Home LATEST NEWS ताजी बातमी फेसबूक-इन्स्टाची मालकी असलेल्या Meta ला 5,395 कोटींचा दंड; रात्री नोटिफिकेशन्स बंद, वापरावर...

फेसबूक-इन्स्टाची मालकी असलेल्या Meta ला 5,395 कोटींचा दंड; रात्री नोटिफिकेशन्स बंद, वापरावर मर्यादा

3
0

Source :- BBC INDIA NEWS

मार्क झकरबर्ग

फोटो स्रोत, Reuters

अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातील एका न्यायाधीशांनी गुरुवारी (6 ऑगस्ट) मेटा (Meta) ला आणखी 56.7 कोटी डॉलर्स (सुमारे 5,395 कोटी रुपये) दंड भरण्याचे आदेश दिले.

प्लॅटफॉर्ममुळे मुलांना असलेल्या धोक्याबाबत जनतेला इशारा देण्यात कंपनी अपयशी ठरल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे. मुलांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर मेटाविरुद्ध झालेल्या कारवाईत हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आहे.

अमेरिकेतला हा एक मोठा निर्णय देताना न्यायाधीश ब्रायन बिडशेड यांनी सोशल मीडिया क्षेत्रातील या दिग्गज कंपनीची संभावना “सार्वजनिक उपद्रव” अशी केली आणि त्याची तुलना थेट वायू प्रदूषणाशीच केली. भविष्यातील हानी कमी करण्यासाठी हा निधी वापरला जावा, असे आदेश त्यांनी दिले.

या प्रकरणात मेटाला यापूर्वीच 37.5 कोटी डॉलर्स (सुमारे 3,568 कोटी रुपये) दंड भरण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे कंपनीवर आकारलेल्या दंडाची एकूण रक्कम 94.2 कोटी डॉलर्स (सुमारे 8,963 कोटी रुपये) इतकी झाली आहे.

न्यायाधीश बिडशेड यांनी मेटाची तुलना एका कारखान्याशी केली. जाहिराती आणि मजकूर हे त्याचं उत्पादन असून “मुलांचं मानसिक नुकसान आणि त्यांचे लैंगिक शोषण हे त्या कारखान्यामुळे निर्माण होणारं प्रदूषण आहे, त्यावर नियंत्रण आणले पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.

दोनच दिवसांपूर्वी बीबीसी आयच्या तपासानंतर भारत सरकारने मेटाकडे स्पष्टीकरण मागितलं होतं. भारताच्या सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, मार्क झुकरबर्ग यांनी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री, डीपफेक्स आणि प्लॅटफॉर्मवरील त्रुटींबाबत माफी मागितली आहे.

या दंडाच्या निर्णयानंतर इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप आणि थ्रेड्स या प्लॅटफॉर्मचे मालक आणि संचालक असलेल्या मेटाच्या प्रवक्त्यांनी गुरुवारी सांगितले. “आम्ही या निर्णयाशी असहमत असून त्याविरोधात अपील करणार आहोत.”

ते पुढे म्हणाले, “आमच्या प्लॅटफॉर्मवर लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करतो. वाईट प्रवृत्तीच्या व्यक्ती आणि हानिकारक मजकूर ओळखणं व हटवणं या प्रक्रियेत असलेल्या आव्हानांबाबत आम्ही पारदर्शक राहिलो आहोत.

किशोरवयीन मुलांचे ऑनलाइन संरक्षण करण्याच्या आमच्या कामगिरीवर आम्हाला विश्वास आहे आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणाऱ्या दाव्यांविरोधात आम्ही आमचा बचाव करत राहू.”

या प्रकरणातील यापूर्वीच्या 37.5 कोटी डॉलर्स दंडाबाबतही मेटानं अपील करण्याचा मानस व्यक्त केला होता आणि तसे स्पष्टीकरण दिलं होतं. मुलांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यावर एखाद्या राज्यानं मेटाविरुद्ध यशस्वीपणे दावा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ होती.

मार्क झकरबर्ग

फोटो स्रोत, Getty Images

सध्या अमेरिकेत मेटावर अशाच प्रकारच्या मुद्द्यांवर हजारो खटले सुरू आहेत. न्यू मेक्सिकोमधील या निर्णयांव्यतिरिक्त, याच वर्षी लॉस एंजेलिसमधील अशाच दाव्यांच्या एका प्रकरणातही मेटाला पराभव स्वीकारावा लागला.

न्यू मेक्सिकोमधील हे प्रकरण 2023 मध्ये राज्याच्या वकिलांनी दाखल केलेल्या खटल्यातून उद्भवले. मेटाच्या प्लॅटफॉर्ममुळे मुलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आणि त्यांना लैंगिकदृष्ट्या स्पष्ट सामग्री तसेच लैंगिक गुन्हेगारांच्या संपर्कात आणले गेले, यासाठी कंपनीला जबाबदार धरले जावे, असा युक्तिवाद करण्यात आला होता.

खटल्याच्या पहिल्या टप्प्यात मेटाने न्यू मेक्सिकोच्या अनफेअर प्रॅक्टिसेस ॲक्ट (अनुचित व्यावसायिक पद्धती प्रतिबंधक कायदा) चे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आले.

