Source :- BBC INDIA NEWS

“बाबा नसल्यामुळे आम्ही पुरते खचलो. आता तरी सरकारनं त्यांची आश्वासनं पूर्ण करावी. तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करत नसाल तर परत आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळेल. अशी आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे माझ्या बाबांचा जीव गेला. तुम्ही तुमचे आश्वासन पाळले, तुमचे काम प्रामाणिकपणे केले तर कितीतरी जीव वाचतील.”
आपले जीवन संपवलेल्या शेतकऱ्याची मुलगी घराच्या दरवाज्यात बसून रडत रडत नेत्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत होती.
भंडाऱ्यातील धोप गावचे शेतकरी राजेंद्र सपाटे यांनी पालकमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर आपले जीवन संपवले. त्यानंतर त्या परिसरातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे?
अल्पभूधारक शेतकरी कसे जगतात? हे बघण्यासाठी आम्ही पोहोचलो भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि तुमसर तालुक्यात.
निकीता सपाटे ही राजेंद्र सपाटे यांची मुलगी. ती सध्या नाशिकला बीएसएस्सी नर्सिंग करतेय, तर तिचा भाऊ वैभव अकोल्या बीएस्सी फॉरेस्ट्री शिकतोय. त्यांचं शिक्षण आणि घरातला खर्च फक्त चार एकर शेतीवर चालायचा. निकीताचे वडील राजेंद्र या शेतात भातपीक घ्यायचे. पण, यावर्षी पावसाअभावी त्यांच्या शेतातील भातपीक पूर्णपणे वाळलं. त्यामधून काहीच उत्पादन होणार नाहीये.
(जीवन संपवणे ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. जर तुम्हीदेखील तणावात असाल तर भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 18002333330 ची मदत घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी देखील बोललं पाहिजे.)

दोन तीन शेतांच्या नंतर सोरणा तलावाचा कॅनल जातो. त्यापासून एक छोटासा नाला त्यांच्या शेताजवळ येतो. पण, कॅनलच्या दुरवस्थेमुळे आणि शेत शेवटी असल्यानं त्यांना शेतासाठी पाणी मिळत नव्हतं. तसेच रामटेक-तुमसर रस्त्यांचं बांधकाम झाल्यानं रस्त्यांचं पाणीसुद्धा शेतात उतरत नाही.
त्यामुळे भातपीकाला फटका बसला. इतकंच नाहीतर शेतात जाण्यासाठी नीट रस्ता पण नाही. या सगळ्या मागण्या घेऊन राजेंद्र सपाटे वारंवार सरकार दरबारी जायचे. पण, प्रत्येकवेळी निराशाच हाती आली.
शेवटी 3 ऑक्टोबरला पालकमंत्री पंकज भोयर दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आले. त्यांच्यासमोर राजेंद्र यांनी व्यथा मांडली. ते रडले सुद्धा. त्यानंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी त्यांनी धडपड केली. पण, भेट होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांनी थेट विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं, अशी माहिती त्यांची पत्नी शालू सपाटे यांनी दिली.
भातपीक करपल्यानं मुलांच्या शिक्षणाची चिंता
सपाटे यांना मुलांच्या शिक्षणाची चिंता होती. कारण, त्यांच्या भरवशावर दोन्ही मुलांचं शिक्षण होतं. आता बाबा गेल्यानंतर आमच्या शिक्षणाचं काय होणार? अशी चिंता मुलगी निकीताला लागली आहे.
ती सांगतेय, “आमचे बाबाच आमचे बॅकबोन होते. आम्ही दुसऱ्या शहरांमध्ये शिक्षण घेतोय. तिथला खर्च कसा परवडणार आहे? आमचं शिक्षण कसं होणार आहे याचा विचारच करू शकत नाही. माझ्या बाबांसारखा दुसरा जीव जाऊ नये यासाठी सरकारनं आमच्या गावातल्या शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय करावी.”
निकीताच्या वडिलांनी जीवन संपवल्यावर सरकारमधील नेत्यांनी तिच्या घरी भेटी दिल्या. शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचे आश्वासन देखील दिले. पण, हे आश्वासन त्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण करावे अशी अपेक्षा निकीता व्यक्त करतेय.

तिची आई आणि भाऊ अजूनही या दुःखातून सावरू शकले नाहीत. निकीता सतत रडणाऱ्या आई आणि भावाला धीर देतेय.
निकीताची आई सांगतेय, “राजेंद्र यांना कर्जाची खूप भीती वाटायची. मी कर्ज कसं फेडेन असं ते म्हणायचे. त्यामुळे सरकारी बँकांचं कर्ज कधी उचललं नाही. पण, ते नातेवाईकांकडून बिनव्याजी पैसे घ्यायचे. एकाकडून उचलले की दुसऱ्याला द्यायचे. मुलांना शिक्षणासाठी पैसे द्यायचे तेव्हा कुठन आणले विचारलं तर मी करतो बरोबर असं बोलायचे.”
आता शेतात काहीच होणार नव्हतं. त्यामुळे त्यांना चिंता लागली होती, असंही त्या सांगतात.
आम्ही सपाटे यांच्या घरी भेट दिल्यानंतर त्यांच्या शेतात पोहोचलो तर तिथली अवस्था फारच वाईट आहे. शेतातलं भातपीक गर्भावस्था येण्याआधीच पूर्णपणे करपलं आहे. तसेच अर्ध्या शेतात त्यांना पाऊस नसल्यानं भातपीक सुद्धा लावता आलं नाही.
फक्त सपाटे कुटुंब नाहीतर इथल्या अल्पभूधारक आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था सारखीच आहे.
‘खायला तांदूळ उरला नाहीतर सावकाराचे दोन लाख कुठून देऊ?’
भंडारा जिल्हा भाताचं उत्पादन घेणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे. इथं जवळपास 1.18 लाख हेक्टरवर भाताचं उत्पादन होतं. तसेच अतिशय उत्तम दर्जाचा तांदूळ या भागात होतो. भंडारा हा चांगल्या पावसाचा आणि भरपूर तलावांचा जिल्हा असल्यानं अनेक शेतकरी दुसऱ्या हंगामातही तांदळाचं उत्पादन घेतात. पण, यावर्षी पावसात 16 टक्के तूट आहे.
पहिल्याच हंगामासाठी पाणी पुरेस नसल्यानं भातपीक पूर्णपणे करपलं आहे. सिंचनाची सोय आहे त्यांचं भातपीक टिकून आहे. पण, कोरडवाहू पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेतकऱ्यांचं भातपीक करपल्यानं नुकसान झालंय.

त्यापैकीच एक या भागातले अल्पभूधारक शेतकरी अरविंद धुर्वे आहेत. त्यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे. पण, त्यांच्या शेतातलं भातपीक पूर्णपणे करपलं आहे. त्यांनी आता जनावरांसाठी चारा होईल या आशेनं हे भातपीक वेळेआधीच काढायला घेतलंय. तसा भातपीक कापणीचा हंगाम नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी असतो. पण, पीक करपल्यानं वेळेआधीच कापण्याची वेळ कोरडवाहू शेतकऱ्यांवर आली आहे.
धुर्वे सांगतात, ‘मी दोन लाख रुपये कर्ज घेतलं. सावकाराकडून घेतलं किंवा आणखी कुठून घेतलं माझं मला माहिती आहे. पण, आता खायला तांदूळ उरला नाहीतर मी सावकाराचे दोन लाख रुपये कसे देऊ? आमच्या पूर्ण कुटुंबावर मरायची पाळी आली आहे.’
त्यांच्या शेतातल्या तूर सध्या हिरव्या दिसत होत्या. पण, जमिनीत ओलावा टिकून आहे तोपर्यंत तूर टिकेल. त्यानंतर ऐन शेंगा येण्याच्या हंगामात तूर वाळून जाईल अशीही भीती ते व्यक्त करत होते.
‘पोरींचं शिक्षण बंद करायला लागेल’
दुसरे शेतकरी संतोष निमकर यांच्याकडे फक्त अडीच एकर शेती आहे. यावर त्यांना सात जणांचं पालनपोषण आणि तीन मुलींचं शिक्षण करायला लागतं.
पण, त्यांच्या अडीच एकर शेतीमधलं भातपीक पूर्णपणे करपलं आहे.
निमकर म्हणतात, “यानंतरचं जगणं कठीण दिसतंय. कसं जगायचं हा मोठा प्रश्न आहे. कुणाकडे मोलमजुरीनं जायचं तर ती पण मिळणार नाही. कारण, कास्तकाराकडे कामच राहणार नाही तर तो कुठून देईल. घरी धान्य सुद्धा घेऊ शकणार नाही. सरकार रेशन देतं तेच खायला लागेल. पोरींच्या शिक्षणासाठी कर्जबाजारी व्हायला लागेल नाहीतर त्यांचं शिक्षण बंद करायला लागेल.”

या परिसरात तलावाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे पीकसुद्धा करपले आहे. कारण, इथला शेतकरी ज्या तलावातून सिंचन करतोय तो सोरणा तलाव कोरडा पडत चाललाय. आता फक्त 12 टक्के पाणी शिल्लक राहिलं आहे.
दरवर्षी हा तलाव शंभर टक्के भरला तर इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचं सिंचन होऊन दुसऱ्या हंगामात भातपीक घेता यायचं. पण, यावर्षी तलाव 25 टक्केही भरला नाही. जी पाण्याची स्थिती मार्च-एप्रिल महिन्यात असते ती स्थिती आता दिसतेय.
तसेच या भागात बावनथडी प्रकल्प सुद्धा आहे. पण, 1992 ला उद्घाटन होऊन त्यांच्या कालव्याचं काम अपूर्ण आहे. त्याचं पाणी मिळालं असतं तर आमच्याकडच्या भातपिकाची अवस्था अशी नसती आणि आमच्या भागातल्या शेतकऱ्यावर जीवन संपवण्याची पाळी आली नसती असं याच भागातले ताडगाव इथले शेतकरी प्रल्हाद मने बोलून दाखवतात.
जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटले?
एकूण किती भातपिकाचं नुकसान झालंय याबद्दल आम्ही जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्यासोबत संपर्क साधला.
ते म्हणाले, सध्या भातपीक पिवळं पडणं आणि करपणं या दोन गोष्टी दिसत आहेत. पण, यापेक्षाही हार्वेस्टींग झाल्यानंतर उत्पादन होतं की नाही त्यावरही नुकसान अवलंबून आहे. त्यामुळे आमचे पंचनामे खूप धीम्या गतीनं सुरू आहे. हार्वेस्टींग झाल्यानंतर आणखी नुकसान वाढण्याची शक्यता आहे.”
सोबतच शेतकऱ्यांनी दुसऱ्या हंगामात कमी पाणी लागेल अशी पिकं घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यावर अपडेट करण्यात येईल.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई – 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस – 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स – 080 – 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




