Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे
पोप लिओ चौदावे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना फुफ्फुसांचा कर्करोग (कॅन्सर) असल्याचे व्हॅटिकनने सांगितलं आहे. यापूर्वी नियमित आरोग्य तपासणीदरम्यान त्यांच्या फुफ्फुसात एक गाठ आढळून आली होती.
71 वर्षीय पोप लिओ यांच्यावर मंगळवारी (13 ऑक्टोबर) रोममधील जेमेली रुग्णालयात 90 मिनिटांची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान ऊतींच्या तपासणीत त्यांना फुफ्फुसांचा ॲडिनोकार्सिनोमा हा कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले, असं डॉक्टरांनी सांगितलं.
व्हॅटिकनने एका निवेदनात म्हटलं आहे की, पोप यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवल्यानंतर त्यांना त्यांच्या खोलीत परत पाठवण्यात आलं.
फुफ्फुसांचा ॲडिनोकार्सिनोमा म्हणजे काय? पोप यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया किती गंभीर होती, त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल?
फुफ्फुसांचा ॲडिनोकार्सिनोमा म्हणजे काय?
व्हॅटिकनच्या म्हणण्यानुसार, फुफ्फुसातील ही एक छोटी गाठ आहे. अशा गाठी सामान्यतः हानिकारक नसतात. अमेरिकन थोरॅसिक सोसायटीच्या (एटीएस) मते, फुफ्फुसात आढळणाऱ्या 5 टक्क्यांपेक्षाही कमी गाठी कॅन्सरच्या असतात. पण, व्यक्तीचे वय, गाठीचा आकार आणि धूम्रपानाची सवय यांमुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
फुफ्फुसातील गाठी या सामान्य ऊतींपेक्षा अधिक घन किंवा दाट असतात. त्यामुळे सीटी स्कॅनमध्ये त्या पांढऱ्या ठिपक्यांसारख्या दिसतात. एटीएसनुसार, यालाच सामान्य भाषेत ‘फुफ्फुसावर डाग पडणे’ असंही म्हटलं जातं.
परंतु, पोप लिओ यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान घेतलेल्या ऊतींच्या तपासणीत ती गाठ फुफ्फुसांचा ॲडिनोकार्सिनोमा असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा फुफ्फुसांच्या कॅन्सरचा एक प्रकार आहे. तो फुफ्फुसांमध्ये श्लेष्मा (बेडका) तयार करणाऱ्या पेशींपासून सुरू होतो.
फोटो स्रोत, Getty Images
डॉक्टर लुइगी कार्बोन आणि स्टेफानो मार्गारिटोरा यांनी होली सीच्या प्रेस कार्यालयामार्फत जारी केलेल्या निवेदनात सांगितलं, “शस्त्रक्रियेदरम्यान केलेल्या ऊतींच्या तपासणीत फुफ्फुसांचा ॲडिनोकार्सिनोमा हा कॅन्सर असल्याचं स्पष्ट झालं. शस्त्रक्रियेपूर्वी केलेल्या तपासण्यांमधूनही याच आजाराची शक्यता वर्तवण्यात आली होती.”
ॲडिनोकार्सिनोमा हा फुफ्फुसांच्या कॅन्सरचा सर्वांत सामान्य प्रकार आहे. विशेष म्हणजे, हा कॅन्सर धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्येही आढळून येतो. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या (सीडीसी) माहितीनुसार, धूम्रपान न करणाऱ्या लोकांना होणाऱ्या फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे 50 ते 60 टक्के प्रकरणं ॲडिनोकार्सिनोमाची असतात.
मे 2025 मध्ये पोप म्हणून निवड झालेले लिओ हे पोपपदाच्या मानाने तुलनेने कमी वयाचे आहेत. त्यांना टेनिससह अनेक खेळांची आवड आहे. ते धूम्रपान करत नाहीत आणि यापूर्वी त्यांना कोणताही गंभीर आजार नव्हता.
शस्त्रक्रिया किती गंभीर होती?
व्हॅटिकनने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी व्हीडिओच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्याच्या तंत्राचा वापर करून पोप लिओ यांच्या उजव्या फुफ्फुसाचा खालचा भाग काढून टाकला.
कॅन्सरची गाठ पूर्णपणे काढून टाकण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली, असं डॉक्टर लुइगी कार्बोन आणि स्टेफानो मार्गारिटोरा यांनी वैद्यकीय निवेदनात सांगितलं.
शस्त्रक्रिया सुमारे 90 मिनिटं चालली. पण, पोप यांना ऑपरेशन थिएटरमध्ये साधारण 3 तास घालवावे लागले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि त्यात कोणतीही अडचण आली नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.
फोटो स्रोत, Vatican Media
काही वेळ डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवल्यानंतर पोप लिओ रोममधील जेमेली रुग्णालयातील त्यांच्या खोलीत परतले. व्हॅटिकनने दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर त्यांनी रात्रीचे जेवण केलं आणि सायंकाळचा वेळ आपल्या सचिवांसह व्हॅटिकनमधील इतर कर्मचाऱ्यांसोबत घालवला.
व्हॅटिकनने सांगितलं की, पुढील तपासण्यांचे अहवाल मिळाल्यानंतर त्यांची माहिती दिली जाईल.
पोप कधी बरे होतील?
पोप लिओ यांना बरं होण्यासाठी सुमारे 1 आठवडा लागण्याची अपेक्षा आहे, असं व्हॅटिकनने म्हटलं आहे.
पोप लिओ यांच्यावर रोममधील जेमेली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णालयाचे पूर्ण नाव अगोस्तिनो जेमेली पॉलीक्लिनिक असं आहे. हे रुग्णालय कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ द सेक्रेड हार्ट या विद्यापीठाशी संलग्न आहे.
रुग्णालयाच्या दहाव्या मजल्यावर पोप यांच्यासाठी खास खोली (विशेष सुइट) आहे. तिथे प्रार्थना करण्यासाठी स्वतंत्र चॅपलही (खासगी प्रार्थनास्थळ) आहे.
फोटो स्रोत, EPA
पोप लिओ यांच्याआधीचे पोप फ्रान्सिस यांच्यावरही याच रुग्णालयात अनेकवेळा उपचार झाले होते. श्वास घेण्यास त्रास होण्यासह इतर समस्यांमुळे दीर्घकाळ आजारी राहिल्यानंतर एप्रिल 2025 मध्ये त्यांचं निधन झालं होतं.
सेंट जॉन पॉल द्वितीय यांनी जेमेली रुग्णालयात बराच काळ व्यतीत केला होता. त्यामुळे त्यांनी या रुग्णालयाला गंमतीने ‘तिसरे व्हॅटिकन’ असं नाव दिलं होतं. व्हॅटिकन आणि पोप यांचे उन्हाळ्यातील निवासस्थान असलेल्या कॅस्टेल गँडोल्फो यांच्यानंतर हे नाव देण्यात आलं होतं.
पोप पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमांत दिसतील?
रुग्णालयामध्ये दाखल होण्यापूर्वीच पोप लिओ यांनी 13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरदरम्यानचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले होते.
शस्त्रक्रिया होणार असूनही, पोप लिओ यांनी सोमवारी (12 ऑक्टोबर) सकाळी त्यांच्या सर्व नियोजित कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
सोमवारी व्हॅटिकनने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमपत्रिकेनुसार, पोप लिओ यांनी त्या दिवशी अर्जेंटिना, निकाराग्वा, जपान, नायजेरिया आणि अमेरिकेतून आलेल्या बिशपांची भेट घेतली होती.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, रोममधील एका सेवाभावी संस्थेच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत पोप लिओ यांनी स्पष्ट आणि ठाम आवाजात संवाद साधला. त्याचबरोबर, त्यांच्या कामाबद्दल सदस्यांचे आभारही मानले.
फोटो स्रोत, Reuters
1.4 अब्ज कॅथलिक ख्रिश्चनांचे प्रमुख असलेल्या पोप लिओ यांचे या आठवड्यात अनेक सार्वजनिक कार्यक्रम होणार होते. त्यामध्ये बुधवारी सेंट पीटर्स स्क्वेअर येथे होणाऱ्या सामूहिक प्रार्थना सभेचाही समावेश होता.
या प्रार्थना सभेचं नेतृत्व कार्डिनल लुईस टॅगल करणार आहेत, असं व्हॅटिकनने सांगितलं.
पोप लिओ हे 6 ते 17 नोव्हेंबरदरम्यान उरुग्वे, अर्जेंटिना आणि पेरू या देशांच्या दौऱ्यावरही जाणार आहेत.
शस्त्रक्रिया आणि त्यानंतर बरं होण्यासाठी लागणारा वेळ यामुळे या दौऱ्यावर परिणाम होईल का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या दौऱ्यात पोप लिओ पेरूमध्ये विमान आणि हेलिकॉप्टरने प्रवास करणार आहेत. तसेच, ते उंचावर असलेल्या ठिकाणांनाही भेट देणार आहेत.
आपला दौऱ्यावर जाण्याचा मानस अजूनही कायम आहे, असं पोप लिओ यांनी रविवारी सांगितलं.
पोप आजारी पडल्यास व्हॅटिकनचा कारभार कसा चालतो?
जगभरातील कॅथलिक ख्रिश्चनांसाठी पोप हे सर्वोच्च धर्मगुरू आहेत. ते आजारी पडल्यास त्यांची जागा घेण्यासाठी कोणताही निश्चित प्रतिनिधी नसतो.
ज्यावेळी पोप आजारी असतात तेव्हाही व्हॅटिकनचा प्रशासकीय कारभार सुरूच राहतो. पण, पोप यांच्या मंजुरीची आवश्यकता असलेले निर्णय सहसा पुढे ढकलले जातात.
पोप यांचं निधन झाल्यास किंवा त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यास, त्यांच्या जागी नवीन पोप निवडण्यासाठी कॉन्क्लेव्ह आयोजित केले जाते. ही प्रक्रिया आयोजित करण्याची जबाबदारी कार्डिनल्स कॉलेजच्या डीनवर असते. सध्या ही जबाबदारी फिलिपिन्सचे कार्डिनल लुइस अँटोनियो टॅगल यांच्याकडे आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