कंपनीच्या शिफारस करणाऱ्या संगणकीय प्रणालींनी प्रत्यक्षात अल्पवयीन वापरकर्त्यांना हानिकारक सामग्री आणि व्यक्तींकडे “वळवले” असल्याचे न्यायालयाने म्हटले.

शिफारस करणाऱ्या संगणकीय प्रणाली ही अशी साधनं आहेत, ज्यांच्या मदतीने मेटा आपल्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना कोणता मजकूर दिसेल हे आपोआप ठरवते.

खटल्याच्या या दुसऱ्या टप्प्यात निर्णय देताना न्यायाधीश बिडशेड यांनी म्हटलं की मेटामुळे झालेली हानी “सार्वजनिक उपद्रव” या पातळीपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित असा व्यापक प्रश्न, ज्याचा विपरीत परिणाम संपूर्ण समाजावर होत आहे.

मुलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर मेटाला मिळालेला हा सर्वात मोठा दंड तर आहेच, पण एखाद्या सोशल मीडिया कंपनीला “सार्वजनिकदृष्ट्या उपद्रवी” म्हणून घोषित करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.

न्यायाधीशांनी निर्णयात लिहिलं की, “जसा एखाद्या कारखान्यातून होणाऱ्या विषारी प्रदूषणाचा परिणाम समाजाच्या स्वच्छ हवा घेण्याच्या हक्कावर होतो, तसाच मेटाच्या प्लॅटफॉर्मचा मुलांवर होणारा घातक परिणाम केवळ त्या प्लॅटफॉर्मपुरता मर्यादित राहत नाही.

तो संपूर्ण इंटरनेटवर पसरतो आणि त्याहून अधिक चिंताजनक म्हणजे प्रत्यक्ष जगातही पोहोचतो. त्यामुळे प्रभावित होणारी मुलं, त्यांची कुटुंबं, शाळा, रुग्णालयं आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांवर सामाजिक ओझं आणि नुकसान निर्माण होतं.”

फेसबूक-इन्स्टाची मालकी असलेल्या Meta ला 4,931 कोटींचा दंड; रात्री नोटिफिकेशन्स बंद, वापरावर मर्यादा

फोटो स्रोत, Getty Images

मेटाला जो निधी तयार करण्याचे आदेश दिलेत तो निधी “या हानीच्या व्यापक परिणामांना कमी करण्यासाठी” वापरला जाईल, असे न्यायाधीश बिडशेड यांनी म्हटले.

या निधीतील बहुतांश रक्कम, म्हणजे 42 कोटी डॉलर्स (सुमारे 3,996 कोटी रुपये), मेटाच्या प्लॅटफॉर्ममुळे आधीच झालेल्या हानीच्या उपचारासाठी वापरली जाईल.

या आदेशानुसार, “योग्य वैद्यकीय किंवा वर्तनात्मक आरोग्य कार्यक्रम आणि तज्ज्ञांना निधी पुरवण्यासाठी” ही रक्कम वापरली जाणार आहे.

उर्वरित निधीपैकी काही हिस्सा जनजागृती आणि प्रतिबंधात्मक प्रशिक्षणासाठी वापरला जाईल. यात शिक्षक आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना मुलांवरील सोशल मीडिया हानीच्या परिणामांना कसे सामोरे जायचे याचे प्रशिक्षण देणे समाविष्ट असेल.

आदेशात सुचवलेल्या उपाययोजना

न्यायाधीशांनी मेटाला इतर काही उपाययोजनाही लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये:

  • 18 वर्षांखालील वापरकर्त्यांची कोणतीही अकाउंट्स प्रौढ वापरकर्त्यांना शिफारस न करणं
  • कोणत्याही प्रौढ व्यक्तीला अल्पवयीन वापरकर्त्याला संदेश पाठवता येणार नाही याची खात्री करणं
  • अल्पवयीन वापरकर्त्यांकडून किंवा त्यांना नग्नतेशी संबंधित सामग्री पाठवणे अथवा प्राप्त करणे प्रतिबंधित करणं
  • बाल लैंगिक शोषणात सहभागी होणाऱ्या प्रौढ वापरकर्त्यांसाठी एकदाच उल्लंघन आणि कायमची कारवाई धोरण लागू करणं
  • याशिवाय मेटाला पुढील उपाय लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत:
  • 18 वर्षांखालील वापरकर्त्यांसाठी लाईक्सची संख्या दिसणार नाही अशी व्यवस्था करणं
  • अशा वापरकर्त्यांसाठी दररोज रात्री 10:00 PM ते सकाळी 7:00 AM या वेळेत पुश नोटिफिकेशन्स बंद करणं
  • तसेच शैक्षणिक वर्षादरम्यान, आठवड्याच्या शेवटच्या दिवसांव्यतिरिक्त, 8:00 AM ते 3:00 PM या वेळेतही पुश नोटिफिकेशन्स बंद करणे
  • इन्स्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही प्लॅटफॉर्मवर अशा वापरकर्त्यांसाठी दरमहा एकत्रित 90 तासांच्या वापराची अनिवार्य मर्यादा लागू करणं, म्हणजे दररोज साधारण तीन तास

पुढील आठवड्यात मेटाविरुद्ध कॅलिफोर्नियामध्ये आणखी एका महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे. अमेरिकेतील जवळपास तीन डझन राज्यांच्या अटर्नी जनरल्सनी मुलांच्या गोपनीयतेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत कंपनीविरुद्ध दावा दाखल केला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC