गंडक नद्यांमधून नेपाळच्या पर्वतीय भागातून बिहारच्या मैदानांपर्यंत पाणी पोहोचायला साधारण 1 दिवस लागू शकतो. घाघरा नदीमधून त्याहून थोडा अधिक वेळ लागतो.

चुरे प्रदेशातून येणारे अचानक पूर काही तासांतच येऊ शकतात.

भूस्खलन, धरण फुटणं किंवा गाळाचा प्रवाह यांसारख्या घटना याहूनही वेगानं घडू शकतात. सध्याच्या पुरात रसुवा भागातून आलेला उच्चांक गाठणारा जलप्रवाह सुमारे 7.5 तासांत भारतीय सीमेपाशी असलेल्या त्रिवेणी येथे पोहोचला.

नेपाळ भारताला किती आधी इशारा देऊ शकतो?

फोटो स्रोत, Getty Images

भारत आणि नेपाळ अनेक केंद्रांच्या जाळ्याद्वारे रिअल-टाइममध्ये पाऊस आणि नदीच्या जलपातळीच्या माहितीचं आदानप्रदान करतात. नेपाळचा जलविज्ञान आणि हवामानशास्त्र विभाग भारताच्या केंद्रीय जल आयोगाला ही माहिती पाठवतो आणि तिचा वापर पूराच्या पूर्वानुमानासाठी केला जातो.

तरीही संन्याल यांच्या मते काही महत्त्वाच्या उणिवा कायम आहेत.

यामध्ये चुरे प्रदेशात सर्वाधिक वेगानं प्रवाह तयार होणाऱ्या जलक्षेत्रांमध्ये रिअल-टाइम निरीक्षण करणाऱ्या केंद्रांची कमतरता आहे.

तसंच दोन्ही देशांमध्ये एकच संयुक्त पूर्वानुमान प्रणाली नाही. तटांची स्थिती, नदीच्या मार्गातील बदल आणि गाळ याबाबत नियमित माहितीची देवाणघेवाणही मर्यादित आहे.

आणि मग सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो. मिळालेला इशारा जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचणं आणि तो धोक्यात असलेल्या कुटुंबांपर्यंत पोहोचणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

सिन्हा म्हणतात, “या सीमापार नद्यांसाठी माहितीची देवाणघेवाण आणि पूर्वसूचना यंत्रणांवरील सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. हिमनदी तलाव, त्यातील पाणीप्रवाह आणि त्यामध्ये वेळोवेळी होणारे बदल यांचं सातत्याने आणि तातडीने निरीक्षण करण्याची गरज आहे.”

भारत आणि नेपाळमधील पुरांबाबतचा सर्वात मोठा गैरसमज काय आहे?

वैज्ञानिकांच्या मते, एक सामान्य गैरसमज म्हणजे नेपाळ भारताकडे पाणी सोडतो.

संन्याल म्हणतात, “नेपाळमध्ये असं करण्याची क्षमता असलेले मोठे जलाशय जवळपास नाहीत. त्यातील मुख्य साठवण धरण कुलेखानी हे 1 घन किलोमीटरच्या एकदशांश भागापेक्षाही कमी पाणी साठवू शकतं. त्यामुळे सोडण्यासाठी फारसं पाणीच नाही.”

कोसी आणि गंडक बंधाऱ्यांचं व्यवस्थापन भारताकडून केलं जातं. जेव्हा पुराचं पाणी सीमेपर्यंत पोहोचतं, तेव्हा त्यामागील मुख्य कारण वरच्या भागात झालेला मुसळधार पाऊस असतो. ते नेपाळनं धरणांचे दरवाजे उघडले म्हणून होत नसतं.

मात्र, एक महत्त्वाची बाब आहे. उत्तर बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात येणाऱ्या अनेक पुरांमधील मोठा पाण्याचा हिस्सा नेपाळमध्ये पडलेल्या पावसातून येतो. त्यामुळे नेपाळमध्ये किती पाऊस पडतो याचा भारतातील पुरांच्या तीव्रतेवर परिणाम होतो.

नेपाळ गंगेच्या सरासरी वार्षिक प्रवाहातील जवळपास 40% पाणी पुरवतो आणि उन्हाळी कोरड्या हंगामात याहून अधिक योगदान देतो. त्यामुळे त्याची जलव्यवस्था भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

सान्याल म्हणतात, “याकडे कारण आणि दोषारोपाची गोष्ट म्हणून पाहणं म्हणजे ही गोष्ट खूपच सोपी केल्यासारखं होईल. (थोडक्यात दोषारोप करुन मिटवण्याइतकी ही सोपी गोष्ट नाही) पाऊस पडणं हा कोणी घेतलेला निर्णय नसतो.”

एखादा पाणीप्रवाह विनाशकारी ठरणं हे भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांतील परिस्थितींवर अवलंबून असतं. यामध्ये गंगेची पाणीपातळी, भारतातील पाऊस, तटबंदी किती मजबूत आहेत, पाण्याचा निचराचरा आणि गाळ यांचा समावेश होतो.

संन्याल म्हणतात, “याचे परिणाम दोन्ही बाजूंनी होतात. भारताच्या संरक्षणासाठी बांधलेले तट आणि बंधाऱ्यांमुळं नेपाळच्या तराई भागात पाणीपातळी वाढली आहे आणि बॅकवॉटर पूर निर्माण झाले आहेत. ही नेपाळची दीर्घकालीन चिंता आहे.”

भारत आणि नेपाळ मध्ये ही एक सामाईक नदीप्रणाली आहे. यात एक देश वरच्या प्रवाहात तर दुसरा खालच्या प्रवाहात आहे.

म्हणून उपाय दोषारोप करण्यात नाही, तर अधिक चांगला डेटा, संयुक्त पूर्वानुमान आणि सुधारित नदी व्यवस्थापनात आहे.

भारताने नेमकी कोणत्या गोष्टीची सर्वाधिक चिंता करायला हवी?

राजीव सिन्हा म्हणतात, “भारताने चिंता करायला हवी, पण ती फक्त नेपाळमधील कोसी नदीपुरतीच असावी असं आवश्यक नाही.”

दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, तज्ज्ञांच्या मते खरी सूचना हिमालयात घडत असलेल्या बदलांविषयी आहे आणि पाणी, खडक, बर्फ आणि प्रचंड प्रमाणातील गाळ अचानक एकत्र आल्यास काय घडू शकतं याविषयी आहे.

सिन्हा यांच्या मते, नेपाळमधील अलीकडची आपत्ती भारतातील अलीकडच्या अनेक मोठ्या घटनांसारखी आहे. यामध्ये 2021 मधील चमोली आपत्ती आणि उत्तराखंडमधील 2025 मधील धराली आपत्तीचा समावेश होतो. त्यांच्या मते, नेपाळमधील घटना “कदाचित 5 ते 10 पट मोठी” होती.

सिन्हा म्हणतात, “मूळ मुद्दा हा आहे की हे पूर सामान्य नाहीत.”

सामान्य पुरामध्ये मुख्यतः पाणी असतं. पण अतिवृष्टी, वितळणारा बर्फ किंवा अचानक आलेले पाण्याचे प्रवाह हे प्रचंड गाळासोबत मिसळले की एक दाट मिश्रण तयार होऊ शकतं. हे मिश्रण आपल्या मार्गातील जवळपास प्रत्येक गोष्ट नष्ट करू शकतं.

जलप्रवाहानं तटांचं होणारं नुकसान

फोटो स्रोत, Getty Images

2021 मधील चमोली आपत्तीमधून हा धडा मिळाला. त्यावेळी हिमालयातील एका मोठ्या हिमनदीचा भाग कोसळला होता. त्यानंतर पाणी आणि गाळाचा प्रचंड प्रवाह खाली आला. या घटनेत 200 लोकांचा मृत्यू झाला आणि जलविद्युत प्रकल्पांचं मोठं नुकसान झालं.

2025 मध्ये उत्तराखंडमधील धराली येथेही अशीच गोष्ट दिसली. मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला आणि गाळाच्या प्रवाहानं गावातील काही भाग अनेक मीटर खोल खाली गाडले गेले.

हवामान बदल हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे.

तज्ज्ञांच्या मते, अतिवृष्टीची तीव्रता वाढतेय. हा प्रदेश जागतिक सरासरीपेक्षा अधिक वेगानं तापतोय. उष्ण वातावरणात अधिक आर्द्रता साठते आणि मान्सून कमी कालावधीत अधिक पाऊस आणत असला तरी पावसाच्या सरी अधिक तीव्र होत आहेत.

उंच पर्वतीय भागांमध्ये तयार होणारा धोकाही वाढत आहे. पर्माफ्रॉस्ट वितळल्यामुळं हिमनदी तलाव फुटण्याच्या आणि बर्फाळ हिमस्खलनांच्या घटना वाढू शकतात. त्यामुळे अचानक, उच्च वेगानं आणि गाळासह पूर येऊ शकतात, त्यांचा अंदाज करणं कठीण असेल.

अशा घटना वाढल्या तर भूस्खलनांची संख्या वाढेल आणि नद्यांमध्ये गाळही अधिक साचेल. त्यामुळे नद्या उथळ होतील आणि नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होईल. त्याचा परिणाम सीमेच्या दोन्ही बाजूंना जाणवू शकतो.

या सर्व घटना हिमालयात वाढत असलेल्या एका मोठ्या संकटाच्या-धोक्याच्या चित्राचा भाग आहेत. त्यामुळे भारतासाठीचा धोका अधिक गंभीर बनत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC